जगभरात ख्रिसमस कसा साजरा केला जातो? 12 भन्नाट पद्धती

फोटो स्रोत, Getty Images
डिसेंबरच्या थंडीनं हातपाय पसरायला सुरुवात केली की जगभरातल्या आबालवृद्धांना वेध लागतात ते ख्रिसमसचे! ख्रिसमस हा तसा धर्मातीत सण आहे.
जगभरातल्या जवळपास 160 पेक्षा जास्त देशांमध्ये तो साजरा केला जातो. विशेष म्हणजे, यातल्या अनेक देशांमध्ये तर ख्रिश्चन मुख्य धर्मही नाही.
या विविधतेमुळेच ख्रिसमस साजरा करण्याच्या पद्धतीही देशोदेशी वेगवेगळ्या आहेत. अर्थात प्रत्येक पद्धतीमुळे आनंद दुप्पट होतो, हे वेगळं सांगायलाच नको.
यातल्या काही देशांमध्ये ख्रिसमस कसा साजरा होतो, हे बघणं खरंच मजेशीर आहे. काही रीतीरिवाज तर तुमच्यासाठी धक्कादायकही असतील.
1. मुलांना घाबरवा, मजा घ्या!
हॅलोविनमध्ये जसं वेगवेगळी भयानक सोंगं घेऊन एकमेकांना घाबरवण्याची अहमहमिका सुरू असते, तसंच काहीसं ऑस्ट्रियात ख्रिसमसदरम्यान करतात.

फोटो स्रोत, Getty Images
मस्ती करणाऱ्या, आईवडिलांचं न ऐकणाऱ्या मुलांना हा भयानक दिसणारा क्रँपस घाबरवतो. जसं सांताक्लॉज चांगलं वागणाऱ्या मुलांना गिफ्ट्स देतो, तसंच क्रँपस वाईट वागणाऱ्या मुलांना आपल्या पोतडीत टाकून पळवून घेऊन जातो.
आपल्याकडे जसं 'आईवडिलांचं ऐकलं नाही की, गणपती कान कापतो', त्यातलाच हा प्रकार!
म्हणूनच बरेच आईवडील अशी भयंकर वस्त्र घालून निघतात, आपल्याच बदमाश बहादुरांना घाबरवायला!
2. ख्रिसमस म्हणजे फ्राईड चिकन
'उगवत्या सूर्याच्या देशात' म्हणजेच जपानमध्ये बौद्ध आणि शिंटो हे दोन धर्म जास्त प्रचलित आहेत. आतापर्यंत या देशात ख्रिश्चन धर्माचा प्रसार इतर देशांपेक्षा कमीच झालेला आहे. तरीही तिथं ख्रिसमस साजरा करण्यात कोणीच मागे राहत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
पण गेल्या काही वर्षांमध्ये जपानमध्ये ख्रिसमसच्या काळात फ्राईड चिकन खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. किंबहुना ख्रिसमस म्हणजे फ्राईड चिकन, असं समीकरणच रूढ होत चाललं आहे.
या काळात तब्बल 36 लाखांपेक्षा जास्त कुटुंबं कॉलेस्ट्रॉलची पर्वा न करता बिनधास्त फ्राईड चिकनवर आडवा हात मारतात. हे फ्राईड चिकन इतकं लोकप्रिय आहे की, अमेरिकन फूड कंपन्यासाठी खास फेस्टिव्हल स्पेशल मेन्यू ठरवतात. अनेकदा ख्रिसमसच्या एक आठवडा आधीपासूनच तुमची ऑर्डर नोंदवावी लागते.
3. देर आए, दुरुस्त आए
तुम्हाला एखाद्या रशियन किंवा युक्रेनियन माणसाला ख्रिसमसच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर प्लीज, 25 डिसेंबरला देऊ नका!
तो तुमच्याकडे अगदीच तुच्छतेनं बघण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कारण रशिया आणि त्याच्या आसपासच्या 13 देशांमध्ये अगदी सनातनी ख्रिश्चन धर्म पाळला जातो. या देशांमध्ये ख्रिसमस 25 डिसेंबरला नाही, तर 7 जानेवारीला साजरा करतात.
याचंही एक कारण आहे. या देशांमध्ये ज्युलियन इंग्रजी कॅलेंडर पाळण्याची पद्धत आहे. हे कॅलेंडर इसवी सन पूर्व 45व्या वर्षी तयार झालं होतं. आपण जे वापरतो, आणि जगभरात बहुतांश देशांमध्ये जे पाळलं जातं ते ग्रेगॉरियन इंग्रजी कॅलेंडर आहे. या दोन्ही कॅलेंडरमध्ये 13 दिवसांचा फरक आहे.
त्यामुळेच जगभरात 25 डिसेंबरला साजरा होणारा ख्रिसमस इथे मात्र 7 जानेवारीला साजरा होतो.
4. आईसलँडचे बुटके
हिमगौरी आणि तिचे सात बुटके, यांची कथा आपणही ऐकली आहे. हे सात बुटके खरंच अस्तित्वात आहेत, पण ते दिसत नाहीत, असं मानणारी थोडीथोडकी नाही, तर 54 टक्के जनता आईसलँडमध्ये राहते.

फोटो स्रोत, Getty Images
या बुटक्यांचा पेहरावही आपण गोष्टींच्या पुस्तकात किंवा कार्टूनमध्ये बघितला आहे. आईसलँडमध्ये सांताक्लॉजच्या ऐवजी बुटक्यांचा वेष घेतलेली मोठी माणसं लहान मुलांसाठी भेटवस्तू घेऊन येतात.
लहान मुलांनी भेटवस्तूच्या आशेनं खिडकीत ठेवलेल्या चिमुकल्या बुटांमध्ये हे 'बुटके' गुपचूप भेटवस्तू ठेवतात.
5. बकऱ्याचं दहन
नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क या स्कँडिनॅव्हियन देशांमध्ये चाऱ्यापासून बनवलेला बकरा ही ख्रिसमसची ओळख आहे. 1966 मध्ये स्वीडनच्या गॅव्हले या गावात चाऱ्यापासून असा अजस्र बकरा बनवण्यात आला होता.
तेव्हापासून आतापर्यंत दरवर्षी स्वीडनमध्ये असा मोठा बकरा बनवला जातो. पण इथल्या यंत्रणांपुढे समस्या वेगळीच आहे.

फोटो स्रोत, AFP/Getty Images
आता या 13 मीटर उंच बकऱ्याला आग लावण्याची परंपराच इथल्या लोकांच्या अंगवळणी पडली आहे. काही ठरावीक अंतरावरून या बकऱ्यावर पेटते गोळे फेकून त्याला जाळण्याचा प्रयत्न करतात.
गेल्य 40 वर्षांमध्ये फक्त 29 वेळा हा बकरा जाळण्यात स्वीडिश लोकांना यश आलं आहे. आपल्याकडल्या रावण दहनासारखीच ही पद्धत!
6. व्हेनेझुएलामध्ये स्केटिंगची परंपरा
व्हेनेझुएलामध्ये राहणारे सश्रद्ध ख्रिश्चन लोक ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये होणारी प्रार्थना कधीच चुकवत नाहीत. त्यांनी ही परंपरा स्पेनकडून उचलली आहे.

फोटो स्रोत, AFP
काही ठिकाणी तर लोक रात्री होणाऱ्या 'पटिनाटा' उत्सवासाठी एकत्र जमतात. हा महोत्सव साधारणपणे स्थानिक चर्च आयोजित करतं, ज्यात चर्चमधल्या प्रार्थनेनंतर मुलांना स्केटिंग, स्केटबोर्डिंग किंवा सायकल चालवू देण्याची मुभा असते.
ही बाब एवढ्यावरच थांबत नाही. मुलांना अगदी बिनधास्त स्केटिंग करता यावं, यासाठी रस्ते वाहतूक बंद ठेवली जाते.
7. ख्रिस्तजन्माचा असाही देखावा!
स्पेनमधला कॅटलोनिया हा प्रांत सध्या विभाजनाच्या बातम्यांमुळे खूपच चर्चेत आहे. पण या प्रांतातल्या ख्रिस्तजन्माच्या देखाव्यांची चर्चा तर खूप आधीपासूनच होत आली आहे.
गोठ्यात जन्माला आलेला बालख्रिस्त, मेरी, जोसेफ वगैरेंचा समावेश असलेला ख्रिस्तजन्माचा देखावा तर भारतातल्या पोरांनाही माहीत असतो.

फोटो स्रोत, Getty Images
पण कॅटलोनियामध्ये मात्र या देखाव्यात चक्कं लोकांना शौचाला बसलेलं दाखवतात. अनेकदा प्रसिद्ध राजकारणी, फुटबॉलपटू यांचे पँट खाली घेऊन शौचाला बसलेले पुतळे या देखाव्यांमध्ये दिसतात.
बरं, ही प्रथा काही सध्याच्या स्पेन-कॅटलोनिया बखेड्यावरूनही सुरू झालेली नाही. काही इतिहासकारांच्या मते ही प्रथा 18व्या शतकापासून सुरू आहे.
ख्रिस्तजन्माच्या देखाव्यात हा शौचाला बसलेला छोटासा पुतळा कुठेतरी लपवला जातो आणि मग लहान मुलांना तो शोधून काढायचं आव्हान दिलं जातं. तेवढीच त्यांनाही मजा!
लहान मुलांनी ख्रिस्तजन्माचा देखावा अधिक बारकाईनं बघावा, म्हणूनही ही प्रथा रूढ झाली असावी का?
8. अमेरिकेच्या ख्रिसमसमध्ये जर्मनीची काकडी
जर्मनीत ख्रिसमसला 'वाईनाख्ट' म्हणतात, आणि त्या वेळी 'वाईनाख्ट्सगुर्कं' म्हणजे ख्रिसमसच्या काकडीला जर्मनीत भलतीच मागणी असते.
पण ही परंपरा जर्मनीपुरती मर्यादित नाही. जर्मनांच्या जिव्हाळ्याची ही परंपरा आता अमेरिकेतही अनेक घरांमध्ये तंतोतंत पाळली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
ख्रिसमस ट्रीला एखाद्या दागिन्याच्या सहाय्यानं ही काकडी अडकवतात. सकाळी सकाळी जो लहान मुलगा सगळ्यांत आधी ही काकडी शोधेल, त्याला खास भेट दिली जाते.
अमेरिकेत राहत असलेले जर्मन लोक अगदी खात्रीनं सांगतात की, ही परंपरा त्यांच्या पूर्वजांनी युरोपमधून अमेरिकेत आणली.
9. पोर्तुगालमध्ये पितरांचं जेवण!
पोर्तुगीज लोक त्यांचं ख्रिसमसचं पारंपरिक जेवण 24 डिसेंबरच्या रात्री उशीरा घेतात. या जेवणाला कॉन्सोआदा म्हणतात.

फोटो स्रोत, iStock
परंपरेनुसार ही मेजवानी झाल्यानंतर काहीही झाकपाक न करता टेबल तसंच ठेवलं जातं. कुटुंबातील मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ हे जेवण ठेवतात.
पोर्तुगालच्या काही भागांमध्ये तर, नुकतंच निधन झालेल्या एखाद्या नातेवाईकासाठी जेवणाच्या टेबलावर चक्क रिकामी जागा ठेवली जाते.
10. जोडा आणि दार ठरवतात जोडीदार!
चेक रिपब्लिकमध्ये लग्न न झालेल्या मुलींसाठी ख्रिसमस हा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. पुढलं वर्षभर तरी आपलं लग्न होणार की नाही, याचा निकाल या दिवशी लागतो म्हणतात.

फोटो स्रोत, iStock
या देशात रूढ असलेल्या समजुतीप्रमाणे लग्न न झालेल्या मुली दरवाज्याकडे पाठ करून बूट फेकतात. त्या बुटाचं टोक दरवाजाच्या दिशेला असेल, तर त्या मुलीचं लग्न नजीकच्या काळात होण्याची शक्यता असते.
पण बुटाचं टोक विरुद्ध दिशेला असलं, तर पुढलं वर्षभर तरी त्या मुलीला वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसतं.
11. पालेभाज्यांचं सॅलडही बरं, पण हे?
जर तुम्हाला पालेभाज्यांचं सॅलड खायचा वैताग येत असेल, तर आता या पदार्थाबद्दल कळल्यावर तुमचं मत नक्कीच बदलेल.

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण आफ्रिकेत ख्रिसमसला तळलेल्या अळ्या काही घरांमध्ये मेजवानीचा मुख्य भाग असतो.
ग्रीनलँडमध्ये तर चक्क व्हेलची कच्ची त्वचा आणि समुद्रपक्ष्याचं आंबवलेलं मांस ख्रिसमस स्पेशल मेन्यूमध्ये असतं. आणि नॉर्वेमध्ये तर मेंढीचं भाजलेलं डोकं हा एक वेगळा पदार्थच असतो.
आता या सॅलडबद्दल तुम्हाला काय वाटतं?
12. 'मुळ्या'पासून ख्रिसमसची तयारी
मेक्सिकोमधल्या ओक्साका शहरात ख्रिसमसच्या आधीपासूनच उत्सवी वातावरण सुरू करण्याची परंपरा आहे. या उत्सवातला मुख्य घटक असतो तो म्हणजे मुळा! पांढराफट्टक नाही, चांगला लालचुटूक मुळा!

फोटो स्रोत, Getty Images
23 डिसेंबरला या शहरात मुळ्यापासून तयार केलेल्या अनेक छोट्या छोट्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवलं जातं.
विशेष म्हणजे त्यात ख्रिस्तजन्माच्या देखाव्याचाही समावेश असतो. हे प्रदर्शन बघायला हजारो लोक गर्दी करतात.
तुम्ही हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








