TRP पुढील 3 महिन्यांसाठी रद्द, BARCचा निर्णय

फोटो स्रोत, SOPA IMAGES
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी
TRP Scam मध्ये Republic TV चा ही सहभाग आहे आणि त्याची चौकशी केली जाईल, असं मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी म्हटलं आणि अर्णब गोस्वामी विरुद्ध मुंबई पोलीस वादात नवीन भर पडली. दरम्यान आज BARC ने येत्या 12 आठवड्यांसाठी TRP पद्धती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळामध्ये TRP ची घोषणा होणार नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
रेटिंग सुधारण्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा तीन चॅनल्सवर आरोप आहे. पण त्यातही अनेक किंतु-परंतु आहेत. पोलिसांकडे नेमके काय पुरावे आहेत? TRP नेमका कसा मोजतात? TRP खरंच विश्वासार्ह असतो का? पाहणार आहोत या प्रश्नांची उत्तरं सोप्या शब्दांत.
Broadcast Audience Research Council of India (BARC) म्हणजे बार्क ही संस्था सर्व प्रकारच्या चॅनल्सच्या प्रेक्षकांची मोजदाद करत असते. याला Target Rating Points (TRP) असं म्हटलं जातं. त्यांच्याच आकडेवारीवर दर आठवड्याला वेगवेगळी चॅनल्स आपण पहिल्या नंबरवर असल्याचा दावा करतात.

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
हे काम बार्कने हन्सा रिसर्च नावाच्या एका कंपनीकडे दिलं होतं त्याच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी काही चॅनल्सबरोबर मिळून हा घोटाळा केल्याचा मुंबई पोलिसांचा आरोप आहे. TRP चं गणित पाहण्यापूर्वी पोलिसांच्या या दाव्यानंतर काय-काय नाट्य रंगलं हे पाहूया.
'TRP स्कॅम' वर प्राईम टाईम खडाजंगी
मुंबई पोलिसांनी तीन चॅनल्सची नावं घेतली. 'फक्त मराठी' आणि 'बॉक्स सिनेमा' या दोन चॅनल्सच्या मालकांना अटक केली गेलीय.
रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांचा किंवा इतरांचा यात सहभाग असल्याचाही संशय आहे. अर्णब गोस्वामींनी मुंबई पोलिसांचे सगळे आरोप खोडून काढलेत आणि थेट परमबीर सिंह यांच्यावर हल्लाबोल केला.
सुशांत सिंह राजपूत प्रकरण, पालघरचं लिंचिंग या सगळ्यांत मुंबई पोलिसांना प्रश्न विचारल्यामुळे रिपब्लिकला लक्ष्य केलं जातंय असा आरोप गोस्वामींनी केला.
गोष्टी इतक्यात थांबल्या नाहीत. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये रिपब्लिकचं नाव नाहीय. पण त्यात India Today या न्यूज चॅनलचं नाव मात्र आहे. रिपब्लिकने हीच FIR दाखवत गुरूवारी प्राईम टाईममध्ये पोलिसांवर चांगलाच हल्ला चढवला.
पण त्यापाठोपाठ यात आणखी एक ट्विस्ट आला. मुंबई पोलिसांचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी मीडियाला सांगितलं की इंडिया टुडे या चॅनलचं नाव जरी FIR मध्ये असलं तरी त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीयत.
राजकीय फटकेबाजी
पण हे सगळं फक्त पोलीस आणि चॅनल्सपुरतं मर्यादित राहिलं नाही. ही पत्रकार परिषद संपेपर्यंत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
शिवसेनेकडून संजय राऊत यांनी 'असत्यमेव जयते' म्हणत रिपब्लिकला टोला हाणला. तर प्रताप सरनाईक यांनी गोस्वामींच्या अटकेची मागणी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रिपब्लिकची पाठराखण करत महाविकास आघाडी माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
TRP का आणि कसा मोजतात?
आता या या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या TRP कडे येऊ. TRP वरून हे कळतं की कोणत्या सामाजिक-आर्थिक वर्गातल्या किती लोकांनी, एखाद्या विशिष्ट काळात एखादं विशिष्ट चॅनल किती वेळ पाहिलं. BARC ही संस्था दर आठवड्याला TRP रेटिंग्स जाहीर करत असते. 2015 पासून बार्कची आकडेवारी यायला सुरुवात झाली.
2 वर्षापेक्षा जास्त वयं असलेली कोणतीही व्यक्ती प्रेक्षक म्हणून धरली जाऊ शकते. म्हणजे घरातलं जेमतेम बोलायला लागलेलं मूलसुद्धा यात प्रेक्षक असू शकतं आणि 80-90 वर्षांचे आजी-आजोबा सुद्धा.
या मोजणीत सर्वप्रथम 3 लाख घरांचं एक सर्वेक्षण केलं जातं ज्याला Establishment Survey म्हटलं जातं. या 3 लाखांपैकी 44,000 घरं निवडली जातात जिथे BAR-O-Meter (बॅरोमीटर) नावाचं उपकरण बसवलं जातं.

फोटो स्रोत, Twitter
ही घरं निवडताना आर्थिक, सामाजिक अशाप्रकारचं वैविध्य जपता येईल असा प्रयत्न असतो. BAR-O-Meter हे उपकरण कोण व्यक्ती किती वेळ कोणतं चॅनल पाहतेय याचं मोजमाप करतं.
कधीकधी प्रत्यक्ष जाऊन किंवा टेलिफोनद्वारे पडताळणी करण्याचीही तरतूद आहे. दर महिन्याला नवीन 44,00 घरांचा अभ्यास केला जातो. दरवर्षी Establishment Survey साठी नवीन 3 लाख घरं निवडली जातात.
TRP मध्ये फेरफार करता येते?
परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की हन्सा रिसर्च नावाची जी कंपनी बार्कसाठी मोजमाप करते त्यांच्या एका माजी कर्मचाऱ्याने लोकांना पैसे देऊन विशिष्ट चॅनल्स घरात सुरू ठेवायला सांगितली होती. त्या व्यक्तीला याप्रकरणी ताब्यातही घेतलंय.
याबद्दल बोलताना हन्सा रिसर्च कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण निझरा यांनी म्हटलंय, "हन्सा रिसर्च कायमच अशा गोष्टींबद्दल जागरुक राहिलेली आहे आणि जेव्हाही अशा घटना आमच्या लक्षात आल्या तेव्हा आम्ही BARC आणि संबंधित यंत्रणांना त्याची माहिती दिली आहे. BARC आणि इतर यंत्रणांना आम्ही पुढेही सहकार्य करत राहू."
2018 मध्ये सुद्धा हन्सा रिसर्च या कंपनीच्या एका कर्मचाऱ्यावर अशाच प्रकारचा आरोप झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
2015 पासून BARC ही भारताची अधिकृत Audience Measurement Agency बनली. त्यापूर्वी भारतात TAM Media Research नावाची एक कंपनी हे काम करत असे.
याला TAM रेटिंग म्हणूनही ओळखले जायचं. पण या रेटिंग्जबद्दल बराच गदारोळ झाला होता.
NDTV ने याविरुद्ध तक्रार करत कंपनीचे अधिकारी काही चॅनल्सकडून लाच घेऊन रेटिंग्जमध्ये फेरफार करत असल्याचाही आरोप केला होता.
TRP इतका महत्त्वाचा कशासाठी?
रेटिंग्ज ही एखाद्या चॅनलच्या लोकप्रियतेचा मापदंड आहेत. ते देत असलेले कार्यक्रम किती चांगले किंवा वाईट याबद्दल मतमतांतरं असू शकतात, पण त्यांची लोकप्रियता मोजण्याचं एकमेव साधन TRP आहे.
याच TRP च्या आधारावर जाहिरातदार आपले निर्णय घेत असतात. एखादं चॅनल किंवा एखादा कार्यक्रम जितका जास्त लोकप्रिय तितके त्याला जाहिरातदार अधिक मिळू शकतात.
TRP वरून होणारा वाद नवीन नाही. रेटिंग्ज आणि जाहिरातींसाठी पत्रकारितेशी तडजोड केल्याचे आरोप अनेकदा अनेक माध्यमांवर झालेत. या घोटाळ्याच्या आरोपांची सत्यता कायदा ठरवेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








