कोल्हापूरची झणझणीत रस्सामंडळं तुम्हाला माहिती आहेत का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - कोल्हापूरचं रस्सामंडळ (शूटिंग - स्वाती पाटील-राजगोळकर, एडिटिंग आणि निर्मिती - रोहन टिल्लू)
    • Author, स्वाती पाटील-राजगोळकर आणि रोहन टिल्लू
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्राचं वर्णन वसंत बापटांनी "राकट देशा, कणखर देशा", असं केलं आहे. त्यातलं राकट आणि तरीही राजसपण कोल्हापूरच्या मातीत घट्टं मुरलं आहे. कोल्हापूरची आणि पर्यायाने पश्चिम महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीही अशीच आहे.

पहाटे आखाड्यात घुमणारा, सकाळी तर्रीबाज मिसळ रिचवणारा, सोबत लोटीभर धारोष्ण दूध पिऊन दुपारी कामाला लागणारा, संध्याकाळी 'रक्काळ्या'वर फिरणारा, रात्री मस्त शेमला-पटका वगैरे बांधून लावणीचा आस्वाद घेणारा कोल्हापूरकर तांबड्या-पांढऱ्या रश्श्याच्या आठवणीनंही नादावतो.

याच कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचा एक पैलू म्हणजे रस्सामंडळ!

रस्सामंडळ काय आहे?

रस्सामंडळ ही संकल्पना अत्यंत 'दोस्ती खात्यातली' आहे. रोजच्या बैठकीतले, नाक्यावर किंवा आखाड्यात जमणारे मित्र एकत्र येऊन ही मेजवानी करतात.

रस्सामंडळाच्या मेजवानीत तांबड्या-पांढऱ्या रश्श्याबरोबरच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त, मान असतो तो 'खुळ्या रश्श्या'ला! लालभडक कट, झणझणीत, चमचमीत मटणाचा रस्सा म्हणजेच हा खुळा रस्सा.

रस्सामंडळ

फोटो स्रोत, BCC

फोटो कॅप्शन, रटरटणारं मटण हा रस्सामंडळाचा गाभा असतो

खुळा रस्सा म्हटलं की, कोल्हापूरमध्ये लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण या रस्सामंडळाची खासियत म्हणजे ही माळावरची मेजवानी असते.

रश्श्याची मेजवानी होते कशी?

या पार्टीचा 'फील' येतो, तो एखाद्या जंगलात किंवा नदीचा काठी. मित्रांचं टोळकं तिथं आपापल्या घरची मोठमोठी पातेली, भांडी पोहोचतात. कांदा, लसूण, मसाले, टॉमेटो वगैरे साहित्य घेऊन जातं. पोळ्या-चपात्या-भाकरी वगैरे सर्वजण आपापल्या घरूनच आणतात.

तिथे काटक्या वगैरे जमवून दगडांची चूल तयार केली जाते. त्यावर पातेली ठेवून मग स्वयंपाक रांधायची सुरुवात होते.

काही 'बल्लवाचार्य' आपल्या पाककौशल्याची चुणूक दाखवायला उत्सुक असतातच. काही जण कांदा-टॉमेटो वगैरे चिरून देण्याचं काम करतात.

रस्सामंडळ
फोटो कॅप्शन, मित्रमंडळींसाठी रस्सामंडळ ही पर्वणी असते

ज्यांना स्वयंपाकाची सवय नसते, ते बापडे काटक्या-लाकडं वगैरे गोळा करून सक्रीय सहभाग नोंदवतात. काही खुशालचेंडू फक्त इतरांचं मनोरंजन करण्याचं काम इमानेइतबारे करत असतात.

मोकळ्या रानात झोंबऱ्या हवेत मग चुलीची ऊबही हवीहवीशी वाटते आणि मित्रांचं कोंडाळं मटण कसं बनतंय, हे पाहण्याच्या निमित्ताने चुलीभोवती एकत्र येतात.

रस्सा आणि सुकं मटण

सुरुवातीला एका मोठ्या पातेल्यात पाणी टाकून त्यात खडा मसाला आणि मटणाचे तुकडे टाकले जातात. हे मटण थोडंसं उकडून घेतात.

दुसऱ्या चुलीवर दुसऱ्या पातेल्यात तेलावर कांदा, टॉमेटो आणि इतर मसाला टाकून तो चांगला परतून घेतला जातो. कांदा जरासा तांबूस झाला की त्यात अस्सल कोल्हापूरचं लाल झणझणीत तिखट टाकतात.

रस्सामंडळ
फोटो कॅप्शन, रटरटणारं मटण

हा मसाला थोडा शिजला की, त्यात उकडून घेतलेले मटणाचे तुकडे टाकतात. मटण मस्त शिजेपर्यंत हे पातेलं झाकून ठेवतात. हे सुकं मटण तयार होतं.

त्याचबरोबर कोल्हापूरचा सुप्रसिद्ध तांबडा-पांढरा रस्साही बनवला जातो. पांढऱ्या रश्श्यासाठी त्यात ओल्या नारळाचा मसाला टाकतात.

एकदा का मटण तयार झालं की, दोस्तमंडळी आपापली ताटं घेऊन रानातच बैठक मारतात. सोबत कापलेला कांदा आणि वरून लिंबू पिळून मिटक्या मारत या रश्श्याचा आस्वाद घेतला जातो.

हिवाळ्यातल्या खास पदार्थांचा पहिला भाग - विदर्भातल्या शेतांमध्ये बनणारे रोडगे किंवा पानगे

व्हीडिओ कॅप्शन, वैदर्भीय खाद्यसंस्कृतीचा मानबिंदू - रोडगे

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)