'अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रशियाच्या हस्तक्षेपाची शक्यता'

फोटो स्रोत, MIKHAIL KLIMENTYEV/AFP/Getty Images
- Author, गॉर्डन कोरेरा
- Role, बीबीसी सुरक्षा प्रतिनिधी
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रशियाकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे, असं अमेरिकेच्या CIA या गुप्तचर संघटनेचे संचालक माइक पाँपेओ यांनी म्हटलं आहे.
CIA या संस्थेबद्दल आपण हॉलिवूडच्या चित्रपटातून ऐकलं असेल. पण या संघटनेचं कामकाज कसं चालतं, ट्रंप यांना माहिती कशी पुरवली जाते आणि ते या संस्थेचं कामकाज ते कसं पाहतात या विषयी CIA प्रमुखांनी बीबीसीशी संवाद साधला आहे. त्यांच्याजवळ असलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी काही भाकीतं केली आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना महत्त्वाच्या विषयातलं कळत नाही, असा आरोप 'फायर अॅंड फ्युरी' या पुस्तकात मायकल वुल्फ यांनी केला आहे. पण या आरोपात काही तथ्य नाही, असा निर्वाळाही पाँपेओ यांनी दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2016 च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांमध्ये रशियानं हस्तक्षेप केला असं अमेरिकेतील गुप्तचर संघटनांना वाटतं.
"अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांत रशियाकडून हस्तक्षेप केला जाईल. रशियाचे हे प्रयत्न रोखण्यासाठी युरोप आणि अमेरिकेत संस्थात्मक पातळीवर फारसे प्रयत्न झालेले नाहीत," असं पाँपेओ यांचं म्हणणं आहे.
"अमेरिकेवर हल्ला करता येईल अशा क्षमतेची क्षेपणास्त्रं उत्तर कोरियाकडून लवकरच तयार केली जातील," असंही ते म्हणाले.
"अमेरिकेची CIA ही आमची संघटना जगातली सर्वोत्तम गुप्तहेर संघटना आहे," असं पाँपेओ यांनी म्हटलं. "आम्ही आमचं काम अगदी चोखपणे बजावतो. अमेरिकेच्या लोकांच्या वतीने आम्ही सर्व रहस्य शोधून आणू," असं पाँपेओ यांनी म्हटलं.
"आम्ही आमच्या उद्दिष्टांबाबत स्पष्ट आहोत. डोनाल्ड ट्रंप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं कामकाज सुरळीत सुरू आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, Getty Images
पाँपेओ यांच्या हाती प्रमुखपदाची सूत्रं 2017 मध्ये आली. तेव्हापासून संस्थेत काय बदल घडले याची माहिती त्यांनी बीबीसीला दिली. तसंच पुढची दिशा काय असेल याची चर्चासुध्दा त्यांनी या मुलाखतीत केली.
रशिया आणि अमेरिका
"रशिया आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये बदल झाला आहे," असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे, "असं असलं तरी आम्ही त्यांना आजही एक स्पर्धकच मानतो. त्यांच्या छुप्या कारवाया काही कमी झाल्या नाहीत हे देखील एक सत्य आहे," असं पाँपेओ म्हणतात.
"अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहेत. त्या मध्यावधी निवडणुकांच्या वेळी रशियाकडून नक्कीच हस्तक्षेप केला जाऊ शकतो. पण अमेरिकेतील निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही त्यांचे प्रयत्न नक्कीच हाणून पाडू," असं ते म्हणाले.
"रशियाचे प्रयत्न रोखणं हा आमच्या संस्थेचा मूळ उद्देश नाही. महत्त्वपूर्ण माहिती गोळा करून लोकांना सहकार्य करणं हे आमचं काम आहे. पण त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी हे करणं आवश्यक आहे," असं ते म्हणाले.
ट्रंप CIA चं कामकाज कसं पाहतात?
रशियाचा हस्तक्षेप झाला नाही असं ट्रंप म्हणतात. त्यांच्या आणि तुमच्या मतांमध्ये फरक आहे असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, तसं नाही. "मत देणं हे आमचं काम नाही तर सत्य मांडणं हे आमचं काम आहे."

"आम्ही ट्रंप यांच्यासमोर तथ्य आणि सत्य मांडतो. राष्ट्राध्यक्षांना माहिती पुरवणं हे आमचं रोजचं काम आहे. त्यांना वैयक्तिकरीत्या ही माहिती दिली जाते. चालू घडामोडी आणि धोरणात्मक मुद्द्यांची माहिती मी त्यांना रोज पुरवतो. जेव्हा ते राजधानीमध्ये नसतात तेव्हा त्यांना परतल्यावर ही माहिती दिली जाते," असं पाँपेओ यांनी सांगितलं.
"राष्ट्राध्यक्ष ट्रंप हे एकाग्र चित्तानं या विषयावर काम करतात आणि ते जिज्ञासू आहे. आम्ही ही माहिती कशी गोळा केली हे देखील ते विचारतात. CIAने या माहितीवर का विश्वास ठेवला याची पडताळणी ते करून पाहतात," अशी माहिती त्यांनी दिली.
'फायर अॅंड फ्युरी'मधले दावे खोटे
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर फायर अॅंड फ्युरी हे एक पुस्तक नुकतंच आलं. मायकल वुल्फ यांनी लिहिलेलं हे पुस्तक वादग्रस्त ठरलं आहे. या पुस्तकाबाबत तुमचं काय मत आहे असं विचारलं असता पाँपेओ म्हणाले, "मी पुस्तक वाचलं नाही आणि वाचायची इच्छाही नाही. पण या पुस्तकाबद्दल जे ऐकलं त्या आधारावर माझं हे निरीक्षण आहे की या पुस्तकातले दावे खोटे आहेत."

फोटो स्रोत, PAUL J. RICHARDS/AFP/GETTY IMAGES
"राष्ट्राध्यक्षांना महत्त्वपूर्ण विषयांची समज नाही असं म्हणणं धोकादायक आहे आणि खोटं आहे. लेखकाच्या वेडगळपणाचं मला अतोनात दुःख झालं आहे," असं पाँपेओ यांनी म्हटलं.
किम जाँग उन आणि अमेरिका
डोनाल्ड ट्रंप यांच्या ट्विटरवरील भाषा प्रयोगावरून त्यांना विचारले असता ते म्हणाले, "उत्तर कोरियाला ज्या भाषेत समजतं त्या भाषेत राष्ट्राध्यक्षांकडून उत्तर दिलं जातं. राष्ट्राध्यक्षांच्या ट्वीटमुळं परिस्थिती चिघळली नाही तर आटोक्यात आली".

फोटो स्रोत, AFP
"उत्तर कोरियाच्या कारवायांना रोखणं हे आमचं उद्दिष्ट आहे," असं ते म्हणाले. "अमेरिकेलाही लक्ष्य करू शकतील अशा क्षमतेची क्षेपणास्त्र काही महिन्यांमध्येच उत्तर कोरियात तयार होण्याची शक्यता आहे. या विषयासंदर्भात आवश्यक माहिती गोळा करून ती आम्ही राष्ट्राध्यक्षांना पुरवणार आहोत जेणेकरून ते योग्य निर्णय घेऊन परिस्थिती आटोक्यात आणू शकतील."
"कोणताही निर्णय घाईगडबडीत आणि विचारपूर्वक घेतला नाही तर मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होऊ शकते याची राष्ट्राध्यक्षांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाणीव आहे," असं पाँपेओ म्हणतात.
अणुयुद्ध टाळायचं असेल तर किम जाँग उन यांना पदावरून काढून टाकणं शक्य आहे का असं विचारलं असता ते म्हणाले, "हो खूप गोष्टी शक्य आहेत." पण हे कसं शक्य आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








