पाहा व्हीडिओ : डाऊन सिंड्रोम असणारी आदिती वर्मा कशी चालवते स्वत:चं 'कॅफे'

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : 'डाऊन सिंड्रोम' वर 'कॅफे' काढून आदितीनं केली मात
    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

जन्मतः डाऊन सिंड्रोम हा आजार असलेली आदिती वर्मा नवी मुंबईत स्वतःचं एक कॅफे चालवते. तिच्या या कॅफेत नेहमी तरुण-तरुणींची वर्दळ असते. तिने उचललेलं हे पाऊल अनेक विकलांग व्यक्तींना एक नवी उमेद देत आहे.

नवी मुंबईच्या बेलापूर उपनगरात भूमी मॉलमध्ये 'आदितीज कॉर्नर' नावाचं एक कॅफे आहे. तिसऱ्या मजल्यावर असलेलं हे कॅफे या परिसरात लोकप्रिय आहे. याच्या लोकप्रियतेचं मुख्य कारण आहे या कॅफेची मालकीण आदिती वर्मा.

आदितीला जन्मतः डाऊन सिंड्रोम हा आजार आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आदितीला घरी बसण्याचा कंटाळा येऊ लागला. मग ती तिच्या आई-बाबांसोबत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊ लागली.

त्यांच्या ऑफिसमधला व्यवहाराचा हिशोब ठेवण्याचं काम तिच्याकडे होतं. पण या बैठ्या कामाचा तिला पुन्हा कंटाळा येऊ लागला.

आदीती वर्मा

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC

फोटो कॅप्शन, नवी मुंबईच्या बेलापूर येथील भूमी मॉलमध्ये आदितीचा कॅफे आहे.

मग एके दिवशी आदितीची नजर ऑफिसमध्ये चहा आणून देणाऱ्या एक मुलावर पडली. आपणही लोकांना चहा द्यावा, अशी इच्छा तिनं तिच्या पालकांना बोलून दाखवली.

आणि यातून आदितीला एखादं कॅफे उघडून द्यावं, अशी कल्पना तिच्या पालकांना सुचली.

मग आदितीच्या आईवडिलांनी त्यांच्या ऑफिस जवळच असलेल्या भूमी मॉलमध्ये 1 जानेवारी 2016 ला 'आदितीज कॅफे' सुरू करून दिलं.

आदितीच्या आई रिना वर्मा सांगतात, "आधीपासूनच आदितीला स्वयंपाकाची खूपच आवड होती. घरी कुठलाही कार्यक्रम असला की जेवण बनवायला ती पुढेपुढे करायची. नॉन-व्हेजची तर तिला विशेष आवड होती."

कॅफे

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC

फोटो कॅप्शन, डाऊन सिंड्रोम हा आजार असलेली आदिती वर्मा नवी मुंबईत स्वतःचा कॅफे यशस्वीपणे चालवत आहे.

सुरुवातीला त्यांच्या मनात भीती होती, की ती हे सर्व सांभाळू शकेल का? पण आदितीचा उत्साह आणि काम करण्याच्या चिकाटीने त्यांची ही भीती दूर केली.

अवघ्या दीड वर्षात आदितीने या कॅफेची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. कॅफेसाठी लागणाऱ्या एकेका सामानाची ऑर्डर देणं, ग्राहकांच्या ऑर्डर घेणं, त्यांना डिलिव्हरी देणं आणि या सर्वांचा हिशोब ठेवणं, सगळं ती स्वतः पाहाते.

तिचे वडील अमित वर्मा सांगतात, "आम्ही आदितीला कधीही स्पेशल चाईल्ड म्हणून वेगळी वागणूक दिली नाही. तिच्या प्रत्येक प्रयत्नात आम्ही तिची साथ देतो."

आदितीज कॅफेतून आसपासच्या दुकानांमध्ये आणि ऑफिसमध्ये जेवणाचा डबा जातो. नेहमीचे ग्राहक असलेले कौशल डोंगरे सांगतात, "तिच्या जेवणाला एक घरगुती चव असते. आम्ही घरून स्वत:चा डबा आणला असेल तरी आदितीकडूनही जेवण मागवतोच."

आदितीचं यश नक्कीच भारावून टाकणारं आहे. पण ती इथंच थांबणार नाही.

आदीती वर्मा

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC

फोटो कॅप्शन, कॅफेसाठी लागणाऱ्या सामानापासून ते ग्राहकांच्या ऑर्डर घेणे, डिलिव्हरी देणे तसेच सर्व हिशोब ती स्वतः पाहते.

आदिती सांगते, "भविष्यात मला 5-स्टार हॉटेल सुरू करण्याची इच्छा आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मला माझ्यासारख्या मुला-मुलींसाठी काहीतरी करायचं आहे."

आणि तिच्या या आत्मविश्वासाचं गुपित काय?

आदिती सांगते, "कुणावरही जबरदस्ती करू नका. मुलांना जे काही करायचं असेल, ते करू द्या. पक्ष्याप्रमाणं त्यांना स्वच्छंद उडू द्या. त्यातूनच यश मिळेल."

आणखी वाचा :

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)