भानू अथैय्यांचं निधन, कोल्हापूरच्या भानुमतीचा ऑस्कर विजयापर्यंतचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
भारतासाठी पहिला ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या भानू अथैय्या यांचं निधन झालं आहे. त्या 91 वर्षांच्या होत्या.
भानू अथैय्या यांना 1983 साली 'गांधी' या चित्रपटाच्या वेशभूषेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
वेषभूषाकार भानू अथैय्या यांचं दीर्घकालीन आजारानं निधन झाल्याची बातमी पीटीआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
त्या गेल्या 3 वर्षांपासून ब्रेन ट्यूमरने आजारी होत्या. गुरुवारी सकाळी त्यांचं झोपेत निधन झालं.
भानू अथैय्या कोण होत्या?
भानू अथैय्या या वेशभूषाकार बनण्याआधी, एक चित्रकारही होत्या. जेजे विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. चित्रकार गायतोंडे हे त्यांचे सहआध्यायी.
चित्रकार एम.एफ हुसैन, फ्रान्सिस न्यूटन सुझा, एस. एच रझा, शिल्पकार एस के बाक्रे अशा दिग्गज कलाकारांनी सुरू केलेल्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपमध्येही त्या होत्या. प्रोग्रेसिव्हच्या दोन प्रदर्शनांत त्यांची चित्रंही होती. पण पुढे त्यांनी वेगळं क्षेत्र निवडलं, आणि तिथेही थेट ऑस्कर मिळवण्यापर्यंत बाजी मारली.
1982मधील गांधी या चित्रपटातील वेशभूषेकरिता त्यांना ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. रिचर्ड अॅटनबरो या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.
आमिर खानच्या 'लगान' आणि शाहरूख खानच्या 'स्वदेस' या चित्रपटांसाठी त्यांनी वेशभूषाकार म्हणून काम पाहिलं होतं.
2012मध्ये त्यांनी ऑस्करची ट्रॉफी परत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ती ट्रॉफी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावी, अशी त्यांची इच्छा होती.
बीबीसीला त्यांनी सांगितलं होतं की, "ट्रॉफीच्या सुरक्षेचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. भारतात यापूर्वी अनेक पुरस्कार गायब झाले आहेत. मी इतकी वर्षँ हा पुरस्कार सांभाळून ठेवला आहे, भविष्यातही तो सुरक्षित राहावा, अशी माझी इच्छा आहे.
"मी अनेकदा ऑस्करच्या कार्यालयात जाते. तिथं अनेकांनी त्यांना मिळालेल्या ट्रॉफी ठेवल्या आहेत. अमेरिकन वेषभूषाकार एडिथ हेड यांनीही मृत्यूच्या आधी 8 ऑस्कर ट्रॉफीज तिथे ठेवल्या होत्या."

फोटो स्रोत, Parveen Negi/The India Today Group via Getty Image
भानू अथैय्यांचं महाराष्ट्राशी नातं
२८ एप्रिल १९३० रोजी अण्णासाहेब राजोपाध्ये यांच्या घरी भानुमती यांचा जन्म झाला. अंबाबाई मंदिर परिसरात महाद्वार रोड लगत असलेल्या पश्चिम दिशेला राजोपाध्ये यांचा वाडा होता.
जेष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी सांगतात, "भानू अथैय्यांचे वडील अण्णासाहेब चित्रकार होते. कोल्हापूरमध्ये त्यांची ओळख पेंटर अशी होती. त्यामुळं घरी येऊन कलाशिक्षक भानूमती यांना चित्रकलेचे शिक्षण देत होते. भानू अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झाले. कोल्हापूरच्या म.ल.ग. हायस्कूलमध्ये भानू यांचे शिक्षण झाले. अंबाबाई मंदिर परिसरात बालपण घालवलेल्या भानू यांचा कोल्हापूरसोबत कायम सलोखा राहिला."
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि वेषभूषाकार चंद्रकांत जोशी यांनी बीबीसीशी बोलताना भानू यांच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, "भानू यांनी अवघ्या १० व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या मोहिनी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. अभिनय केलेला हा त्यांचा एकमेव चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी जे जे आर्ट स्कूलमधून कलेचे शिक्षण घेत कारकीर्दीला सुरूवात केली. आशुतोष गोवारीकर यांच्या लगान चित्रपटासाठी त्यांनी वेषभूषाकार म्हणून अखेरचं काम केलेलं होतं.
"शाहू या मालिकेसाठी वेषभूषा करण्याची जबाबदारी भानू यांच्यावर देण्यात आली होती. राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित या मालिकेच्या अभिनेत्याचा शिकारीच्या प्रसंगासाठीचा पोषाख भानू यांनी स्वतः तयार केला होता. कामाचा व्याप वाढल्याने त्यांना पुढे ही मालिका करणं शक्य झालं नाही. त्यामुळे पुढे या मालिकेसाठी चंद्रकांत जोशी यांनी वेषभूषेचे काम पाहिले.
"भानू यांची भाची कोल्हापूरमध्ये कागल इथं राहत असल्याने भानू यांचे कोल्हापूरला येणं- जाणं असायचं. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर सकाळी सहा वाजता त्या अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचायच्या आणि नंतर भेटायला घरी यायच्या."
थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलचा पहिला जीवनगौरव पुरस्कार भानूमती यांचा प्रदान करण्यात आला होता. तो स्वीकारण्यासाठी त्या स्वतः कोल्हापूरला आल्या होत्या. आपल्या जन्मभूमीत मिळालेल्या या गौरवाने त्या खूप खुश झाल्या होत्या, असंही जोशी यांनी सांगितलं.
भानू अथैय्यांनी वेशभूषा केलेले सिनेमे
ऐतिहासिक चित्रपट बनवताना तो काळ साकारणं महत्त्वाचं असतं. अथैय्या यांना अशी संधी मिळाली ती गांधी, रजिया सुलताना, आणि डॉक्टर आंबेडकर या चित्रपटांमध्ये. मराठीत 'ध्यासपर्व' हा चित्रपट त्यांनी केला.
'1942 अ लव्ह स्टोरी' या चित्रपटात 1942 चा काळ साकारण्याची संधीदेखील त्यांना मिळाली.
आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान यांच्या 'लगान'साठी त्यांनी काम केलं. या चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत विदेशी भाषा विभागात अंतिम पाच पर्यंत मजल मारली होती. आशुतोष गोवारीकर यांच्या 'स्वदेस'साठी देखील भानू अथैय्यांची मदत घेण्यात आली होती.
भानुमती यांनी चंदेरी दुनियेत 100 हून अधिक चित्रपट केले.
लेकीन, लगान ,गांधी या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले. वेषभूषाकार म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर अथैय्यांनी गुरुदत्त, देवानंद, राजकपूर अशा दिग्दर्शकांबरोबर काम केलं . गुरुदत्त यांच्या टीमचा भाग बनल्यानंतर त्यांच्या 'कागज के फूल', 'चौदवी का चांद', 'साहेब बीबी और गुलाम' या चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं.
तर 'वक्त', 'गाईड', 'तिसरी मंझिल' या चित्रपटांसाठीही त्यांनी काम केलं. 1970 मध्ये आलेला राज कपूर यांचा 'मेरा नाम जोकर' या चित्रपटासाठी त्यांनी काम केलं. त्यानंतर 'सत्यम शिवम सुंदरम', 'प्रेम रोग', 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटासाठी देखील वेशभूषाकार म्हणून त्यांनी काम केलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








