बाबर : मध्य आशियात वर्चस्वाच्या लढाईपासून ते मुघल साम्राज्याच्या स्थापनेपर्यंत

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मिर्झा एबी बेग
- Role, बीबीसी उर्दू, दिल्ली
"आधुनिक राजकीय इतिहासकार मॅकावली यांनी बहुतेक बाबर यांच्याबद्दल ऐकलं नसेल. जर त्यांनी ऐकलं असतं तर 'द प्रिंस' हे पुस्तक लिहिण्याऐवजी त्यांनी बाबर यांच्या आयुष्यावर आधारित एखादं पुस्तक नक्की लिहिलं असतं. हे पुस्तक लिहिण्यात त्यांनी जास्त रस दाखवला असता."
इंग्रजीतील प्रसिद्ध कादंबरीकार ई. एम. फॉस्टर यांचं हे वाक्य.
बाबर हे केवळ यशस्वी राज्यकर्तेच नव्हते. तर सौंदर्यबोध आणि कलात्मक गुणही त्यांच्यामध्ये होते.
मुघल साम्राज्याचे संस्थापक जहीर-उद-दीन मोहम्मद बाबर (1483-1530) यांचं वर्णन इतिहासात एक विजेते म्हणून केलं जातं. तसंच एक कलाकाल आणि लेखक म्हणूनही त्यांची ओळख सर्वमान्य आहे.
स्टीफन डेल हे इतिहासकार बाबरबद्दल लिहितात, "बाबर हे एक बादशाह म्हणून अधिक महत्त्वाचे आहेत की एक कवी आणि लेखक म्हणून हे ठरवणं अतिशय कठीण काम आहे."
सध्याच्या भारतात बहुसंख्याक हिंदू वर्गातील एका विशिष्ट विचारसरणीचे लोक बाबर यांना आक्रमणकर्ता, लुटारू, नफाखोर, हिंदूंचा शत्रू, अत्याचारी आणि दडपशाही करणारा बादशाह मानतात. हा विषय इथपर्यंतच मर्यादित नाही. तर भारताचा सत्ताधारी पक्ष बाबरच नव्हे तर मुघल साम्राज्याशी संबंधित प्रत्येक गोष्टींचा विरोध करताना दिसतो.
पाचशे वर्षांपूर्वी बाबरने अद्वितीय अशा एका साम्राज्याची स्थापना केली होती. त्यांनी 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहिम लोधीला हरवलं आणि भारतात एक नवं साम्राज्य स्थापन केलं.
आपल्या सर्वोच्च सत्ताकाळात मुघल साम्राज्याकडे जगभरातील एक-चतुर्थांश संपत्ती होती. या साम्राज्याचा विस्तार अफगाणीस्तानसह संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेला होता.
बाबर यांचा सर्वांत मोठा परिचय
बाबर यांचं जीवन अतिशय संघर्षपूर्ण राहिलं. सध्याच्या जगात त्यांचा सर्वांत मोठा परिचय म्हणजे त्यांची आत्मकथा. त्यांचं पुस्तक 'बाबरनामा' किंवा 'तुज्क-ए-बाबरी' या नावाने ओळखलं जातं.

फोटो स्रोत, Google
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात इतिहास विभागाच्या प्रमुख निशात मंजर यांनी बाबर यांच्या आयुष्याबाबत अधिक माहिती दिली.
त्यांच्या मते, बाबरांचं आयुष्य हे दोन भागात विभागलं जाऊ शकतं. एक भाग सीर दरिया आणि आमू नदीदरम्यान मध्य आशियात वर्चस्वाच्या संघर्षाचा आहे. तर दुसरा भाग लहान असला तरी महत्त्वपूर्ण आहे. या भागात चार वर्षांत त्यांनी भारतात एका प्रचंड मोठ्या साम्राज्याची स्थापना केली. हे साम्राज्य तब्बल 300 वर्षं चाललं.
ऑक्सफोर्ड सेंटर फॉर इस्लामिक स्टडीजमध्ये दक्षिण आशियाई इस्लाम विषयाचे फेलो मुईन अहमद निजामी यांनी बीबीसीला सांगितलं, "तैमूर आणि चंगेज यांच्या वंशाच्या बाबर यांना वडील उमर शेख मिर्झा यांच्याकडून फरगना नावाचं एक छोटंसं साम्राज्य क्षेत्र वारसाहक्काने मिळालं. फरगनाच्या आजूबाजूच्या प्रदेशात त्यांच्या नातेवाईकांचं राज्य होतं.
ते सांगतात, "बाबर यांना आपलं हे साम्राज्य गमवावं लागलं होतं. त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वाधिक काळ विविध मोहिमांमध्ये आणि वाळवंटात भटकत घालवला. आपलं साम्राज्य परत मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरत होते. परिस्थितीनेच त्यांना भारताकडे कूच करण्यास भाग पाडलं."
बाबर यांची आत्मकथा
बाबर यांनी त्यांना सातत्याने मिळणाऱ्या अपयशाचा उल्लेख आत्मकथेत केला आहे.
ते लिहितात, "जितके दिवस मी ताश्कंदमध्ये होतो, त्यावेळी मी अत्यंत दुःखी आणि निराश होतो. माझं साम्राज्य माझ्या ताब्यात नव्हतं. ते परत मिळण्याचीही कोणती चिन्हं नव्हती. माझे बहुतांश नोकर निघून गेले. सोबत राहिलेले नोकर गरीबीमुळे माझ्यासोबत फिरू शकत नव्हते."

फोटो स्रोत, RAKTAB
बाबर पुढे लिहितात, "अखेर बेघर होऊन भटकत-भटकत मी थकून गेलो. मी आयुष्याला कंटाळलो होतो. असलं जीवन जगण्यापेक्षा शक्य त्या ठिकाणी निघून जावं, असं माझ्या मनाने मला सांगितलं. कोणीच पाहू नये अशा ठिकाणी जाऊन लपावं. लोकांसमोर अशा प्रकारची बदनामी सहन करत बिकट परिस्थितीत जगण्यापेक्षा शक्त तितक्या दूर निघून जावं, मला कुणीच ओळखू नये, असं वाटत होतं. या विचारानेच उत्तर चीनच्या दिशेने जायचं ठरवलं होतं. मला लहानपणापासूनच प्रवास करायला आवडायचा. पण वतनदारी आणि राजकीय संबंधांच्या कारणांमुळे मी जाऊ शकत नव्हतो."
बाबर यांनी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी इतर ठिकाणीही लिहिल्या आहेत, असं मुईन अहमद यांनी सांगितलं.
त्यापैकी एका ठिकाणी तर त्यांनी लिहिलं, "अजून काय बघायचं बाकी आहे? नशिबाने ही कसली थट्टा लावली आहे. आणखी किती अत्याचार मला पाहावा लागेल?"
बाबर यांनी आपली बिकट परिस्थिती एका 'शेर'च्या माध्यमातून व्यक्त केली होती.

फोटो स्रोत, WIKIPEDIA
'आता माझ्याकडे मित्रं नाहीत, देश नाही वा पैसा नाही. मला एका क्षणाचीही विश्रांती नाही. इथं येणं हा माझा निर्णय होता, मी आता परत जाऊही शकत नाही,' या अर्थाने त्यांनी एक शेर लिहिला होता.
बाबर यांच्या जहीर-उद-दीन बाबर या आत्मकथास्वरूपी कादंबरीत डॉ. प्रेमकिल कादरॉफ यांनी बाबर यांची हीच अस्थिर आणि अशांत परिस्थिती दर्शवली आहे.
एका ठिकाणी ते लिहितात, "बाबर श्वास घेण्यासाठी थोडा थांबला पण त्याने आपलं बोलणं सुरू ठेवलं. सगळं नश्वर आहे. मोठमोठ्या साम्राज्यांचे संस्थापक जग सोडून जाताच त्यांचं साम्राज्य तुकडे-तुकडे होतं. पण शायराचे शब्द कित्येक युग जिवंत राहतात."
त्यांनी एकदा आपला एक शेर जमशेद बादशाह यांच्या उल्लेखानंतर दगडावर कोरला होता. आज हा शेर तजाकिस्तानच्या एका संग्रहालयात आहे. हा शेर त्यांच्या परिस्थितीची योग्य व्याख्या करतो.
'गिरफ्तेम आलम ब मर्दी व जोर
व लेकिन न बर्देन बा खुद बा गोर'
बळ आणि धाडसाच्या जोरावर जगावर विजय मिळवता येतो. पण स्वतःला स्वतःहून दफन करता येत नाही, असा त्याचा अर्थ होतो.
यावरून बाबर पराभव स्वीकारणाऱ्यांपैकी नव्हते, हे कळून येतं.
बाबर यांच्यात जमिनीवर लाथ मारून पाणी काढण्याइतकं बळ होतं. यामुळेच एका ठिकाणी डॉ. प्रेमकिल कादरॉफ यांनी बाबरच्या परिस्थितीचं अशा प्रकारे वर्णन केलेलं आढळतं.
बाबर यांचं भारताच्या दिशेने प्रयाण
बाबर यांचं लक्ष भारताकडे कसं वेधलं, याबाबत वेगवेगळ्या कथा आहेत. पण प्रा. निशात मंजर यांच्या मते, "भारताकडे त्यांचं लक्ष वेधलं जाणं उचित होतं. कारण काबूलमध्ये कर लावण्यासाठी फक्त एकच गोष्ट होती. शासकीय प्रशासनाला संपत्तीची प्रचंड आवश्यकता होती. त्यामुळे बाबर यांच्यासमोर भारताकडे प्रयाण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता.
यामुळेच सिंधु नदी पार करण्याऐवजी त्यांनी भारताच्या पश्चिम भागावर अनेक हल्ले केले. तिथं लूटमार करून ते काबूलला परत जायचे.
मंजर यांच्या मते, "बाबर ज्याप्रकारे आपली आत्मकथा सुरू करतात, एका 12 वर्षांच्या मुलाकडून अशा प्रकारच्या धाडसाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. पण बाबर यांच्या रक्तात सत्ताकौशल्यासोबतच धाडसही होतं."
नशीब आणि गरज या दोहोंमुळे बाबर भारताकडे ओढले गेले. अन्यथा त्यांचे सुरुवातीचे प्रयत्न उत्तर आशियातील त्यांचं परंपरागत साम्राज्य बळकट करणं हेच होते.

फोटो स्रोत, BRITISH LIBRARY
राणा साँगा किंवा दौलत खान लोधी यांनी त्यांना दिल्ली साम्राज्यावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केलं होतं की नाही, हा एक वादाचा विषय आहे.
पण आजच्या लोकशाही मूल्यांवरून आपण संस्थान (सल्तनत) काळ पारखू शकत नाही. त्याकाळी कोणीही कुठेही जायचा. विजयी झाल्यानंतर सामान्य आणि खास असे दोन्ही गट त्यांचा स्वीकार करत. त्यांना हल्लेखोर समजलं जात नव्हतं.
पण बाबर यांच्या भारताच्या स्वप्नाबाबत एल. एफ. रुशब्रुक यांनी आपल्या पुस्तकात जहीर-उद-दीन मोहम्मद बाबरमध्ये लिहिलं आहे.
"बाबर यांनी सगळं काही गमावल्यानंतर 'देख कात' नामक गावात राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी स्वतःला पूर्णपणे तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतलं. त्यांनी आपले सगळे आधीचे दावे सोडून दिले. एक सर्वसामान्य पाहुण्यांच्या स्वरुपात ते गावच्या सरदारच्या घरी राहू लागले."
दरम्यान, या गावात घडलेल्या एका घटनेने बाबर यांच्या भावी आयुष्यावर परिणाम होणार हे नक्की होतं.
सरदार 70 वा 80 वयाचे होते. त्यांची आई 111 वर्षांची होती. या महिलेचे नातेवाईक तैमूर बेग यांच्या सैन्यासोबत भारतात गेले होते. वृद्ध महिला ही गोष्ट नेहमी सांगायची. तीच गोष्ट बाबर यांच्या डोक्यात बसली.
बाबर यांच्या पूर्वजांबद्दलही वृद्ध महिलेने अनेक गोष्टी सांगितल्या. त्या कथा ऐकून बाबर यांच्या मनात एक उत्साह निर्माण झाला. तेव्हापासूनच भारतात तैमूरचा विजय पुनरुज्जिवित करण्याच्या स्वप्नाने बाबर यांच्या मनात घर केलं.
जामिया मिलिया विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या सहायक प्राध्यापक रहमा जावेद राशिद यांच्या मते, "बाबर वडिलांकडून तैमूर वंशाचे पाचवे तर आईकडून चंगेज खानचे 14वे वंशज होते. आशियातील दोन महान विजेत्यांचं रक्त बाबर यांच्या अंगात होतं. याच रक्ताच्या बळावर त्यांना इतर साम्राज्यांवर अधिपत्य मिळवता आलं."
शिक्षण आणि प्रशिक्षण
बाबर यांचा जन्म आणि शिक्षण फरगनाची राजधानी अंदजानमध्ये झालं. प्रा. निशात मंजर सांगतात, "त्यांचे दोन्ही पूर्वज चंगेज खान आणि तैमूर लंग शिकलेले नव्हते. पण शिक्षणाशिवाय शासन चालवणं अवघड असल्याचं त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं. बाबर यांचं शिक्षणसुद्धा इस्लामिक परंपरेनुसार चार वर्षं चार दिवस वयात सुरू करण्यात आलं."
चंगेज खानच्या वंशजांना शिक्षण देणारे लोक उईगर (वीगर) समुदायातून होते. उईगर लोक सध्या चीनच्या शिंनझियांग प्रांतात हालअपेष्टांचं जीवन जगत आहेत. पण त्यावेळी मध्य पूर्व आशियात त्यांना उच्च शिक्षित मानलं जात होतं.
अशा प्रकारे, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तैमूर बेगने चुगताई तुर्कांना ठेवलं होतं. त्यांनाही त्या काळात सर्वाधिक सुशिक्षित मानलं जात होतं.

फोटो स्रोत, British Library
त्यांनी अरबी, फारसीवर प्रभुत्व ठेवत आपल्या भाषेलाही साहित्यिक दर्जा मिळवून दिला होता.
पण बाबर यांचं इतक्या कमी वयात बादशाह बनणं, युद्धमोहिमा, त्यानंतरची भटकंती असं आयुष्य असूनही त्यांना ज्ञान आणि कौशल्याच्या क्षेत्रात हे स्थान कसं मिळालं?
या प्रश्नाचं उत्तर देताना प्रा. निशात सांगतात, "बाबर जिथं-जिथं गेले, तिथं त्यांचे शिक्षकही त्यांच्यासोबत जायचे. त्यांना सगळ्या प्रकारच्या लोकांना भेटणं आवडायचं. विशेषतः त्यांनी अली शेर नवाई यांच्यासारख्या कवींना अभय दिलं होतं."
निशांत पुढे सांगतात, "बाबर यांनी ज्या प्रकारे स्वतःचं मोकळेप्रमाणे वर्णन केलं, ते इतर बादशाहांच्या बाबतीत पाहायला मिळत नाही. त्यांनी आपलं लग्न, प्रेम, दारू पिणं, वाळवंटातली पायी भटकंती, शल्य आणि आपल्या मनातल्या प्रत्येक स्थितीचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे."
स्टीफन डेल यांनी आपल्या 'गार्डन ऑफ पॅराडाईज' या पुस्तकात बाबर यांचं गद्य लेखन उत्तम असल्याचं म्हटलंय.
बाबर यांनी आपल्या मुलाचं लेखन कशा प्रकारे सुधारलं होतं, याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.
बाबर यांनी हुमायूं यांना एक पत्र लिहिल्याची नोंद आहे. या पत्रात 'आपल्या लेखनात आशय हरवून जातो, त्यामुळे आपण स्वतः लिहावं,' असा सल्ला बाबर यांनी हुमायूं यांना दिला होता.
उर्दूचे सुप्रसिद्ध शायर गालिब यांनी 300 वर्षांनंतर उर्दूमध्ये लिहिण्याची विशिष्ट शैली विकसित केली होती. याचा त्यांना गर्वही होता. अशाच प्रकारचं स्पष्ट आणि साधं सोपं गद्य बाबर यांनी त्यांच्या आधीच आपल्या उत्तराधिकाऱ्यांसाठी लिहिलं होतं.
बाबर यांचं लग्न त्यांची चुलत बहीण आयेशा हिच्याशी झालं होतं, हे बाबरनामा वाचताना समजतं. आयेशा आणि बाबर यांना एक मुलगी झाली. पण ती 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस जगू शकली नाही. बाबर यांचं आपल्या पत्नीवर थोडंसंही प्रेम नव्हतं.
त्यांनी लिहिलं आहे, "उर्दू बाजारात एक मुलगा होता. बाबरी नावाचा. मला त्याच्यासोबत एक वेगळाच बंध जुळल्यासारखा वाटत आहे."
इस परिवश पे क्या हुआ शैदा
बल्की अपनी खुदी भी खो बैठा
त्यांचं आणखी एक फारसी शेर खालीलप्रमाणे -
हेच किस चूं मन खराब व आशिक व रुस्वा मबाद
हेच महबूब चोत व बे रहम व बे परवा मबाद
याचा अर्थ "पण परिस्थिती ही होती की बाबरी माझ्यासमोर आल्यास मी लाजून त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. मी त्याला भेटलो, बोललो तरी डोळ्यात डोळे घालत नाही. माझ्या मनात अशी अस्वस्थता निर्माण होते की मी तो आल्याबद्दल त्याचे आभारही मानू शकत नाही. त्याच्या न येण्याबाबत तक्रारही करू शकत नाही, त्याला जबरदस्तीने बोलवण्याची हिंमतही माझ्यात नाही."
शोम शर्मिंदा हर गह यार खुदरा दर नजर बेनम
रफिका सूए मन बेनंदू नम सूए दीगर बेनम
"त्यावेळी माझी स्थिती अशी होती की प्रेमाचा जोर आणि जवानीचा जोश इतका चढला की मी कधी-कधी अनवाणी पायांनी डोक्यावर काहीही न घेता, महाल, बगीचात फिरत होतो. मला आपला-परका काहीच ध्यानात नव्हतं. स्वतःची किंवा दुसऱ्याची चिंताही मला नव्हती."
बाबर यांची सर्वात प्रिय पत्नी माहिम बेगम होती. तिच्या गर्भातूनच हुमायूँ यांचा जन्म झाला. त्याशिवाय गुलबदन बेगम आणि हिंदाल, असकरी कामरान यांचा जन्म इतर पत्नींकडून झाला.
दारू पिणं
बाबर यांचा एक शेर अनेक ठिकाणी पाहायला मिळतो.
नौ रोज व नौ बहार व दिलबरे खुश अस्त
बाबर बह ऐश कोश आलम दोबारा नीस्त
"नवीन दिवस आहे, नवीन बहर आला आहे. दारू आहे, सुंदर प्रेमी आहे. बाबर अशा मस्तीत राहा, हे जग दुसऱ्यांदा पाहायला मिळणार नाही."
"बाबर यांनी 21 व्या वर्षापर्यंत एक पवित्र जीवन घालवलं. पण नंतर त्यांना दारू पिण्याची मैफल आवडू लागली. त्यांच्या मैफलींमध्ये दारू पिणाऱ्या महिलांचाही उल्लेख करण्यात आला आहे. बाबर यांनी त्यांचा उल्लेख लपवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. ते आपल्या वडिलांबाबतही लिहितात, ते दारूच्या अधीन गेले होते. अफू घेऊ लागले होते. तसंच हुमायूँ हेसुद्धा अफूचे व्यसनाधीन होते," निशात सांगत होत्या.
त्या पुढे सांगतात, "बाबर यांनी दारू पश्चातापाने सोडली. त्यावेळी ती त्यांची रणनिती होती. त्यांच्यासमोर भारताचा सर्वांत मोठा युद्धवीर राणा साँगा होता. तो याआधी कधीच युद्धात हरलेला नव्हता. पानिपतच्या लढाईनंतर बाबरचं सैन्य निम्म-अर्धं उरलं. युद्धादरम्यान बाबर यांना पराभव समोर दिसू लागला. त्यावेळी त्यांनी एक आक्रमक भाषण दिलं आणि दारू सोडण्याचा निर्णय घेतला."
काही मुस्लीम धर्मगुरूंच्या मते, बाबर यांच्या याच खऱ्या पश्चातापामुळे अल्लाहने मुघलांना भारतात 300 वर्षांचं साम्राज्य मिळवून दिलं. पण जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक रिझवान कैसर यांच्या मते, "ही बाबर यांच्या कार्याची धार्मिक व्याख्या असू शकते. पण याचं ऐतिहासिक महत्त्व नाही. हे कोणत्याही प्रकारे सिद्ध करता येणार नाही. पण बाबरने युद्ध जिंकण्यासाठी धार्मिक उत्साहाचा वापर केला, असं जरूर म्हणता येईल."
पूर्वी, बाबर यांनी आपल्या वडिलांकडून मिळालेलं फरगना साम्राज्य मिळवण्यासाठी इराणच्या बादशाहाचा पाठिंबा मिळवला होता. त्यावेळी त्यांनी स्वतः शिया असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी एका धर्मगुरूने त्यांना विरोध केला होता.

प्रा. निशात सांगतात, "बाबर यांनी अनेक ठिकाणी शत्रू मुस्लीम शासकांना 'काफिर' शब्दाने संबोधलं होतं. त्यांच्यासाठी अपशब्द वापरले होते."
बाबर यांनी आपल्या पश्चातापाचा उल्लेख खालीलप्रकारे केला आहे.
बाबर लिहितात, "मी काबूलहून दारू मागवली होती. बाबा दोस्त सूजी उंटांचा काफिला भरून दारूचे मडकी घेऊन आला आहे. दरम्यान मोहम्मद शरीफ नजूमी यांनी ही गोष्ट पसरवली की मंगळ यावेळी पश्चिमेला आहे. त्यामुळे युद्धात पराभव होईल. याच गोष्टीने माझ्या सैन्याला घाबरवलं होतं."
"जमादी-उल-सानीची (अरबी महिना) 23 वी तारीख होती. तो दिवस मंगळवारचा होता. अचानक मला दारू सोडण्याचा विचार आला. मनाशी संकल्प करून मी दारूचा त्याग केला. दारूची सगळी सोन्याची आणि चांदीची भांडी तोडली. छावणीत असलेली सगळी दारू मी फेकायला लावली. दारूच्या भांड्यांतून जे सोनं-चांदी मिळालं ते गरिबांमध्ये वाटलं. या कामात माझा सहकारी अस यानेही मला मदत केली."
"मी दारूचा त्याग केल्याची माहिती मिळताच माझ्या तीन अधिकाऱ्यांनीही दारू सोडली. बाबा दोस्तने ऊंटांच्या काफिल्यावर अनेक मडकी दारू आणली होती. ही दारू फेकण्याऐवजी त्यामध्ये मीठ टाकून त्याचं सिरका (व्हिनेगर) बनवण्यात आलं. ज्याठिकाणी मी दारूचा त्याग केला तिथं एक खड्डा करून पश्चातापाच्या आठवणीत एक स्मारक बांधलं."
"अल्लाहने राणा साँगावर विजय मिळवून दिल्यास माझ्या साम्राज्यात मी सगळ्या प्रकारचे कर माफ करेन, असाही निर्णय घेतला होता. या माफीची घोषणा करणं आवश्यक असल्याचं मला वाटलं. त्यामुळे लेखकांना याविषयी लेख लिहिण्यास सांगितलं. ही बातमी दूरपर्यंत प्रसिद्ध झाली पाहिजे, असे आदेश दिले."
"शत्रूच्या मोठ्या संख्येमुळे सैन्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे मी सगळ्या सैन्याला एका ठिकाणी एकत्रित केलं. म्हणालो, 'जगात आलेल्या प्रत्येकाला मरायचंच आहे. आयुष्य अल्लाहच्या हातात आहे. मृत्यू समोर पाहून कुणीही परत फिरणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत लढाई सुरू ठेवली जाईल.' माझ्या या भाषणाचा चांगलाच प्रभाव पडला. यामुळे सैन्यात उत्साह संचारला. जोरदार लढाई झाली. अखेर विजय मिळाला. 1527 मध्ये हा विजय मिळाला."
बाबर आणि त्यांचे नातेवाईक
पानिपतच्या लढाईनंतर बाबर यांच्या हाती लागलेला खजिना त्यांनी उदारपणे आपले नातेवाईक आणि पदाधिकाऱ्यांमधून वाटला. बाबर यांनी याचा उल्लेखही केला आहे. तसंच त्यांची मुलगी गुलबदन बानो हिनेसुद्धा तिच्या हुमायूँनामा पुस्तकात सविस्तरपणे याबद्दल मांडलं आहे.
प्रा. निशात मंजर आणि डॉ. रहमा जावेद यांनी बीबीसीला सांगितलं, "महिलांसोबतचे संबंध हे बाबर यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं. महिला त्यांच्या चर्चेत सहभागी होत्या. त्यांची आई त्यांच्या सोबतच होती. तर त्यांची आजी समरकंदहून अंदजानला येत असायची. त्यांनी आपल्या आत्मकथेत काकी, मावशी, बहीण आणि अत्या यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.
बाबर यांच्या आत्मचरित्रात महिलांचा जितका उल्लेख पाहायला मिळतो, तसा उल्लेख मुघल साम्राज्यात कधीच पाहायला मिळाला नाही.
याबाबत बोलताना निशात मंजर यांनी म्हटलं, "अकबर बादशाहच्या शासनाकाळापर्यंत मुघलांवर तुर्क आणि बेग परंपरांचा प्रभाव जास्त होता. यामुळे महिलांची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी दिसत होती.
यामुळेच बाबर यांनी आपल्या दोन आत्यांचा उल्लेख केला आहे. त्या दोघी पुरुषांप्रमाणे पगडी बांधायच्या. घोड्यावर स्वार होऊन तलवारबाजी करायच्या. तलवार चालवणं आणि धाडस त्यांच्यात होतंच. पण दरबार आणि सभांमध्येही त्या सहभागी व्हायच्या. त्यांचा आवाका फक्त लग्नापर्यंतच मर्यादित नव्हता."
प्रा. निशात यांच्या मते, "मुघलांचं भारतीयीकरण अकबरच्या काळात सुरू झालं. त्यानंतर महिला मागे पडत गेल्या. पुढे जहांगीरच्या बंडखोरीच्या काळात त्या समझोता करताना दिसतात. पण त्याही त्यांच्या अत्या आणि आजी आहेत. त्यांना जन्म दिलेल्या आईचा उल्लेख कुठेच आढळत नाही. चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका खूप वाढवून दाखवण्यात आली आहे."
बाबरच्या व्यक्तिमत्त्वात वारसा
बाबर यांच्यावर भारतात हल्लेखोर असल्याचे मंदिरं तोडल्याचे तसंच हिंदुंना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावण्याचे आरोप केले जातात.
परंतु त्यांचा नातू जलालुद्दीन मोहम्मद अकबर याला शांती दूत संबोधलं जातं. धार्मिक सहिष्णुता ही त्यांच्या कार्याचा भाग असल्याचं सांगितलं जातं.
पण दिल्ली विद्यापिठात इतिहास विभागाचे सहायक प्राध्यापक सैफुद्दीन अहमद सांगतात, "इतिहासकार आणि राजकीय विश्लेषकांनी अकबर बादशाह आणि सम्राट अशोक यांना एक मजबूत शासक म्हणून पाहिलं.
त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. या दोन्ही राजांना भारताच्या इतिहासात अबाधित स्थान आहे. याउलट बाबर हे अयोध्येत मंदिर तोडून मशिद बांधल्यामुळे बदनाम आहेत."
बाबर यांनी हुमायूँ यांना आपला उत्तराधिकारी नेमलं. त्यांना एक पत्र लिहून ते म्हणतात, "माझ्या मुला, सर्वप्रथम, धर्मावर आधारित राजकारण करू नको. तुझ्या हृदयात धार्मिक द्वेषाला बिलकुल जागा देऊ नको. लोकांची धार्मिक भावना आणि परंपरांचा विचार करून सर्वांना पूर्ण न्याय दे."
सैफुद्दीन अहमद सांगतात, "बाबर यांची हीच विचारसरणी आजच्या काळात सेक्युलरिझ्म म्हणून ओळखली जाते. बाबर यांनी विचारसरणीमध्ये तणाव निर्माण न करण्याची सूचना दिली होती. लोकांच्या मनात जागा मिळवायची असेल तर दडपशाहीपासून दूर राहा, असंही त्यांनी सांगितलं होतं."

फोटो स्रोत, British Library
सैफुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "बाबरची तिसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही कोणाच्याही समुदायाचं प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करू नये. नेहमीच न्याय करावा. तरच बादशाह आणि जनता यांच्यातील संबंध चांगले राहतील. देशात शांतता नांदेल. त्याशिवाय आपल्या जनतेला त्यांच्या वैशिष्ट्याने, हवामानानुसार ओळखावं, त्यामुळे लोक विविध प्रकारच्या आजारांनी वाचू शकतील."
प्रा. निशात मंजर यांच्या मते, बाबर यांचं हृदय भारताप्रमाणेच मोठं होतं. निरंतर संघर्षावर विश्वास ठेवत होते. निसर्गावरचं त्यांचं प्रेम होतं. भारतात बगीचांची सुरुवात ही त्यांच्याच काळात सुरू झाली. ही नव्या युगाची सुरूवात होती. याचेच परिणाम आपण जहाँगीर यांच्या बगीचांमध्ये आणि शाहजहान यांच्या वास्तुकलेत पाहतो."
बाबर यांच्या आयुष्यात धर्माचा प्रभाव होता. लोकांशी बोलताना ते धार्मिक गोष्टींचा उल्लेख नेहमी करत असत. त्यांची नमाज कधी आणि कोणत्या वेळी सुरू झाली. त्यावेळी ते कुठे होते, याचा उल्लेख ते करायचे.
ते आपल्या ज्योतिषांचा सल्ला घ्यायचे. पण अंधश्रद्धेपासून दूर होते. त्यामुळे एका ठिकाणी बाबर यांनी लिहिलं, "इथं एक संत मुल्ला अब्दुल रहमान होते. ते अतिशय विद्वान होते. नेहमी वाचत राहायचे. त्याच स्थितीत त्यांचा मृत्यू झाला.
लोक सांगतात, गजनीमध्ये एक दर्गा आहे. त्या ठिकाणी तुम्ही दरूद वाचू लागल्यास तिथंली कबर हलू लागते. मी जाऊन पाहिलं तर मकबरा हलत असल्याचं मला दिसलं. मी याबाबत माहिती घेतली तर कबरीजवळ राहणाऱ्या लोकांची ही चलाखी असल्याचं मला दिसून आलं. थडग्याच्या वर एक जाळी बनवली आहे. या जाळीवर चालताना ही जाळी हलू लागते. त्यामुळेच थडगं हलत असल्याचं वाटू लागतं. मी ही जाळी तोडून टाकली आणि घुमट बनवलं.
बाबरनामामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटनांचा उल्लेख आहे. पण बाबर यांचा मृत्यू हीसुद्धा अध्यात्मिक घटना आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गुलबदन बानो यांनी याचं सविस्तरपणे वर्णन केलं आहे. हुमायूँ यांची स्थिती बिघडत चालली होती. यामुळे बाबर यांनी त्यांच्या पलंगाच्या चारी बाजूंना एक चक्कर मारली आणि एक प्रतिज्ञा केली.
गुलबदन लिहितात, "आमच्याकडे असं व्हायचं. पण बाबा जानम (बाबर) यांनी आपल्या आयुष्याच्या बदल्यात हुमायूँ यांचं आयुष्य मागितलं. त्यामुळे हुमायूँ यांची तब्येत सुधारत गेली आणि बाबर आजारी पडत गेले. याच स्थितीत 26 डिसेंबर 1530 ला बाबार यांनी अखेरचा श्वास घेतला. जाताना अनेक अनुत्तरित प्रश्न मागे सोडून गेले."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








