किसमुळे बॉयफ्रेंडचा मृत्यू, गर्लफ्रेंडची रवानगी तुरुंगात

ब्लेअर

फोटो स्रोत, CLACKAMAS COUNTY SHERIFF'S OFFICE

फोटो कॅप्शन, मेलिसा अॅन ब्लेयर

अमेरिकेमधल्या ओरगन प्रांतातल्या एका महिलेला नुकतंच जेलमध्ये धाडण्यात आलं. कारण होतं तिनं तिच्या जेलमध्ये कैद असणाऱ्या बॉयफ्रेण्डला केलेलं किस.

आता किस करणे हा गुन्हा आहे का? तर नाही पण हा किस जरा वेगळाच होता. मेलिसा अॅन ब्लेयरनं तिचा बॉयफ्रेण्ड अॅन्थनी पॉवेलला किस करताना, तोंडात मादक द्रव्यांच्या सात पुड्या लपवल्या होत्या.

मेथांफेटमिन या मादक द्रव्याच्या पुड्या किस करताना आपल्या तोंडातून त्याच्या तोंडात द्यायच्या असा तिचा ईरादा होता. तसं तिनं केलं सुद्धा. पण, यातल्या दोन पुड्या तिच्या बॉयफ्रेण्डच्या पोटात फुटल्या.

त्यामुळे विषबाधा होऊन अॅन्थनी पॉवेलचा मृत्यू झाला, असं पुढे सरकारी वकीलांनी सांगितलं. ही घटना मागच्या वर्षी घडली.

अमेरिकेत ज्यांच्या कोर्टात ही केस चालली त्या न्यायाधिशांनी सांगितलं की, या मृत्यूसाठी पॉवेल आणि मेलिसा सारखेच जबाबदार आहेत.

मेथांफेटमिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेथांफेटमिन

कोर्टाच्या रेकॉर्डप्रमाणे 41 वर्षांचा पॉवेल आपल्या सासूला भोसकण्याच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याची रवानगी गंभीर गुन्हाखाली शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी असणाऱ्या ओरगन राज्यातल्या जेलमध्ये झाली होती.

46 वर्षांची मेलिसा 2 जून 2016 ला तिच्या बॉयफ्रेण्डला भेटायला जेलमध्ये गेली आणि तेव्हाच तिनं ड्रग्सची अदलाबदल केली.

मेलिसाच्या वकीलाचं म्हणणं होतं की, तिला याप्रकारात ओढलं गेलं. मुळात ही योजना पॉवेलनं आखली होती.

"एखाद्या कांदबरीत शोभेल अशी ही परिस्थिती होती. भले पॉवेल जेलमध्ये असेल. पण त्याची मेलिसावर हुकुमत होती. तो जे सांगेल ते तिला करावंच लागायचं," तिचे वकील जॉन रॅन्सम यांनी सांगितलं.

मादक द्रव्य

फोटो स्रोत, Getty Images

न्यायाधीश हर्नाडेझ यांनी तिला मादक पदार्थ देवाणघेवाणीचा कट रचल्याबद्दल दोन वर्षांची कैद सुनावली.

सुटका झाल्यानंतरही तीन वर्ष तिला कोर्टाच्या निरीक्षणाखाली राहावं लागणार आहे.

ब्रॅण्डी पोकोविच या पॉवेलची एका मैत्रिणीनं असोसिएट न्यूज या वृत्तसंस्थेला सांगितलं की, तिनंच पॉवलची ओळख मेलिसा ब्लेयरशी करून दिली होती.

तिनं सांगितलं की, पॉवेल जेलमध्ये असतानाही ती त्याला त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून गर्लफ्रेण्ड शोधायला मदत करायची.

या केसमधल्या इतर चार आरोपींनी गुन्हा मान्य केला आहे. त्यांना लवकरच शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

तुम्ही हे पाहिलं का ?

व्हीडिओ कॅप्शन, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सौदी राजघराण्यातील 200 लोक या होटेलरुपी तुरुंगात आहेत

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)