कुमार गंधर्वांनी भारतीय संगीताला 'निर्भय-निर्गुण' कसं बनवलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
“तानसेन कसे गात होते, हे मला माहीत नाही. परंतु त्यांच्याबद्दल जे काही म्हणतात, ते आधुनिक काळात ज्यांच्याबद्दल म्हणावं, अशा गवयांतील कुमार गंधर्व सर्वश्रेष्ठ गवई आहेत असं मी म्हटलं, तर ती अतिशयोक्ती केली असं कोणी म्हणू नये.”
प्रख्यात साहित्यिक आणि संगीतकार पु. ल. देशपांडे यांनी एका भाषणात कुमार गंधर्वांचं वर्णन करताना हे उद्गार काढले होते.
पुलंनी तेव्हा आरती प्रभूंच्या ओळीही पुन्हा मांडल्या - 'तो न गातो, ऐकतो तो सूर आपला' - म्हणजे कुमार गंधर्व गायला लागल्यावर असं वाटतं की हा जे गातो, ते आपल्या आतलं गाणं आहे.
फक्त पुलंच नाही, तर भारतीय संगीतावर, विशेषतः शास्त्रीय संगीतावर प्रेम करणारे जवळपास सगळेच जण कुमार गंधर्वांच्या गायकीनं उत्साहित होताना दिसतात.
त्यांची जन्मशताब्दी साजरी करतानाही हा उत्साह पुन्हा दिसतो आहे. आपल्या काळाच्या कित्येक वर्ष पुढे असलेल्या या महान कलाकाराच्या सूरांमधली जादू, त्याच्या मृत्यूनंतर तीन दशकं उलटून गेली तरी कायम आहे.
कुमार गंधर्वांनी गायलेल्या कबीर आणि सूरदासांच्या भजनांविषयी आणि कुमार गंधर्वांनी तयार केलेल्या नव्या रागांविषयी लोक आजही भरभरून बोलतात.
त्यांचं गाणं अचंबित करणारं असलं, तरी ते परकं आणि अगम्य वाटत नाही. उलट आजही ते कालसुसंगत वाटतं आणि दरवेळी काहीतरी नवं देऊन जातं.
म्हणूनच ज्यांचा शास्त्रीय संगीताचं व्याकरण नी रागदारीचा अभ्यास नाही, असेही अनेकजण कुमार गंधर्वांच्या गाण्यानं मंत्रमुग्ध होताना दिसतात.
शिवपुत्र असा झाला ‘कुमार गंधर्व’
पंडित कुमार गंधर्वांचा जन्म 8 एप्रिल 1924 रोजी कर्नाटकातल्या बेळगावजवळ सुळेभावी या गावात झाला. त्यांचं मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली.
चार भावंडांमध्ये या शिवपुत्रचा नंबर तिसरा होता.

फोटो स्रोत, Kumar Gandharva Pratishthan
घरात थोडं सांगितिक वातावरण होतं, वडील सिद्धरामय्या गात असत.
पण एक दिवस अचानक वयाच्या सातव्या वर्षी छोटा शिवपुत्र गाऊ लागला आणि तो असा गाऊ लागला की सर्वजण थक्क झाले.
हे काहीतरी वेगळं आहे, म्हणून वडिलांनी त्याचं गाणं त्यांच्या मठाच्या स्वामींना ऐकवलं.
स्वामीजींनी असं म्हटलं की, ‘अरे, हा तर साक्षात गंधर्व आहे.' तेव्हापासून या मुलाला कुमार गंधर्व अशी उपाधी दिली गेली आणि त्याच नावानं ते ओळखले गेले.

फोटो स्रोत, Kumar Gandharva Pratishtan
कुमार गंधर्व त्यानंतर वडिलांसोबत गाण्याच्या जलशांमध्ये गाऊ लागले. म्हणजे वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून ते गाणं सादर करू लागले होते.
बरं हे सादरीकरण कसं असायचं तर कुठलीही एखादी रेकॉर्ड लावली जायची आणि ते त्यासोबत पुढे गायला लागायचे, त्या गाण्याचा विस्तार करू लागले. हा मुलगा काही न शिकता हे कसं करतो आहे असा प्रश्न सर्वांना पडायचा.
कुमार गंधर्वांचा हा लौकिक ऐकून सावंतवाडीच्या महाराजांना वाटलं, हा मुलगा रेकॉर्डची इतकी चांगली नक्कल करतो, म्हणजे त्याच्याकडून आधीच बरीच तयारी करून घेत असावेत.
त्यांनी एक अगदी नवी आलेली रेकॉर्ड कुमार गंधर्वांसमोर लावली. रेकॉर्ड सुरू झाली आणि कुमार गंधर्व त्यासोबत गायला लागले. जणू त्यांना स्वर आपोआप समजत होते.
खरं तर त्या काळात कुमार गंधर्वांना कन्नड सोडून दुसरी भाषा येत नव्हती. पण सूरांना प्रत्येकवेळी भाषेची गरज तशीही नसते.
स्वातंत्र्यापूर्वीच्या त्या दिवसांमध्ये संपूर्ण भारतात, अगदी कराचीपर्यंत कुमार गंधर्वांचे जलसे झाले होते. त्यांना चांगली प्रसिद्धीही मिळाली होती.

फोटो स्रोत, Kumar Gandharva Pratishtan
अशाच एका मैफिलीदरम्यान सिद्धरामय्या यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही या मुलाला मुंबईत प्राध्यापक बी आर देवधर यांच्याकडे संगीत शिकायला पाठवा.
वडिलांनी त्यानंतर कुमार गांधर्वांना मुंबईला देवधर यांच्या संगीत विद्यालयात आणून सोडलं आणि ते सुळेभावीला परतले. तिथून कुमार गंधर्वांच्या सांगितिक प्रवासाला खरी सुरूवात झाली. रत्न होतंच, त्याला पैलू पडत गेले.
देवधर शाळेतलं शिक्षण
मुंबईच्या गिरगावात ऑपेरा हाऊसच्या समोर एका इमारतीच्या तळघरात ‘प्राध्यापक देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ आहे.
संगीत शिक्षण आणि प्रसारासाठी काम करणाऱ्या बी आर देवधर यांनी साधारण शंभर वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना केली होती.
कुमार गंधर्व इथे 1936 साली शिकण्यासाठी आले आणि 1947 पर्यंत म्हणजे साधारण बारा वर्ष देवधर मास्तरांकडे गुरूगृही राहूनच त्यांनी संगीताचा अभ्यास केला.

फोटो स्रोत, Deodhar School of Indian Music
त्या काळात देवधर शाळा हे मुंबईतलं संगीताचं मोठं केंद्र मानलं जात होतं. देवधर मास्तरांचे वंशज संगीता आणि गिरीश गोगटे या शाळेचं महत्त्व समजावून सांगतात.
“देवधर मास्तरांचा सगळ्या घराण्यांमधल्या गायकांशी चांगला संबंध होता. स्वतः देवधर यांचे गुरू विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी शाळेत व्हायचा. त्यानिमित्तानं देशभरातले नामवंत गायक देवधर शाळेत यायचे,” गिरीश गोगटे माहिती देतात.
त्यामुळे कुमार गांधर्वांना अशी वेगवेगळ्या घराण्यांची वैशिष्ट्य शिकायला मिळाली आणि त्यांची गायकी आणखी विकसित झाली.
संगीता सांगतात, “आमचे आजोबा प्रगत विचारांचे होते. हे घराणं आपलं नाही किंवा त्यांचं गाणं आपण गायचं नाही आणि आपली विद्या त्यांना द्यायची नाही असा विचार आजोबांनी कधी केला नाही. त्यांनी कुमारजींना सगळीकडच्या संगीताचा परिचय करून दिला आणि त्यातून जे वेचता येईल ते घेण्यास सांगितलं.”

पुढे कुमारजी शाळेत शिकवूही लागले आणि 1947 साली त्यांची विद्यार्थिनी भानुमती कंस यांच्यासोबत त्यांचा प्रेमविवाह झाला.
कुमारजींच्या मैफिली एकीकडे सुरू होत्या, पण त्याच सुमारास ते आजारी पडले.
असाध्य आजार आणि देवासला मुक्काम
त्या काळात असाध्य मानल्या जाणाऱ्या क्षयरोगानं कुमार गंधर्वांना ग्रासलं.
आजाराचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना अशा ठिकाणी जाऊन राहण्याचा सल्ला दिला, जिथे वातावरण शुष्क, कोरडं असेल. त्यामुळे त्यांनी देवासची निवड केली.
भानुमतींची बहीण, डॉ. त्रिवेणी कंस या देवासला राहात होत्या आणि कुमारजींवर पुत्रवत प्रेम करणारे रामुभैय्या दाते हेही देवासला राहात होते. त्यामुळेच कुमार गंधर्वांनी राहण्यासाठी देवास निवडलं.

फोटो स्रोत, Kumar Gandharva Pratishthan
लेखिका आणि ‘कालजयी’ या कुमार गंधर्वांवरील ग्रंथाच्या सहसंपादक रेखा इनामदार-साने सांगतात, “कुमारजींच्या पहिल्या पत्नी भानुमती या स्वतंत्ररित्या गायिका पण होत्या. पण कुमारजींना क्षयरोगानं ग्रासलं, तेव्हा भानुमतींनी कुमारजींचा जीवापाड सांभाळ केला. त्यांच्यामुळेच कुमारजी वाचले, असं म्हणता येईल. या काळात भानुमतींनी स्वतः नोकरी करून कुटुंबाला आर्थिक आधारही दिला.
“भानुमतींपासून कुमारजींना मुकुल शिवपुत्र आणि यशोवर्धन ही दोन मुलं झाली. यशोवर्धनच्या जन्मानंतर 1961 मध्ये भानुमतींचं निधन झालं.
“त्यानंतर वसुंधराताईंशी कुमारजींचा विवाह हा 1962 मध्ये झाला. वसुंधरांपासून त्यांना मुलगी झाली, कलापिनी. 62 ते 92 म्हणजे कुमारजी जाईपर्यंत त्यांना वसुंधराताईंची साथ लाभली. ती साथ केवळ संसारात होती असं नाही, तर ती कार्यक्रमांमध्ये सुद्धा होती.”
कुमार गंधर्वांचे नातू आणि मुकुल शिवपुत्र यांचे पुत्र भुवनेश कोमकली सांगतात, “वसुंधराताईंनी कुमारजींचं जीवन आणि परिवारच सांभाळला नाही, तर त्यांची सांगितिक परंपरा माझ्यापर्यंत, कलापिनीताईंपर्यंत आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम केलं.”

कुमार गंधर्व देवासला आले, तेव्हा आजारातून बरे होईपर्यंत साधारण पाच वर्ष त्यांना गाण्याची परवानगीही नव्हती. तो काळ किती कठीण असावा?
भुवनेश यांनी याचं वर्णन नेमक्या शब्दांत केलं आहे. ते सांगतात, “अलीकडेच आपण कोव्हिडच्या साथीचा सामना केला. या आजारात 15-15 दिवसांचं आयसोलेशन, काही महिन्यांचं लॉकडाऊन असं अनेकांच्या आयुष्यात आलं. ते किती कठीण होतं?
मग माझ्या मनात प्रश्न येतो, कुमारजी तर पाच वर्ष आयसोलेशनमध्ये होते. त्यांनी तेव्हाच्या काळात ती पाच वर्षं कशी काढली असतील? तेव्हा संपर्काच्या गोष्टीही फारशा प्रगत नव्हत्या. या सगळ्या वातावरणातही संगीताविषयी, स्वतःच्या जगण्याविषयी सकारात्मक विचार करणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं.”
लोकपरंपरा आणि नव्या रागांची निर्मिती
गाणं बंद होतं, त्या पाच वर्षांत कुमारजींच्या कानावर संगीत पडत होतं. बागेतल्या पक्ष्यांचे आवाज असो वा देवासच्या आसपासचं निसर्गातलं आणि लोकपरंपरेतलं संगीत असो. ते ऐकत होते.
देवास हे मध्य प्रदेशातल्या माळवा प्रांतात इंदूरजवळ वसलं आहे. आज शहर वाढलं आहे, पण सत्तर वर्षांपूर्वी हे एक छोटं गाव होतं. या परिसरात समृद्ध लोकपरंपरा आहे.
त्या माळवी परंपरेत फक्त मोठे क्षण साजरे करण्यासाठीच नाही तर दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक विषयासाठी एक गीत आहे.
ती लोकगीतं कुमारजींच्या कानावर पडत होती, तेव्हा या गाण्यांचा बाज काहीसा वेगळा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी गाण्यांच्या नोंदी ठेवणं सुरू केलं. अशा लोकपरंपरेतल्या धुन आणि गीतांचा अभ्यास करत असताना जे सापडलं, त्यातून कुमार गंधर्वांनी 11 नवे धुनउगम राग भारतीय संगीताला दिले. लोकपरंपरेतूनच रागांची निर्मिती होते, हे त्यांनी पहिल्यांदा सिद्ध केलं.

कुमार गंधर्वांचे शिष्य आणि विख्यात शास्त्रीय गायक सत्यशील देशपांडे सांगतात, “राग म्हणजे केवळ एक स्वरसमूह नसतो, तर त्याची एक चाल – Gait – असते. लोक त्यातले स्वर उलटसुलट करून काहीतरी नाविन्य आणल्याचं सांगतात. पण कुमार गंधर्वांनी तसं केलं नाही.
“कुमारजींचं मानणं होतं की प्रत्येक रागाची एक धुन असते. अशा लोक धुनींचा अभ्यास त्यांनी केला. ज्या धुन मधून राग तयार झाले नव्हते, त्यांना राग रूप मिळवून दिलं. तसंच ज्या रागांची लोकधुन सापडत नव्हती, ती शोधून काढली आणि रागसंगीत आणखी समृद्ध केलं.”
हे योगदान किती मोठं आणि महत्त्वाचं होतं, हे सत्यशील नमूद करतात. “पंजाबी हॉटेलमध्ये तुम्ही कारलं मागवा नाहीतर भेंडी. सगळं एका ग्रेव्हीतच तयार केलेलं असतं. असंच सगळे राग एकाच ग्रेव्हीत टाकून आपल्या आपल्या घराण्यानुसार गाण्याची पद्धत होती. कुमार गंधर्वांनी ते बंधन ठोकरून लावलं.”

सत्यशील पुढे सांगतात, “त्यांनी जयपूर घराण्यातला नेमकेपणा घेतला, आग्रा घराण्यातून बोलबनाव म्हणजे शब्दांमधली नादार्थक आघात करण्याची क्षमता घेतली. ग्वाल्हेरचं सर्वस्पर्शित्व घेतलं. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा एकत्र गुच्छ तयार केला. पण नेहमीकरता स्वतःचा एक फॉर्म्युला ठरवला नाही. हीच त्यांनी संगीतात केलेली क्रांती आहे.”
ऋतूसंगीताचे कार्यक्रम असोत वा 'मला उमजलेले बालगंधर्व' सारखा कार्यक्रम. कुमार गंधर्वांच्या गायकीचे वेगवेगळे पैलू त्यातून दिसून येतात.
कबिराचा आवाज
माळव्यात लोकपरंपरेइतकीच निर्गुण संतांची परंपराही मोठी आहे.
देवासमध्येच शिलनाथ बाबा नावाचे नाथपंथी संत काही काळ राहून गेले होते. त्यांनी पेटवलेली धुनी म्हणजे पवित्र अग्नी आजही तेवत ठेवला आहे.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
भुवनेश सांगतात, “या धुनीपाशी निर्गुण संत जमा होत. त्यांची भजनं करण्याची पद्धत वेगळी होती. ते दुसऱ्या कुणासाठी नाही तर स्वतःसाठी गायचे. त्याचा प्रभावही कुमार गंधर्वांवर पडला. त्यातूनच त्यांनी कबीर, सूरदास आणि इतर नाथपंथी लोकांची भजनं लोकांसमोर आणली.”
ही भजनं होती तरी त्यात नुसता भक्तीभाव नव्हता. या संतांच्या परंपरेत गुरुला आणि गुरुशिष्य नात्याला महत्त्वाचं स्थान होतं. त्यातून आध्यात्माइतकंच एकात्मतेलाही स्पर्श करणारा विचार उमटत होता.
कुमार गंधर्वांनी एक प्रकारे तो विचारही शास्त्रीय संगीताच्या मुख्य प्रवाहात आणला. 'सुनता है गुरू ग्यानी', 'उड जाएगा हंस अकेला' आणि 'निर्भय निर्गुण' अशा कुमारजींनी गायलेल्या रचना ऐकताना हीच गोष्ट जाणवते.

निर्भय निर्गुण या संत कबिरांच्या रचनेविषयी रेखा इनामदार-साने सांगतात, “यातलं निर्भय म्हणजे काय, तर एकतर तुम्ही कुठलही भय बाळगू नका. म्हणजे पूर्ण भयमुक्त राहणे हा विचार त्यात आहे. आणि निर्गुण अशासाठी की कबिरानं सगुण भक्ती कधी केली नाही. मूर्तीपूजा आणि सगुण भक्ती त्यांनी नाकारली.
"आत्ता आपल्याकडे जे चाललेलं आहे मूर्तीपुजेचं अवास्तव स्तोम, ते बघता कबीर केव्हा होऊन गेले?"
रेखा पुढे सांगतात, “कुमारजींच्या भाषेत बोलायचं, तर विरानियत आणि फक्कडपन अशी कबिराची दोन वैशिष्ट्य त्यांनी अधोरेखित केली आहेत. विरानियत म्हणजे एकांत. एकांतातच तुम्हाला शोध लागू शकतो.
"फक्कडपन म्हणजे सडेतोडपणा- आपल्याला जे वाटेल आणि पटेल ते बोलण्याचं धैर्य. कबिराच्या या गोष्टी अंतर्यामी कुमारजींना जाणवल्या होत्या.”
गंधर्वांचा वारसा
देवास शहराच्या साधारण मध्यावर ‘माता जी की टेकडी’ नावाचा एक छोटा डोंगर आहे, ज्यावर देवीचं मंदिर आहे.
आता या मंदिरात जाण्यासाठी रोपवे आहे. पण आधी एका रस्त्यानं चढून जावं लागायचं. त्याच रस्त्यावर, टेकडीच्या पायथ्याशी आहे ‘भानुकुल’. भानुमतींच्या कुटुंबाचं घर.
भानुकुलच्या आवारात प्रवेश करताच डावीकडे एक छोटंसं व्यासपीठ आहे, जिथे बसून गाता यावं.
मग पुढे पिवळसर रंगानं रंगवलेली वास्तू, तिच्यात दर्शनी भागात वऱ्हांडा, वऱ्हांड्यामध्ये झोपाळा आणि आसपास बहरलेली बाग. गुलाबापासून ते जांभळ्या फुलांच्या वेलीपर्यंत निसर्गानं केलेली उधळण.
खिडकीतून पाझरणारं दुपारचं उबदार सोनेरी ऊन.

फोटो स्रोत, Shardul
या घरातच कुमार गंधर्व पुढचं आयुष्य जगले. तिथला दिवाणखाना आणि कुमारजी राहायचे ती खोली आजही जशीच्या तशी जतन केलेली आहे. इथल्या वातावरणात आल्यावर आजही तिथे संगीत भरून राहिलं असावं असं वाटतं.
भुवनेश सांगतात, “लहानपणी आमच्या घरातलं वातावरणच संगीतमय होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत आमच्या दिननचर्येत संगिताशिवाय काही नव्हतं. म्हणजे कुणी गात नसेल तर गाण्यावर चर्चा तरी सुरू असायची. त्यामुळे माझा संगीतातला प्रवास कुठून सुरू झाला हे नक्की सांगता येणार नाही.”
“आजोबांच्याच नाही तर पित्याच्या रुपातही मी कुमारजींना पाहात आलो आहे. त्यांनी जितके माझे लाड केले, तेवढाच मी त्यांचा ओरडाही खाल्ला आहे.”
पुढे भुवनेश यांनी वसुंधराताईंकडे आणि मग पंडित मधुप मुद्गल यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. ते सांगतात की वसुंधराताईंनी त्यांना थेट कुमारजींच्या रचना शिकवून सुरुवात केली नाही. तर आधी परंपरागत संगीतच शिकवलं.
“आता माझ्याकडे जे संगीत शिकण्यासाठी येतात, त्यांना मी याच पद्धतीनं शिकवायचा प्रयत्न करतो.
आताच्या पिढीच्या आसपास जे सांगितिक वातावरण आहे, त्यात बराच कोलाहल आहे. त्यातून टिकून राहायचं, संयमानं एखादी गोष्ट करायची हे जमलं तर ही पिढी आणखी पुढे जाईल यात शंका नाही.”

फोटो स्रोत, Getty Images
कलापिनी आणि त्यांचा भाचा भुवनेशनं कुमार गंधर्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुमार गंधर्वांच्या गाण्यांसह अनेक गोष्टींचं जतन केलं आहे.
1992 साली कुमार गंधर्वांचं निधन झालं. त्यानंतर तीन दशकं उलटली आहेत. आताच्या पिढीनं कधी कुमारजींना जिवंतपणी पाहिलं नाहीये, ना समोर बसून ऐकलं आहे, ना त्यांना कुमारजींविषयी फार काही माहिती आहे. पण कुमारजींचं संगीत त्यांनाही प्रभावित करतं. त्यामुळेच कुमारजींच्या अशा गोष्टी जतन करणं महत्त्वाचं ठरतं.
भुवनेश सांगतात, “पंडित कुमार गंधर्वांचं स्थान भारतीय शास्त्रीय संगीतात सर्वपरी आहे. त्यांनी भारतीय परंपरागत संगीतामध्ये नवीन सौंदर्यस्थळं शोधून संगीताचा नवीनदृष्ट्या आनंद घेणं लोकांना शिकवलं. संगीतामध्ये विचार कसा करावा आणि तो विचार व्यक्त कसा करावा या गोष्टी त्यांनी लोकांना शिकवल्या. हे मला त्यांचं सर्वात मोठं योगदान वाटतं.
“त्यांचा असा विचार होता, की संगीत ही अशी विधा आहे ज्यात व्यक्त होण्याच्या शक्यता सर्वाधिक आहेत आणि त्यातून विषयांची विविधता आपल्याला दाखवता आली पाहिजे. त्याच्यामुळे असं आता म्हटलं जातं की भारतीय शास्त्रीय संगीत हे कुमार गंधर्वांच्या आधी वेगळं होतं आणि कुमार गंधर्वांनंतर आज वेगळं आहे.”
संदर्भ आणि आभार
- ‘रसिकहो’ - पु. ल. देशपांडे यांच्या भाषणांचा संग्रह
- ‘कालजयी’ - संपादक कलापिनी कोमकली आणि रेखा इनामदार-साने
- 'गान गुणगान' - सत्यशील देशपांडे
- 'सिंगिंग एम्प्टीनेस' - लिंडा हेस
- कुमार गंधर्व प्रतिष्ठान












