'मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांची खैर नाही'

मुंबई पोलीस दलाविरोधात अपप्रचार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी संकेत दिले आहेत.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलाची नाहक बदनामी करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट होल्डर्सची आता खैर नाही. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी FIR दाखल केले आहेत.
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. 'सुशांतची हत्या करण्यात आली. मात्र, मुंबई पोलीस हे प्रकरण आत्महत्येचं आहे असं दाखवून, बड्या आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. सुशांत प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत' असे आरोप पोलिसांवर करण्यात आले होते.
#JusticeForSushant #ShameOnMumbaiPolice #SSR यांसारखे ट्रेंड सोशल मीडियावर सुरू करण्यात आले. मुंबई पोलीस कार्यक्षम नाहीत, असं म्हणत सोशल मीडियावर मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली. ट्विटर, फेसबुकवर मुंबई पोलिसांच्या विरोधात मोठी मोहीम चालवण्यात आली.
मात्र, ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या फॉरेन्सिक टीमच्या चौकशीत सुशांतने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी, पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई
वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुशांत प्रकरणी मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी 80 हजारपेक्षा जास्त बोगस अकाउंट तयार करण्यात आले. सुशांतच्या मृत्यूनंतर जून महिन्यात हे अकाउंट तयार करण्यात आले होते. या अकाउंटवरून मुंबई पोलिसांविरोधात मोहीम राबवण्यात आली.
याबाबत बीबीसीशी बोलताना मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले, "हजारोंच्या संख्येने असलेल्या या फेक अउंट्सवरून मुंबई पोलिसांना शिव्या देण्यात आल्या. पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जाणीवपूर्वक मुंबई पोलिसांविरोधात मोहिम चालवण्यात आली. या अकाउंटची ओळख आम्ही पटवली आहे. आम्ही ट्विटर, फेसबूक आणि इतर सोशल मीडियासोबत चर्चा करत आहोत."

फोटो स्रोत, Getty Images
"यातील काही अकाउंट विदेशातील असण्याची शक्यता आहे. या अकाउंटवरून खोटी माहिती पसरवण्यात आली. मुंबई पोलीस दलाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलं," असं पोलीस आयुक्त परमबीर सिंह पुढे म्हणाले.
सायबर सेलची करणार चौकशी
फेक अकाउंट प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे देण्यात आली आहे.
सायबर सेलच्या अधिकाऱ्यांने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार इटली, जपान, फ्रान्स, टर्की या देशातून मोठ्या संख्येने पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या. काही पोस्ट या विदेशी भाषेतील होत्या. यासारख्या आणखी पोस्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढे चौकशी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत बीबीसीशी बोलताना मुंबई पोलीसांच्या सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर म्हणाल्या, "मुंबई पोलीस आयुक्तांना ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडिया अकाउंटवरून टृोल केलं जात आहे. पोलीस आयुक्त आणि पोलीस दलाबाबत चुकीच्या भाषेचा वापर केला जात आहे. शिवीगाळ करण्यात येत आहे. त्यामुळे या सोशल मीडिया अकाउंट विरोधात IT कायद्याचं कलम 67अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा फोटो मॉर्फकरून वापरण्यात आला होता. त्याबाबतही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
"काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटरवरील फोटो मॉर्फकरून वापरण्यात आला होता. त्याबाबतही FIR दाखल करण्यात आली आहे" असं DCP रश्मी करंदीकर पुढे म्हणाल्या.
राजकीय वातावरण तापलं
सुशांतने आत्महत्या केली असा एम्सच्या डॉक्टरांनी दिलेला अहवाल आणि फेक अकाउंटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांची बदनामी. यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना आणि काँग्रेसने भाजपवर पलटवार केलाय.
याबाबत पत्रकारांशी बोलताना राज्याते गृहमंत्री म्हणाले, "सुशांतप्रकरणी भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला जाणीवपूर्वक बदनाम केलं. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाचा अहवालही हेच सांगतो. मुंबई पोलिसांनी प्रोफेशनल पद्धतीने तपास केला यावर सर्वोच्च न्यायालय आणि 'एम्स'च्या अहवालानंतर शिक्कामोर्तब झालं आहे."
'राज्याची बदनाम करणाऱ्यांच्या प्रचाराला फडणवीस जाणार?'
गृहमंत्र्यांनी या प्रकरणी थेट माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय.

फोटो स्रोत, Getty Images
"आता भाजपने राज्यातील जनतेची माफी मागावी. पाच वर्षं राज्य पोलिसांचं नेतृत्व केल्यानंतरही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवला. आता महाराष्ट्राची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला ते जाणार का," असा सवाल अनिल देशमुख यांनी विचारला आहे.
याबाबत बोलताना वाहतूकमंत्री अनिल परब म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र पोलिसांचा नेहमी गौरव केला. पण, ज्यांनी महाराष्ट्र पोलिसांचा, सरकारचा अपमान केला त्यांच्या प्रचारासाठी जावं का? याबाबत त्यांनी स्वत:लाच प्रश्न विचारावा. राज्याची झालेली बदनामी कोण भरून देणार."
भाजपने मात्र हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. याबाबत बोलताना भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले, "गृहमंत्र्यांनी भाजपवर केलेले आरोप खोटे आहेत. त्यांचा आम्ही निषेध करतो. भाजप किंवा देवेंद्र फडणवीस बेकायदेशीर काम करत नाहीत. त्यामुळे कोणतीही चौकशी सरकार करू शकतं. अनिल देशमुख अत्यंत बेजबाबदार गृहमंत्री आहेत"
"सुशांत प्रकरणाचा राजकीय वापर करण्यात आला. सुशांतच्या प्रेमापोटी हे करण्यात आलं नव्हतं त्यामुळे यात कोणी काय केलं हे सर्व चौकशीत समोर येईल," असं अनिल परब म्हणाले.
तर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, "भाजपने राजकीय षड्यंत्र केलं होतं. सुशांत मृत्यू प्रकरणाचा बिहार निवडणुकीसाठी भावनिक वापर करण्यात आला. यामागे भाजपचा आयटी सेल होता हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता या षड्यंत्राच्या मुळाशी पोहोचून मास्टरमाइंडवर कारवाई करावी लागेल."
सुशांत मृत्यू प्रकरणावरून पोलिसांची टीव्ही आणि सोशल मीडियावर नाहक बदनामी होत असल्याप्रकरणी निवृत्त IPS अधिकाऱ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने मीडियाला बातमी करताना संयम बाळगा अशी सूचना केली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








