सी. डी. देशमुख : स्वतंत्र भारताच्या पहिल्या नोटेवर सही करणारा महाराष्ट्राचा 'कंठमणी'

सी डी देशमुख, रोहा

फोटो स्रोत, Prathmesh Kherade, Roha

फोटो कॅप्शन, रोहा शहरात सी. डी. देशमुख यांचं भिंतीवर रेखाटलेलं शिल्प
    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आजची केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय प्रशासकीय सेवा (ICS) होय. या परीक्षेत सी. डी. देशमुख यांनी संबंध भारतात प्रथम क्रमांक मिळवला होता.

हे वर्ष होतं 1918. सी. डी. देशमुख ICS मध्ये पहिले आले होते, हे मोठं यश होतंच. मात्र, त्यानंतर जे घडलं, त्यात या माणसाच्या शेवटपर्यंतच्या कारकीर्दीची बिजं दिसतात.

ICS मध्ये प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या 22 वर्षीय चिंतामण द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली आणि सांगितलं की, "सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मला देशसेवा करायची आहे."

त्यावेळी टिळकांनी देशमुखांना सांगितलं, "तुमच्या हृदयात देशाची उर्मी आहे ना? मग ती सारखी उचंबळत ठेवा. ती जागृत ठेवून तुम्ही सरकारची नोकरी करा. राज्यकारभाराचा तुमचा अनुभव स्वराज्यात फार उपयोगी पडेल. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुमच्या आयुष्यात एक दिवस असा उगवेल, की ज्या दिवशी तुमच्या हृदयातील देशसेवेची ही उर्मी आपोआप प्रकट होईल."

सी. डी. देशमुख यांची शेवटपर्यंतची म्हणजे 1982 पर्यंतची कारकीर्द पाहिल्यास टिळकांच्या शब्द नि शब्दाला ते जागल्याचाच प्रत्यय येतो.

शासकीय आणि प्रशासकीय पदांची सी. डी. देशमुख यांच्या आयुष्यात कधीच वानवा नव्हती. 1969 साली राष्ट्रपतीपदाची निवडणूक ते पराभूत झाले. हे एक पद वगळता, सी. डी. देशमुखांनी अपयश पाहिलं नाही. आपल्या ज्ञानाच्या जोरावर ते केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आणि पुढे केंद्रीय अर्थमंत्रीच झाले नाहीत, तर त्याच अर्थमंत्रिपदाचा आपल्या प्रांतासाठी राजीनामा देण्याचं धाडसही त्यांना याच ज्ञानातून आल्याचं नमूद केल्यास वावगं ठरू नये.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

इतकी पदं मिळाली, शासकीय-प्रशासकीय मिळालीच, सोबत अनेक संस्था-विद्यापीठांनी मानद सन्मान दिले ते वेगळेच. मात्र, यातले दोन सन्मान त्यांच्या प्रवासाच्या दोन टप्प्यांचे योग्य वर्णन करणारे दिसतात.

एका प्रसंगी पंडीत जवाहरलाल नेहरू आणि सी. डी. देशमुख सोबत होते. समोर ब्रिटीश उच्चायुक्त होते. त्यावेळी सी. डी. देशमुखांची ओळख करून देताना नेहरू म्हणाले, 'India's most charming minister'.

पंडीत नेहरू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंडीत जवाहरलाल नेहरू

दुसरी एक ओळख म्हणजे, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन ऐन भरात असताना मुंबई केंद्रशासित करण्याची कल्पना पुढे आली. या गोष्टीला विरोध करत सी. डी. देशमुखांनी राजीनामा दिला. त्यानंतर आचार्य अत्रे यांनी म्हटलं होतं, "चिंतामण महाराष्ट्राचा 'कंठमणी' झाला"

शासन-प्रशासनातील कामांबाबत नेहरूंनी काढलेले गौरवोद्गार आणि भूमिकेसाठी पदाची चिंता न केल्याबाबत आचार्य अत्रेंनी काढलेले गौरवोद्गार सी. डी. देशमुख यांची भारताच्या आर्थिक-सामाजिक-राजकीय पटलावरील स्वतंत्र ओळख करून देतात.

'कुलाब्यातील रोहा' ते 'लंडनमधील रोहा'

शिक्षणातील त्यांची गुणवत्ता ही लहानपणापासूनच दिसते. त्यासाठी 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात थोडं डोकावावं लागेल.

14 जानेवारी 1886 रोजी कुलाबा जिल्ह्यातील (आताचा रायगड जिल्हा) महाडजवळील नाते या गावी द्वारकानाथ आणि भगिरथी या दाम्पत्याच्या पोटी चिंतामण यांचा जन्म झाला. मुलीचं पहिलं बाळंतपण माहेरी करण्याची प्रथा होती. त्यामुळे भगिरथीबाई नाते गावी गेल्या होत्या. अन्यथा, देशमुख कुटुंबीय मूळचे रोहा तालुक्यातले.

महाड, तळा अशा ठिकाणी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर या भागात त्यावेळी हायस्कूल नसल्यानं रोह्यातच खासगी शिकवणी सुरू लावली. मग पुढील शिक्षणासाठी त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं.

घरात आर्थिक परिस्थिती बरी होती. त्यांचं कुटुंब वतनदार देशमुख होतं. वडील द्वारकानाथ गणेश देशमुख हे वकील होते.

1912 साली मुंबईत विद्यापीठात मॅट्रिक परीक्षेत ते विद्यापीठात पहिले आले. एवढंच नव्हे, तर संस्कृत भाषेतील पहिली जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्तीही त्यांनी मिळवली. सी. डी. देशमुख यांच्या या कर्तृत्त्वाकडे पाहून, प्रसिद्ध कवी आणि नाटककार राम गणेश गडकरी यांनी 'आनंद वर्धापन' नावाची कविता सी. डी. देशमुखांवर लिहिली. पुढे 'वाग्वैजयंती' या संग्रहात ती प्रसिद्धही झाली.

सी डी देशमुख, रोहा

फोटो स्रोत, Yogesh Bhagwat, Mahad

फोटो कॅप्शन, सी. डी. देशमुख यांचं नाते या गावी या घरात जन्म झाला...

1915 साली ते केम्ब्रिजमध्ये शिकण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथं त्यांनी नॅचरल सायन्सेस विथ बोटनी, केमेस्ट्री अँड जिओलॉजी या विषयात प्रथम क्रमांक पटकावत पदवी घेतली. विशेष म्हणजे या तीनही विषयात त्यांनी 'फ्रँक स्मार्ट प्राईज' मिळवला.

1918 साली लंडनमधूनच त्यांनी ICS ची परीक्षा दिली आणि संपूर्ण भारतात ते प्रथम आले. या परीक्षेतील यशामुळे ते वयाच्या 22 व्या वर्षीच महाराष्ट्रासह भारताला 'सीडी' नावानं परिचित झाले.

इथं एक विशेष गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे, ज्या रोहा गावाशी (आताचा तालुका) त्यांचं बालपण जोडलेलं होतं, त्या गावाच्या प्रेमापोटी पुढे जेव्हा 50 च्या दशकात सी. डी. देशमुख इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याच्या बेतानं गेले होते. तेव्हा लंडनमधील आपल्या बंगल्याला त्यांनी 'रोहा' हे नाव दिलं होतं.

रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर

सी. डी. देशमुखांची प्रशासकीय कारकीर्द जवळपास 21 वर्षीची होती. मध्य प्रांतात त्यांनी महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली. या पदांवर काम करणारे ते सर्वात तरुण ICS होते.

या कार्यकाळात सी. डी. देशमुख यांना काही महत्त्वाच्या क्षणांचे साक्षीदार होता आले. 1931 साली महात्मा गांधीजींनी सहभाग घेतलेल्या लंडनमधील गोलमेज परिषदेचं काम सी. डी. देशमुखांनी सचिव या नात्यानं केलं होतं.

पुढे 1939 च्या जुलैमध्ये सी. डी. देशमुखांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली. नंतर अवघ्या तीनच महिन्यात त्यांची बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली.

दोनच वर्षात म्हणजे 1941 साली मणिलाल नानावटी यांच्या जागी सी. डी. देशमुख रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर झाले.

सी डी देशमुख, रोहा

फोटो स्रोत, Yogesh Bhagwat, Mahad

1943 साली जेम्स टेलर यांचं निधन झालं. सी. डी. देशमुख यांनी रिझर्व्ह बँकेत पाऊल ठेवलं तेव्हा हे जेम्स टेलर गव्हर्नर होते. जेम्स टेलर यांच्या निधनानंतर रिझर्व्ह बँकेला पहिला भारतीय गव्हर्नर लाभला, तो सी. डी. देशमुखांच्या रुपानं.

11 ऑगस्ट 1943 रोजी सी. डी. देशमुख यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारला. त्याच्या पुढच्याच वर्षी सीडींना भारताच्या व्हॉईसरॉयमार्फत 'नाईटहूड' (Knighthood) बहुमान देण्यात आला. 'सर' संबोधनाला पात्र ठरवणारा हा सन्मान.

आर्थिक इतिहासाचे अभ्यासक राहुल बजोरिया हे 'लोकसत्ता'मधील लेखात म्हणतात, "आरबीआयची स्थापना 1935 सालची. म्हणजे, सी. डी. देशमुख गव्हर्नर झाले तेव्हा या संस्थेचं वय होतं केवळ आठ वर्षे. वाढत्या वयातील ही संस्था अपरिपक्व राहू नये म्हणून सीडींनी मोठं काम केलं."

"याच काळात दुसऱ्या महायुद्धाचे चटके अर्थव्यवस्थेला बसत होते, युद्धोत्तर मंदीमुळे भारतीय मालाची मागणी घटत होती, परिणामी परकीय चलनावर परिणाम होण्याची शक्यता होती. अशा काळात सी. डी. देशमुखांच्या नेतृत्त्वाने अर्थव्यवस्थेला वाचवले," असं बजोरिया म्हणतात.

सी डी देशमुख, रोहा

फोटो स्रोत, Prathmesh Kherade, Roha

ब्रिटिशांसह वसाहतवादाविरुद्ध लढणाऱ्या काँग्रेस नेत्यांशीही सीडींचे चांगले संबंध होते. भारतीय स्वातंत्र्याच्या सत्तांतराच्या तकाळात संक्रमणकालीन सरकार म्हणून व्हाइसरॉयज काऊन्सिलमध्ये वित्तप्रमुख म्हणून सीडींची नेमणूक केली गेली. हे पद अर्थमंत्रिपदाच्या स्तराचे होते. मात्र, सीडींनी आरबीआयमध्येच राहण्याचे ठरवले. मग ते पद लियाकत अली खान यांच्याकडे गेले, जे पुढे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले.

रिझर्व्ह बँकेतली सी. डी. देशमुखांची कारकीर्द 10 वर्षी होती. 1939 साली ते आरबीआयमध्ये आले आणि 30 जून 1949 रोजी त्यांनी राजीनामा दिला.

पहिल्या पत्नीचं निधन, दुसरं लग्न....

रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झाल्यानंतर सी. डी. देशमुखांनी लंडनमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत होते. याचं कारण आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 1920 साली त्यांनी लंडनमध्ये रोझिना यांच्याशी विवाह केला होता.

सीडींच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाई देशमुख लिहितात, रोझिना ही अतिशय देखणी, दयाळू, प्रेमळ, आल्या-गेल्याचे उत्तम स्वागत करणारी व पतिपरायण अशी एक सुंदर तरुणी होती.

त्यांना 1922 साली मुलगीही झाली होती. 'प्रिमरोज' असं तिचं नाव ठेवण्यात आलं होतं. सीडी मध्य प्रांताचे गव्हर्नर असताना अमरावतीमध्ये तिचा जन्म झाला होता.

1949 मध्ये आरबीआयधून निवृत्तीनंतर ते रोझिना आणि प्रिमरोजसोबत लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या बेतात असतानाच, नेहरूंनी त्यांना पुन्हा आरबीआयची धुरा हाती घेण्याची विनंती केली. देश स्वातंत्र्य झाला होता आणि त्यासाठी आपली गरज असल्याचं ओळखून सीडींना नेहरूंची विनंती टाळता आली नाही.

1949 सालीच रोझिना यांचं निधन झालं. पत्नीच्या शेवटच्या काळात सीडी तिथं पोहोचू शकले नाहीत. नंतर मुलगी प्रिमरोजसोबत राहावं असंही त्यांना वाटलं. पण तेही शक्य झालं नाही. मुलीला दर महिन्याला विशिष्ट रक्कम मिळेल, या हेतूनं लंडनमधील बँकेत त्यांनी ठेवल्याची आठवण दुर्गाबाई देशमुख यांनी लिहून ठेवलीय.

सी डी देशमुख, रोहा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गांधीजींच्या बाजूला उभ्या असलेल्या दुर्गाबाई देशमुख (1934 सालचा फोटो)

पुढे 22 जानेवारी 1953 रोजी सी. डी. देशमुखांनी दुर्गाबाई देशमुख यांच्याशी विवाह केला. दुर्गाबाई आणि चिंतामणराव तेव्हा दोघेही नियोजन आयोगात सदस्य होते. सीडी तर त्यावेळी भारताचे अर्थमंत्रीच होते. या नात्यानं ते आयोगात होते.

विशेष म्हणजे, भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनीच या नवदाम्पत्याचे पहिले साक्षीदार म्हणून सही केली. इतर दोन सह्या सुचेता कृपलानी आणि दुर्गाबाईंचे बंधू नारायणराव यांनी केले. विजयालक्ष्मी पंडीत आणि इंदिरा गांधीही याप्रसंगी उपस्थित होत्या.

नियोजन आयोगात पती-पत्नी एकदाच नको असा विचार करून दुर्गाबाईंनी पदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं, तेव्हा नेहरूंनी उत्तर दिलं, "चिंतामणरावांनी नियोजन आयोगावर तुमची नेमणूक केलेली नाही."

दुर्गाबाई देशमुख या सीडींइतक्याच कर्तृत्त्वानं मोठ्या होत्या. आंध्र महिला सभेची त्यांनी केलेली स्थापना अत्यंत महत्त्वाचं कार्य मानलं जातं. त्यांच्यासोबत विवाहानंतर सीडींनी त्यांचे अनेक निर्णय दुर्गाबाईंशी चर्चेअंतीच घेतले. एकानं पूर्णवेळ काम करायचं आणि एकानं देशसेवा करायची, असं ठरवून दोघांनी देशकार्यात वाटा उचलला होता.

मुंबईसाठी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा

1952 साली सी. डी. देशमुखांनी कुलाबा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलेही. शेकापतर्फे भाऊसाहेब राऊत यांनी त्यांना आव्हान दिलं होतं. मात्र, या निवडणुकीपूर्वीच नेहरूंनी सीडींना मंत्रिमंडळात घेतलं होतं आणि अर्थमंत्रिपदी नियुक्त केलं होतं. मात्र, मंत्रिमंडळात सर्व लोकनियुक्त मंत्री असावेत, असा नेहरूंचा आग्रह होता आणि त्यासाठी त्यांनी सीडींना निवडणूक लढण्यास सांगितलं.

सीडी हे काँग्रेसचे सदस्य नव्हते. स्वतंत्र लढण्यास ते इच्छुक होते. मात्र, तसे झाल्यास काँग्रेस कार्यकर्ते उघडपणे समर्थन करण्याची शक्यता नसल्याचं नेहरूंनी सांगितलं. मात्र, तरीही ते ठाम राहिले, लढले आणि जिंकले. काँग्रेसपुरस्कृत उमेदवार हा प्रचार मात्र त्यावेळी त्यांच्या मदतीला आला.

सी डी देशमुख, रोहा

फोटो स्रोत, Yogesh Bhagwat, Mahad

फोटो कॅप्शन, सी. डी. देशमुख यांचं नाते (महाड) येथील घर अत्यंत वाईट अवस्थेत उभं आहे...

याचा पुढे त्यांना फायदाही झाला. जेव्हा अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली, तेव्हा पंतप्रधानांव्यतिरिक्त कुणाला स्पष्टीकरण देण्याचं बंधन त्यांच्यावर राहिलं नाही. काँग्रेस पक्षाशी जोडले नसल्यानं त्यांच्याकडे कुठलेच स्पष्टीकरण मागण्यात आले नाही.

भाषावार प्रांतरचनेच्या मुद्द्यावरून सीडी नाराज झाले, पुढे त्याचं पर्यावसन राजीनाम्यात झालं. याबाबत त्यांनी नेहरू मेमोरियलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली होती.

मुंबई शहराला स्वतंत्र दर्जा देण्याची कल्पना त्यांना पटली नाही. तसंच, मुंबईमध्ये शासनानं केलेल्या गोळीबाराची चौकशी करण्यास नकार देणं हे लोकशाहीच्या विरोधातील कृत्य आहे, अस म्हणत सी. डी. देशमुखांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

बागकाम ते 'मेघदूत'चं भाषांतर

अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी तातडीनं सी. डी. देशमुखांना विद्यापीठ अनुदान आयोगात (यूजीसी) येण्याची विनंती केली. आझाद हे तेव्हा भारताचे शिक्षणमंत्री होते. त्यांची विनंती सीडींनी स्वीकारली आणि ते यूजीसीचे पहिले अध्यक्ष बनले.

अर्थमंत्रिपदाच्या काळातही त्यांनी अनेक संस्थात्मक कामं केली. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीची स्थापना असो किंवा नवीन कंपनी कायदा लागू करणं असो.

अर्थमंत्रिपदावरून बाजूला झाल्यानंतरही अनेक संस्थांना त्यांनी बळ दिलं. भारतीय सांख्यिकी संस्थेचे अध्यक्ष, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष यांसह बऱ्याच संस्थांमध्ये पदं भूषवली.

दिल्लीस्थित इंडिया इंटरनॅशनल सेंटरची संकल्पना, उभारणी ही सीडींचीच. आजही तिथं सीडींच्या नावाचे सभागृह आहे, मेमोरियल लेक्चर्सचं आयोजन केलं जातं.

सी डी देशमुख, रोहा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बंकिंगहॅम पॅलेस (लंडन) येथे 1952 साली सी. डी. देशमुख...

त्यांच्या या कार्यासाठी भारत सरकारनं त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कारानं गौरवलं. दुर्गाबाई देशमुख यांनाही त्यांच्या कार्यामुळे 'पद्मभूषण' पुरस्कार मिळाला आहे. आशियाचा नोबेल मानलं जाणाऱ्या रेमन मॅगसेसे पुरस्कारानेही सीडींना गौरवण्यात आलं आहे.

संस्थात्मक कार्यासह त्यांनी साहित्य, कला, निसर्ग या प्रांतातही सहज मुशाफिरी केली.

सी. डी. देशमुख हे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत यांसह सात ते आठ भाषांमध्ये पारंगत होते. संस्कृतमधील मेघतूचं मराठीत भाषांतर त्यांनी केलं. 'माय कोर्स ऑफ लाईफ' या आत्मरचरित्रातून आपला जीवनपट त्यांनी मांडला.

बागकाम हे त्यांचं आवडतं काम होतं. पुणे असो, दिल्ली असो वा लंडन, इथल्या त्यांच्या निवासस्थानी झाडांची निगा त्यांना वेळ असला की ते स्वत: राखत.

इथं पुन्हा नमूद करायला हवं, सीडी हे भारतासह जगाच्या आर्थिक विश्वातील नावाजलेले व्यक्ती असले तरी त्यांचं शिक्षण हे नॅचरल सायन्सेस विथ बोटनी, केमेस्ट्री अँड जिओलॉजी या विषयात झालं होतं. सीडींचं निसर्गाप्रती असलेलं प्रेम केवळ या शिक्षणातच नाही, तर आत्मचरित्रात त्यांनी लिहिल्याप्रमाणे आहे. आपलं गाव असलेल्या रोह्याचं निसर्गवर्णन अगदी ठेवणीतल्य शब्दांमध्ये केलंय. निसर्गाची ओढ दाखवणारे ते शब्द आहेत.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि शेवटचा काळ

सी. डी. देशमुख यांची स्वंतत्र पार्टीशी झालेली जवळीक अनेकांना आश्चर्यचकीत करते.

पण याबाबत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अजित रानडे लिहितात, देशमुख यांच्या विचारांतील समाजवादी प्रेरणांचे मूळ हे त्या काळात त्यांनी पाहिलेल्या प्रच्छन्न दारिद्र्याच्या प्रभावात होते. पण यातून ते मुक्त आर्थिक धोरणांचे विरोधक होते, असा निष्कर्ष कुणी काढू नये.

1960 च्या दशकात ते स्वतंत्र पार्टीच्या जवळ गेल्याची नोंद सापडते. पुढे 1969 साली स्वतंत्र पार्टीने त्यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारीही दिली. मात्र, त्यात ते पराभूत झाले. यश न मिळालेलं त्यांच्या आयुष्यातील हे एकमेव पद मानायला हवे.

सी डी देशमुख, रोहा

फोटो स्रोत, Yogesh Bhagwat, Mahad

फोटो कॅप्शन, सी. डी. देशमुख यांच्या जन्मस्थळाकडे दुर्लक्षच...

राहुल बजोरिया त्यांच्या लेखात 'केनेशियन अर्थव्यवस्था' या संकल्पनेचे प्रणेते सर जॉन मेनार्ड केन्स यांच्या एका विधानाचा उल्लेख करतात. सी. डी. देशमुखांना उद्देशून केन्स म्हणाले होते, "तुमच्या देशावर दीर्घकाळ प्रभाव पाडणारे काम तुम्ही कराल, अशी आशा मला आहे..."

आज सी. डी. देशमुखांचा जीवनपट पाहताना, केन्स या जागतिक स्तरावरील नावाजलेल्या अर्थतज्ज्ञाचं विधान किती दूरदृष्टी आणि अचूक होते, हे सहज लक्षात येतं.

...आणि आजच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 1982 रोजी महाराष्ट्राच्या 'कंठमणी'चं हैदराबादेत निधन झालं. दुर्दैव असं की, त्यांना शासकीय मानवंदनाही देण्यात आली नाही. डॉ. न. गो. राजूरकर हे या घटनेचं वर्णन करताना म्हणतात, 'मावळत्या दिनकराला अर्ध्य न देण्याची दुर्दैवी परंपरा त्या दिवशीही पाळली गेली होती!'

आणखी दुर्दैव असं की, त्यांचं मूळ गाव असलेल्या नाते (आताच्या महाड तालुक्यात) इथं साधं स्मारकही बनवण्यात आलं नाही. जन्मस्थळ जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, सीडींच्या स्पर्शाचा हा सोनेरी ठेवा, कुणाला जपावा वाटत नाही, हे महाराष्ट्रासह भारताला शरम आणणारी बाब आहे, असं म्हटल्यास अतिशोयक्ती ठरू नये.

संदर्भ :-

  • महाराष्ट्राचा कंठमणी - श्रीनिवास वेदक
  • महाराष्ट्राचा चिंतामणी (लोकसत्ता विशेषांक)
  • ग्रेट अॅडमिनिस्ट्रेटर्स ऑफ इंडिया - एम. एल. अहुजा
  • विसाव्या शतकातील महाराष्ट्र (खंड सहावा) - य. दि. फडके

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)