भ्रष्टाचाराच्या शिक्षेतून सुटण्यासाठी सौदी प्रिन्स तलाल यांनी पैसे दिले?

फोटो स्रोत, Getty Images
भ्रष्टाचाराच्या आरोपात गेल्या दोन महिन्यांपासून ताब्यात असलेले सौदी अरेबियाचे प्रिन्स अलवलीद बिन तलाल यांची सुटका करण्यात आली आहे. प्रिन्स तलाल हे जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.
प्रिन्स तलाल यांनी सरकारबरोबर वाटाघाटी करून एक प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (भावी राजे) यांनी भ्रष्टाचार विरोधात मोहीम उघडली आहे.
सौदी अरेबियातले मोठे उद्योगपती, राजकारणी आणि राजघराण्यातील सदस्यांना रिट्ज कार्लटन हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
"आपल्यावर कोणताही आरोप नाही, क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्या कृतीला आपला पाठिंबा आहे," असं तलाल यांनी रॉयटर्सला सांगितलं आहे.

प्रिंस तलाल हे जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची संपत्ती 17 अब्ज डॉलर आहे असा अंदाज आहे. फोर्ब्स या नियतकालिकानं त्यांना जगातली 45 व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हटलं आहे.
ट्विटर, अॅपल या सारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी पैसे गुंतवले आहेत. तलाल हे 'किंगडम ऑफ होल्डिंग' या कंपनीचे मालक आहेत. सुटकेनंतर तेच या कंपनीच्या प्रमुखपदी कायम राहणार आहेत.
तलाल यांच्यासोबत MBC टेलिव्हिजनचे प्रमुख वलीद अल इब्राहिम आणि शाही न्यायालयाचे माजी प्रमुख खालिद अल तुवैजीरी यांचीही सुटका करण्यात आली आहे.
एक अब्ज डॉलर देऊन सुटका?
तलाल यांच्याआधी प्रिंस मितेब बिन अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली होती. आपल्या सुटकेसाठी त्यांनी 1 अब्ज डॉलर दिले असावे असा एक अंदाज आहे.
प्रिंस तलाल यांनी देखील आपल्या सुटकेसाठी पैसे दिले असावेत असा अंदाज आहे. पण त्यांनी नेमकी किती रक्कम दिली याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मोहम्मद बिन सलमान यांनी ही भ्रष्टाचार विरोधी मोहीम आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी सुरू केली असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
ही मोहीम जेव्हा सुरू केली गेली तेव्हा सौदी अरेबियाच्या अॅटर्नी जनरलांनी भ्रष्टाचारावर चिंता व्यक्त केली होती.
गेल्या कित्येक दशकांमध्ये 100 अब्ज डॉलरहून अधिकचा भ्रष्टाचार झाला असावा असं त्यांनी म्हटलं होतं.
200 हून अधिक जणांना ताब्यात घेऊन रिट्झ कार्लटन या अलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
हे हॉटेल सध्या बंद आहे. 14 फेब्रुवारीला ते पुन्हा सर्वांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









