औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधली गेली, कारण

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी, औरंगाबाद
छत्रपती संभाजीनगरपासून (पूर्वीचं औरंगाबाद) 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद शहरात औरंगजेबाची कबर आहे. पण दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कशी आली, असा प्रश्न पडणं साहजिक आहे.
याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी खुलताबादला गेलो. खुलताबादमध्ये ज्या गेटमधून आत प्रवेश होतो, त्याला नगारखाना असं म्हणतात.
नगारखान्यातून आत गेलं की थोड्याच अंतरावर उजवीकडे औरंगजेबाची मजार असल्याचं दिसून येतं. इथं आत प्रवेश करण्यापूर्वी हे एक राष्ट्रीय स्मारक असल्याचं भारतीय पुरातत्व खात्यानं लावलेलं बोर्ड दिसून येतं.
कबरीकडे जाण्यापूर्वी पायातील बूट, चप्पल बाहेर काढावे लागतात. कबरीच्या दरवाज्यापाशी आम्ही पोहोचलो तेव्हा तिथं आमची भेट शेख शुकूर यांच्याशी झाली.
सकाळची वेळ असल्यानं तिथं फारशी गर्दी नव्हती. एक-दोन माणसं औरंगजेबाची कबर पाहण्यासाठी आलेली होती.
शेख शुकूर त्यांना या कबरीविषयी माहिती देत होते. आम्हीही या कबरीपाशी पोहोचलो.
औरंगजेबाची कबर अत्यंत साधेपणानं बांधण्यात आलेली आहे. ती केवळ मातीची आहे. या कबरीवर साधी पांढरी चादर अंथरण्यात आलेली आहे. शिवाय कबरीवर सब्जाचं झाडंही लावण्यात आलेलं आहे.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
औरंगजेबाच्या कबरीची देखभाल करणारी शेख शुकूर यांची ही पाचवी पीढी आहे. कबरीविषयी अधिक विचारल्यावर त्यांनी एका दमात सांगितलं, "ही औरंगजेब बादशाहाची कबर आहे. माझी कबर अत्यंत साधी बनवावी, तिच्यावर सब्जाचं झाडं लावावं आणि वरच्या बाजूला छत वगैरे नसावं, असं त्यांनी मृत्यूपत्रात लिहिलं होतं. त्याकाळी ही कबर बनवण्यासाठी 14 रुपये 12 आणे इतका खर्च आला होता."
औरंगजेबाच्या कबरीपाशी एका बाजूला एक शिळा ठेवण्यात आली आहे. तिच्यावर लिहिलं आहे की, औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहोम्मद औरंगजेब आलमगीर आहे. औरंगजेबाचा जन्म 1618 आणि मृत्यू 1707 मध्ये झाला.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
या शिळेवर हिजरी कालगणनेनुसार, औरंगजेबाच्या जन्म आणि मृत्यूवर्षाची माहिती दिलेली आहे.
औरंगजेबानं औरंगाबाद निवडलं कारण...
1707 मध्ये औरंगजेबाचा अहमदनगरमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला.
कारण, मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी, असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं.
याविषयी इतिहासकार डॉ. दुलारी कुरैशी सांगतात, "औरंगजेबानं इच्छापत्र लिहिलं होतं. त्यात त्याने अगदी स्पष्ट लिहिलं होतं की, माझे गुरू हजरत ख्वाजा झैनुद्दीन सिराजी यांना तो आपले गुरु मानायचा. झैनुद्दीन सिराजी हे औरंगजेबाच्या खूप पूर्वीचे होते.
पण, औरंगजेब वाचन खूप करायचा. त्यात त्याने सिराजी यांना खूप फॉलो केलं. मग औरंगजेबानं सांगितलं की माझी कबर जी बांधायची ती सिराजी यांच्याजवळच बांधायची."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
ही कबर कशी असावी, याविषयीही औरंगजेबानं मृत्यूपत्रात सविस्तर लिहिलं होतं.
कुरैशी सांगतात, "माझी जी कबर बांधाल, ती मी जे पैसे स्वत: कमावले आहेत, त्यात जितकं होईल तेवढ्यातच बांधायची आणि त्यावर एक सब्जाचं छोटंसं रोप लावायचं. एवढीच औरंगजेबाची इच्छा होती. औरंगजेबाने टोप्या बनवल्या होत्या, तसंच तो कुराण शरीफ लिहायचा. त्यात जी कमाई झाली त्यातच त्याची खुलताबादेत कबर बांधण्यात आली."
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं ही कबर बांधली. औरंगजेब गुरू मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे. पूर्वी या कबरीवर वरच्या बाजूला संरक्षित कवच देण्यात आलं होतं. ते लाकडात बांधलेलं होतं.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
त्यानंतर मग 1904-05 च्या दरम्यान लॉर्ड कर्झन आले. आणि त्यांना वाटलं की, इतका मोठा बादशाह आणि त्याची किती साधी कबर कशी काय असू शकते. त्यामुळे मग त्यांनी तिथं मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केली
'जमिनीवरचा स्वर्ग'
खुलताबाद हे धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेलं गाव आहे. भद्रा मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत.
खुलताबादला जुन्या काळात 'जमिनीवरचा स्वर्ग' असं संबोधलं जायचं.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
खुलताबादचं त्याकाळी नेमकं काय महत्त्व होतं, याविषयी इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी सांगतात, "रौझा याचा अर्थ होतो स्वर्गातलं नंदनवन. जमिनीवरचा स्वर्ग कुठे आहे तर तो खुलताबाद हा आहे, असं म्हटलं जायचं. इ. स. 1300 साली मुन्तजिबुद्दीन जर जरी जर बक्षच्या आगमनापासून सुफींचं आगमन इथं व्हायला सुरुवात झाली. हे सुफी काबूल, बुखारा, कंदाहार, समरकंद, इराण, इराक, पर्शिया, या देशांमधून प्रवास करायचे आणि खुलताबादला यायचे.
"दक्षिण भारतातील इस्लामचा गड असल्यामुळे आणि सुफी चळवळीचं केंद्र असल्यामुळे या ठिकाणी देशविदेशातून सुफी आलेले आहेत. त्या प्रत्येकाच्या कबरी खुलताबादमध्ये आहेत. या सगळ्या अशा मोठमोठ्या संतांच्या कबरी असल्यामुळे प्रत्येकाला वाटायचं की, आपलंसुद्धा मृत्यूनंतर दफन हे साधू-संतांच्या, सुफींच्या सहसावात व्हावं."
खुलताबाद दख्खनेतील इस्लामी चळवळीचं केंद्र बनलं
इ. स. 1300 साली दिल्लीच्या निजामुद्दीन अवलियाने दख्खनमध्ये इस्लामचा प्रसार करण्यासाठी आपला शिष्य मुन्तजिबुद्दीन जर जरी जर बक्ष याला 700 पालखी (700 सुफी फकीर) सोबत देऊन देवगिरीला पाठवलं. त्यावेळी दिल्लीच्या अलाउद्दीन खिलजीनं राजा रामदेवराय यादव याला आपला मांडलिक बनवलं होतं.
मुन्तजिबुद्दीनने दौलताबादला आपलं केंद्र ठेवून बाकी 700 जणांना येथूनच संपूर्ण दक्षिण भारतात पाठवलं. 1309 मध्ये त्याचं निधन झालं. त्याचा दर्गा खुलताबादमध्ये हुडा टेकडीच्या पायथ्याशी बांधण्यात आला.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
संकेत कुलकर्णी सांगतात, "आपली चळवळ सुरू ठेवण्यासाठी निजामुद्दीन अवलियाने आपला उत्तराधिकारी बुऱ्हानुद्दीन गरीब याला आणखी 700 पालखी, प्रेषित महंमद पैगंबर यांचा पोशाख (पेहरन शरीफ), त्यांच्या मुखावरील केस (मुहे मुबारक) देऊन खुलताबादला पाठवलं. तेव्हापासून खुलताबाद हे दख्खनेतील इस्लामी चळवळीचं केंद्र बनलं. बुऱ्हानुद्दीनला 29 वर्षांचा कार्यकाळ लाभला."
"त्याच्यानंतर देवगिरीला महंमद तुघलकाने आपली राजधानी बनवलं. तेव्हा त्या दरबारातील काझी आणि इस्लामी विद्वान असलेल्या दाऊद हुसेन शिराजी याला जैनुद्दीनने आपला उत्तराधिकारी नेमले. त्याचे नामकरण जैनुद्दीन दाऊद हुसेन शिराजी असे झाले. जैनुद्दीनने 1370 पर्यंत सुफी चळवळ मजबूत केली. जैनुद्दीन ख्वाजा परंपरेतील 22 वे खलिफा ठरले. मात्र आपल्यानंतर कोणी खलिफा होण्याच्या योग्यतेचा दिसत नाही, असे म्हणून झैनुद्दीनने उत्तराधिकारी नेमला नाही. त्यामुळे त्याच्यानंतर ही चळवळ खंडित झाली आणि खुलताबादचे महत्त्व थोडे कमी झाले."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
17 व्या शतकात बादशहा औरंगजेबाने जैनुद्दीन शिराजीच्या दर्ग्याला भेट दिली. जैनुद्दीन शिराजीने 14व्या शतकात केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन औरंगजेबाने दख्खनमध्ये आपल्या मोहिमा राबवल्या. जैनुद्दीनच्या कबरीबर हात ठेवून त्यालाच आपला गुरू मानले. भारतात कुठेही आपण मरण पावलो, तरी याच ठिकाणी आपल्याला दफन करावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
औरंगजेबाचं महाराष्ट्र कनेक्शन
शाहजहान बादशाह असताना त्यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाला औरंगजेबाला सुभेदार म्हणून दौलताबादला पाठवलं.
1636 ते 1644 हा औरंगजेबाच्या पहिल्या सुभेदारीचा कार्यकाळ होता.
पुढे औरंगजेबानं दौलताबादचं मुख्यालय बदलून औरंगाबाद पसंत केलं, कारण त्याला औरंगाबाद आवडत होतं, असं इतिहासकार सांगतात.

फोटो स्रोत, PENGUIN INDIA
डॉ. दुलारी कुरैशी सांगतात, "ही भूमी कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी औरंगजेब वेरूळ, दौलताबाद असं दख्खनमध्ये सगळीकडे फिरायचा. वेरूळबद्दल औरंगजेबानं खूप लिहिलं आहे. त्यानंतर त्यानं दौलताबादपासून वेरूळपर्यंत रस्ता बनवला होता."
1652 मध्ये औरंगजेबाला दुसऱ्यांदा औरंगाबादची सुभेदारी मिळाली आणि तो परत औरंगाबादला आला. 1652 ते 1659 या काळात औरंगजेबानं औरंगाबादेत अनेक वास्तू बांधल्या. यात किले अर्क आणि हिमायत बागेसारख्या अनेक बागांचा समावेश होतो.
1681-82 मध्ये मराठा साम्राज्याचं आक्रमण वाढायला लागलं होतं. त्यावेळी औरंगजेब पुन्हा दक्षिणेत आला आणि 1707 पर्यंत म्हणजे मृत्यू होईपर्यंत इथंच राहिला. 1707मध्ये अहमदनगरमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला.
खुलताबाद पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचं
औरंगजेबाची नातसून बनी बेगमची बाग, त्या बागेशेजारील तलाव, भद्रा मारूतीचं मंदिर अशी अनेक पर्यटन स्थळं खुलताबादमध्ये आहेत. खुलताबादची ओळख केवळ औरंगजेबाच्या कबरीपुरती मर्यादित नाहीये.
अकबरुद्दीन औवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असले तरी खुलताबाद पर्यटनाच्या दृष्टीनं एक वेगळं आणि ऐतिहासिक महत्त्व असल्याचं इतिहासकारांचं मत आहे.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
संकेत कुलकर्णी सांगतात, "सातवाहन राष्ट्रकुट काळापासूनचे अवशेष याठिकाणी मिळालेले आहेत. येथून जवळ 3 किलोमीटरवर वेरूळची कैलास लेणी आहे. खुलताबादमध्ये प्रमुख असे 12 ते 15 मोठमोठे सुफी संतांचे दर्गे आहेत. ज्याठिकाणी प्रत्येकाचे उरूस असतात. सण-उत्सव असतात. त्यामुळे मुस्लीम समाजाचं वर्षभर इथं येणं असतं.
"इथून जवळच भद्रा मारोतीचं मंदिराचं मंदिर आहे, ज्याचं जीर्णोद्धार झालेलं आहे. तेसुद्धा मोठं पर्यटन आणि धार्मिक स्थळ इथं आहे."
औरंगाबादमध्येच औरंगजेबानं आपल्या पत्नीसाठी 'बीबी का मकबरा' उभारला. त्याला आज 'दख्खनचा ताज' म्हणून संबोधलं जातं. दिल्लीचा शहेनशाह असलेल्या औरंगजेबानं आपल्या 89 वर्षांच्या आयुष्यातला 36 ते 37 एवढा प्रदीर्घ काळ औरंगाबादमध्ये घालवला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








