2002च्या दंगलींनंतर तोगडिया, मोदींमध्ये दरी?

तोगडिया

फोटो स्रोत, AFP

    • Author, विकास त्रिवेदी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

हातात धारदार त्रिशूल, कपाळावर टिळा, गळ्या भोवती भगवा स्कार्फ आणि समोर लोकांची गर्दी. मंचावर उभी असलेली ही व्यक्ती समर्थकांसमोर काही अशा प्रकारे भाषणं देते.

  • हैद्राबादमध्ये एक कुत्रा आहे, जो स्वत:ला वाघ समजतो.
  • 'भारत माता की जय' न म्हणणारा एक दिवस पाकिस्तान जिंदाबाद म्हणेल.
  • हिंदू लोकांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे.
  • मुसलमान 2002च्या दंगली विसरले असतील, पण त्यांना 2013च्या मुजफ्फरनगरमधल्या दंगली जरूर आठवतील.
  • गांधींच्या विचारांना मानणारे आहेत, म्हणून इथे दहशतवाद आहे.

या व्यक्तीची ही वक्तव्यं वेगवेगळ्या प्रसंगांची आहेत. या भाषणांना उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळतो. अशी वक्तव्यं करणारे प्रवीण तोगडिया कँसरवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. पण गेल्या काही दशकांपासून त्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी संबंध राहिलेला नाही. ते आता हिंदुत्वाची 'प्रॅक्टिस' करतात.

आता चर्चेत का आहेत तोगडिया?

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचं नाव जेव्हा कानावर पडतं तेव्हा लोकांना त्यांच्या नावाबरोबरच अनेक वादग्रस्त शब्दही ऐकू येतात.

सध्या तोगडिया यांच्याविरुद्ध राजस्थानच्या गंगापूर न्यायालयानं एका दंगलीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. सोमवारी सकाळी जेव्हा राजस्थान पोलीस त्यांना अटक करायला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा ते घरी नव्हते.

अखेर तोगडिया अहमदाबादेतल्या चंद्रमणी हॉस्पिटलमध्ये सापडले. डॉक्टरांच्या मते, "त्यांना जेव्हा हॉस्पिटलला आणण्यातं आलं तेव्हा ते बेशुद्ध होते. त्यांच्या रक्तातल साखरेचं प्रमाण कमी झालं होतं."

तब्येत ठीक झाल्यावर मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर येऊन तोगडिया म्हणाले, "माझं एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र आहे. गुप्तचर विभाग माझ्यामागे आहे. हिंदू एकता, गौरक्षण यासाठी मी जे काम करतो त्याला दाबण्याचे प्रयत्न केले जात आहेत."

तोगडिया

फोटो स्रोत, Getty Images

गुजरातमधले ज्येष्ठ पत्रकार अजय उमठ यांच्या मते, गेल्या काही दिवसांत तोगडिया यांच्याविरुद्ध वॉरंट निघण्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. 1998च्या एका प्रकरणाची 2017मध्ये दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट काढण्यात आलं होतं. त्याप्रकरणी तोगडिया हजर झाले. त्याबरोबरच अनेक जुनी प्रकरणं समोर येऊ लागली होती.

दोन आठवड्यांआधी प्रवीण तोगडिया यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या एका मुलाखतीत स्वत:विरुद्ध निघालेल्या वॉरंटवर आश्चर्य व्यक्त केलं होतं.

तोगडिया म्हणाले होते, "हे अतिशय आश्चर्यकारक आणि दु:खद आहे. काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करणाऱ्या देशद्रोहींविरुद्ध दाखल झालेले खटले मागे घेतले जातात. पण देशभक्त प्रवीण तोगडियाविरुद्ध खटले परत घेतले जात नाहीत. म्हणजे माझी लायकी लष्करावर हल्ला करणाऱ्या लोकांपेक्षा कमी झाली आहे."

तोगडिया तुम्हाला किती माहिती आहेत?

विश्व हिंदू परिषदेच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार तोगडिया यांचा जन्म 12 डिसेंबर 1956 रोजी झाला. गुजरातमध्ये अमरेली जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या प्रवीण यांची आई दूध विकायची.

लहान वयातच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले होते. पण त्यांचं डॉक्टर बनायचं स्वप्नही लहानपणापासूनच होतं. त्यासाठी त्यांनी अहमदाबाद गाठलं आणि तिथेच त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं.

तोगडिया यांनी हजारपेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा उल्लेख या वेबसाईटवर आहे. तोगडिया एकदा म्हणाले होते की त्यांच्या ऑपरेशन टेबलवर आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

प्रवीण तोगडिया

फोटो स्रोत, Getty Images

चौदा वर्षं प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्राला रामराम ठोकला आणि हिंदुत्ववादी अजेंडा पुढे नेण्यास सुरुवात केली.

आता प्रवीण तोगडिया यांच्या वक्तव्यामुळे लोकांचा जीव धोक्यात जातो. यावर तोगडिया म्हणतात, "गांधीच्या स्वातंत्र्य लढ्यातही कित्येक लोकांचा बळी गेला होता."

तोगडिया यांचं अहमदाबादेत 'धन्वंतरी' नावाचं एक हॉस्पिटल आहे. राजस्थान पोलिसांना गुंगारा देत याच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता, अशी माहिती त्यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मोदींबरोबर संघात होते तोगडिया

1980च्या दरम्यान तोगडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघं संघात स्वयंसेवक होते. पण काही काळानंतर तोगडिया विश्व हिंदू परिषदेत गेले तर मोदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

प्रवीण तोगडिया राम मंदिर आंदोलनाच्या वेळीही सक्रिय होते. 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीतसुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप झाला. पण 2002 नंतर तेव्हा सत्तेवर असलेल्या मोदी सरकारने जी कारवाई केली तेव्हापासून दोघांमध्ये दुरावा वाढत गेला.

मोदींचे टीकाकार

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई '2014 - The Election that changed India' या पुस्तकात लिहितात, "फेब्रुवारी 2002 मध्ये झालेल्या घटनेचे खरे बॉस नरेंद्र मोदी नाही तर प्रवीण तोगडिया होते."

गुजरातमधल्या मंदिरांची तोडफोड हेसुद्धा या दोघांमधल्या मतभेदाचं एक कारण समजलं जातं. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, 2008 साली अनेक अनधिकृत मंदिरं तोडण्यात आली होती. त्यावरून तोगडिया आणि मोदी यांच्यात एक भेटही झाली होती.

तोगडिया

फोटो स्रोत, Getty Images

सत्तेत आल्यावर मोदी सरकारचं राममंदिरासाठी काही न करणं आणि गोरक्षेवरून झालेल्या हिंसेवरून मोदी यांच्या वक्तव्यावर तोगडिया यांनी टीका केली होती.

तोगडिया म्हणाले, "मुसलमानांना रोजगार देण्याची तुम्ही चिंता करता. देशाच्या 80 टक्के लोकांना खोटं आणि गुन्हेगार ठरवलं जात आहे, कारण ते हिंदू आहेत. हा गोमाता आणि हिंदूंचा अपमान आहे."

तोगडिया यांची त्रिशूल दीक्षा

आपल्या कृत्यांनी चर्चेत येण्याची त्यांची ही पहिली वेळ नाही.

एप्रिल 2003मध्ये तोगडिया यांना अजमेरमध्ये शस्त्र कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपांखाली राजस्थानमध्ये अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या मते, कायद्यानं बंदी असतानाही तोगडिया यांनी राजस्थानमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना त्रिशूल वाटले होते.

तोगडिया

फोटो स्रोत, Getty Images

या अटकेमुळे तोगडिया यांच्यावर फारसा फरक पडला नाही आणि काही दिवसांतच त्यांनी इतर राज्यांतही हा कार्यक्रम राबवला.

याबरोबरच त्यांच्यावर प्रक्षोभक भाषणांसाठी अनेक खटले दाखल झाले आहेत. पण प्रत्येकवेळी ते काही दिवस विजनवासात जातात आणि काही दिवसांनंतर पुन्हा ते मंचावर दिसतात. कॅंन्सरचे डॉक्टर असलेले तोगडिया भाषणांच्या प्रॅक्टिसमध्ये गुंतून जातात आणि समोर उपस्थित लोक उत्साहात त्यांचा जयजयकार सुरू करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)