तोगडिया भाजपसोबतच्या कुरबुरींची किंमत मोजत आहेत का?

प्रवीण तोगडिया

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अजय उमट
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

"जुने खटले काढून माझ्याविरोधात षडयंत्र सरकारनं सुरू केलं आहे. सरकारला माझं एन्काऊंटर करायचं असून काही दिवसांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे," असे आरोप विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत केले.

हे आरोप करताना तोगडिया डॉक्टरांसमवेत व्हीलचेअरवरच पत्रकार परिषदेत दाखल झाले होते. हे आरोप करताना तोगडिया यांना रडू कोसळलं. माझ्या घराची झडती का घेतली जात आहे? मी सराईत गुन्हेगार आहे का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

रस्त्यात बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांना अहमदाबादमधल्या चंद्रमणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर मंगळवारी सकाळी शुद्धीवर आल्यावर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली.

राजस्थानातील गंगापूर कोर्टानं दंगलीच्या एका प्रकरणात तोगडिया यांना समन्स बजावलं आहे. अनेकदा समन्स बजावूनही ते कोर्टात हजर न राहिल्यानं त्यांना आता आजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे.

त्यामुळे राजस्थान पोलीस त्यांना सोमवारी अटक करण्यासाठी अहमदाबादमधल्या सोला पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, ते घरी न सापडल्यानं पोलीस राजस्थानला परतले.

त्यानंतर दुपारी अडीच वाजता झेड प्लस सुरक्षा असलेले तोगडिया एका व्यक्तीसोबत ऑटोमध्ये बसून जाताना दिसले होते. यानंतर रात्री साडेआठ वाजता कोतरपूरजवळ ते बेशुद्ध अवस्थेत सापडले होते.

15 दिवसांत अनेक नोटिसा

गेल्या 15 दिवसांत तोगडिया यांना अनेक प्रकरणांची समन्स प्राप्त झाली आहेत. 1998च्या एका प्रकरणात 2017मध्ये त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं होतं.

त्यामुळे या प्रकरणी त्यांना कोर्टात हजर राहावं लागलं होतं. आता त्यांना राजस्थानच्या गंगापूरवरून एक वॉरंट बजावण्यात आलं असून हरियाणावरुनही त्यांच्या विरोधात वॉरंट बजावलं जाण्याची शक्यता आहे.

प्रवीण तोगडिया

फोटो स्रोत, Getty Images

म्हणजेच आता जुने खटले पुन्हा तोगडियांसमोर उभे ठाकले आहेत. हा योगायोगही असेल मात्र, तोगडियांचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत वाजल्याचं बोललं जात आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुख पदाच्या निवडणुकीसाठी जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली, तेव्हा त्यांनी ही निवडणूक लढवू नये, असं संघ आणि भाजपमधील एका गटाला वाटत होतं.

मात्र भुवनेश्वर इथल्या बैठकीत त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांना 3 वर्षांसाठी कार्यकारी प्रमुख बनवण्यात आलं.

भाजप नेत्यांसोबत मतभेद का?

असं मानलं जातं की, तोगडिया यांचे भाजपच्या नेत्यांसोबत बरेच वैचारिक मतभेद आहेत. राम मंदिर, कलम 370, समान नागरी कायदा याविषयांवर तोगडिया फार कठोर बोलतात.

गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की, राम मंदिर निर्माण करण्यासाठी मोदी सरकारनं संसदेत एक विधेयक सादर करणं आवश्यक आहे.

प्रवीण तोगडिया

फोटो स्रोत, Getty Images

यावेळी वेगवेगळ्या 6 मुद्द्यांवर त्यांनी मोदी सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. राम मंदिराव्यतिरिक्त यात रोजगार, शेती यांसारखे मुद्देही होते. तीन तलाकच्या मुद्द्यावर मोदी सरकारनं कठोरतेनं बोललं पाहिजे, अशी भूमिका ते मांडतात.

तोगडिया किती मजबूत?

तोगडियांना घाबरायला हवं इतके मजबूत ते आता राहिले नाहीत. मात्र, ते शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांसारख्या सरकारला आव्हान देणाऱ्या नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.

तसंच ते सरकार विरोधी वक्तव्यही उघडपणे करत असतात. भाजपमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आता दिसत नाही.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)