कोरोना व्हायरस : जगातल्या दर 10 व्यक्तींपैकी एकाला संसर्ग झाल्याची शक्यता - WHO

फोटो स्रोत, Robin Utrecht/SOPA Images/LightRocket via Getty Im
जगाच्या लोकसंख्येत दर 10 जणांपैकी एकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असण्याची शक्यता असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनी म्हटलं आहे. एका जेष्ठ अधिकाऱ्याच्या मते या अंदाजाचा अर्थ "जगाच्या लोकसंख्येतला एक मोठा गट धोक्यात आहे."
आतापर्यंत जगभरातल्या दीडशेपेक्षा जास्त देशांमधील 3.5 कोटींपेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. पण संक्रमणाचा हा आकडा प्रत्यक्षात 80 कोटींच्या जवळपास असण्याचा WHOचा अंदाज आहे.
नोंदवण्यात येणाऱ्या संसर्गाच्या प्रकरणांपेक्षा प्रत्यक्षातली संख्या कितीतरी अधिक असल्याचं तज्ज्ञ दीर्घ काळापासून सांगत आहेत.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-सिरम इन्स्टिट्यूट तयार करणार लशीचे 10 कोटी अधिक डोससिरम इन्स्टिट्यूट तयार करणार लशीचे 10 कोटी अधिक डोस
- वाचा- 'ही' लक्षणं फक्त सर्दीची, फ्लूची की कोरोनाची?

WHOच्या जिनिव्हामधल्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये या जागतिक साथीचा जगभरातल्या देशांतून बिमोड कसा करायचा, याविषयी चर्चा झाली.
कोरोना व्हायरसच्या संसर्गाची पहिली घटना चीनमधल्या वुहानमध्ये नोंदवण्यात आली होती. यानंतर आतापर्यंत 10 महिन्यांचा कालावधी उलटलाय. पण ही साथ आटोक्यात येण्याची चिन्हं अजूनही दिसत नाहीत.
ही जागतिक साथ रोखण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर काही देशांमध्ये या साथीची दुसरी लाट आली. आणि काही देशांमधली रुग्णसंख्या पूर्वीपेक्षाही जास्त झालेली आहे.
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के लोक आतापर्यंत या विषाणू संसर्गाच्या विळख्यात अडकल्याचा अंदाज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी व्यक्त केलाय. ते म्हणाले, "हा आकडा विविध देश, शहरं आणि गावं आणि विविध समुदायांनुसार वेगवेगळी आहे."

फोटो स्रोत, Reuters
"पण याचा अर्थ म्हणजे जगभरातला एक मोठा गट धोक्यात आहे. ही साथ इतक्यात जाणार नाही, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला हेही माहित आहे की सध्या या साथीचा संसर्ग पसरण्यापासून रोखण्याचे आणि आयुष्य वाचवण्याचे मार्ग आपल्याकडे आहेत."
जगभरातल्या विविध देशांमध्ये या व्हायरसचा वेगवेगळा परिणाम झाला असून या जागतिक साथीचा बिमोड करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल टेड्रॉस अॅडनहॉम गिब्रायसुस यांनी म्हटलंय.
ते म्हणाले, "सगळ्या देशांमध्ये या व्हायरसचा संसर्ग झालेला असला तरी आपण हे लक्षात घ्यायला हवं की या साथीचा परिणाम काही ठिकाणी जास्त झालाय तर काही ठिकाणी कमी. संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 70 टक्के प्रकरणं आणि मृत्यू हे दहा देशांमध्ये नोंदवण्यात आलेले आहेत आणि एकूण प्रकरणांपैकी अर्ध्या केसेस या तीन देशांत नोंदवण्यात आलेल्या आहेत."
या व्हायरसमुळे आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले असल्याचं जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीची आकडेवारी सांगते. अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये संसर्गाची सर्वात जास्त प्रकरणं आहेत.
कोरोना अपडेट
- कोरोनासाठीची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी वीकेंड हॉस्पिटलमध्ये घालवला. यानंतर सोमवारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.
- कोव्हिड 19साठीचे यापुढे उपचार आता त्यांच्यावर व्हाईट हाऊसमध्येच करण्यात येणार असल्याचं ट्रंप यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी म्हटलंय. डोनाल्ड ट्रंप यांच्या सान्निध्यात असणाऱ्या सुमारे 12 जणांना आतापर्यंत कोव्हिड 19 झाल्याचं आढळून आलंय. यामध्ये ज्येष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्माचाऱ्यांपर्यंतच्या सगळ्यांचा समावेश आहे.
- जगातल्या कोणत्याही देशाच्या तुलनेत अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण सर्वात जास्त आहेत. इथे या व्हायरसमुळे आतापर्यंत 2.10 लाख लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर मेक्सिकोमध्ये आतापर्यंत या व्हायरसमुळे 81 हजार जणांचा बळी गेलाय.
- कोरोना व्हायरसची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिसमधले बार मंगळवारपासून बंद करण्यात आले आहेत.
- इराणमध्ये सोमवारी कोरोना व्हायरसची 3,902 नवीन प्रकरणं आढळली तर 235 मृत्यू नोंदवण्यात आले. राजधानी तेहरान आणि आजुबाजूच्या भागांमधल्या शाळा, महाविद्यालयं, लायब्ररी, मशीदी आणि इतर सार्वजनिक ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्यात आलाय. लोकांच्या अनावश्यक प्रवासावर याद्वारे निर्बंध लावण्यात आले आहेत.
- जगातील सर्वोत्तम विमानतळ मानल्या जाणाऱ्या सिंगापूरच्या चांगी विमानतळाने भविष्यातल्या विमान प्रवासाबद्दल खबरदारीचा इशारा दिलाय. सध्या अतिशय कमी लोक विमान प्रवास करत असल्याचं एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी म्हटलंय. उड्डाणांची संख्या कमी असल्याने सध्या चांगी एअरपोर्टची दोन टर्मिनल्स बंद करण्यात आली आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








