औरंगजेबाला सुधारस आणि रसनाविलास ही नावं सुचली तेव्हा...

औरंगजेब

फोटो स्रोत, OXFORD

फोटो कॅप्शन, औरंगजेब
    • Author, अव्यक्त
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

कोणताही धार्मिक पंथ वा संप्रदाय अस्तित्त्वात येण्याआधी भाषा अस्तित्त्वात आल्या होत्या. पण कालागणिक अनेक भाषा काही समुदायांची ओळख म्हणून रूढ झाल्या, हे कटू सत्य आहे.

विविध संप्रदायांचा विकास ज्या क्षेत्रात झाला आणि या धर्मांचे प्रचारक किंवा महत्त्वाचे मानले जाणारे लोक जी भाषा वापरायचे, त्याच भाषांमध्ये धर्मग्रंथ लिहीण्यात आले आणि म्हणूनच या भाषा समुदायांची सांस्कृतिक ओळख झाल्या, हे यामागचं एक कारण असू शकतं.

समाजाची भाषा

म्हणूनच अरबी - फारसीला इस्लामशी जोडलं जातं. याच प्रकारे पाली आणि प्राकृत या भाषा बौद्ध आणि जैन धर्माची ओळख बनल्या.

गुरुमुखीमध्ये लिहिण्यात येणारी पंजाबी भाषा शीख समुदायाशी जोडण्यात आली. पण याचा दोष ना भाषांना देता येईल ना आपल्या पूर्वजांना.

संस्कृत

फोटो स्रोत, FIROZ KHAN

पण त्यांच्या नावावर धर्म चालवणाऱ्या आणि या एकाच भाषेशी या धर्माचा संबंध रूढ करणाऱ्या नंतरच्या पिढीच्या अनुयायांची ही चूक असल्याचं म्हटलं जाऊ शकतं.

भारतामधल्या भाषांच्या विकासाबद्दल बोलायचं झालं तर आज आपण ज्या हिंदी भाषेमध्ये बोलतो, तिचा विकास ज्या बोलीतून झाला आहे त्यामध्ये संस्कृतसोबतच अरबी आणि फारसी भाषांचंही योगदान आहे. मुसलमान शासकांसोबत अमीर खुसरो, सुफी कवी आणि संतांनीदेखील धर्मावर आधारित हा भाषाभेद कधीही स्वीकारला नाही.

यासाठी काही अपवाद नक्कीच असतील. पण सुरुवातीला सगळ्यांनीच अगदी खुल्या मनाने सगळ्या भाषा शिकल्या आणि स्वीकारल्या होत्या. अनेक धर्मग्रंथांचेही एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद झाले.

'संस्कृति के चार अध्याय' या प्रसिद्ध पुस्तकात रामधारी सिंह ऊर्फ 'दिनकर' यांनी ताजक शास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या श्लोकांची काही रंजक उदाहरणं दिली आहेत. अरबी आणि संस्कृतचा मिलाप या ग्रंथात करण्यात आला आहे. उदाहरणार्थ - 'स्यादिक्कबालः इशराफयोगः, ....खल्लासरम् रद्दमुथोदुफालिः कुत्थम् तदुत्थोथदिवीरनामा.' ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ डॉ. सुनीतीकुमार चटर्जी लिहितात, '16व्या शतकाच्या अखेरपर्यंत सर्व भारतीय मुसलमान (परदेशी, देशी किंवा मिश्र उगम असणारे) फारसीला एका परदेशी भाषेसारखे मानू लागले आणि देशांतर्गत भाषा त्यांनी पूर्णपणे स्वीकारल्या होत्या.'

औरंगजेबाचं संस्कृत प्रेम

दिनकर लिहितात, मुस्लिम बादशहांना व्यवहारांमध्येही संस्कृत शब्द वापरायला आवडायचं कारण या देशात संस्कृत शब्दच अधिक समजले जात. याबाबत एक रंजक किस्सा सांगितला जातो. एकदा औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद आजमशाह याने त्याला काही आंबे पाठवले आणि त्यांचं नामकरण करावं असा आग्रह धरला. त्यावेळी औरंगजेबाने त्यांची नावं ठेवली - 'सुधारस' आणि 'रसनाविलास'

औरंगजेब

फोटो स्रोत, PENGUIN INDIA

फोटो कॅप्शन, औरंगजेब

कदाचित अमीर खुसरो ( 1253-1325)च्या काळापासूनच दोन भाषांचा मिलाफ करत खिचडीप्रमाणे छंद रचण्याची पद्धत निर्माण झाली असावी. त्यांनी अनेकदा आपल्या रचनेमध्ये छंदाचा एक उतारा फारसीत तर दुसरा ब्रजभाषेत रचलेला आहे.

उदाहरणार्थ

'ज़े-हाल-ए-मिस्कीं मकुन तग़ाफ़ुल दुराय नैनांबनाए बतियां

कि ताब-ए-हिज्रां नदारम ऐ जांन लेहू काहे लगाए छतियां'

पण जेव्हा रहीम (अब्दुल रहीम ख़ान-ए-ख़ानां, 1556-1627) यांनी असा भाषा मिलाफाचा प्रयोग केला तेव्हा त्यांनी खडी बोली आणि संस्कृतचा मेळ घातला.

याचं लोकप्रिय उदाहरण म्हणजे -

दृष्टा तत्र विचित्रिता तरुलता, मैं था गया बाग में।

काचितत्र कुरंगशावनयना, गुल तोड़ती थी खड़ी।।

उन्मद्भ्रूधनुषा कटाक्षविशि, घायल किया था मुझे।

तत्सीदामि सदैव मोहजलधौ, हे दिल गुजारो शुकर।।

एकस्मिन्दिवसावसानसमये, मैं था गया बाग मे।

काचितत्र कुरंगबालनयना, गुल तोड़ती थी खड़ी।।

तां द्वष्ट्वा नवयौवनांशशिमुखीं, मैं मोह में जा पड़ा।

नो जीवामि त्वया विना श्रृणु प्रिये, तू यार कैसे मिले।।

रहीम हे मोठे संस्कृत विद्यवान होते. त्यांनी कृष्ण भक्तीचे श्लोक शुद्ध संस्कृतमध्ये रचले. सोबतच वैदिक ज्योतिषावर संस्कृतमध्ये दोन ग्रंथही त्यांनी लिहिले. पहिला आहे 'खेटकौतुकम्' आणि दुसरा 'द्वात्रिंशदयोगावली.'

या काळातल्या कवींच्या या खिचडी भाषेबद्दल 18व्या शतकातील कवी भिखारीदास यांनी लिहिलं होतं -

ब्रजभाषा भाषा रुचिर, कहै सुमति सब कोय।

मिलै संस्कृक-पारस्यो, पै अति सुगम जो होय।।

पण संस्कृतची शुद्धता आणि श्रेष्ठता कायम ठेवण्याची काळजी गेल्या दीर्घ काळापासून संस्कृत विद्वानांना लागून राहिली आहे आणि ही भाषा एका वर्गापर्यंतच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्नही झाला होता.

आधी दलितांना (ज्यांना त्याकाळी 'पंचम' वा 'अंत्यज' म्हटलं जाई) आणि त्यानंतर मुसलमानांना या भाषेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले. म्हणूनच ही भाषा समाजापासून दूर गेली आणि बदलत्या काळानुसार या भाषेचा तितकासा विकासही झाला नाही.

म्हणूनच कबीराने म्हटलं होतं - 'संसकिरत है कूप जल, भाखा बहता नीर।'

त्याच काळातलचे आणखी एक संत रज्जब म्हणतात - 'पराकरित मधि ऊपजै, संसकिरत सब बेद, अब समझावै कौन करि पाया भाषा भेद।'

मलिक मोहम्मद जायसी यांनी म्हटलं होतं - 'अरबी तुरकी हिन्दुई, भाषा जेती आहि। जेहि मह मारग प्रेम का, सबै सराहे ताहि।'

कबीराचं संस्कृतविषयीचं मत

संस्कृतचे विद्वान असणाऱ्या तुलसीदास यांनीही अरबी-फारसी शब्दांचा वापर सढळहस्ते केलाय. म्हणूनच त्यांचं आणि कवी गंग यांचं कौतुक करताना भिखारीदास यांनी लिहिलंय - 'तुलसी गंग दोऊ भये सुकविन को सरदार, जिनके काव्यन में मिली भाषा विविध प्रकार।'

ज्या कवि गंग यांचं भिखारीदास कौतुक करत आहेत त्या कवि गंग यांनी संस्कृत-फारसीत लिहिलेली एक कविता पहा - 'कौन घरी करिहै विधना जब रु-ए-अयां दिलदार मुवीनम्। आनंद होय तबै सजनी, दर वस्ल्ये चार निगार नशीनम्।'

आणखी एक प्रसिद्ध कवी रसखान (मूळ नाव - सैय्यद इब्राहिम खान) हे पठाण होते. पुष्टीमार्गी वल्लभ संप्रदायाचे प्रवर्तक वल्लभाचार्य यांचा मुलगा विठ्ठलनाथ यांचे ते शिष्य होते.

रसखान यांची कृष्ण भक्ती प्रसिद्ध आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ मथुरा आणि वृंदावनात घालवला. त्यांच्याबाबत असंही मानलं जातं की ते संस्कृत विद्वान होते आणि त्यांनी भागवताचा फारसीत अनुवाद केला होता.

असंही म्हटलं जातं की रसखान यांच्यासारख्या मुस्लिम भक्तांनाच उद्देश्यून भारतेंदु हरिश्चंद्र यांनी म्हटलं होतं की 'इन मुसलमान हरिजनन पर कोटिन हिंदू वारिए.'

नजरूल इस्लाम आणि हिंदू देवता

आज हिंदी भाषकांना बांगला भाषेतील रविंद्रनाथ टागोरांनंतरचं सर्वाधित ओळखीचं नाव म्हणजे काजी नजरूल इस्लाम.

प्रसिद्ध समीक्षक रामविलास शर्मा म्हणतात की नजरूल इस्लाम यांनी आपल्या साहित्यिक कलाकृतींमध्ये कुठेही आपल्या मुसलमान असण्याशी तडजोड केली नाही. पण त्यांनी हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन अशा सगळ्या धर्माच्या ग्रंथांमधून आपले दाखले घेतले. त्यातही हिंदू गाथांमधून सगळ्यांत जास्त दाखले त्यांनी घेतले आहेत.

भारतात दलित आणि मुसलमानांनी संस्कृत शिकण्याचं-शिकवण्याचं समर्थन महात्मा गांधींनीही केलं होतं.

20 मार्च 1927 ला हरिद्वारमधील गुरुकुल कांगडीमध्ये राष्ट्रीय शिक्षण परिषदेत केलेल्या अध्यक्षीय भाषणामध्ये गांधीजींनी या गोष्टीवर विशेष भर दिला होता.

संस्कृतचं शिक्षण घेणं हे फक्त भारतातल्या हिंदुंचंच नाही तर मुसलमानांचंही कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 1 सप्टेंबर 1927ला मद्रासच्या पचैयप्पा कॉलेजमधल्या आपल्या भाषणातही त्यांनी याच गोष्टीचा पुनरुच्चार केला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)