संपत्तीसाठी बायकोला जिवंत पुरून वर तुळशीचं रोप लावलं, त्याच ठिकाणी तो डान्स पार्टीही करायचा

फोटो स्रोत, TWITTER/PRIMEVIDEO
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
शकरेह खलिली... बंगळुरमधली एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेली मुलगी. त्यांचे आजोबा सर मिर्झा इस्माईल 1926-41 पर्यंत म्हैसूरच्या दिवाण पदावर कार्यरत होते.
दिवाण साहेबांनी आपली नात शकरेहचा विवाह भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी अकबर खलिली यांच्याशी लावून दिला होता.
शकरेह लहान असतानाच दिवाण साहेबांनी तिचं लग्न ठरवलं होतं. पुढे वैवाहिक आयुष्यात शकरेहला चार मुली झाल्या, पण त्यांना मुलगा हवा होता.
याच काळात त्यांच्या आयुष्यात मुरली मनोहर मिश्रा नामक व्यक्ती आला. या व्यक्तीने लहान वयातच मृत्यूला हरवल्यामुळे त्यांची ओळख ‘स्वामी श्रद्धानंद’ अशी झाली होती.
या व्यक्तीमुळे शकरेह आणि अकबर यांचं वैवाहिक आयुष्य संपुष्टात आलं. दोघांनीही घटस्फोट घेतला. पण नव्या प्रेमसंबंधात धर्माची अडचण होतीच.
शकरेह एका श्रीमंत कुटुंबातून असल्यामुळे त्यांना वारशात स्थावर मालमत्ता आणि गडगंज संपत्ती मिळाली होती. काहींना असं वाटतं की, श्रद्धानंदला संपत्तीची लालसा होती आणि यातूनच शकरेहचा दुर्दैवी अंत झाला.
ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली 'डान्सिंग ऑन द ग्रेव्ह' नावाची डॉक्युमेंट्री याच भयानक घटनेवर आधारित आहे.
ही डॉक्यूमेंट्री प्रसिद्ध होऊ नये म्हणून स्वामी श्रद्धानंदने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. शिवाय अंतरिम जामीन मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली.
प्रेमाचा शोध
खलिली कुटुंबात सारं काही आलबेल नसतानाच मुरली मनोहर मिश्रा उर्फ स्वामी श्रद्धानंद याचा प्रवेश झाला. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण आता गोष्टी बदलू लागल्या होत्या.
शकरेह खलिलीची मुलगी सबा खलिलीच्या म्हणण्यानुसार, (सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, पृष्ठ क्रमांक-2) तिच्या कुटुंबाची आणि स्वामी श्रद्धानंदची पहिली भेट 1983 मध्ये दिल्लीतील रामपूरच्या नवाबाच्या कुटुंबातील बेगमच्या घरी झाली होती. मला वाटलं की, त्याच्याकडे दैवी शक्ती आहे. त्याचं वागणं अतिशय चांगलं होतं.
शकरेह यांच्याकडे स्थावर मालमत्ता होती. त्यावेळी 'लँड सीलिंग अॅक्ट' लागू झाला होता. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेसंदर्भात काही समस्या निर्माण झाल्या होत्या.
स्वामी श्रद्धानंदने रामपूरच्या नवाबांच्या कुटुंबाला या लँड सीलिंग प्रकरणात मदत केली होती. त्यामुळे स्वामी श्रद्धानंदला बंगळुरूला बोलावण्यात आलेलं.
सबाच्या म्हणण्यानुसार, 'त्यावेळी माझे वडील इराणमध्ये कार्यरत होते. आणि आम्ही बंगळुरमध्ये राहत होतो. बऱ्याचदा ते आमच्या घरी यायचे, राहायचे, आम्हाला मदत करायचे. त्यांचं हे वागणं आम्हाला आवडायचं.

फोटो स्रोत, TWITTER/PRIMEVIDEO
याच काळात इराणमध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर होऊ लागली होती. 1979 मध्ये तिथली शहाची सत्ता उलथून टाकण्यात आली. 80 मध्ये त्यांचं इराकशी युद्ध सुरू झालं, जे 1988 पर्यंत सुरूच होतं.
अशा काळात तत्कालीन इंदिरा गांधी सरकारला मुरब्बी भारतीय राजदूत हवे होते. अकबर खलिली यांच्याकडे मोठा अनुभव होता, शिवाय ते शिया मुस्लिम होते. त्यामुळे त्यांची रवानगी तेहरानला करण्यात आली.
बऱ्याचदा भारतीय परराष्ट्र सेवेत असणारे अधिकारी आपल्या नोकरी दरम्यान आपल्या कुटुंबाला सोबत नेतात. पण युद्धासारख्या आणिबाणीच्या काळात कुटुंबाला सोबत नेणं धोक्याचं असल्याने अकबर खलिली यांनी आपल्या कुटुंबाला भारतातच ठेवण्याचा निर्णय घेतला.
युद्धामुळे अकबर त्यांच्या कामात खूपच व्यस्त होते. यात त्यांना शकरेहला पुरेसा वेळ देता आला नाही. त्यामुळे शकरेहचा स्वामी श्रद्धानंदकडचा ओढा वाढला.
इकडे श्रद्धानंद आणि शकरेह यांच्यातील जवळीक वाढत गेली तसं अकबर आणि शकरेह यांच्यात दुरावा निर्माण होऊ लागला. त्या दोघांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून वाद सुरू झाले.
स्वामी श्रद्धानंदच्या म्हणण्यानुसार, त्याने शकरेहच्या सांगण्यावरून तिच्या मालमत्तेची देखभाल करायला सुरुवात केली. पण या कामात श्रद्धानंदचे पैसे खर्च होऊ लागल्याने तो शकरेह सोबत राहू लागला.
शेवटी शकरेह आणि अकबर यांनी ऑक्टोबर 1985 मध्ये घटस्फोट घेतला. शकरेहने त्यांचे दागिने खलीली कुटुंबाला परत केले. त्यांनी उचललेलं हे पाऊल मुली, कुटुंबीय आणि नातेवाईकांसाठी हैराण करणारं होतं.
घटस्फोट होऊन नुकतेच सहा महिने झाले असतील, कुटुंब या धक्क्यातून सावरतच होतं की, त्यांना आणखीन एक धक्का बसला. 1986 च्या एप्रिल महिन्यात शकरेह यांनी स्वामी श्रद्धानंद सोबत लग्न केलं. काहींच्या मते दोघांचं व्यक्तिमत्त्व पूर्णपणे विरोधाभासी होतं.
अकबर खलिली यांचं व्यक्तिमत्त्व अगदीच ठळक होतं. त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेचं प्रशिक्षण घेतलं होतं. शिवाय त्यांचे धाकटे भाऊ इस्माईल मिर्झा आणि मामा हुमायून मिर्झा यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. हुमायून मिर्झा हे परराष्ट्र मंत्रालयातही उच्च अधिकारी होते.
अकबर खलिली यांची ओळख परराष्ट्र मंत्रालयातील चालते फिरते विश्वकोश अशी होती. याउलट श्रध्दानंदचं व्यक्तिमत्त्व होतं. अगदीच सरासरी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या या व्यक्तीबरोबर शकरेह यांनी लग्न केलं.
श्रध्दानंदने शकरेहला मालमत्तेत मदत करण्याचं आणि त्याच्या अलौकिक सामर्थ्याने मुलगा देण्याचं वचन दिलं होतं.
स्वामी श्रद्धानंदच्या म्हणण्यानुसार, "शकरेहने लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी आमच्यात असे कोणतेच संबंध नव्हते. 1986 मध्ये आम्ही विशेष विवाह नोंदणी कायद्यांतर्गत लग्नाची नोंद केली."
"कुटुंबियांना समजावणं कठीण होतं. शकरेह एखाद्या मूर्तिपूजकाशी लग्न कसं काय करू शकते याचं त्यांना आश्चर्य वाटलं होतं. नातेवाईकांनी तिच्याशी संबंध तोडले होते. इतकंच नाही तर मालमत्तेसाठी तिच्यावर न्यायालयीन खटले दाखल केले. हा तिच्यासाठी मोठा धक्का होता.आम्हाला एक मुलगा झाला, पण तो जास्त दिवस जगला नाही. यावर कोण काय करणार?"
श्रद्धानंदने शकरेहच्या मालकीच्या जमिनीवर 'एस' नावाने बंगला बांधला, निवासी फ्लॅट काढले. याच नावाची फायनान्स कंपनी स्थापन केली.
दोघांच्या नावाने संयुक्त बँक खाती आणि लॉकर्स उघडले. शकरेहने तिच्या संपत्तीची 'पॉवर ऑफ अॅटर्नी' देखील श्रद्धानंदला दिली होती.
त्याचवेळी शकरेहची मुलगी सबा मॉडेलिंगच्या करिअरसाठी मुंबईला गेली. आता शकरेह एकटी पडली. त्यामुळे श्रद्धानंद सोबतची तिची जवळीक आणखी वाढू लागली. श्रद्धानंदही तिच्या आयुष्यातील सर्व निर्णय घेऊ लागला, तिच्या आयुष्यावर वर्चस्व गाजवू लागला.
अकबर खलिलीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर शकरेहच्या मुली त्यांच्या वडिलांसोबत इटलीला गेल्या होत्या. पण सबा आणि तिची आई संपर्कात होत्या.
सबाने मॉडेलिंगचं भूत डोक्यातून काढून लंडनमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं अशी शकरेहची इच्छा होती. तिच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी देखील तिच्या आईने दाखवली. स्वत: शकरेहचं शिक्षण सिंगापूरमध्ये झालं होतं.
म्हैसूरचे दिवाण असलेल्या सर मिर्झा इस्माईल यांनी आपल्या मुलींच्या नावे संपत्ती ठेवली होती. त्यांच्या धाकट्या मुलीने म्हणजेच गौहर ताज नमाजी यांनी वडिलांकडून मिळालेली संपत्ती आपल्या मुली आणि नातवंडांच्या नावे केली. पण नंतर त्यांनी शकरेहला दिलेली संपत्ती परत मागितली.
पण यानंतरही शकरेह आणि त्यांच्या आईमध्ये काहीच तणाव नव्हता. पुढे 1991 च्या एप्रिल महिन्यातील 19 तारखेला सबा आणि शकरेह यांचं फोनवर बोलणं झालं पण मे महिन्यानंतर शकरेह अचानक गायब झाल्या.
निराशा आणि आशा

फोटो स्रोत, NSTAGRAM/CSSLATHA.OFFICIAL
सुप्रीम कोर्टाच्या निकालात (पृष्ठ क्र. 3-4) तपशीलवार वर्णन केल्याप्रमाणे, शकरेह आणि सबाचा नेहमी फोन कॉल व्हायचा. पण आईचा फोन येणं बंद झाल्यावर सबाने स्वतः फोन करायला सुरुवात केली. मात्र श्रद्धानंद फोन उचलून उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला.
या काळात फोन करणं आजच्यासारखं सामान्य नव्हतं. तेव्हा एसटीडी कॉल्स, ट्रंक कॉल्स आणि इंटरनॅशनल कॉल्स बुक करावे लागायचे.
सबाला राहवलं नाही म्हणून तिने बंगळुरूला प्रत्यक्ष येऊन आईची चौकशी केली. यावर शकरेह गरोदर असून तिच्यावर न्यूयॉर्कमधील रुझवेल्ट रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं श्रद्धानंदने सांगितलं. सबाने या रुग्णालयात फोन करून चौकशी केली असता अशा नावाचा कोणताही रुग्ण तिथे दाखल नसल्याची माहिती तिला मिळाली.
यानंतर श्रद्धानंदने ती लंडनमध्ये असल्याचं सांगितलं. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आता सबाला तिच्या सावत्र वडिलांचा संशय येऊ लागला. पुढे आयकर विभागाच्या प्रकरणामुळे शकरेह कोणाशीही बोलत नसल्याचं त्याने सांगितले.
पण मुंबईतील एका हॉटेलमध्ये राहिलेला शकरेहचा पासपोर्ट सबाच्या हाती लागला. यावरून आपली आई भारताबाहेर गेली नसल्याचं उघड झालं. सबाने जुलै 1991 मध्ये तिची आई बेपत्ता असल्याची तक्रार बेंगळुरूमधील अशोकनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली.
पहिली तीन वर्ष स्वामी श्रद्धानंद बंगळुर पोलिसांपासून दूर राहण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनीही संशयितावर पाळत ठेवली, मात्र त्यांनाही फारसं यश मिळालं नाही. श्रद्धानंदने अतिशय शांतपणे पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि शकरेह बेपत्ता असल्याचं सांगितलं.
पोलिसी खाक्या दाखवूनही काहीच फायदा झाला नाही. आता पोलिस केस बंद करण्याच्या विचारात होते. पण सबाने तसं घडू दिलं नाही. तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन आपली व्यथा मांडली. यानंतर हे प्रकरण बेंगळुरच्या सेंट्रल क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आलं.
डान्सिंग ऑन द ग्रेव्ह

फोटो स्रोत, TWITTER/INDIATODAY
शकरेह व्हिंटेज कारची शौकीन होती. शिवाय ती गर्भश्रीमंत महिला असल्याने बंगळुरच्या उच्चवर्गीय समाजात तिचं मोठं प्रस्थ होतं. त्यामुळे तिच्या बेपत्ता होण्याची बातमी फक्त बंगळुरच नव्हे, तर संपूर्ण देशभरात छापून आली होती.
शकरेह आणि श्रद्धानंदच्या बंगल्यावर राजू नावाचा नोकर होता. तो बागकाम करायचा, तर त्याची बायको जोसेफिन घरकाम करायची.
तपास अधिकारी बी. अजमतुल्ला यांच्या म्हणण्यानुसार, "जोसेफिनने सांगितलं की आम्ही गावी गेल्यावर श्रद्धानंदने अंगणात तुळशीचं रोप लावलं आणि मला त्याची काळजी घ्यायला सांगितली. ते रोज त्याची पूजा करायचे."
"आमच्या गावात ब्राह्मण लोक त्यांच्या मृत नातेवाईकांसाठी अंगणात तुळशीचं रोप लावतात आणि त्याला दूध अर्पण करतात. त्यामुळे शकरेहचा मृत्यू झालाय असं मानलं जात होतं. पण तिच्या मृत्यूबद्दल काहीच माहिती मिळाली नव्हती."
मध्यंतरीच्या काळात श्रद्धानंदने ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’च्या आधारे मालमत्ता विकणं सुरूच ठेवलं होतं. त्याने बँकेतील लॉकरमधले दागिने काढून विकले. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईलाही उत्तर दिलं. यावर शकरेहची देखील स्वाक्षरी होती.
सबा सांगते की, श्रद्धानंद पार्टी करायचा, रेस्टॉरंट आणि पबमध्ये जायचा, परदेशी प्रवास करायचा. त्याचं आयुष्य अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे सुरू होतं.
जोसेफिनच्या म्हणण्यानुसार, घराच्या अंगणात पार्ट्या व्हायच्या, श्रद्धानंदच्या जवळचे लोक पार्टीत नाचायचे. याच ठिकाणी शकरेहला पुरण्यात आलं होतं.
त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आल्यावर प्रसारमाध्यमांमध्ये हेडलाईन होती, 'डान्सिंग ऑन द ग्रेव्ह'
दारूमुळे गुपित फुटलं

फोटो स्रोत, TWITTER/PRIMEVIDEO
शकरेह बेपत्ता असण्यामागे कोणता ठोस पुरावा सापडत नव्हता. अशातच महादेव नावाच्या हेड कॉन्स्टेबलला एक जुनी युक्ती सुचली.
याविषयी तपास अधिकाऱ्याने बीबीसी हिंदी बंगळुरूचे सहकारी इम्रान कुरेशी यांना त्यावेळी मुलाखत दिली होती.
त्यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितलं की, "महादेवने शकरेहच्या घरी काम करणाऱ्या एका मदतनीसाला गाठलं आणि दारू पिण्यासाठी त्याला ब्रिगेड रोडवरील एका प्रसिद्ध ठिकाणी नेलं. या प्रकरणात श्रद्धानंदचा हात असल्याचं स्पष्ट होताच आणि आम्ही त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली."
बरीच दारू प्यायल्यानंतर राजूने पोलिस कॉन्स्टेबल महादेव समोर तोंड उघडलं. त्याने सांगितलं की, बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या एका छोट्या बेडरूमसमोर जमिनीत खड्डा खोदला असून त्यात पाणी भरण्याची सोय होती. यानंतर शिवाजीनगर मधून एक मोठा बॉक्स बनवून घरी आणला होता. या बॉक्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता यावं अशा पद्धतीची चाकं बसविण्यात आली होती.
“मी मॅडमना शेवटचं आंध्र प्रदेशला जाताना पाहिलं होतं. त्यांच्या कुटुंबात कोणीतरी आजारी होतं. मॅडम रोज 9 ते 10 च्या दरम्यान उठायच्या, पण त्यादिवशी त्या उठल्याच नव्हत्या. तो बॉक्स ठेवण्यासाठी साहेबांनी मला 100 रुपये दिले आणि जायला सांगितलं. त्यानंतर आम्हाला मॅडम कधी दिसल्याच नाहीत,” राजूने सांगितलं.
पण आता पोलिसांसमोर कोडं होतं ते म्हणजे श्रध्दानंदकडून हे सगळं कसं वदवून घ्यायचं? कारण तो पोलिसांना तपासात सहकार्य करत होता, सर्व प्रश्नांची नीट उत्तरं देत होता. एकदा क्राइम ब्रँचने मध्यरात्री त्याला उचलून आणलं आणि चौकशी सुरू केली. यावेळी मात्र श्रद्धानंदने गुन्ह्याची कबुली दिली.
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शकरेह श्रद्धानंदला नोकराप्रमाणे वागवत होती. त्यांच्यात सतत भांडणं व्हायची. त्यामुळे श्रद्धानंदने 28 मे 1991 रोजी शकरेहचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
श्रद्धानंद रोज आपल्या पत्नीला रोज चहा बनवून द्यायचा. याच चहामध्ये त्याने झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. त्यानंतर त्याने शकरेहला गादीसह उचलून पेटीत टाकलं आणि वरचं झाकण बंद केलं. त्याने बेडरूमच्या खिडकी खाली असलेली भिंत तोडली, आणि समोरच खोदलेल्या खड्ड्यात पेटी ढकलून दिली. हा खड्डा त्याने आधीच तयार करून ठेवला होता. मातीने टाकून त्यावर फरशा लावल्या.
श्रद्धानंदने शकरेहला जिवंत गाडलं होतं. फॉरेन्सिक टीमला त्याचे पुरावे मिळाले होते. 1994 मध्ये पत्रकार परिषदेनंतर दोन दिवसांनी श्रद्धानंदला घरी नेण्यात आलं. तिथे पोहोचल्यानंतर त्याने पेटी पुरलेल्या ठिकाणी खडू फेकून मारला.
पोलिसांच्या तपास पथकाने पेटी काढली असता त्यात कवटी सहित शरीराचा सांगाडा सापडला. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला सापडलेला हा एक महत्त्वाचा पुरावा होता.
क्रॅनिओफेशियल तंत्राच्या मदतीने त्यांनी शकरेहचा चेहरा बनवला. हा फोटो कुटुंबातील सदस्यांना ओळखण्यासाठी पाठवला गेला. आणि तो शकरेहचा असल्याचं सिद्ध झालं.
डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या मदतीने तो सांगाडा शकरेहचा असल्याची खात्री पटली. शकरेहच्या आईने तिच्या बोटातील अंगठ्या ओळखल्या.
श्रद्धानंदने सांगितलं, "शकरेह खूप चांगली व्यक्ती होती. आम्ही एकत्र आनंदी होतो. ती जिवंत असती तर आजही आम्ही एकत्र असतो. शकरेह मला राज नावाने हाक मारायची. ती म्हणायची लग्नाच्या वीस वर्षात मला जो आनंद मिळाला नाही तो तुमच्यासोबत राहून मिळाला. जर माझं काही बरं वाईट झालं तर मला याच ठिकाणी पुरून टाका."
"माझ्याकडून चूक झाली. तिचा मृत्यू झालाय असं समजून मी तिला जमिनीत गाडलं, पण मी पोलिसात कळवायला हवं होतं. आधीच लोक धर्मामुळे आमच्या नात्याच्या विरोधात होते. आणि तिच्या मृत्यूला त्यांनी मलाच जबाबदार धरलं असतं."
"इस्लामी विधींनुसार तिचा मृतदेह शवपेटीत ठेऊन त्यावर अंत्यसंस्कार करून दफन करण्यात आला. मी एकामागून एक चुका केल्या. मला माहित होतं, एक दिवस माझं पितळ उघडं पडेल. पण तरीही माझा स्वतःवर ताबा नव्हता. माझ्यावर दबाव टाकून माझा जबाब नोंदविण्यात आला. मी शकरेहला मारलं नव्हतं."
पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
30 मार्च 1994 मध्ये, 81 रिचमंड रोड येथील शकरेहच्या घरात तिचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी उत्खनन करण्यात आलं. मात्र श्रद्धानंदचे वकील आलोक नागरेचा यांनी पोलिस तपास आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते विचारतात, जर पोलिसांनी श्रद्धानंदला अटक करून घटनास्थळी आणलं होतं तर श्रद्धानंदच्या खिशात घराच्या चाव्या कशा काय आल्या? श्रद्धानंद खिशातून चावी काढताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. जर तो पोलिसांच्या ताब्यात असेल तर चावी पोलिसांच्या ताब्यात असायला हवी होती.
"शकरेहच्या घराला सील नव्हतं. घटनेच्या तीन वर्षानंतर पोलिसांनी श्रद्धानंदच्या कपाटातून गोळ्या काढतानाचा व्हीडिओ रेकॉर्ड केला. तसं पाहायला गेलं तर कोणताच गुन्हेगार इतके दिवस आपल्याजवळ पुरावे ठेवणार नाही आणि हे तर्कसंगत नाही. सापडलेल्या गोळ्या स्वस्तातील जेनेरिक औषध होती."
नागरेचा यांचं म्हणणं आहे की, स्वामी श्रद्धानंद, ज्यांच्याकडे फारशी संपत्ती आणि प्रतिष्ठा नव्हती त्यांनी शकरेहजवळ जाणं अनेकांना मान्य नव्हतं. यात इतरांचेही आर्थिक हितसंबंध होते. त्यामुळे शकरेहच्या मृत्यूला स्वामी श्रद्धानंदला जबाबदार न धरता इतरही गोष्टी तपासल्या पाहिजेत.
प्रचलित प्रथेनुसार, जेव्हा एखादी व्यक्ती सांसारिक जीवनाचा त्याग करते तेव्हा त्याला गुरु दीक्षा देतो, नवं नाव आणि नवी ओळख देतो. तसंच मुरली मनोहर मिश्रा ही व्यक्ती स्वामी श्रद्धानंद बनण्यामागे एक कथा आहे.
मुरली मनोहर मिश्राचा जन्म मध्यप्रदेशातील सागर येथे झाला. लहानपणी मिश्राला गंभीर स्वरूपाचा आजार झाला होता, त्यातून वाचणं अशक्य होतं. कुटुंबीयांनी शक्य ते उपचार केले, अखेर मृत्यू जवळ आला.
त्यावेळी आर्य समाजातील स्वामी श्रद्धानंद नामक एका गुरूंनी भविष्यवाणी केली होती की, हा मुलगा जगेल आणि मोठा होऊन स्वतःचं नाव श्रद्धानंद ठेवेल.
मुरली मनोहर मिश्राने कोणत्या गुरूकडून दीक्षा घेतली ही माहिती उपलब्ध नाही. मात्र हायस्कूल पर्यंतच शिक्षण घेतलेल्या मिश्राला माहीत होतं की, आपला जन्म एखादं असामान्य कार्य करण्यासाठी झाला आहे.
या क्रूर हत्येसाठी कनिष्ठ न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. कर्नाटक उच्च न्यायालयाने देखील ही शिक्षा कायम ठेवली.

फोटो स्रोत, Getty Images
यावर श्रद्धानंदने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. सर्वोच्च न्यायालयातील आठ न्यायाधीशांच्या दोन खंडपीठांनी यावर सुनावणी केली. या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवलं. प्रकरण शेवटच्या टप्प्यात असताना एका न्यायाधीशांना वाटलं की, फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली जाऊ शकते. पण या निकालानुसार श्रद्धानंदची मरेपर्यंत तुरुंगातून सुटका होणार नव्हती. त्याने क्षमायाचना अर्ज केला आहे, जो विचाराधीन आहे.
श्रद्धानंदचं म्हणणं आहे की, तुरुंगवास मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. मी रोज मृत्यूची वाट पाहतोय. तुरुंगवासापेक्षा मला फाशी दिली असती तर बरं झालं असतं. तुरुंगात मला माझ्या इच्छेने ना खाता येतं, ना झोपता येतं. जवळपास तीन दशकांपासून त्याचा हा नित्यक्रम झालाय. मला एकाही दिवसाचा पॅरोल मिळाला नाही. पण राजीव गांधींच्या दोषी मारेकऱ्यांचीही सुटका करण्यात आली.
बेंगळुरू तुरुंगात कैद असलेल्या श्रद्धानंदची मध्यप्रदेशातील सागर तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. याच तुरुंगात त्याची 'डान्सिंग ऑन द ग्रेव्ह' या माहितीपटासाठी विस्तृत मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत स्वेच्छेने दिली असल्याचं श्रद्धानंदचं म्हणणं आहे.
काही लोकांनी विरोध केल्यामुळे शकरेहची कवटी योग्य रितीरिवाजानुसार दफन करण्यात आलेली नाही. तिच्या अंत्यसंस्कारावेळी ना कोणी प्रार्थना केली ना कोणी नमाज अदा केली. डॉक्युमेंट्री मध्ये दाखवल्याप्रमाणे तिच्या कवटीचं काय झालं हे स्पष्ट नाही. पण हीच ती दफनभूमी होती, ज्यासाठी नाना इस्माईल मिर्झा यांनी मदत केली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








