पाहा व्हीडिओ : इजिप्तच्या सिनाई प्रांतात मशिदीवर हल्ला, 230 ठार
इजिप्तच्या उत्तर सिनाई प्रांतात एका मशिदीत झालेल्या हल्ल्यात 200हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. संशयित कट्टरवाद्यांनी शुक्रवारी या मशिदीत आधी बाँबस्फोट घडवून आणला आणि नंतर नागरिकांवर गोळीबार केला.
बिर-अल-अबेद शहराजवळच्या अल-अरिश परिसरात अल रावदा मशिदीमध्ये शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी नागरीक जमले होते. तेव्हा एका अज्ञात वाहनातून आलेल्या चौघांनी नागरिकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं एपी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
कमीतकमी 100 लोक या हल्ल्यात जखमी झाल्याचं इजिप्तच्या आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.
२०१३ सालापासून मुस्लीम कट्टरवाद्यांच्या हल्ल्यांमुळे इजिप्त हादरत आहे.

फोटो स्रोत, EPA
इजिप्तमधल्या सैन्यांना सहकार्य करणारे नागरिक मशिदीत प्रार्थना करत असताना शुक्रवारचा हल्ला झाला. म्हणून त्यांनाच नुकसान पोहोचवण्याच्या हेतूनं हा हल्ला झाल्याचं सध्या बोललं जात आहे.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फत्तेह अल-सिसी यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेत देशाच्या सुरक्षेचा आढावा घेतल्याचं स्थानिक वृत्तवाहिनी एक्स्ट्रा न्यूजनं सांगितलं आहे.
"अल-रावदा येथील मशिदीतील भाविकांवर झालेल्या हल्ल्याला आम्ही सर्व शक्तिनिशी प्रत्युत्तर देऊ. इजिप्त दहशतवादाचा कठोरतेनं सामना करत आहे. इजिप्तची ही मोहीम थांबावी, म्हणूनच हा हल्ला करण्यात आला आहे," असं ते पुढे म्हणाले.

"इजिप्तचं सैन्य आणि पोलीस प्रशासन या घटनेचा बदला घेऊन देशात शांतता प्रस्थापित करतील," असं त्यांनी म्हटलं.
या हल्ल्यानंतर इजिप्तने "अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर" हवाई हमले केल्याचं म्हटलं आहे.
इजिप्तमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, AFP
काही आठवड्यांपूर्वी सिनाईमध्येच इजिप्तच्या लष्करावर कट्टरवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. त्यानंतरचा हा सगळ्यांत मोठा हल्ला मानला जात आहे. पण कुठल्याही संघटनेनं या हल्ल्यामागे हात असल्याचा दावा अद्याप केलेला नाही.
इजिप्तच्या लष्करानं अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची सत्ता जुलै २०१३ मध्ये उलथवून लावल्यानंतर मुस्लीम कट्टरवाद्यांचे हल्ले वाढले आहेत.
कथित इस्लामिक स्टेटकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये पोलीस, सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला असून हे हल्ले सिनाई प्रांतातच झाले आहेत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









