गुजरात : घोड्यावर बसतो म्हणून दलित युवकाची हत्या

प्रदीप राठोड

फोटो स्रोत, Social Media/Bhargav Parikh

फोटो कॅप्शन, 21 वर्षांच्या प्रदीपची हत्या करण्यात आली
    • Author, भार्गव पारेख
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

गुजरातमध्ये एका दलित युवकाची हत्या करण्यात आली, त्याचा गुन्हा इतकाच होता की तो घोड्यावर बसत असे.

भावनगर जिल्ह्यातील टिंबी गावातील प्रदीप राठोड हा युवक आपल्या घोडीवर बसून घराबाहेर गेला आणि परतलाच नाही.

गुरुवारी रात्री प्रदीप वडिलांना रात्रीचं जेवण एकत्र करू असं सांगून घराबाहेर पडला. रात्र झाली तरी तो परतला नाही म्हणून त्याच्या वडिलांना काळजी वाटू लागली. ते त्याचा शोध घेत गावाबाहेर आले आणि तिथे त्यांना मुलाचा मृतदेह सापडला. शेजारीच त्याची घोडी बांधलेली होती.

या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. प्रदीपचा मृतदेह भावनगरच्या सर टी. रुग्णालयात नेण्यात आला. तिथं पोस्टमार्टम करण्यात आलं, पण मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. या प्रकरणातील सर्व आरोपींना जोवर अटक केली जाणार नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

प्रदीपचे वडील कालूभाई यांनी 'बीबीसी गुजराती'ला सांगितलं की, "प्रदीपनं दोन महिन्यांपूर्वी घोडी विकत घेतली होती. घोडी घेतल्यापासून त्याला धमक्या येऊ लागल्या होत्या. तो म्हणू लागला की मी घोडी विकून टाकीन पण मीच त्याला म्हटलं राहू दे. तो शेतात घोडीवर बसूनच जात असे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो संध्याकाळी शेतातून परतला. नंतर पुन्हा तो बाहेर गेला आणि ही घटना घडली."

प्रदीपचे कुंटुंबीय

फोटो स्रोत, Social media

टिंबी गावची लोकसंख्या अंदाजे 300 आहे. त्यांच्या गावाजवळ उमराळा नावाचं एक गाव आहे. " उमराळातल्या लोकांनी त्याला आठ दिवसांपूर्वी धमकी दिली होती. घोडी विकून टाक असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि जर तू हे केलं नाहीस, तर तुला मारून टाकू असं एकानं माझ्या मुलाला म्हटलं होतं," अशी माहिती कालूभाई यांनी दिली.

उमराळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक के. जे. तलपडा यांनी सांगितलं की, "आम्ही तक्रार नोंदवली आहे आणि तपास सुरू आहे. तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी भावनगर क्राइम ब्रांचची मदत घेतली जाईल."

या प्रकरणावर गुजरात सरकारनं भाष्य केलं आहे. "आम्ही भावनगरच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात अहवाल देखील मागवण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल," असं सामाजिक न्यायमंत्री ईश्वरभाई परमार यांनी म्हटलं आहे.

दलित नेते अशोक गिल्लाधर म्हणाले, "या भागातील दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. याआधी देखील दलितांच्या हत्या वाढल्या आहेत."

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)