राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांचं बॉलिवूड कनेक्शन तुम्हाला माहीत आहे का?

बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्यापासून, किंबहुना प्रबोधनकार ठाकरेंपासून सिनेजगताशी संबंध आलाय.

प्रबोधनकार ठाकरे यांनी आचार्य अत्रे यांच्या 'श्यामची आई' सिनेमात काम केलं होतं. तसंच, महात्मा फुलेंवरील सिनेमात प्रबोधनकार ठाकरेंनी कर्मठ ब्राह्मणाची भूमिका केली होती.

प्रबोधनकार स्वत: ब्राह्मणेतर चळवळीतले होते. त्यामुळे त्या भूमिकेची खूप चर्चा झाली होती, असं सिनेमाचे अभ्यासक आणि पत्रकार हेमंत देसाई सांगतात.

प्रबोधनकार ठाकरे

फोटो स्रोत, PICTURE COURTSEY- PRABODHANKAR.ORG

ठाकरे कुटुंबाच्या या सिनेइतिहासाचा बीबीसी मराठीनं आढावा घेतला आहे.

'सोंगाड्या'मुळे बाळासाहेबांचा सिनेक्षेत्रात पहिल्यांदा हस्तक्षेप

शिवसेनेची स्थापना होऊन चार वर्षं झाली होती. मराठीचा मुद्दा घेत शिवसेना विविध क्षेत्रात शिरकाव करत होती. मात्र, सिनेक्षेत्राकडे बाळासाहेब ठाकरेंची अजून नजर गेली नव्हती.

तोच 1971 साली अभिनेते दादा कोंडके यांचा 'सोंगाड्या' प्रदर्शित झाला आणि तुफान चालू लागला. याच सिनेमाच्या अनुषंगाने घडलेल्या एका घटनेनं शिवसेनेला आणि पर्यायाने बाळासाहेबांना सिनेक्षेत्रात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्याची 'संधी' दिली.

'सोंगाड्या'च्या प्रदर्शनावेळीही वाद झाला. कारण होतं अभिनेते देवानंद यांच्या 'तेरे मेरे सपने'चं. देव आनंद यांचा हा सिनेमाही नेमका त्याचवेळी प्रदर्शित झाला होता. त्यामुळे मुंबईतल्या दादरमधल्या कोहिनूर थिएटरने दादा कोंडकेंचा 'सोंगाड्या' सिनेमा लावायला नकार दिला.

दादा कोंडके

फोटो स्रोत, EKTA JEEV/ANITAA PADHYE

दादांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी बाळासाहेब ठाकरेंना मदतीची विनंती केली. मराठी चित्रपटाला जागा देत नाही म्हणून शिवसेनेनेही थिएटर मालकाविरुद्ध दादांची बाजू घेतली. लेखिका अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या 'एकटा जीव' पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे.

याबाबतच्या आठवणी सांगताना शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले म्हणाले, "बाळासाहेबांनी यात स्वतः लक्ष घातलं आणि सगळे शिवसैनिक त्यात सहभागी झाले. हा चित्रपट थिएटरमध्ये लागावा यासाठी मोठं आंदोलन झालं."

"सेनेच्या आंदोलनामुळे अखेर थिएटर मालकाला ऐकावं लागलं आणि 'सोंगाड्या' कोहिनूरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट भरपूर चालला. दादांच्या स्टारडममध्ये बाळासाहेबांकडून कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या मौल्यवान मदतीचा मोठा हात होता," असंही रावले म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

बाळासाहेब ठाकरे यांना पक्षाची 'मराठी' प्रतिमा ठाम करण्यासाठी या घटनेचा मोलाचा वाटा होता. मात्र, हा काही एकमेव किस्सा नाही. पुढे जवळपास पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत बाळासाहेब ठाकरे आणि सिनेक्षेत्र यांचा जवळून संबंध आला.

अमिताभ बच्चन यांना मदत, मग बिग बी-सेनाप्रमुख मैत्रीचं पर्व सुरू

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'कूली' सिनेमावेळी झालेल्या अपघाताचा किस्सा अनेकांना माहीत आहे. मात्र, त्यातील आणखी काही गोष्टी ज्येष्ठ सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर यांनी बीबीसी मराठीला सांगितल्या.

1982 साली बंगळुरूत 'कूली' सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तातडीनं मुंबईत आणण्यात आलं.

मुंबई विमानतळावरून ब्रीच कँडी हॉस्पिटलला नेण्यासाठी अमिताभ यांच्या लांबीची रुग्णवाहिका कुठे उपलब्ध होत नव्हती, तेव्हा गिरगावातल्या भडकमकर मार्ग शाखेची रुग्णवाहिका बाळासाहेब ठाकरेंनी उपलब्ध करून दिली होती.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

अमिताभ बच्चन या गोष्टीची जाणीव ठेवली. कारण त्यानंतर 1984 साली ज्यावेळी भडकमकर मार्ग शाखेचा वर्धापन दिन झाला, तेव्हा अमिताभ बच्चन आला होता. तेव्हा पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन हे एकाच व्यासपीठावर आले होते. छगन भुजबळ तेव्हा शिवसेनेते होते. तेही तिथे आले होते.

दिलीप ठाकूर सांगतात, "या घटनेनंतर अमिताभ बच्चन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात स्नेहाचं नातं निर्माण झालं, ते पुढे कायम राहिलं. अमिताभ हे बाळासाहेबांचा खूप आदर करायचे."

बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Hindustan Times

हा केवळ एक किस्सा झाला, पण बाळासाहेबांच्या हस्ते मराठी सिनेमांचे मुहूर्त सुद्धा झालेत. रमेश साळगावकर दिग्दर्शित 'सह्याद्रीचा वाघ' सिनेमाचा मुहूर्त बाळासाहेबांच्या हस्ते झाला होता. क्रांतिसिह नाना पाटलांवर आधारित हा सिनेमा होता. पण तो सिनेमा काही पूर्ण होऊ शकला नाही.

दीपक सरीन दिग्दर्शित 'रणभूमी', जयदेव ठाकरेंच्या 'सबूत' यांचे मुहूर्तही बाळासाहेब ठाकरेंनी केले.

खरंतर शिवसेना स्थापन करण्याच्या आधी बाळासाहेब ठाकरे सिनेमांच्या जाहिरातींसाठी कॅचलाईन सुद्धा द्यायचे, असं दिलीप ठाकूर सांगतात.

देव आनंद यांच्यासोबत बाळासाहेबांची ओळखही सेनेच्या स्थापनेआधीपासूनच होती. स्वत: कलाकार आणि रसिक असल्याने त्यांचे वेगवेगळ्या लोकांसोबत संबंध यायचे.

बाळासाहेब म्हणजे 'फादर फिगर'

पुढे शिवसेनेच्या स्थापनेनंतर कलाकारांना बाळासाहेब ठाकरे 'फादर फिगर' वाटायचे. मनिषा कोईरालाचा 'छोटीशी लव्हस्टोरी' नावाचा सिनेमा आला होता. या सिनेमातले बोल्ड सीन मनिषा कोईराला न विचारतच डमीवर केले होते. मनिषा कोईरालाने ही तक्रार बाळासाहेब ठाकरेंकडे केली. त्यानंतर हा सिनेमा महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊ दिला नव्हता.

देव आनंद

फोटो स्रोत, NAVKETAN

1991च्या सभेत बाळासाहेब ठाकरेंनी आवाहन केलं होतं की, पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घ्यायचं नाही. त्यावेळी देव आनंद यांचा 'सौ करोड' सिनेमा आला होता आणि त्यात फातिमा शेख नावाची पाकिस्तानी अभिनेत्री होती. तेव्हा देव आनंद यांनी बाळासाहेबांची भेट घेऊन चर्चा केली होती.

केवळ विरोधच नव्हे, बऱ्याच ठिकाणी मदतही केली. दोन्ही बाजूंनी सहकार्य झालं, मैत्री जपली गेली.

अभिनेता संजय दत्त याला बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला पाठिंबा सर्वश्रुत आहे. त्यावेळी माध्यमांमध्येही याची खूप चर्चा झाली होती.

बाळासाहेबांच्या 'त्या' सभेला मिथुन चक्रवर्ती होते…

दिलीप ठाकूर हे अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा एक किस्सा सांगतात. बाळासाहेबांनी विलेपार्ले (मुंबई) येथील सभेत पहिल्यांदा हिंदुत्त्वाचा नारा दिला. त्या सभेवरून पुढे खूप गदारोळही माजला. रमेश प्रभू यांच्या प्रचारासाठी ती सभा होती.

त्याच सभेच्या दिवशी मिथुन चक्रवर्ती यांच्या सिनेमाचं प्रमोशन होतं. तिथे मिथुन चक्रवर्ती उशिरा पोहोचले. तेव्हा पत्रकारांनी त्यांना उशिरा येण्याचं कारण विचारलं, तर ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंच्या पार्ल्यातील सभेला गेलो होतो.

मिथून चक्रवर्ती

फोटो स्रोत, Getty Images

ज्या सभेपासून पुढे शिवसेना हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे वळली, त्या सभेला मिथुन चक्रवर्ती होते, हे विशेष.

बाळासाहेबांप्रमाणाचे त्यांचे भाऊ श्रीकांत ठाकरेही सिनेमांचे चाहते होते. किंबहुना, श्रीकांत ठाकरे हे सिनेक्षेत्रात प्रत्यक्षपणे उतरले.

'शुभ बोल नाऱ्या'वरील सिनेपरीक्षणाचा मथळा - 'काय घंटा बोलणार'

श्रीकांत ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे वडील.

खरंतर श्रीकांत ठाकरे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. संगीत दिग्दर्शक, वादक, लेखक, सिनेसमीक्षक इत्यादी बऱ्याच क्षेत्रात ते वावरले. श्रीकांत ठाकरे 'मार्मिक' साप्ताहिकात 'सिनेप्रिक्षान' हा स्तंभ 'शुद्धनिषाद' या टोपणनावाने लिहायचे. खरंतर 'शुद्धनिषाद' हा संगीतातील एक राग आहे. श्रीकांत ठाकरे मार्मिकला साजेसं बिनतोड लिहायचे.

'मार्मिक'च्या पहिल्या पानावर बाळासाहेब ठाकरेंनी रेखाटलेलं व्यंगचित्र असे. वाचक ते पाहत आणि थेट शेवटच्या पानावर जात असत. शेवटच्या पानावर श्रीकांत ठाकरेंचं 'सिनेप्रिक्षान' छापलं जाई.

प्रबोधनकार ठाकरे

फोटो स्रोत, PRABODHANKAR.ORG

फोटो कॅप्शन, श्रीकांत ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे

मराठीतील ज्येष्ठ सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर हे श्रीकांत ठाकरेंचे निकटवर्तीय होते. त्यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना श्रीकांत ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणतात, "मार्मिकमध्ये पत्रांच्या सदरात मी काही ना काही लिहित असायचो. ते तारुण्यातले दिवस होते. उत्साहीपणा होता. अनेकदा खिडकीतूनच पत्र देऊन परतायचो. पण घरात गेलो की, मग श्रीकांतजी आणि माझी गप्पांची मैफल भरायची आणि विषय असायचा चित्रपटाचाच. चित्रपटाने आमच्यातील वयाचा अंतरही कमी केला. ते चित्रपटाविषयी भरभरून बोलायचे."

'मार्मिक'मधील श्रीकांत ठाकरेंचं सिनेसमीक्षण प्रचंड गाजायचं. दिलीप ठाकूरांनी त्यांचे दोन किस्से सांगितले, ते फारच गमतीशीर आहेत. शिवाय, श्रीकांत ठाकरेंची लेखन शैली आणि हजरजबाबीपणा दाखवून देणारे आहेत.

'शुभ बोल नाऱ्या' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तो सिनेमा काही श्रीकांत ठाकरेंना आवडला नाही. त्यानंतर त्यांनी 'मार्मिकमध्ये त्या सिनेमावर परीक्षण लिहिलं आणि मथळा दिला, 'काय घंटा बोलणार'.

तीन सिनेमांची निर्मिती आणि मोहम्मद रफींकडून गायन

त्यांची निरीक्षण क्षमता अफाट होती, असं दिलीप ठाकूर सांगतात. 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाचं खूप कौतुक होत असताना, श्रीकांत ठाकरेंनी परीक्षण लिहिताना नोंदवलं की, सिनेमातल्या एका दृश्यात कॅमेरा कसा हललाय.

श्रीकांत ठाकरेंनी संगीत क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी नावावर केलीच. अगदी मोहम्मद रफी यांना मराठीत गाणी गायला लावण्याचं श्रेय त्यांनाच जातं.

रफींना 'ळ' अक्षराचा उच्चार येत नसल्यानं गाणी बदलली, पण रफींकडूनच जवळपास 10-11 गाणी गाऊन घेतली. त्यात भावगीत, कोळीगीत, बालगीतं होती. त्यातलं 'शोधीशी मानवा राऊळी मंदिरी' हे गाणं तर प्रसिद्धच आहे.

मोहम्मद रफी

संगीत क्षेत्रासोबतच त्यांनी सिनेनिर्मितीतही मोजके प्रयोग करून पाहिले. दिलीप ठाकूर सांगतात, श्रीकांत ठाकरे आणि कॅमेरामन प्रभाकर निकळंकर यांनी मिळून 'प्रेरणाचित्र' नावाची चित्रपट संस्था सुरू केली.

या संस्थेअंतर्गत 1975 साली 'शूरा मी वंदिले' नावाचा सिनेमा काढला होता. या सिनेमातही मोहम्मद रफींचं एक गाणं होतं. त्यांनंतर 'सवाई हवालदार', 'महानदीच्या तीरावर' असे सिनेमे काढले.

पण तीनच सिनेमांवर ते थांबले. पुढे सिनेनिर्मितीतून ते बाहेर पडले. पण सिनेनिर्मिती केल्यानं त्यांना याचा फायदा सिनेमा पाहण्यात, त्यातली निरीक्षणं नोंदवण्यात आणि परीक्षणं लिहिण्यात प्रचंड झाला.

श्रीकांत ठाकरे अशा ठाकरी बाण्याचे, स्वत:ची लेखनशैली, संगीतशैली बाळगणारे होते. सिनेमा हा त्यांच्या सर्वांत आवडीचा प्रांत होता. पुढे राज ठाकरेंमध्ये त्यांच्यातील हे गुण आल्याचे तेव्हाही दिसून आले आणि आजही दिसतात.

राज ठाकरे: चित्रपटांचं कलेक्शन ते कलाकारांशी मैत्री

श्रीकांत ठाकरेंच्या शेवटच्या काळातला एक किस्सा दिलीप ठाकूर सांगतात. 2000 साली 'मिशन कश्मीर' हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी श्रीकांत ठाकरेंना सांगितलं, "तुम्ही दिलीपला सांगा, 'मिशन कश्मीर' सिनेमातला त्याच्या कुणी ओळखीत कुणी असेल, तर त्यांना सिनेमाचं नावं बदलून 'भीषण' काश्मीर करायला सांग."

सांगण्याचा मुद्दा असा की, राज ठाकरे हेही सिनेमांच्या निरीक्षणाबाबत, त्यावरील परीक्षणाबाबत अगदी श्रीकांत ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवणारे आहेत. त्यात ठाकरी बाण्याची भाषा ही त्यांचीही जमेची बाजू.

राज ठाकरे, महेश मांजरेकर

फोटो स्रोत, Getty Images

राज ठाकरे यांच्याकडे केवळ प्रादेशिक किंवा राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सिनेमांचंही कलेक्शन असल्याचं राज ठाकरेंचे निकटवर्तीय किर्तीकुमार शिंदे सांगतात.

"बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरे यांच्या भाषणांचा नीट अभ्यास केला, तर दोघांच्या भाषणांमध्येही अधून-मधून सिनेमांचे संदर्भ येत राहतात. किंबहुना, अनौपचारिक गप्पांदरम्यान सुद्धा राज ठाकरे कायमच आम्हा कार्यकर्त्यांना सिनेमांबद्दल सांगतात. हे सिनेमा पाहा, ते सिनेमे पाहा, असंही सूचवतात," असं किर्तीकुमार शिंदे सांगतात.

राज ठाकरे यांची मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांसोबतची मैत्री तर सर्वश्रुत आहे. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरेंनीही अनेक मराठी सिनेमांचे ट्रेलर लॉन्च केले आहेत, मुहूर्त केले आहेत.

महेश मांजरेकर, केदार शिंदे, भरत जाधव ही मराठीतील कलाकार मंडळी राज ठाकरेंच्या मित्रपरिवरात दिसून येतात.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

शिवाय, मराठी सिनेमांना थिएटर मिळवून देण्यासाठी अनेकदा राज ठाकरेंच्या पक्षाने आंदोलनं सुद्धा केली आहेत. सिनेमा प्रदर्शित करण्यावरून मराठी आणि हिंदी सिनेमात समजुतीही घडवून आणल्या आहेत.

जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सन यांना भारतात आणण्यासाठी राज ठाकरे यांनीच पुढाकार घेतला होता. त्यावेळी विमानतळावर स्वागतासाठीही राज ठाकरे हजर होते.

मात्र, राज ठाकरेंएवढी सिनेमाशी जवळीक त्यांचे भाऊ आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिसून येत नाही.

उद्धव ठाकरेंना सिनेक्षेत्रात किती रस?

उद्धव ठाकरे यांचा सिनेक्षेत्राची आवड तितकी समोर आली नाही. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे अनिल कपूर यांच्या कुटुंबाशी मैत्रीचे नाते आहे. मात्र, उद्धव ठाकरे तितके सिनेजगतापासून दूरच राहताना दिसतात.

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा हाती घेतल्यानंतर मात्र सिनेक्षेत्रातील काही कलावंतांना पक्षात घेऊन महत्त्वाच्या स्थानी बसवल्याचं दिसून आले आहे. त्यात आदेश बांदेकर, सुबोध भावे, शरद पोंक्षे अशा अभिनेत्यांची नावं घेता येतील.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK/UDDHAV THACKERAY

आदेश बांदेकर यांना मंत्रि‍पदाचा दर्जा असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आलीय. एकूणच उद्धव ठाकरे यांचा राजकीय अंगानेच सिनेक्षेत्राशी अधिक संबंध आल्याचे दिसून आलं आहे.

जयदेव ठाकरेंचा 'सपूत', तर बिंदूमाधव ठाकरेंचा 'अग्निसाक्षी'

उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही बंधूंनी मात्र प्रत्येकी एक सिनेमा काढला होता. जयदेव ठाकरे यांनी 'सपूत' नावाचा सिनेमा काढला होता. यात अभिनेता सुनील शेट्टीने काम केलं होतं, तर नाना पाटेकरांनी अभिनय केलेला 'अग्निसाक्षी' सिनेमा बिंदूमाधव ठाकरे यांनी काढला होता.

जयदेव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

सपूत आणि अग्निसाक्षी हे दोन्ही सिनेमे 1996 साली प्रदर्शित झाले होते. यातील बिंदूमाधव ठाकरे यांच्या अग्निसाक्षी सिनेमाने 1996 साली मोठी कमाई केली होती आणि सुपरहिट ठरला होता.

मात्र, जयदेव ठाकरे आणि बिंदूमाधव ठाकरे यांनी पुढे काही सिनेमा काढले नाहीत. एकाच सिनेमानिर्मितीनंतर ते त्यातून बाहेर पडले.

स्मिता ठाकरेंचा सिनेसृष्टीतला दबदबा

स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरेंच्या थोरल्या सून म्हणजे जयदेव ठाकरे यांच्या पत्नी. स्मिता ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबात प्रवेश केल्यानंतर त्यात सिनेमाजगताकडेही वळल्या.

त्यांच्या मालकीचं राहुल प्रॉडक्शन हाऊस आजही सिनेक्षेत्रात कार्यरत आहे.

स्मिता ठाकरे

फोटो स्रोत, SMITA THACKERAY/FACEBOOK

1999 साली 'हसीना मान जायेगी' सिनेमापासून स्मिता ठाकरे यांचा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सँडविच, कैसे कहें, सोसायटी काम से गयी, ह जो कहे ना पाये या सिनेमांची निर्मितीही स्मिता ठाकरेंनी केली.

पुढे त्यांनी टेलिव्हिजन मालिका आणि टेलिव्हिजन शो सुद्धा केले. सिनेमांच्या वितरण क्षेत्रातही स्मिता ठाकरे यांनी नशीब आजमावलं.

ठाकरेंची नातवंडांचा सिनेजगताशी संबंध

जयदेव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे यांनी सिनेक्षेत्रात थेट पाऊल ठेवत आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न जरूर केला. 'राडा रॉक्स' नावाचा मराठी सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला होता.

राहुल ठाकरे यांनी कॅनडात जाऊन सिनेनिर्मितीचा अभ्यास केला आहे. सिनेक्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवण्याचं स्वप्न राहुल यांनी अनेकदा माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

राज ठाकरे याची कन्या उर्वशी ठाकरे या कॉस्च्युम डिझाईनर आहेत. त्यांनी सिनेमा-नाट्य कलावंतांच्या कॉस्च्युम डिझाईनिंगचं काम केलं आहे.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा सिनेमाच्या प्रक्रियेत थेट संबंध नसला, तरी त्यांचा मित्रपरिवार सिनेमाशी संबधित आहे.

आदित्य ठाकरे, अक्षय कुमार

फोटो स्रोत, Getty Images

अभिनेत्री दिशा पाटणी आणि आदित्य ठाकरे यांची मैत्री जगजाहीर आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहण्यात आलं आहे.

केवळ दिशा पाटणीच नाही तर आदित्य ठाकरे बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रीटींसोबत एकत्र दिसतात.

अभिनेता अक्षय कुमार यांच्यासोबत आदित्या यांनी मुलींना सेल्फ डिफेंसचं प्रशिक्षण देण्याची मोहीम सुरू केली होती. तसंच बॉलीवूडच्या अनेक कलाकारांसोबत आदित्य ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

(या लेखात अनिता पाध्ये लिखित 'एकटा जीव' या पुस्तकातला एक प्रसंग देण्यात आला आहे. तो अनिता पाध्ये यांनी 2018 साली बीबीसी मराठीला सांगितला होता. वरील बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा अनवधानाने लेखिकेचे नाव देण्याचे राहिले होते. ते आता देण्यात आले आहे.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)