शाहीर साबळेंनी यशवंतराव चव्हाणांना म्हटलेलं, ‘आम्ही कलाकार आहोत, मिंधे नाही’

फोटो स्रोत, Kedar Shinde
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
(आज 3 सप्टेंबर शाहीर साबळे यांचा जन्मदिन आहे. त्या निमित्ताने हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)
मुंबई आकाशवाणीवर महाराष्ट्राचं वर्णन करणारा एक पोवाडा सादर होणार होता...त्यासाठी शाहीर आले. त्यांनी आपल्या पोवाड्याला सुरुवात केली...
महाराष्ट्र भूमी बहुगुणी शोभते खणी
किती नरमणी, संत जन्मले हिच्या कुसव्यात
शारदा भक्त शोभती खास कलेची नित्य नवी आरास ।।
पण आकाशवाणीच्या अधिकाऱ्याने पोवाडा थांबवला...प्रत्येक ठिकाणी ‘महाराष्ट्र’ हा शब्द कशाला? एक-दोनदा कुठेतरी वापरा, असं त्याचं म्हणणं होतं.
हा काळ होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा...आकाशवाणीवर जे अधिकारी होते, ते दाक्षिणात्य होते. ‘महाराष्ट्र’ हा शब्द सतत कानावर पडत असल्याने ते सतर्क झाले आणि त्यांनी पोवाडा गाणाऱ्या शाहिरांना जाब विचारला...
शाहिराने विचारलं, “मग शिवाजी महाराज कुठे जन्माला आले होते म्हणून सांगू? दिल्ली की कलकत्ता?”
शेवटी कसाबसा हा वाद थांबवला गेला. पोवाडा आपल्याला हवा तसा सादर करून शाहीर बाहेर पडले खरे...पण आकाशवाणीने पुढचे सहा महिने त्यांचे कार्यक्रम बंद केले...
अर्थात, त्याने काय फरक पडणार होता?
या शाहिराचं भांडवल त्याच्या डफावर मारलेली थाप आणि त्याचा बुलंद आवाज होता... त्याच्यासाठी ते पुरेसं होतं.
‘शाहिराचा पोवाडा म्हणजे लहानापासून थोरापर्यंत, खेड्यापासून शहरापर्यंत, अशिक्षितांपासून विद्वानांपर्यंत शहारे उठविणारा वीजांचा कडकडाट. त्यानं इतिहास उभा करावा आणि मनोरंजाबरोबरच श्रोत्यांच्या मनाची मशागतही,’ असं म्हणणारे शाहीर होते कृष्णाजी गणपतराव साबळे...ज्यांना रसिकांच्या प्रेमाने 'महाराष्ट्र शाहीर' बनवलं...

कृष्णराव गणपतराव साबळे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 ला झाला. साबळे कुटुंब मुळचे सातारा जिल्ह्यातील शिवथर या गावचे.
त्यांचे वडील गणपतराव हे त्याकाळी रेल्वेमध्ये नोकरीला होते. वॅगनमधलं सामान उतरवण्याच्या कामावर ते होते. पण नंतर गणपतराव भावंडांसहित शिवथर गाव सोडून साताऱ्यामधल्या वाईतल्या पसरणी या गावात स्थायिक झाले.
आईने गायलेल्या ओव्यांमधून, देवळातील भजनांमधून गाण्याचे सूर शाहीर साबळेंच्या कानावर पडत होते,
शाहीर साबळेंनी त्यांच्या 'माझा पवाडा' या चरित्रात म्हटलं आहे, “गायकीचा वारसा आमच्या घराण्याला मिळाला ही माझी आई कृष्णाई हिचीच पुण्याई. ती स्वतः ओव्या रचायची आणि जात्यावर म्हणायची. तिला शीघ्रकवीच म्हणायला हवी.”
जडणघडणीच्या आईकडून नकळतपणे गाण्याचे संस्कार झालेल्या, तालासुरात हुबेहूब भजन म्हणणाऱ्या लहानग्या शाहिरांना गावातल्या भजनी मंडळात घेतलं. भजनी मंडळासोबत ते गावोगाव फिरू लागले. पण शाहिरांच्या वडिलांना हे मान्य नव्हतं. कारण साबळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार ठीक नव्हती. आपल्या मुलाने शिकून कुटुंबाला आधार द्यावा ही त्यांची अपेक्षा होती.
आपल्या मुलाच्या डोक्यातून गाणं काढून टाकण्याचा उपाय म्हणून आई-वडिलांनी शाहिरांना शिक्षणासाठी त्यांच्या मामाकडे ठेवायचं ठरवलं. मामाचं गाव खान्देशातलं अमळनेर. पश्चिम महाराष्ट्रातल्या पसरणीतून शाहिरांची रवानगी थेट खान्देशात होत होती.
साने गुरूजींचा सहवास
गाणं विसरावं म्हणून शाहिरांना त्यांच्या आई-वडिलांनी अमळनेरला पाठवलं होतं. पण तिथे गेल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळणार होती...
अमळनेरमधल्या प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरूजी शिक्षक होते.
एकदा अमळनेरमध्ये गुरूजींच्या सभेत शाहीर साबळेंनी ‘रमला कुठे गं कान्हा’ हे गाणं गायलं. ते ऐकून साने गुरूजींनी त्यांना एक गाणं रचून दिलं आणि त्याच चालीवर गायला सांगितलं.
एकदा गुरूजींनी एक कार्यक्रम बसवला होता आणि शाहीर साबळेंच्या देशभक्तिपर गाण्यानं त्याची सुरूवात होणार होती.
तोपर्यंत आजीच्या कानावर शाहिरांच्या गाण्याच्या गोष्टी गेल्या होत्या. तिने शाहिरांना अक्षरशः घरातच कोंडून घातलं होतं. ‘तंगडं मोडीन गेलास तर,’ अशी धमकीच दिली होती.
शाहीर आले नाहीत, तेव्हा स्वतः गुरूजी त्यांच्या मामाच्या घरी गेले.
त्यांनी आजीची समजूत घालायला सुरूवात केली.
पण आजीने गुरूजींनाही स्पष्टपणे सांगितलं, “अहो, त्याला साळा शिकायला पाठवलंय आईबापानी माझ्याकडं. तुमच्या संगं गाण बजावणं करून साळंचा इस्कोट करण्यासाठी नाही. आल्या पावली परत जा गुरुजी.”
साने गुरूजी आल्या पावली परत गेले. शाहीर तळमळले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
अर्थात, शाहीर आणि गुरूजींचे ऋणानुबंध इथेच संपणारे नव्हते.
1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनाच्या वेळी साने गुरूजी आणि शाहिरांची पुन्हा भेट झाली. शाहीर त्यांच्यासोबत चळवळीत सहभागी झाले, महाराष्ट्रभर फिरले.
गांधी माझा सखा गं
ओवी त्यांना गाईन
अन् तुरुंगात जाईन
मी स्वराज्य मिळवीन
ही ओवी शाहीर तेव्हा गायचे.
गुरुजींनी दलितांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणुन पंढरपूरला आमरण उपोषण सुरु केलं, तेव्हाही शाहीर साबळे त्यांच्यासोबत होते. त्यांनी महाराष्ट्रभर फिरून गुरुजींचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
शाहीर साबळेंच्या पोवाड्याची पहिली रेकॉर्ड जेव्हा एचएमव्हीने काढली, तेव्हा त्याची पहिला प्रत घेऊन ते साने गुरूजींना भेटायला गेले. ती ऐकण्यासाठी गुरुजी तिथल्या एका गुजराती कुटुंबाकडे गेले, कारण त्यांच्याकडे रेकॉर्डर होता. ती रेकॉर्ड ऐकल्यावर गुरूजींच्या डोळ्यांत पाणी आल्याचं शाहिरांनी सांगितल्याची आठवण वसुंधरा साबळेंनी लिहिली आहे.
शाहिरीतले गुरू
मामाकडे शिकत असताना शाहीर साबळेंचं गाण्यातलं लक्ष कमी झालं नव्हतंच, उलट सिनेमातल्या गाण्यांनी त्यांना चांगलीच भुरळ घातली होती. पण सातवीत असतानाच त्यांच्या संगीताच्या आवडीला कलाटणी देणारी एक घटना घडणार होती.
त्या काळी खान्देशात सिद्राम बसप्पा मुचाटे नावाचे शाहीर प्रचंड लोकप्रिय होते. त्यांचा एक कार्यक्रम पाहायला मामा त्याला घेऊन गेले. शाहीर मुचाटेंच्या आवाजाने त्यांना भुरळ घातली. हे असंच आपल्याला करायचंय हे त्यांनी ठरवलं, पण ते कसं करायचं हे त्यांना माहीत नव्हतं.
आपल्या मामाकडून त्यांनी शाहीर मुचाटेंचे सगळे पोवाडे मिळवले आणि त्यांचा अभ्यासही सुरू केला.
“जेव्हा मी अमळनेरला होतो, तेव्हा शाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे यांचा माझ्यावर प्रभाव पडला होता. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यामुळे त्यांना जवळपास चौदा वर्षं तुरुंगात राहावं लागलं होतं,” असं शाहीर साबळेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.
शाहीर गवाणकर, अण्णाभाऊ साठे यांचाही आपल्यावर प्रभाव असल्याचं शाहिरांनी या मुलाखतीत म्हटलं होतं.
एकीकडे शाहिरीची गोडी लागत असताना, दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात एका कटू अनुभवाला शाहीर साबळेंना सामोरं जावं लागलं.
त्यांची मराठी सातवी म्हणजेच त्यावेळेच्या फायनलची परीक्षा आली. त्याचं केंद्र जळगावला होतं. त्यासाठीचा खर्च होता तीन रूपये. पण आजीने ते तीन रूपये त्यांना दिले नाहीत. ‘परीक्षेला बसून उपयोग नाही’ असा तिच्या मनात ठाम बसलं होतं.
शेवटी शाहिरांना परीक्षा देता आली नाही, ते निराश होऊन पसरणीला आई-वडिलांकडे परतले.
कृष्णा ते शाहीर
पसरणीत आल्यावरही त्यांच्या आय़ुष्याला दिशा नव्हती. शेवटी ते मुंबईला गेले, जिथे त्यांचे दोन काका गिरणीत काम करत होते.
मुंबईत आल्यावर कलेशिवाय आपल्याला दुसरा रस्ता नसल्याचं शाहिरांच्या मनानं घेतलं होतं. शाहीर मुचाटेंप्रमाणे आपणही स्वातंत्र्य़लढ्यात भाग घ्यावा, असं त्यांना वाटत होतं.
शाहिरांचा साने गुरूजींशी पत्रव्यवहार सुरू होताच. त्यांनी जेव्हा ही गोष्ट गुरूजींना सांगितली, तेव्हा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी ‘जनता कलापथक’ असं नावंही सुचवलं.

अशी गीतरचना ते करायला लागले होते. त्यांचे सोबती आणि ओळखीचे लोक आता त्यांना ‘शाहीर’ म्हणूनच बोलवत होते.
व्यावसायिक यश
मुंबईत जेव्हा शाहीर आपलं बस्तान बसवत होते, तेव्हा एचएमव्ही ही रेकॉर्डिंग कंपनी प्रादेशिक गाण्यांचं रेकॉर्डिंग करत होती.
या कंपनीकडून शाहिरांची काही गाणी आणि पोवाडेही रेकॉर्ड झाले.
एचएमव्हीकडून दरवेळी कुठल्या गायकाच्या रेकॉर्ड्सचा खप किती झाला याची पुस्तिका निघायची, त्यात शाहिरांचाही समावेश झाला.
याच काळात शाहिरांचं कलापथकही काम करत होतं. राजा मयेकरांसोबत त्यांची जोडी चांगलीच जुळली होती.
कोयना स्वयंवर, इंद्राच्या दरबारात दारुड्या, कोड्याची करामत, नशीब फुटके सांधून घ्या, बापाचा बाप अशी एकामागून एक यशस्वी प्रहसनं येत होती.
त्याचबरोबर जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, या गो दांड्यावरन नवरा कुणाचा येतो, रुणझुण वाजंत्री वाजती यासारखी गाणीही गाजत होती.
महाराष्ट्र गीताची गोष्ट

फोटो स्रोत, Kedar Shinde
"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..." हे गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमान दाटून येतो.
शाहीर साबळेंच्या आवाजातलं हे अजरामर गीत लिहिल होतं कवी राजा बढे यांनी.
1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानिमित्ताने राजा बढेंनी हे गीत लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी त्याला चाल दिली होती. शाहीर साबळेंनीच हे गाणं गावं असा आग्रह त्यांनी धरला.
हा मान शाहीर अमरशेखांना मिळावा असं, शाहीर साबळेंना वाटत होतं, पण काही कारणाने तसं झालं नाही आणि शाहीर साबळेंच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड झालं.
या गाण्याबद्दल शाहीर साबळेंनी म्हटलं होतं, “मला महाराष्ट्र गीताबद्दल विलक्षण प्रेम आहे, अभिमान आहे. हे गीत गायल्याशिवाय मला स्फूर्तीच येत नाही. कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जसं श्रीगणेश देवाला नमन करतो, तसं मी महाराष्ट्राला मानवंदन दिल्याशिवाय रंगभूमीवर पाऊल टाकत नाही.”
‘आम्ही कलाकार आहोत, मिंधे नाही’
महाराष्ट्राचं गौरवगीत गाणाऱ्या या महाराष्ट्र शाहीराने वेळ आल्यावर सत्तेला कडवे बोलही ऐकवले होते.
शाहीर साबळेंना यशवंतराव चव्हाणांबद्दल प्रचंड आदर होता, पण त्यांनी त्यांच्यासमोरही सत्य बोलताना काही भीड बाळगली नाही...
ही गोष्ट होती 1962 सालची. तेव्हा निवडणुका होत्या. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची धुरा यशवंतराव चव्हाणांच्या खांद्यावर होती.
यशवंतरावांनी राज्यातील विचारवंत, शाहीर, कलाकार, कवी, साहित्यिक यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीला बोलावलं. या बैठकीला शाहीर साबळेही गेले होते.
या बैठकीत यशवंतरावांनी कलाकारांशी संवाद साधत त्यांना आवाहन केलं की, कलाकारांनी काँग्रेसच्या प्रचारात भूमिका बजावावी.
यशवंतराव चव्हाणांना नेमकं काय सांगायचं? कलाकारांना हा प्रश्न पडलेला.
शाहीर उठले आणि त्यांनी म्हटलं, “शाहीर मंडळी डफ तुणतुणं घेऊन जनजागृती करतो ते अन्यायाला वाचा फुटावी म्हणून, त्याचप्रमाणे चांगल्या समाजोपयोगी बाबींचे कौतुक व्हावं म्हणून. शाहिरी कला कोणाही वैयक्तिक उमेदवाराची भाटगिरी करण्यासाठी वापरली जाऊ नये. सरकारी बाजू मांडली जाईल, पण पक्षाचं लेबल लावून शाहिरी कला वेठीला धरू नये.”
या बैठकीत इतर साहित्यिकांसोबत त्यांचे काही मतभेदही झाले.

फोटो स्रोत, Kedar Shinde
शेवटी शाहीर साबळेंनी म्हटलं, “आम्ही कलाकार आहोत, मिंधे नाही कोणाचे. खऱ्या कलावंताना मी तेच सांगतो, जे मी बऱ्याच वर्षांपूर्वी दिला होता-
कलावंत बंधूजनहो,
देशकामी लागा
कला आपुली अनमोल, कामापुरते घ्यावे मोल
आणि शाहीर साबळे तिथून बाहेर पडले.
दुसऱ्या दिवशी शाहिरांना यशवंतराव चव्हाणांनी पुन्हा बोलावून घेतलं.
यशवंतरावांनी म्हटलं, “वा, शाहीर...मानलं तुम्हाला! शेवटी एकतर कलाकार आमच्या राष्ट्राला मिळाला, सत्ताधीशांसमोर जो ताठ मानेनं उभा राहू शकतो आणि मोकळेपणाने आपले विचार मांडू शकतो.”
बाळासाहेब ठाकरेंशी मैत्री आणि दुरावाही...

फोटो स्रोत, Kedar Shinde
आपल्या कलेच्या राजकीय वापराबद्दल यशवंतराव चव्हाणांना सुनावणाऱ्या शाहिरांनी आपले मित्र बाळासाहेब ठाकरेंसोबतही अशीच भूमिका घेतली होती. त्यातून या मित्रांमध्ये वैचारिक दुरावाही आला...
खरंतर शाहीर साबळे शिवसेनेच्या स्थापनेचे आणि वाढीचे केवळ साक्षीदार नव्हते, तर त्यात त्यांचा कलात्मक सहभागही होता.
झालं असं होतं की, शाहिरांचं ‘यमराज्यात एक रात्र’ हे प्रहसन गाजत होतं, त्याचं कौतुक होत होतं.
त्यावेळचे प्रसिध्द व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांची आपल्या ‘मार्मिक’च्या मुखपृष्ठावर या प्रहसनाचं कौतुक करणारं चित्र छापलं होतं. तिथूनच बाळासाहेब आणि शाहीर साबळेंचं मैत्र सुरू झालं.
याच दरम्यान मुंबईत शिवसेनेचा जम बसू लागला होता. पण सभा, शाखा, मार्मिक एवढ्यावरच बाळासाहेब समाधानी नव्हते. त्यांच्या मनात वेगळा विचार सुरू होता.

फोटो स्रोत, Kedar Shinde
तो त्यांनी शाहीर साबळेंसमोर मांडला, “मुंबईतील मराठी माणसाचं दुखणं मांडणारं, त्यांच्या व्यथांना वाचा फोडणारं असं नवीन मुक्तनाट्य शाहीर साबळे यांनी रंगभूमीवर आणावं.”
बाळासाहेबांनी म्हटलं खरं, पण शाहिरांकडून तसं लिखाण काही होत नव्हतं.
शेवटी बाळासाहेबांनी शाहिरांना निर्वाणीचा इशारा दिला की, तुम्ही काही लिहिलंच नाही तर आपली मैत्री संपली असं समजा!
बाळासाहेबांच्या या ‘तंबी’नंतर शाहिरांनी एकटाकी लिहित त्यांचं सगळ्यांत गाजलेलं मुक्तनाट्य लिहिलं- ‘आंधळं दळतंय’
प्रमोद नवलकर यांनी ‘भटक्याची भ्रमंती’ या सदरात ‘आंधळं दळतयं’ बद्दल लिहिलं होतं, की या शिवसेनेच्या प्रसूतीवेदना आहेत.
यामध्ये शाहिरांनी एक लावणी वापरली. पण ती रुढ शृंगारिक नव्हती, तर मुंबईत हमाली करणाऱ्या मराठी माथाडी कामगाराची खंत मांडणारी होती...

यातून मराठी माणसाच्या वेदना मांडल्या जात होत्या...शिवसेनेचं बळ वाढत होतं. पण याचवेळी शाहीर आणि बाळासाहेबांमध्ये मात्र दुरावा आला.
शिवसेना पक्ष म्हणून मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवणार असं बाळासाहेबांनी जाहीर केलं.
शाहिरांची भूमिका काहीशी वेगळी होती.
त्यांनी ‘माझा पवाडा’ मध्ये म्हटलं आहे,”शिवसेना ही मराठी माणसाची अस्मिता आणि संस्कृती जोपासणारी सामाजिक संस्था असल्यामुळे आम्ही राजकारणात पडणार नाही किंवा निवडणुका लढवणार नाही; मात्र निवडून येणाऱ्यांच्या नाकात वेसण घालू अशा आणाभाकाही घेतल्या होत्या. पण नको तेच घडायला लागलं होतं.”
शेवटी शाहीर साबळेंनी म्हटलं की, माझ्यासारखी कलावंत प्रवृत्तीची व्यक्ती राजकारणी माणसाचा फक्त मित्र असू शकते. सहकारी मात्र कधीच होऊ शकत नाही.
इथूनच शाहीर पुन्हा त्यांच्या कलात्मक प्रवासाकडे वळले आणि बाळासाहेब आणि त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या.
मुक्तनाट्य आणि मोबाईल थिएटर

फोटो स्रोत, Kedar Shinde
शाहीर साबळेंचे मराठी रंगभूमीवरील योगदान अजून एका बाबतीत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे त्यांनी मुक्तनाट्य हा प्रकार रंगभूमीवर आणला.
शाहीर साबळेंचे सगळे कार्यक्रम हे मोकळ्या ठिकाणी व्हायचे. पण नंतर त्यांनी बंदिस्त नाट्यगृहात आपला प्रयोग घेऊन जाण्याचा विचार केला.
पण तिथे जाताना रंगभूमीवरील रुढ चौकटीपेक्षा काही वेगळं करण्याचा त्यांचा विचार होता. त्यातूनच मुक्तनाट्याची कल्पना समोर आली.
नाटकांसारखा सेट नाही, रंगभुमीवर कुठलीही प्रॉपर्टी नाही. जे दाखवायचंय ते शब्दांतून तमाशाप्रमाणे जागेवरच गरगर फिरून असा काहीसा या मुक्तनाट्याचा फॉर्म.
त्याबद्दल शाहीर साबळेंनी एका मुलाखतीत म्हटलेलं, की “तमाशा हे एक प्रकाराचं लोकनाट्य आहे. तमाशासाठी तुम्हाला मेकअप, खूप सारी प्रॉपर्टी लागत नाही. तो अगदी झाडाखालीही व्हायचा. पण काळ बदलला महाराष्ट्रात गंधर्वांनी नाटकाची वेगळी परंपरा सुरू केली. या पार्श्वभूमीवर मी विचार केला की, आता ओपन एअर तमाशांचा काळ सरला आहे. लाइट्स वगैरे तंत्रज्ञानासह बंदिस्त थिएटरमध्ये वेगवेगळ्या शक्यता अजमावण्याची वेळ आली आहे.
त्यातूनच मी लोकनाट्य आणि पारंपरिक नाट्यातील थोड्या थोड्या गोष्टी घेऊन माझा स्वतःचा तमाशा तयार केला...मुक्त नाट्य.”

फोटो स्रोत, Kedar Shinde
या मुक्तनाट्यासोबतच शाहिरांनी अजून एक प्रयोग केला होता तो म्हणजे ‘मोबाईल थिएटर.’
एक बस घेऊन सर्व सोयींनी सज्ज असे फिरते रंगमंच वाहक-वाहन बांधून घेण्याची ही कल्पना होती. 30 फूट बाय 30 फुटांचा विस्तृत रंगमंच होता. पण तो फोल्ड करता येणारा होता. बसने कलाकार इच्छित स्थळी पोहोचले की, त्या बसचं रुपांतर स्टेजमध्ये करता येणार होतं.
11 फेब्रुवारी 1973 ला या मोबाईल थिएटरचं उद्घाटन झालं. पु. ल. देशपांडे यांनीही या थिएटरचं कौतुक केलं होतं.
पण या थिएटरमुळे शाहिरांच्या वाट्याला आर्थिक ओढग्रस्तीच आली.
या थिएटरसाठी शाहिरांनी कर्ज काढलं होतं. पण निसर्गाची अवकृपा झाली आणि हा डोलारा कोसळला...
शाहिरांनी त्याबद्दल म्हटलं,”पावसाअभावी साऱ्या महाराष्ट्रात लागोपाठ दोन वर्षं दुष्काळ पडला. साहजिकच आम्ही ज्यांच्यावर भिस्त ठेवून हा गोवर्धन उभा केला, त्या शिक्षणसंस्था, साखर कारखाने आणि ग्रामीण ठेकेदार यांच्याकडून प्रयोगासाठी मागणी येणं दुरापस्त झालं.
पुढं 1974 चा रेल्वे संप आणि मग वर्षभरात आणीबाणी आणि मग जमावबंदी. मोबाईल थिएटर जागेवरच स्थिर होऊन पडलं. सतरा हजारांचं लोखंडी सामान सतराशे रुपयांत भंगाराच्या भावानं विकावं लागलं. पावणेदोन लाखांच्या कर्जात गळ्याइतका बुडाला तो शाहीर साबळे.”
महाराष्ट्राची लोकधारा

फोटो स्रोत, Kedar Shinde
मोबाईल थिएटरमुळे बसलेल्या आर्थिक धक्क्यातून सावरायला शाहिरांना वेळ गेला. पण त्यांनी उभारी घेतली.
महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यकमातून त्यांनी पुन्हा एकदा यशाचं शिखर पाहिलं. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांच्या कलांना एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करण्याची कल्पना यामागे होती.
विशेष म्हणजे यावेळी शाहीर साबळेंसोबत त्यांची पुढची पिढीही खांद्याला खांदा लावून उभी होती. यशोधरा, देवदत्त, वसुंधरा आणि चारूशीला या मुलांचा महाराष्ट्राची लोकधारामध्ये सक्रीय सहभाग होता.
शाहिरांनी म्हटलं होतं, की माझा मुलगा देवदत्त, मुली यशोधरा, चारूशीला आणि वसुंधरा यांनी माझं स्वप्न पूर्णत्वास नेलं. मीच गायलेली लोकगीतं त्यांनी वेगळ्या ढंगात बसवली आणि 1 मे 1984 सालचा प्रयोग यशस्वी करून दाखवला.
या कार्यक्रमातून जागरण-गोंधळ , वासुदेव, कोकेवाला, जोशीपिंगळा यांसारखी विथीनाट्ये, कृषी संस्कृतीतील भलरी गीते, कोळी बांधवांची गीते व नृत्ये, तमाशातील लावणी-बतावणी, मर्दानी पोवाडे, भजने आणि भारुडे असे लोकप्रकार प्रेक्षकांसमोर आले.
मुंबईचे त्यावेळेचे शेरीफ शाहीर पांडुरंग वनमाळी यांनी म्हटलं, “लोकसाहित्याचे गीतप्रकार मोठ्या कलात्मकतेने व सहजतेने लोकधारेत गुंफले आहेत. या लोकधारेतून भजन, कोकणातील नमन, देशावरील ढोल, लेझीम, लग्नगीते नृत्यासहित सादर केली आहेत. शाहिरांनी मराठी संस्कृतीचा ठेवा इतरांपर्यंत पोहोचवला आहे.”
तपस्याश्रम
लोककलाकारांच्या वृद्धापकाळी त्यांना निराश्रितांचं जिणं जगावं लागू नये, त्यांनी जतन केलेल्या कलांची परंपरा पुढे चालावी यासाठी शाहीर साबळेंनी ‘तपस्याश्रमा’ची स्थापना केली.
त्यासाठी त्यांनी 10 जानेवारी 1989 साली ‘शाहीर साबळे प्रतिष्ठान’ या संस्थेची नोंदणी केली.
आपलं हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी पसरणीतली साबळे कुटुंबियांची आठ एकर जमीन प्रतिष्ठानला बक्षीसपत्र करून दिली.
पदरमोड आणि शासनाने केलेली मदत यातून ‘तपस्याश्रम’ उभा राहिला.
कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल शाहीर साबळे यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.
संगीत नाटक अकादेमीचा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सर्वश्रेष्ठ गायक पुरस्कार, महाराष्ट्ररत्न पुरस्कार इत्यादि पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला गेला.
भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरविण्यात आलं.
20 मार्च 2015 ला वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं.

फोटो स्रोत, Kedar Shinde
स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मुंबईमधल्या मराठी माणसाची गळचेपी माहीत नसलेल्या; वासुदेव, गोंधळ, भारूड, जागरण-गोंधळ यांसारख्या लोककलांशी नाळ तुटलेल्या आजच्या पिढीला शाहीर साबळे माहीत असतील का? कदाचित ते नाही असं उत्तर देतील...
पण जेव्हा ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गाणं वाजेल तेव्हा या बुलंद आवाजाशी त्यांची ओळख होत राहील. जेव्हा ‘या गो दांड्यावरून गाण्यावर’ ते ठेका धरतील, तेव्हा शाहीर साबळे त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील... ‘यळकोट यळकोट’ म्हणत जेव्हा कोणी ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या’ म्हणत गजर करेल, तेव्हा त्या भक्तीत शाहिरांचा आवाज असेल...
कलाकार आणि कलेचं हे अद्वैत साधलं की मग वेगळ्या ओळखीची गरज भासत नाही.
संदर्भ-
- माझा पवाडा- शाहीर साबळे
- वसुंधरा साबळे यांनी लिहिलेली लेखमाला
- मराठी विश्वकोष
- मुंबई थिएटर गाईड
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








