दारू प्यायल्याने खरंच आपल्या भावनांमध्ये काही बदल होतो का? वाचा

एवढी दारू प्यायल्याने नेमकं काय होतं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एवढी दारू प्यायल्याने नेमकं काय होतं?

मद्यप्राशनाचा भावनांशी काय संबंध आहे याविषयी 2017 मध्ये एक अभ्यास करण्यात आला. त्याच्या अहवालानुसार, वेगवेगळ्या प्रकारचं मद्य तुमचा मूड वेगवेगळ्या प्रकारे सेट करू शकतं. ही बातमी पुन्हा शेयर करत आहोत.

स्पिरीट या प्रकारात मोडणाऱ्या मद्यांमुळे तुम्हाला राग येऊ शकतो, तुम्हाला सेक्सी वाटू शकतं, रडू येऊ शकतं. तर रेड वाईन किंवा बीअरमुळे तुम्हाला शांत, निवांत वाटू शकतं, असं यासंबंधी अभ्यास करणाऱ्यांनी म्हटलं आहे.

हा अभ्यास करणाऱ्यांनी 21 देशांतल्या 18 ते 34 वयोगटातल्या जवळपास 30,000 लोकांचा अभ्यास केला. या अभ्यासातून पुढे आलेले निष्कर्ष त्यांनी 'बीजेएम ओपन' या शोध मासिकात प्रसिद्ध केले.

अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांनी स्पिरीट प्रकारात मोडणारी मद्यं तसंच बीअर आणि वाईन प्यायली. त्यातल्या बऱ्याच जणांचं म्हणणं पडलं की, वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याचा त्यांच्यावर वेगवेगळा परिणाम झाला.

पाश्चिमात्य देशांत कधीमधी बीअर पिणं चांगलं मानलं जात असलं तरी सततच दारू पिण्याचे धोके या अभ्यासातून समोर येतील अशी अभ्यासकांनी आशा व्यक्त केली.

रागाचा पारा चढतो

जास्त काळ मद्य पित राहिलं की, लोकांना त्याची सवय होते. त्यामुळे काही काळानंतर हलकं वाटण्यासाठी लोक जास्त मद्य प्यायला सुरुवात करतात.

पण यामुळे काही वाईट परिणामही होऊ शकतात, असं पब्लिक हेल्थ वेल्स एनएचए ट्रस्टचे अभ्यासक प्रा. मार्क बेलीस सांगतात.

वाईन ग्लास

फोटो स्रोत, Getty Images

एका ऑनलाईन सर्वेक्षणात लोकांना वर्तमानपत्रं, मासिकं आणि सोशल मीडियावरून सहभागी करून घेतलं होतं. त्यात काही गोष्टी ठळकपणे समोर आल्या.

  • रेड वाईन व्हाईट वाईनच्या तुलनेत लोकांना जास्त आळशी बनवते.
  • बीअर किंवा वाईन प्यायल्यानंतर लोकांना जास्त निवांत वाटतं.
  • स्पिरीट गटात मोडणारं मद्य - उदाहरणार्थ ब्रॅंडी, रम, व्हिस्की किंवा स्कॉच प्यायल्यानंतर सेक्सी वाटतं, असं सहभागी झालेल्यांपैकी 40 टक्क्यांहून अधिक लोकांनी सांगितलं.
  • अर्ध्याहून अधिक लोकांनी सांगितलं की, स्पिरीट गटातलं मद्य प्यायल्यानंतर त्यांच्यात उत्साह संचारला आणि त्यांच्यात आत्मविश्वासही आला.
  • पण एक तृतीयांश लोकांनी हेही सांगितलं की, स्पिरीट गटातलं मद्य प्यायल्याने ते जास्त आक्रमक झाले.
  • स्पिरीट प्रकारची मद्य लोकांना आक्रमक, चिडचिडं, भावनावश बनवतात असंही लक्षात आलं. ही मद्य प्यायल्यानंतर लोकांना आजारी असल्यासारखं वाटू शकतं.
  • मद्य घेणारे पुरुष, विशेषतः सतत मद्य घेणारे पुरुष हे मद्य घेणाऱ्या स्त्रियांपेक्षा अधिक आक्रमक असतात.

घरात की घराबाहेर?

अर्थात या सर्वेक्षणात काय घडतं हे समोर आलं. पण ते का घडतं याची कारणं समोर आलेली नाहीत.

"तुम्ही कोणत्या वातावरणात मद्यपान करता यावरही तुमच्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. या अभ्यासात आम्ही लोकांना प्रश्न विचारला होता की, तुम्ही कुठे मद्यपान करता, घरी की बाहेर?" प्रा. बेलीस सांगतात.

वाईन ग्लास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मद्यप्राशन तुमचा मूड बदलवू शकतं?

"मद्यपान केल्यानंतर आपल्याला कसं वाटावं याबद्दलही लोकांच्या काही अपेक्षा असतात. ज्याला रिलॅक्स व्हायचं असेलं तो बीअर किंवा वाईन पितो", ते म्हणतात.

वेगवेगळ्या मद्यांची जाहिरात आणि प्रमोशनवरही लोकांच्या मद्यनिवडीवर परिणाम करतं. "बऱ्याचदा प्रमोशन पाहून लोक आपल्या मूडला साजेसं मद्य निवडू शकतात. पण कधी कधी ही निवड चुकली तर नकारात्मक भावनाही येऊ शकते," असं प्रा. बेलीस म्हणाले.

"काही जण स्वतःला उत्साहित वाटावं किंवा आत्मविश्वास यावा म्हणून मद्यपान करतात. पण याचा उलटा परिणामही होऊ शकतो. लोकांना नकारात्मक भावनांनादेखील सामोर जावं लागू शकतं", ते स्पष्ट करतात.

प्रा. बेलीस आणि लंडनच्या किंग्स कॉलेजमधले त्यांचे सहकारी यांनी केलेल्या अभ्यासातून आणखी एक बाब समोर आली. ती अशी-

जे लोक सतत मद्यपान करतात किंवा स्वतःमध्ये सकारात्मक भावना उत्पन्न व्हावी म्हणून मद्यपान करतात, त्यांना तसं केल्यानंतर उत्साहित वाटण्याची शक्यता कधीकधी मद्यपान करणाऱ्यांपेक्षा पाचपट अधिक असते.

"वेगवेगळ्या मद्याचा स्त्रिया आणि पुरुष यांच्यावर होणारा परिणामही वेगळा असतो. मद्य घेतल्यावर स्त्रियांमधे आक्रमकता सोडून इतर भावना जागृत होतात तर पुरूष मद्य घेतल्यावर जास्त आक्रमक होतात."

वाईन ग्लास

फोटो स्रोत, Getty Images

ड्रिंकवेअरचे डॉक्टर जॉन लार्सन म्हणतात, "लोक एका विशिष्ट प्रकारचं मद्य का निवडतात आणि त्या मद्याचा त्यांच्या वागण्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी या अभ्यास महत्त्वाचा आहे."

यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्त्री-पुरुषांसाठी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्व सांगतात की, लोकांनी कमीत कमीत मद्यपान केलं पाहिजे. नियमित मद्यपान करणाऱ्यांनी 14 युनिटपेक्षा जास्त सेवन करू नये, असं हे मार्गदर्शक तत्त्व सांगतं.

आठवड्याला 14 युनिट म्हणजे ब्रॅंडी, रम, व्हिस्की किंवा स्कॉचचे 12 सिंगल पेग, 6 बीअरचे पिंट किंवा 175 मिलीचे वाईनचे 6 ग्लास.

तज्ज्ञांच्या मते, एका मद्याच्या युनिटची किंमत कमीत कमीत 50 पेन्स (यूकेचं चलन) ठेवली तर अतिमद्यप्राशनामुळे होणाऱ्या मृत्यूंमधे घट होऊ शकते.

मद्याच्या किमान किमतीचं धोरण स्कॉटलंडमध्ये 1 मे 2018 रोजी अस्तित्वात येईल. अशाच धोरणासंबंधित कायदा वेल्स आणि आयर्लंडमध्येही करण्याचा सरकार विचार करत आहे.

इंग्लंडमध्ये सध्यातरी असं धोरण अस्तित्वात नाही. पण असं काही होऊ शकतं का याचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे अशी माहिती इंग्लंडच्या गृहखात्याने दिली. भारतामध्येही मद्याच्या किमतीचं धोरण अद्याप नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)