Christmas 2021 : मुघलांच्या काळात कशी गजबजून जायची आग्र्याची बाजारपेठ?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आर.व्ही. स्मिथ
- Role, ज्येष्ठ पत्रकार
25 डिसेंबरला जगभरात ख्रिसमसचा उत्साह असतो. भारतातही मोठ्या शहरांमध्ये ख्रिसमस पार्टी होतात. पण आपल्याकडे ख्रिसमस अलीकडच्या काळात साजरा होतोय असं नाही. अगदी मुघल काळातही ख्रिसमस साजरा व्हायचा. स्वतः मुघल शासक नाताळचा हा सण साजरा करायचे.
औरंगजेबाचा अपवाद वगळला तर अकबरापासून शाह आलमपर्यंतच्या मुघल शासकांनी ख्रिसमस 'सेलिब्रेट' केला आहे. याची सुरूवात अकबराच्या काळात झाली. त्यानं एका पाद्र्याला आपल्या दरबारात आमंत्रित केलं होतं.
मुघलांच्या काळात आग्रा हे पूर्वेकडील सर्वात आलिशान शहर होतं. लेखक थॉमस स्मिथनं आग्र्याचं वर्णन करताना म्हटलं होतं, की युरोपातील प्रवासी इथं आल्यानंतर गल्लीबोळातील समृद्धी, समृद्ध व्यापार आणि शहराच्या बाजूनं वाहणारी यमुना पाहून भारावून जायचे.
व्यापारी शहर आणि मुघलांची राजधानी असल्यामुळे आग्र्यामध्ये इटली, पोर्तुगाल, हॉलंड, फ्रान्स तसंच मध्य आशिया आणि इराणमधूनही व्यापारी आणि पर्यटक यायचे, असं स्मिथ यांनी लिहून ठेवलं आहे.
इतक्या विदेशी लोकांची ये-जा असल्यामुळे त्याकाळातही आग्र्यामध्ये ख्रिसमसचा उत्साह दिसायचा. फ्रान्सिस्कन एनल्स सांगतात, की एका समुदायाचा आनंद सगळ्या शहरभर विखुरला जायचा.
आग्र्याच्या बाजारांमध्ये ख्रिसमसचा उत्साह
बाजारपेठेत सणाचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणावर दिसून यायचा. डिसेंबरच्या गुलाबी थंडीत रंगीबेरंगी कमानी, बॅनर आणि अनेक देशांचे झेंडे दिसायचे. ट्रंपेट तसंच सनई वाजवली जायची. फटाके फोडले जायचे. आणि चर्चमधील घंटाही वाजायच्या.

फोटो स्रोत, Getty Images
अकबरानं आपल्या दरबारात आमंत्रित केलेल्या पाद्र्याला शहरात एक भव्य चर्च बनविण्याची परवानगी दिली होती. या चर्चमध्ये मोठ्या घंटा लावण्यात आल्या होत्या. त्यातील एक घंटा अकबरचा मुलगा जहांगीराच्या काळात त्यातली एक घंटा तुटली.
जहांगीराच्या पुतण्यासाठी झालेल्या एका भव्य कार्यक्रमाच्या दरम्यान ही घंटा तुटली होती. या कार्यक्रमादरम्यान चर्चमधील एक कर्मचाऱ्याला अत्यानंद झाला आणि त्यानं ती घंटा अगदी तुटेपर्यंत वाजवली, असं सांगितलं जातं.
सुदैवानं या दुर्घटनेत कोणी जखमी झालं नाही आणि त्या कर्मचाऱ्याची नोकरीही गेली नाही. अकबर आणि जहांगीर स्वतः ख्रिसमसच्या सणात सहभागी व्हायचे आणि आग्र्याच्या किल्ल्यातील पारंपरिक भोजनाचाही आस्वाद घ्यायचे.
बिशपप्रमाणे व्हायचं अकबराचं स्वागत
थॉमस स्मिथनं लिहिलं आहे, "ख्रिसमसच्या दिवशी सकाळी अकबर आपल्या दरबाऱ्यांसोबत चर्चमध्ये यायचे. येशूच्या जन्माचा देखावा पहायचे."
संध्याकाळी जनानखान्यातील महिला आणि राजकुमारी लाहौरमधल्या चर्चमध्ये येऊन मेणबत्या लावायच्या.

फोटो स्रोत, Getty Images
अकबर ख्रिसमसच्या दिवशी जेव्हा आग्र्याच्या चर्चमध्ये यायचे, तेव्हा त्यांचं स्वागत एखाद्या बिशपप्रमाणे व्हायचं. ते आल्यावर चर्चमधील घंटा वाजवल्या जायच्या आणि भजनही गायले जायचे.
"जे युरोपीय एरवी एकमेकांविरुद्ध कुरघोडी करायचे, व्यापारातले प्रतिस्पर्धी होते, ते सगळं काही विसरुन या सणामध्ये सहभागी व्हायचे. ख्रिसमसच्या रात्री बहुतांश वेळा लहान मुलं येशू ख्रिस्ताच्या जन्माचं नाटक सादर करायचे."
शाही फौजेवर सुरक्षेची जबाबदारी
अकबर आणि जहांगीराच्या काळात या नाटकांचं आयोजन खूप नेटकेपणानं व्हायचं. नाटकादरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी शाही फौजेकडे जबाबदारी सोपविण्यात यायची.
नाटकाची रंगीत तालीम आग्र्याच्या बाजारपेठेत व्हायची. हा भाग आता 'फुलट्टी' या नावानं ओळखला जातो. तिथे ब्रिटिशांचं मुख्यालयही होतं.

फोटो स्रोत, Getty Images
"1632 नंतर मात्र नाटकाची ही परंपरा बंद झाली, कारण शाहजहाँचे पोर्तुगीजांसोबत मतभेद झाले होते. हुगळी बंदर बंद केल्यानंतर आग्र्याचं चर्च तोडण्यात आलं. ख्रिश्चनांच्या सार्वजनिक प्रार्थनेवरही बंधनं घालण्यात आली. त्यावेळी शेकडो पोर्तुगीज कैदी आग्र्यामध्ये होते. त्यांना बंगालहून आणण्यात आलं होतं. मात्र 1640 मध्ये जेव्हा मुघल आणि पोर्तुगीजांमधले संबंध ठीक झाले, तेव्हा पुन्हा हे चर्च उभारण्याची परवानगी देण्यात आली.
हे चर्च आजही उभं आहे. मात्र मुघल शासक मोहम्मद शाह रंगीलाच्या काळापर्यंत ख्रिस्तजन्माचं नाटक काही झालं नाही. रंगीलानं आग्रा आणि दिल्लीमध्ये अकबराच्या काळापासून राहत असलेल्या फ्रेंच बर्बन आणि डच लोकांची बाजू घेतली होती.
1958मध्ये नाटकाचं पुनरुज्जीवन
मात्र कथित अपमानानंतर बर्बनांनी दिल्ली सोडलं आणि ते भोपाळमध्ये स्थायिक झाले. यानंतर शाह आलम, अकबर शाह सैनी, बहादूर शाह जफर यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर ख्रिसमस साजरा केला केला. पण अगदी 1940 साल संपेपर्यंत नाटकाचं आयोजन झालं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
1958 मध्ये आग्र्यात पहिले भारतीय आर्कबिशप डॉक्टर डॉमिनिक आर्थाइड यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं. पण आता मुघल शासक मात्र नव्हते. अर्थात, अध्यात्मिक रुपात त्यांचं अस्तित्व जाणवायचं. आग्रा आणि चर्चने त्यांच्याकडून बरंच काही हिरावून घेतलं होतं.
आग्रा आणि दिल्लीतील मोठ्या धर्मगुरुंच्या आदेशानुसार उत्साहात ख्रिसमस साजरा केला गेला. मात्र नाटकाच्या परंपरेला होकार देण्यात आला नाही. ही दु:खाची गोष्ट आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








