दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे 7 किस्से माहिती आहेत?

दादा कोंडके, बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

अभिनेते दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात घट्ट मैत्री होती, हे सर्वांनाच ठाऊक आहे.

मात्र, तुम्हाला माहीत आहे का, बाळासाहेब आणि दादांची पहिली भेट कधी झाली? शिवसेनेच्या कुठल्या नेत्याला दादा कोंडकेंनी सिनेमात रोल दिला होता? किंवा 1995 साली शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्यानंतर सेनेसाठी प्रचार करणारे दादा शिवसेनेच्याच मंत्र्यांवर का नाराज झाले?

हे आणि असे अनेक किस्से अनिता पाध्ये लिखित 'एकटा जीव' या पुस्तकात आहेत. त्यातलेच काही किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1) 'बाळासाहेबांमुळे 'सोंगाड्या' मुंबईत 37 आठवडे चालला'

1971 साली दादा कोंडकेंचा 'सोंगाड्या' चित्रिकरण होऊन पूर्ण झाला. दादांनी निर्मिती केलेला हा पहिला सिनेमा. दादांच्या कारकीर्दीतल्या सुपर-डुपर हिट ठरलेल्या पुढल्या सर्व सिनेमांची बोहणी 'सोंगाड्या'नंच झाली. मात्र, 'सोंगाड्या'दरम्यान दादांना अनेक अडचणींनाही सामोरं जावं लागलं.

'सोंगाड्या' प्रदर्शनासाठी तयार झाला, मात्र त्याला थिएटरच मिळेना. शेवटी पुण्यात प्रदर्शित करण्यात आला. पुण्यात तब्बल 25 आठवडे चालला. मात्र, दादांना 'सोंगाड्या' मुंबईतही प्रदर्शित करायचा होता.

दादा कोंडके

फोटो स्रोत, Anita Padhye

फोटो कॅप्शन, अनिता पाध्ये लिखित 'एकटा जीव' पुस्तकाचे मुखपृष्ठ

त्या काळात मुंबईतल्या 'कोहिनूर' थिएटरमध्ये मराठी सिनेमे लागत नसत. कपूर नामक पंजाबी मालक होता. पण दादांनी कसंतरी करून 40 हजार रूपये भरून चार आठवड्यांचा करार केलाच.

पण दोन आठवडे होताच, देव आनंद यांचा 'तेरे मेरे सपने' प्रदर्शित झाला आणि कोहिनूरच्या मालकानं म्हणजे कपूरनं दादांचा 'सोंगाड्या' उतरवला. दादा त्याच्याशी भांडले. मात्र, काहीच उपयोग झाला नाही.

शेवटी दादांनी वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक अशा सगळ्यांची दारं ठोठावली. पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी ते बाळासाहेब ठाकरेंकडे गेले.

बाळासाहेबांनी तोपर्यंत दादांचं 'विच्छा माझी पुरी करा'चे काही प्रयोग पाहिले होते. त्यामुळे तोंडओळख होतीच.

दादांनी कपूरची तक्रार बाळासाहेबांकडे केली. मग बाळासाहेबांनी कपूरला फोन केला, तर समोरून कपूर म्हणाला, 'कौन बालासाहेब, मैं नहीं जानता, और देखो मालिक मैं हूं, जो करना है वो कर लो'.

कपूरच्या या उद्धट उत्तरवावर बाळासाहेब म्हणाले, 'अगर हम कुछ करेंगे तो बहोत भारी पडेगा' आणि बाळासाहेबांनी त्याच रात्री 9 वाजता शिवसैनिकांसह 'कोहिनूर' गाठलं. तेव्हा थिएटरमध्ये कपूर नव्हता. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना पाठवून कपूरला उचलून आणायला सांगितलं.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

बाळासाहेब कपूरला म्हणाले, "देखो कपूर, आज के बाद पिक्चर जितने चलेगी, आप थिएटर में नहीं आएंगे "

त्यानंतर 'कोहिनूर'मध्ये 'सोंगाड्या' तब्बल 37 आठवडे हाऊसफुल्ल चालला.

बाळासाहेबांना कपूर इतका घाबरला होता की, दादा कोंडकेंनी अनिता पाध्ये यांना आठवणी सांगताना म्हटलं होतं की, "नंतर कपूर नेहमी मला फोन करून विचारायचा, आपकी कोई फिल्म आने वाली है क्या?"

तर अशी झाली बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची पहिली भेट. त्याआधीही झाल्या भेटी. पण 'सोंगाड्या'नं घडवून आणलेल्या भेटीनं दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे दादा कोंडके हयात असेपर्यंत कायम राहिली.

2) रात्री 11.30 वाजता दादा कोंडके 'मातोश्री'वर का गेले होते?

सिनेमाच्या निमित्तानं जुळलेली मैत्री पुढे रक्ताच्या नात्यातली माणसं असावी तशी फुलली. केवळ बाळासाहेब ठाकरेच नव्हे, तर मीनाताई ठाकरे यांच्याशी दादांची चांगली मैत्री जमली.

अनिता पाध्येंनी शब्दांकन केलेल्या 'एकटा जीव'मध्ये दादांनी सांगितलंय की, "बाळासाहेब कधी कुठल्यातरी कारणांवरून संतापलेले असले की, रात्री अकरा-साडेअकराला सुद्धा मीनाताई मला फोन करायच्या. साहेब चिडलेत, तुम्ही घरी या, असं त्या सांगायच्या."

मग दादा कोंडके बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन इकडच्या-तिकडच्या गप्पा मारून बाळासाहेबांना बोलते करायचे. कधी एखादा अस्सल 'कोंडके स्टाईल' विनोद सांगायचे. मग दोघेही मध्यरात्र होईपर्यंत हसत बसायचे.

दादांशी बोलल्यानं संतापलेले बाळासाहेब नॉर्मल व्हायचे.

दादा कोंडके

फोटो स्रोत, Anita Padhye/Ekta Jeev

फोटो कॅप्शन, अनिता पाध्ये लिखित 'एकटा जीव' पुस्तकातील फोटो

दादांनी त्यांचा कुठलाही सिनेमा बाळासाहेबांना दाखवल्याशिवाय सेन्सॉरला पाठवला नाही. ट्रायल बघितली की बाळासाहेब सांगायचे, कुठल्या सीनला कट मिळेल. हे बिनचूक होत असे. पण एकदा बाळासाहेबांचाही अंदाज चुकला. तो सिनेमा म्हणजे 'वाजवू का'.

एकही कट मिळणार नसल्याचं बाळासाहेबांनी सांगितलं आणि सिनेमाला तब्बल 18 कट मिळाले.

3) शिवसेना नेते प्रमोद नवलकरांना दादांनी 'इन्स्पेक्टर' केलं

सिनेमे करत असताना दादा कोंडके बाळासाहेब आणि शिवसेनेसोबतची जवळीक सोडली नाही. अगदी शिवसेनेच्या बैठकांनाही दादा कोंडके उपस्थित राहत असे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची उठबस असे.

शिवसेनेचे तत्कालीन ज्येष्ठ नेते आणि नंतर युती काळात मंत्री झालेले प्रमोद नवलकर यांना सिनेमात काम करण्याची प्रचंड ओढ होती.

"दादा, मला चांगली मोठी भूमिका करायची आहे. तुमच्या चित्रपटात मला संधी द्या," अशी विनंती शिवसेनेच्या बैठकीला भेटल्यावर नवलकर दादांना करायचे.

दादा म्हणतात, दीनानाथ टाकळकर, शरद तळवळकर यांसारखे मुरलेले कलाकार जोडीला असताना नवलकरांना मोठा रोल कुठला द्यायचा, हा प्रश्नच होता माझ्यासमोर.

पण दादांचा हा प्रश्न त्यांच्याच 'ह्योच नवरा पाहिजे'नं सोडवला. या सिनेमात दादांनी प्रमोद नवलकरांना इन्स्पेक्टरचा रोल दिला.

प्रमोद नवलकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेना नेते प्रमोद नवलकर

प्रमोद नवलकरांनी एवढ्या उत्साहानं या सिनेमात काम केलं की, भूमिकेसाठी लागणारे पोलिसाचे कपडेही त्यांनी स्वत:च शिवून आणले होते. पोलिसांचा बेल्ट मात्र त्यांना कुठे मिळाला नाही. मग तो दादांनी त्यांच्या सिनेमाच्या कपड्यांमधून दिला.

मुद्दा असा की, दादा कोंडके केवळ बाळासाहेबांशीच संबंधित नव्हते, तर शिवसेना आणि शिवसेनेतील नेते-कार्यकर्ते यांच्याशी सुद्धा कौटुंबिक नाते जपून होते.

4) बाळासाहेबांनी दादांना विचारलं, कुठलं मंत्रिपद हवंय?

दादा कोंडकेंनी शिवसेनेचा महाराष्ट्रभर प्रचार केला. पण दादा म्हणतात त्याप्रमाणे, त्यांनी पक्षाचा प्रचार केला. मात्र राजकारणात सक्रीय सहभागी ते कधीच झाले नाहीत. 'माणसाला पैशांचा किंवा सत्तेचा हव्यास असला की तो राजकारणात येतो' असं दादांना वाटे.

पण राजकारणातल्या पदांची संधी कधीच चालून आल्या नाहीत असे नाही. 1995 साली शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता येणार हे पक्कं झाल्यावर बाळासाहेबांनी मंत्रिमंडळ नेमण्यासाठी 'मातोश्री'वर बैठक बोलावली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक असे शिवसेनेचे सर्व बडे नेते हजर होते. त्या बैठकीला दादांनाही बोलावण्यात आलं होतं.

त्या बैठकीत बाळासाहेबांनी विचारलं, "दादा, कुठलं मंत्रिपद हवं."

दादांना वाटलं बाळासाहेब टिंगल करतायेत. कारण त्याआधीही त्यांनी दादांना बऱ्याचदा म्हटलं होतं की, मुख्यमंत्री होणार का?

पण बाळासाहेब गंभीर होते. त्यांनी पुन्हा विचारलं, "दादा, कुठलं मंत्रिपद हवंय?"

दादा कोंडके

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1995 साली युतीचं सरकार आल्यानतंर मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले...

त्यावर दादा म्हणाले, "साहेब, तुम्ही कुठलं पद घेणार?"

बाळासाहेब म्हणाले, "मी सेनाप्रमुखच राहणार."

त्यावर दादा म्हणाले, "जर तुम्ही सेनाप्रमुख राहणार आहात, तर मग मग माझा शिवसैनिक राहण्याचा हक्का तुम्ही का हिरावून घेता? मीही फक्त शिवसैनिकच राहणार."

पण बाळासाहेब दादांना मंत्री करण्याबाबत इतके गंभीर होते की, त्यांनी पुन्हा विचारलं. दादांनी पुन्हा नम्रपणे नकार दिला.

मंत्रिपदासाठी दिवसागणिक पक्ष बदलण्याच्या काळात हा प्रसंग अविश्वसनीयच वाटावा.

5) शिवसेनेच्या बैठकांना जाणं का थांबवलं दादांनी?

शिवसेनेचा दसरा मेळावा असो वा प्रचारसभा दादा कोंडके आवर्जून हजर राहत, भाषण करत. मात्र, नंतर नंतर ते अनुपस्थित राहू लागले.

दसरा मेळाव्याबाबत त्यांनी सांगितलेला प्रसंग म्हटलं तर विनोदी, म्हटलं तर दादांची पुढची भूमिका सांगणारा आहे.

दादा कोंडके

फोटो स्रोत, Anita Padhye

फोटो कॅप्शन, अनिता पाध्ये लिखित 'एकटा जीव' पुस्तकाचे मुखपृष्ठ

दादा म्हणतात, "सुरुवातील शिवाजी पार्कात दसऱ्याला शिवसेनेची सभा असताना जायचो. नंतर नंतर भाषणासाठी मला 10-15 मिनिटंच दिली जात. मग तेवढ्यात काय बोलणार, म्हणून जाणं बंद केलं. त्यात स्टेजवर जाताना चपला काढून जावं लागे आणि त्यामुळे चपलाच चोरीला जात. मग मी जाणंच बंद केलं."

पण 'एकटा जीव'मध्ये दादांनी शिवसेनेच्या नेत्यांबाबत तक्रारही नोंदवलीय.

'दादा बोलले की, लोक हसतात आणि मग गडबड होते, दादा फार अश्लील बोलतात' असं म्हणत शिवसेनेतल्याच काही माणसांनी बाळासाहेबांचे कान भरले. पण दादा सांगतात, बाळासाहेब कधीच याबाबत त्यांना काही बोलले नाही.

शिवसेनेचा एखादा नेता किंवा मंत्र्याच्या भाषणापेक्षा दादांच्याच भाषणाची लोकांना उत्सुकता वाटायची. हे शिवसेनेच्या काही नेत्यांना आवडत नव्हतं. त्यामुळेच बैठकांना बोलावणंही बंद केल्याचं दादा नमूद करतात.

6) युती सरकारच्या काळात दादा नाराज का झाले होते?

बैठकांना बोलावण्याचं बंद केल्याबाबत दादा खंत व्यक्त केलीय. ते म्हणतात, "ज्या शिवसेनेसाठी मी उभ्या-आडव्या महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या, उन्हातान्हाची पर्वा न करता शिवसेना नेत्यांचा प्रचार केला, त्यांच्याच राज्यात मला अशी वागणूक मिळत आहे, याचं वाईट वाटतं."

दादांना हे अनुभव आले, तेव्हा राज्यात युतीचं सरकार होतं.

दादा कोंडके

फोटो स्रोत, Getty Images

यश मिळाल्यावर एखाद्या व्यक्तीने जवळच्या माणसांना विसरावं तसंच माझ्या बाबतीत सेनेचे मंत्री वागत होते, असं दादांनी म्हटलंय.

त्याचवेळी दादांनी हेही नमूद केलंय की, शिवसेनेची सत्ता आली ती बाळासाहेबांमुळे. मंत्रिमंडळाचा गैरसमज आहे की, त्यांच्यामुळे सेनेला सत्ता मिळाली.

एकूणच दादांची मैत्री बाळासाहेबांशी होती. ते बाळासाहेबांखातरच शिवसेनेचं काम करत. बाळासाहेबांसोबतची मैत्री मात्र अखेरपर्यंत टिकली.

7) दादा कोंडकेंना शेवटचं पाहताना बाळासाहेब झालेले भावुक

दादांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह दादरच्या रमा निवासमध्ये आणण्यात आलं. त्यावेळी 'एकटा जीव'च्या लेखिका अनिता पाध्येही तिथे होत्या.

त्या सांगतात, बाळासाहेबांना त्या काळात मोठी सुरक्षा होती. पण कुणाही सुरक्षारक्षकाशिवाय बाळासाहेब दादांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. कारण दादा त्यांच्या कुटुंबातल्यासारखे होते.

बाळासाहेब रमा निवासमध्ये पोहोचले, तेव्हा तिथं गर्दी होती. बाळासाहेब दादांच्या पार्थिवापाशी गेले आणि दादांच्या पार्थिवाच्या डोक्यावरील कपडा खाली सरकवला.

दादा कोंडके

फोटो स्रोत, Anita Padhye

फोटो कॅप्शन, 'एकटा जीव' पुस्तकाची एका आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, गायक सुदेश भोसले आणि लेखिक अनिता पाध्ये

बाळासाहेबांनी दादांच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि काहीच न बोलता ते तिथून निघून गेले.

बाळासाहेब भावनिक झाले होते. महाराष्ट्रातील धडाडीचा नेता आपल्या मित्राबाबत किती हळवा होता, हे त्यावेळी दिसलं.

अनिता पाध्ये सांगतात की, दादांच्या निधनापूर्वीच छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले होते. दादांनी भुजबळांवरही बरीच टीका केली होती. पण दादांच्या अंत्यदर्शनासाठी भुजबळही आले होते. कारण दादांनी व्यक्तीगत टीका कधी केली नव्हती.

'दादांचा सन्मान व्हावा, हीच इच्छा'

लेखिका अनिता पाध्ये म्हणतात, "अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील, विशेषत: मराठी चित्रपटसृष्टीतील दादांचं मोठं योगदान आहे. आपल्या चित्रपटांद्वारे त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलंच. त्याचसोबत मराठी सिनेसृष्टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यातही दादांचा मोठा वाटा आहे. हे आपण विसरायला नको."

दादा कोंडके

फोटो स्रोत, Anita Padhye

फोटो कॅप्शन, लेखिका अनिता पाध्येंचे आई-वडील, स्वत: अनिता पाध्ये आणि दादा कोंडके

"बाळासाहेब ठाकरे आणि दादांची मैत्री निखळ, निस्वार्थी होती. बाळासाहेबांवरील प्रेमाखातर दादा नेहमीच निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या प्रचारकार्यात सहभागी होत असत. भाषणांद्वारे विरोधी पक्षांवर तोफ डागत असत. त्यामुळे 1995 साली महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं, त्यावेळी पद्मश्री अथवा पद्मभूषण देऊन शिवसेनेने दादांच्या कार्याचा सन्मान करायला हवा होता. परंतु, दुर्दैवाने तसं घडलं नाही. आता पुन्हा महाराष्ट्रात शिवसेनाप्रणित सरकार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे आता तरी दादांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळावा," अशी इच्छा लेखिका अनिता पाध्ये व्यक्त करतात.

"मराठी वाचकांकडून दादांच्या 'एकटा जीव' पुस्तकाला भरभरून प्रतिसाद मिळतो. आतापर्यंत अकरा आवृत्त्या निघाल्या. म्हणजे, लोकांची नाळ दादांशी जुळलीच आहे. दादांना शासनाच्या सन्मानापासून वंचितच राहावं लागलंय. कलाक्षेत्रात फार भरीव कार्य न केलेल्या अनेक कलावंताना 'पद्मश्री' मिळावा आणि दादांना मिळू नये हे दुर्दैव आहे," असंही त्या म्हणतात.

(या बातमीतील सर्व किस्से लेखिका अनिता पाध्ये यांच्याशी बोलून आणि त्यांच्याच 'एकटा जीव' पुस्तकाच्या अकराव्या आवृत्तीतून घेतलेले आहेत.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)