सोयराबाईंचे बंधू असूनही संभाजी महाराजांना साथ देणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते

फोटो स्रोत, Twitter/Sarsenapati Hambirao
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट' असं एक वाक्य 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाच्या टीझरमध्ये मुख्य व्यक्तिरेखेच्या म्हणजेच हंबीरराव मोहिते यांच्या तोंडी आहे. हे वाक्य ऐकल्यावर आपल्या लक्षात येतं की हंबीररावांना आपल्या आयुष्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागला पण त्याला त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले. पण एक उत्सुकताही लागते की त्यांचे आयुष्य नेमके कसे होते.
ज्यावेळी 'सरसेनापती हंबीरराव'चा टीझर प्रदर्शित झाला त्यावेळी बाहुबली प्रभासने देखील या चित्रपटाच्या टिजरची स्तुती केली.
62669500अनेकांना हंबीरराव मोहिते नेमके कोण होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य सेनेचे ते सरसेनापती कसे बनले, त्यांचं कार्य काय याची उत्सुकता लागली आहे.
सेनापती हंबीरराव मोहितेंविषयी इतिहासात काय उल्लेख आहे, ते नेमके कसे होते याचा शोध घेणारा हा लेख.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्या नेतृत्वात सरसेनापतीपदाचा बहुमान मिळालेले ते एकमेव सेनापती ठरले. जितके पराक्रमी तितकेच धीरगंभीर आणि सबुरीने काम करणारे स्वराज्यनिष्ट सेनापती अशी त्यांची ख्याती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची आणि प्रशासनाची पूर्ण ओळख असलेला, गनिमी काव्यात निष्णात आणि प्रामाणिक असा योद्धा असे गुण त्यांच्यात होते.
हंबीरराव यांना सेनापतीपद कसं मिळालं?
हंबीरराव यांच्या आधी नेताजी पालकर आणि प्रतापराव गुजर हे सेनापती होते. सेनापती प्रतापराव गुजर यांनी बहलोल खान यांचा पराभव केला पण त्यांना सोडून दिले. या घटनेनंतर शिवाजी महाराजांची प्रतापराव गुजरांवर खपामर्जी झाले. ते त्यांना म्हणाले, तुम्ही लष्कर घेऊन जावून बेहेलोलखान येतो यांसी गाठ घालून बुडवून फत्ते करणे नाहीतर तोंड न दाखविणे. शिवाजी महाराजांनी असे म्हटल्यानंतर अवघ्या सात जणांनी मिळून बेहलोल खानावर स्वारी केली.
त्यानंतर प्रतापराव गुजर यांनी बेहलोल खानास नेसरीच्या खिंडीत गाठले तिथे संघर्ष झाला आणि त्यात प्रतापराव गुजर यांना वीरमरण आले. याचे वर्णन कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात असे केले आहे. या घटनेनंतर स्वराज्यासाठी शहाणा, सबुरीचा आणि चौकस सेनापती असावा अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती.

फोटो स्रोत, Twitter/Sarsenapati
हंबीरराव मोहिते यांचे नाव हंसाजी मोहिते असे होते. ते शिवाजी महाराजांच्या सैन्यात जुमला होते. म्हणजेच शे-दीडशे सैनिकांची तुकडी असलेला अधिकारी.
कऱ्हाडजवळील तळबीड येथील शौर्याची परंपरा लाभलेल्या मोहिते घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. हंबीरराव हे महाराणी ताराराणींचे वडील होते.
सभासदाच्या बखरीत हंबीररावांचे वर्णन असे केले आहे, 'सरनौबतीस माणूस पाहाता हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्ये जुमला होता. बरा शहाणा, मर्दाना, सबुरीचा, चौकस शिपाई मोठा धारकरी पाहूस त्यास हंबीरराव नाव किताबती देऊन सरनौबती सांगितली.'
सभासद बखरीनुसार असं म्हटले आहे की त्यांना हंबीरराव ही पदवी देण्यात आली होती, तर जेधे शकावलीत हंबीरराव असा उल्लेख आहे.

फोटो स्रोत, Getty Images
महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांवर जो पोवाडा लिहिला आहे त्यात हंबीररावांचा उल्लेख आहे. महात्मा फुले लिहितात,
शिवाजीने हंसाजीला सरनौबत केला I मोन अधिकार दिला II हंबिरराव पद जोडले त्याच्या नावाला I शिवाजी मनीं सुखी झाला II
डॉ. सदाशिव शिवदे यांनी सेनापती हंबीरराव मोहिते हे चरित्र लिहिले आहे. शिवदे यांनी इतिहासावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत.
हंबीरराव मोहिते यांच्या चरित्रात त्यांनी निरीक्षण मांडले आहे की ज्याअर्थी शिवाजी महाराजांनी शे-दीडशे सैन्याच्या अधिकाऱ्याला सरसेनापती केले त्याअर्थी त्यांच्याकडून काही बहुमूल्य कामगिरी झाली असावी, त्यामुळे त्यांची नियुक्ती सेनापतीपदी झाली असावी असा अंदाज आहे.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर युवराज, पंतप्रधान आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांचा सन्मान झाला आणि त्यांच्याकडे सरनौबतपदाचे सर्व अधिकार सोपवण्यात आले असा उल्लेख आहे.
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत हंबीरराव हे माहुताच्या जागी होते आणि महाराजांच्या पाठीमागे मोरोपंत बसले होते. म्हणजे पंतप्रधानाच्या बरोबरीचे स्थान त्यांना स्वराज्यात होते.
औरंगाबादचा सुभेदार बहादूर खान याला दिली हूल
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी औरंगाबाद, सुरत, अहमदाबाद, बुऱ्हाणपूर या मोघलाई प्रदेशात स्वारीची योजना आखली होती. या मोहिमेत हंबीरराव देखील सोबत होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या गनिमी काव्याच्या पद्धतीने हूल दिली की बहादूरखानावर बहादूरगडावर हल्ला केला जाणार आहे. आणि त्याला चकमा देऊन त्याच्या दुसऱ्याच छावण्यांवर महाराजांनी अकस्मात हल्ला केला. या लुटीमुळे स्वराज्याच्या खजिन्यात 1 कोटी रुपयांची वाढ झाली होती.

फोटो स्रोत, OXFORD
स्वराज्याच्या खजिन्यात सातत्याने भर व्हावी यासाठी अनेक ठिकाणी मोहिमा केल्या होत्या. हंबीररावांनी वाई, दौलताबाद, लासूर या ठिकाणच्या बाजारपेठा लुटल्याचा उल्लेख आहे.
हंबीररावाच्या सैनिकांनी कापली हत्तींची सोंड
विजापूरकडे मियाना बंधू म्हणून सरदार होते. ते रयतेची लूटमार करत असत, त्यांच्यावर अन्याय करत असत. विजापुरातील लोकांनी शिवाजी महाराजांकडे त्यांची तक्रार केली. त्यांच्या बंदोबस्तासाठी शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहितेंना पाठवलं होतं. शिवदे लिखित हंबीरराव मोहितेंच्या चरित्रात त्यांनी एका फारसी पत्राच्या हवाल्याने या मोहिमेत काय झाले त्याची हकीकत दिली आहे.

फोटो स्रोत, Dr. Sadashiv Shivde
त्यात त्यांनी सांगितले की हंबीररावांचे सैन्य कमी होते आणि मियाणाचे सैन्य मात्र भरपूर होते. तरीसुद्धा मियाणाचा पराभव झाला. या फारसी साधनात असे म्हटले आहे की जशी वीज चमकल्यावर अंधार दूर होऊन पावसाची दुधासारखी पडणारी टपोरी धार नजरेस येते तसाच सैन्यात हलकल्लोळ झाला आणि खानाच्या लोकांनी हंबीररावांना रस्ता दिला. पुढे त्यात असं म्हटलं आहे की 'जसे वेणीचे केस दुभांग करून स्त्री वेणी घालते, तशा रीतीने हंबीररावाने हत्यार चालविताच फळी फुटोन दुभांग केले, शेकडो मनुष्य जातायेता मारले. खान नामोहरम होऊन पळाला.'
या मोहीमेचे सभासदाच्या बखरीतही वर्णन आहे. या मोहिमेत हुसेनखानाचे कित्येक लोक मारले गेले. घोडे आणि हत्ती सुद्धा मारले गेले. तसेच त्यांनी पठाणांचे दोन हजार घोडे आणि हत्ती मिळवले. आपल्या फौजेचा पराभव होत असलेला पाहून हुसेनखान हत्तीवरून पाठीमागे फिरला. हंबीरावांच्या सैनिकांमध्ये असलेल्या नागोजी जेधेंनी ते पाहिले आणि तलवारीने हत्तीची सोंड कापून हत्ती रणांगणाकडे वळवला. हे करताना नागोजींना शत्रूचा तीर लागला आणि या मोहीमेत ते धारातीर्थी पडले.
शिवाजी महाराजांचा मृत्यू आणि संभाजी महाराजांना खंबीर साथ
हंबीरराव मोहिते हे धोरणी आणि स्वराज्यनिष्ठ होते असं इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी बीबीसी मराठीला सांगितले. ते म्हणतात, "शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हंबीरराव मोहिते हे खंबीरपणे संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले. हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे बंधू आणि राजाराम यांचे मामा होते पण स्वराज्यात दुही नको म्हणून त्यांनी संभाजी महाराजांना साथ दिली. यावरूनच त्यांची शिवाजी महाराजांप्रती आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा दिसते.

फोटो स्रोत, Dr. kamal gokhale/continental publication
संभाजी महाराजांनी त्यांना पुन्हा सरनौबत केले म्हणजेच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांच्याही सैन्याचे नेतृत्व करण्याची संधी हंबीररावांना मिळाली होती.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी आपले अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. पुन्हा आपल्या खजिन्यात भर टाकण्याच्या हेतूने संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटण्याची योजना आखली. आणि या स्वारीचे नेतृत्व महाराजांनी सरसेनापती हंबीररावांकडे दिले.
बुऱ्हाणपूर ही मोठी बाजारपेठ होती. मराठ्यांनी बुऱ्हाणपूर आणि त्याच्या आजूबाजूला असलेली 17 पुरे लुटली. त्यातून त्यांनी लाखो रुपयांचा माल ताब्यात घेतला. बुऱ्हाणपूरला खानजहान हा सुभेदार होता. खानजहान औरंगाबादला आहे ही संधी साधून हंबीररावांनी मोहिम फत्ते केली होती. या मोहिमेचा परिणाम असा झाला की मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मीच तिकडे येत आहे असेच औरंगजेबाने कळवले होते. या मोहिमेनंतर खानजहानचे सुभेदारपद मात्र गेले.
मराठ्यांनी औरंगजेबास नामोहरम केले
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना नऊ वर्षं मुघलांशी संघर्ष करावा लागला. त्या नऊ वर्षांपैकी सात वर्षं हंबीररावांनी संभाजी महाराजांना साथ दिली.
बुऱ्हाणपूरच्या मराठ्यांच्या स्वारीनंतर औरंगजेबाने 1683 मध्ये हसन अलीखान बहादूरला 14 हजारांच्या फौजेसह तळकोकणात पाठवले. त्यांचा सामना हंबीररावांच्या फौजेशी झाला. कल्याण-भिवंडी परिसरात झालेल्या या संघर्षात हंबीररावांनी मोघलांना पाणी पाजले. शत्रूचा दाणागोटा बंद करून मराठ्यांनी त्यांना हैराण करून सोडले होते. मराठ्यांच्या गनिमी काव्यापुढे त्यांचा निभाव लागला नसल्याची इतिहासात नोंद आहे.
1682 हे वर्षं मराठ्यांसाठी अतिशय संघर्षाचे गेले. संभाजी महाराज नेतृत्वात हंबीररावांनी औरंगजेबाच्या फौजेला, लष्करी तळांना, बाजारपेठांना नामोहरम करून सोडले औरंगजेब संभाजी महाराजांवर इतका चिडला होता की संभाजीराजांना मारल्याशिवाय पगडी देखील घालणार नाही असं त्याने म्हटलं होतं. हा उल्लेख कारवारच्या इंग्रजांनी सुरतच्या इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात आढळतो असं डॉ. शिवदेंच्या पुस्तकात लिहिले आहे.
हंबीररावांचे इतिहासातील महत्त्व
हंबीरराव हे मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा असल्याचं इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार सांगतात. "दुर्दैवाने आपल्याकडे ऐतिसासिक साधनांचा अभाव आहे त्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण लोकांचे जीवन कसे होते ते समजत नाही. उपलब्ध असलेल्या साधनांवरून हंबीरराव मोहिते हे अत्यंत सबुरीचे आणि युद्धनीती पारंगत होते असे लक्षात येते."
"प्रतापराव गुजर यांच्यासारखे ते भावनेच्या आवेशात कधी आले नाही. तर प्रसंग पाहून ते लढत असत. शत्रूच्या हालचालींचा अभ्यास करून ते निर्णय घेत असत. त्यांचे निधन संभाजी महाराजांच्या आधी झाले. जर ते हयात असते तर त्यांच्या युद्धनीतीच्या बळावर त्यांनी औरंगजेबाला निकराचा लढा दिला असता यात काही संशय नाही. राजाराम महाराज हे त्यांचे भाचे होते पण स्वराज्यात दुही नको म्हणून ते संभाजी महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांनी स्वराज्यासाठी घेतलेल्या या निर्णयातूनच त्यांचं इतिहासातील महत्त्व अधोरेखित होतं." जयसिंगराव पवार पुढे सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








