बार सुरू झाले म्हणून मंदिरं उघडण्याची मागणी करणं कितपत योग्य?

फोटो स्रोत, Hindustan Times
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
राज्यात काही महिन्यांपासून धार्मिक स्थळं उघडण्यात यावीत ही मागणी वंचित बहुजन आघाडी, भाजप, मनसे यांच्याकडून करण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर पंढरपुरात रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं. पण सध्याच्या परिस्थितीत सरकारकडून धार्मिक स्थळं सुरू करणं योग्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
'मिशन बिगीन अगेन' च्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने सरकारकडून लॉकडाऊनला शिथिलता देण्यात येत आहे. 5 ऑक्टोबरपासून सरकारने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्याची परवानगी दिली.
या निर्णयानंतर राज्यात पुन्हा एकदा मंदीरं उघडण्याची मागणी पुढे आली आहे. 'बार सुरू झाले पण मंदीरं कधी सुरू होणार'? असा प्रश्न राजकीय पक्षांकडून उपस्थित केला गेला.
पण मंदीरं उघडणं खरंच शक्य आहे का? या निर्णयामागे राज्य सरकारचा काय हेतू आहे? नेत्यांचं काय म्हणणं आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा रिपोर्ट...
'पब्ज अॅण्ड पार्टी गँगचे सरकार?'
राज्यात बार सुरू केले आणि मंदीरं नाही हा मुद्दा उपस्थित करत भाजपने काळी वस्त्र ओढून सरकारचा निषेध केला. यावेळी बोलताना भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले म्हणाले "आजचा दिवस महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेच्या दृष्टीने काळा दिवस आहे. कारण आजपासून राज्यात बार सुरू आणि मंदिरे बंद आहेत."

फोटो स्रोत, Frédéric Soltan
"ठाकरे सरकार "पब्ज अॅण्ड पार्टी गँग" चे सरकार आहे. हा काळा दिवस ज्या काळ्या सरकारने आणला त्या सरकारचा आम्ही काळे वस्त्र ओढून निषेध व्यक्त करतो".
भाजपबरोबर इतर विरोधी पक्षांकडूनही धार्मिक स्थळं कधी सुरू होणार हा प्रश्न विचारला जातोय. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले "मुख्यमंत्री विविध धार्मिक संघटनांशी चर्चा करत आहेत. सरकारने 50% पर्यंत रेस्टॉरंट आणि बार सुरू करायला परवानगी दिली. 50% ची अट घालून धार्मिक स्थळं उघडणॆ कठीण आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील."
बार सुरू करण्याचं आर्थिक गणित काय?
मे महिन्याच्या कडक लॉकडाऊनमध्ये सरकारचा महसूल बंद झाला. त्याची झळ सरकारी तिजोरीला बसली. आरोग्य सोडून इतर विभागांच्या बजेटला चाप लावावा लागला.
याकाळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला महसूल मिळण्यासाठी दारू विक्रीची दुकानं सुरू करण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला. त्यावर टीकाही झाली. पण राज्य सरकारने आर्थिक गणितं सुरळीत होण्यासाठी घरपोच सेवेची अट घालून ही दुकानं सुरू केली.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
राज्यात दरवर्षी दारू विक्रीमधून 15 हजार कोटींहून अधिक महसूल सरकारला मिळतो.
बार सुरू करण्यामागेही हेच आर्थिक गणित आहे का? याबाबत जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, " उत्पादन शुल्क विभागातून मोठा महसूल सरकारला मिळतो. मोठं अर्थकारण बार सुरू करण्यामागे आहे. तेच अर्थकारण हे धार्मिक स्थळांबाबतही आहे. धार्मिक स्थळं ही बंद ठेवून सरकारला कोणताही फायदा नाही. याउलट या निर्णयातून लोक दुखावले जात आहेत."
"पण बारसाठी 50% ची मर्यादा घालून दिलेली आहे. धार्मिक स्थळांसाठी ही मर्यादा घालणं शक्य नाही. जर ही धार्मिक स्थळं सुरू केली आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली तर त्याचा ताण पोलीस यंत्रणा, प्रशासन यावर येऊ शकतो. त्यामुळे मंदीरांचा मुद्दा भावनिक न करता विचार करून निर्णय झाला पाहीजे."
मंदिरांच्या मुद्यावर राजकारण?
कोरोनाच्या काळात सरकार अपयशी ठरलं हे दाखवण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अनेक मुद्यांवरून टीका केली. पण या महामारीत मोठे मुद्दे विरोधी पक्षाला मिळाले नाहीत.
जेष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर याबाबत सांगतात,"विरोधी पक्षाला रोज एक मुद्दा लागतो. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण आता काही प्रमाणात निवळलं तर दुसरा मुद्दा समोर येतो असचं हे मंदिरांच आहे. हा राजकीय मुद्दा आहे. तरीही उद्या मंदीरं सुरू केली तर लोकांचा प्रवास वाढेल आणि महामारीत हे धोकादायक आहे. याची कल्पना लोकांनासुध्दा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने राजकारण केलं तरी सरकारला याचा फार फटका पडेल असं वाटत नाही."
'बार आणि मंदिर तुलना योग्य नाही'
बार आणि मंदिर यांची तुलना करणं योग्य नाही, असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी म्हटलं आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "इतर अत्यावश्यक सेवा सुरू करणं गरजेचं आहे. धार्मिक स्थळ सुरू करण्याबाबत सरकार विचार करतंय. पण मूळ मुद्दा हा श्रध्देचा आहे. प्रार्थनेसाठी प्रत्येकाच्या घरात मंदिर असतं. श्रध्दा असल्यास घरातल्या मंदिरात प्रार्थना करूनही समाधान मिळतं. त्यामुळे बार आणि रेस्टॉरंट सुरू केले म्हणून त्याच्याशी तुलना करत धार्मिक स्थळं सुरू करा हे म्हणणं योग्य नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








