मृणाल गोरे : मुंबईची 'पाणीवाली बाई' जिने केंद्रीय मंत्रिपद नाकारलं कारण...

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्रासह भारताला 'पाणीवाली बाई' म्हणून परिचित असलेल्या समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचा आज (17 जुलै) स्मृतिदन. ज्या काळात महिलांचं राजकारणातील प्रमाण नगण्य होतं, त्या काळात मुंबई-महाराष्ट्रासह भारतातल्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मृणाल गोरेंनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
ज्यांच्याविरोधात प्रचारासाठी दस्तुरखुद्द इंदिरा गांधींना मुंबईत यावं लागलं, त्या मृणाल गोरे यांच्या राजकीय प्रवासावर हा दृष्टिक्षेप.

2008 साली ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मृणाल गोरेंची 'ग्रेट भेट'मध्ये मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी विचारलं, "ताई, 1977 साली जनता पक्षाचं सरकार आलं असताना चालून आलेलं मंत्रिपद तुम्ही का स्वीकारलं नाहीत?"
त्यावर मृणाल गोरे यांनी दिलेलं उत्तर आजच्या राजकीय वातावरणातील घडामोडी पाहता, अत्यंत आदर्शवादी, किंबहुना काल्पनिक वाटावं असं होतं. त्या म्हणाल्या, "मंत्रिपद देत होते, हे खरंय. आग्रहसुद्धा खूप केला गेला. पण मी नाही सांगितलं."
मंत्रिपद नाकारण्याचं कारण सांगताना मृणाल गोरे पुढे म्हणतात, "माझ्या मनात ठाम होतं की, मंत्रिपद घेऊन आपण फार काही करू शकत नाही. मंत्री झाल्यास सामान्य स्त्रीपासून दुरावत जाऊ आणि सामान्य स्त्रियांशीच जर संपर्क राहिला नाही, तर त्यांच्या भावना समजून घेऊ शकणार नाही."
सत्तेत जाऊन आपण जे काही करू शकतो, त्यापेक्षा बाहेर राहून जास्त करू शकतो, अशा मताच्या मृणाल गोरे होत्या.
सत्ता आणि त्यातून मिळणाऱ्या पदांसाठी दर निवडणुकीच्या आगे-मागे पक्षांतरं करण्याच्या आजच्या काळात हे खरंही वाटू नये, इतका हा निस्वार्थीपणा आणि तत्त्वनिष्ठपणा.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
मृणाल गोरे यांच्यासोबत काम केलेले आणि त्यांचे निकटवर्तीय राहिलेले युवराज मोहिते सांगतात, "पारदर्शकपणा आणि निस्वार्थीपणा हीच तर मृणालताईंच्या संपूर्ण वाटचालीची ओळख आहे."
एमबीबीएसचं शिक्षण शेवटच्या वर्षात अचानक थांबवून, 'डॉक्टर काय फक्त रुग्णांचा उपचार करेल, आपल्याला समाज सुधारायचंय. समाजाचे डॉक्टर होऊया' म्हणत पूर्णवेळ सामाजिक अन् राजकीय चळवळींची कास धरण्याचा निर्णय घेणाऱ्या मृणाल गोरे यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
जयप्रकाश नारायण झाले लग्नाचे साक्षीदार
मोहिलेंच्या सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबात 24 जून 1928 रोजी जन्मलेल्या मृणाल गोरे वयाच्या अगदी विशीतच राष्ट्र सेवा दलाच्या संपर्कात आल्या. देशात 'चले जाव'चं आंदोलन सुरू झालं असताना, मृणाल गोरे पालघरला त्यांच्या आत्याकडे गेल्या होत्या. 1942 च्या दरम्यानचा हा काळ.
पालघरला गेले असतानाच एस. एम. जोशी, भाऊसाहेब रानडे या मंडळींशी संपर्क आला. इथेच त्यांचा मधू लिमये आणि बंडू गोरे यांच्याशी परिचय झाला. समाज सुधारणेसाठी हीच संस्था असल्याचं मृणाल गोरेंच सेवा दलाबाबत मत झालं आणि त्या पुढे आयुष्यभर सेवा दलाच्या कामाशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे जोडून राहिल्या.
सेवाद दलात परिचय झालेल्या बंडू (केशव) गोरेंशीच 1948 साली मृणाल गोरेंचं लग्न झालं. बंडू गोरेंच्या कुटुंबातून या लग्नाला विरोध होता. मात्र, ते सर्व झुगारून या दोघा समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या व्यक्तींनी लगीनगाठ बांधली.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
आकाशवाणीवरील मुलाखतीत मृणाल गोरेंनी त्यांच्या लग्नाबाबतचे किस्से सांगितले आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. मृणाल गोरे सेवा दलात काम करत होत्या. मुंबईतल्या खार ते चेंबुर भागात प्रौढ शाखा सुरू केल्या होत्या. सेवा दलाची संघटना बांधण्यासह राजकीय घडामोडींवर बौद्धिक घेण्याचं त्या काम करत होत्या.
शिक्षण सुरू असतानाच हे काम करत होत्या. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात असताना सेवा दलाच्या कामाला जोर आला होता आणि त्यात मृणाल गोरे खूप वेळ देऊ लागल्या.
त्या सांगतात, "सेवा दलाच्या कामात बुडून गेले होते की, रात्री आल्यानंतर डोळे मिटल्या मिटल्या झोपून जायची. अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. मग पहाटे उठून अभ्यास करायचो. आईलाही वाटायचं शिकावं. फिजिक्ससारखा अवघड विषय मला यायचा. हिने पुढे शिकावं असं शिक्षकांनाही वाटावं. परदेशी जावं अशी त्यांची इच्छा होती."
पण शिक्षण सोडलं. मोहिलेंच्या कुटुंबात सगळेच हादरले. बंडू गोरे आणि तिच्या मैत्रीमुळे हा निर्णय घेतला असावा, असं मोहिलेंच्या कुटुंबात समज झाला होता. पण प्रत्यक्षात बंडू गोरे यांनाही मृणाल गोरे यांच्या या निर्णयाचा धक्काच बसला.
मृणाल गोरेंची अनेक दशकांची मैत्रीण रोहिणी गवाणकर लिहितात, "एकदा विचार करून एखादा निर्णय घेतला की त्याचे चांगले फळ मिळविण्यासाठी त्यावर तुटून पडायचे हा तिचा गुण पहिल्यांदाच लक्षात आला."

शिक्षण सोडल्यानंतर त्यांनी बंडू गोरेंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या विचारांना खतपाणी घालणारा जोडीदार बंडूशिवाय कुणी असू शकत नाही, असं मृणाल गोरेंना वाटलं.
बंडू गोरेंच्या घरी सर्व रुढी पंरपरा मानणारे लोक होते. त्यांना हे लग्न काही पसंत आलं नव्हतं, असं मृणाल गोरेंनी नमूद करून ठेवलंय.
शिक्षण सोडल्यानंतर सेवा दलात पूर्णवेळ काम करत असतानाच 1948 साली दोघांचं लग्न झालं. लग्न रजिस्टर पद्धतीनं केलं गेलं. दादरच्या वनमाळी हॉलमध्ये मोजक्या मित्र मंडळींच्या उपस्थित गाठीभेटीचा कार्यक्रम पार पडला.
बंडू गोरे आणि मृणाल गोरे यांच्या लग्नाचे साक्षीदार व्हायला स्वत: जयप्रकाश नारायण आले होते.
टोपीवाला बंगल्यातून राजकारणाला सुरुवात
गोरेगावचा टोपीवाला बंगला म्हणजे जणू समाजवादी विचारांचं तळ झालं होतं.
लग्नानंतर बंडू गोरे आणि मृणाल गोरे इथंच राहायला आले. मृणाल गोरे यांच्या पुढील राजकारण आणि समाजकारणाचं केंद्रही हाच टोपीवाला बंगला होता.
सेवा दलाचं काम करत असतानाच, निर्मला पेंडसे यांनी स्थापन केलेल्या गोरेगाव महिला मंडळाच्या कामात मृणाल गोरे सक्रीय झाल्या. पण निर्मला पेंडसे या मंडळातून बाहेर पडल्या आणि मग पूर्ण जबाबदारी मृणाल गोरेंकडे आली.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
महिलांच्या संघटनाकडे मृणाल गोरेंचा अधिक ओढा होता. त्यामुळे गोरेगाव महिला मंडळाच्या आधीपासूनच सुरू असलेल्या ग्रंथालय, शिवणक्लास, भजनी मंडळ, खाद्यपदार्थ स्पर्धा यांचा वापर करत मृणाल गोरेंनी महिलांना एकत्र आणलं. या सर्व तशा पारंपरिक गोष्टी. पण या महिला मंडळाच्या माध्यमातून मृणाल गोरेंनी पहिलं क्रांतिकारी पाऊल उचललं.
गोरेगाव महिला मंडळाच्या अंतर्गत मृणाल गोरेंनी कुटुंब नियोजनाचं केंद्र सुरू केलं. हे देशातील पहिलं कुटुंब नियोजन केंद्र होतं. रोहिणी गवाणकर सांगतात, "पुरुष डॉक्टरांकडून तपासून घेण्यासाठी स्त्रिया तयार नसत. पण अशा स्त्रियांची मानसिकता तयार करण्याचं काम मृणाल गोरेंनी गोरेगाव महिला मंडळाच्या माध्यमातून केलं."
ग्रामपंचायतीत प्रवेश आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा
बंडू गोरे आणि मृणाल गोरे यांच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. गोरेगावमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होणार होती. या निवडणुकीत बंडू गोरे यांनी उभं राहावं, अशी स्थानिक समाजवादी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण बंडू गोरेंनी हा प्रस्ताव अमान्य केला आणि कार्यकर्ती असलेल्या पत्नीला अर्थात मृणाल गोरेंना उभं राहण्याचं आवाहन केलं.
मृणाल गोरे 1953 साली गोरेगावच्या ग्रामपंचायतीत जिंकून गेल्या. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर, "आधीच्या पाच वर्षात केलेल्या कामामुळे महिलांचा मोठा पाठिंबा होता. त्याचं फळ ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालं."
समाजवादी नेते बाबूराव सामंत हे तेव्हा सरपंच होते. पुढच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत मृणाल गोरेंना बाबूराव सामंत आणि आबा करमरकर या दोन व्यक्तींचा मोठा पाठिंबा आणि आधार मिळाल्याचं मृणाल गोरेंचे सहाकरी राहिलेले कॉम्रेड सुबोध मोरे सांगतात.
1955 नंतर संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या आंदोलनानं जोर धरला आणि मृणाल गोरे यांनी या मागणीसाठी ग्रामपंचायतीतून राजीनामा दिला.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मृणाल गोरे पूर्ण ताकदीनिशी उतरल्या होत्या. तोवर मृणाल गोरेंच्या मुलीचा (अंजली वर्तक) जन्म झाला होता. त्यामुळे मृणाल गोरे मुलीला आई-बाबांकडे ठेवून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी होत. ज्या ठिकाणी चर्चगेटला मोठा गोळीबार झाला आणि शंभरहून अधिक कार्यकर्ते मृत्यमुखी पडले, त्या ठिकाणी मृणाल गोरेही होत्या.
याच दरम्यान मृणाल गोरेंना एक धक्का बसला. 1958 साली बंडू गोरे यांचं निधन झालं. त्यांच्या आबा करमरकर, बाबूराव सामंत आणि इतरांच्या मदतीनं गोरेगावात केशव गोरे स्मारक ट्रस्ट स्थापन केलं. हे ट्रस्ट आजही कार्यरत आहे.
महिलांच्या प्रश्नांसाठी सुरू केलेलं 'स्वाधार केंद्र' असो किंवा ग्रंथालय, वा महिलांसाठीचे आरोग्य विषयक उपक्रम या ट्रस्टच्या माध्यमातून चालतात. मृणाल गोरेंच्या कन्या अंजली वर्तक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आई अगदी शेवट शेवटपर्यंत ट्रस्टच्या कामात सक्रिय असायची. तिथे जाऊन विविध कार्यक्रमात सहभागी व्हायची. तिनं केलेल्या अनेक रचनात्मक कामातलं केशव गोरे स्मारक ट्रस्ट हे एक होते."
एकीकडे राष्ट्र सेवा दलाचं काम, दुसरीकडे ग्रामपंचायत आणि मग राजीनामा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उडी. असं सुरू असतानाच मृणाल गोरेंच्या राजकीय प्रवासाची वाटचाल अधिक वेगवान झाली.
केवळ मुंबईत नव्हे, तर महाराष्ट्रासह भारतभरात त्यांचं नाव पोहोचलं, ते पाण्यासाठीचं आंदोलन याच काळातलं.
मुंबई महापालिकेत मातृभाषेतून कामकाजासाठी आग्रह
1957 पर्यंत मुंबई महापालिकेची हद्द तोवर जोगेश्वरीपर्यंतच होती. ती हद्द गोरेगावपर्यंत वाढवण्यासाठीही मृणाल गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनं केली. ही हद्द वाढवल्यानंतर गोरेगाव ग्रामपंचायतीचा मुंबई महापालिकेत समावेश झाला आणि निवडणुका लागल्या.
रोहिणी गवाणकर सांगतात त्याप्रमाणे, "ग्रामपंचायतीतील मृणालचं काम सर्वांच्या समोर होतंच. त्यामुळे समाजवादी पक्षानं तिला आपला उमेदवार म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभं केलं. मृणालच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी डॉ. राम मनोहर लोहिया दस्तरखुद्द आले होते."
महापालिकेत निवडून गेल्यावर पहिल्याच दिवशी मृणाल गोरेंनी आपल्या आगामी वाटचालीची चुणूक दाखवली.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
पहिल्याच दिवशी महापालिकेत गेल्यावर नवीन महापौराची निवडणूक होती. त्यावेळचे मावळते महापौर विष्णुप्रसाद देसाई हे अध्यक्षपदी बसलेले होते. काँग्रेसकडून वासुदेवराव वरळीकर हे महापौर बनणार होते. सभेची सुरुवात झाली.
त्यावेळी समाजवादी पक्षाचे जॉर्ज फर्नांडीस, शोभनाथ सिंग आणि मृणाल गोरे हे तीन सदस्य महापालिकेत निवडून आले होते.
या तिघांनी उभं राहून मोठ्या आवाजात मागणी केली की, "अध्यक्ष महाशय मराठीतून बोला. आपल्याला मराठी येत नसेल, तर गुजरातीतून बोला. पण परकीयांची भाषा बोलू नका."
इंग्रजी भाषेत कामकाजाला या नगरसेवकांचा विरोध होता.
तिघांचाही आवाज फार बुलंद होता. तिघेच असूनही ती सभा पुढे चालवणं विष्णुप्रसाद देसाईंना अशक्य झालं. ती सभा तहकूब झाली.
या प्रसंगाबाबत पुढे मृणाल गोरे म्हणाल्या, "वासुदेवराव वरळीकर यांना हार घालण्यासाठी जमलेल्या कोळी बांधवांनी मनातल्या मनात आम्हाला खूप शिव्या दिल्या असतील. पण आम्ही निश्चित सांगते, त्या दिवसापासून महापालिकेत मराठीचा जास्त वापर सुरू झाला."
अशी मिळाली 'पाणीवाली बाई'ची ओळख
ज्यावेळी जोगेश्वरीपर्यंत मुंबई महानगरपालिकेची हद्द होती, तेव्हा जोगेश्वरी पाण्याचे नळ आले होते. मात्र, गोरेगावात पाण्याची प्रचंड टंचाई होती. जर जोगेश्वरीत नळ येऊ शकतात, तर गोरेगावात का नाही, या प्रश्नासह मृणाल गोरेंनी पाण्याचा प्रश्न हाती घेतला.
त्यावेळचा एक किस्सा मृणाल गोरेंनी आकाशवाणीच्या मुलाखतीत सांगितला
"1961 सालीच गोष्ट आहे. मी त्यावेळेला महापालिकेमध्ये नुकतीच निवडून आली होते. एकदिवस सकाळी टेलिफोनची घंटा वाजली. निरोप आला की, मालाडच्या भादरन नगरच्या वसाहतीमध्ये चार मुलं दूषित पाणी पिऊन मृत्यमुखावर आहेत. मी ताबडतोब तिथं गेले. प्रश्न समजून घेतला. त्या भागातल्या घरांचा मालक पाण्याचा प्रश्न सोडवत नव्हता. दुसऱ्या कुणालाही येऊ देत नव्हता. त्याचा परिणाम मुलं मृत्युमुखी पडली.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
"महापालिकेत हा प्रश्न उचलला. आयुक्तांना सांगितलं की, 24 तासात तिथं पिण्याचं पाणी दिलं पाहिजे. आयुक्त पिंपुटकरांनी माझी मागणी मान्य केली. संध्याकाळी महापालिकेचा फौजफाटा घेऊन आलो. सर्व भाडेकरू रस्त्यावर जमा झाले. कोण मालक आडवतो हे पाहतो, असं म्हणत रात्रभर काम करून 12 तासात पाण्याचा प्रश्न सोडवला. सकाळी ज्या वेळेला तिथल्या नळाला पाणी आलं, त्यावेळी त्या भाडेकरूंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. "
मृणाल गोरेंनी पुढच्याच वर्षी म्हणजे 1962 साली मुंबई उपनगराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिली पाणी परिषद भरवली. पाणी परिषदेला काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळांना बोलवण्याचं ठरलं.
मुंबईतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी गाडगीळांना तार करुन येऊ नये म्हणून कळवलं. कारण मृणाल गोरे विरोधी पक्षाच्या नेत्या आहे. परंतु, मृणाल गोरे सांगतात, "काकांनी मात्र उदारपणे सांगितलं की, पिण्याचा प्रश्न खरा आहे, ती मांडत असली तरी ते योग्य आहे. म्हणून मी येणार. काका त्या परिषदेला आले. त्या परिषदेच्या माध्यमातून उपनगरातील पाण्याच्या प्रश्नाची चिरफाड केली."
पाण्याच्या प्रश्नाशी संबंधित असाच एक प्रसंग जोगेश्वरीच्या मजासवाडी झोपडपट्टीतला.
झोपडपट्टीला मुंबई महापालिका नळ देत नव्हती. त्यामुळे झोपडपट्टीतला पाणीप्रश्न बिकट झाला होता. परिणामी पलीकडील आरे कॉलनीतून भिंतीवरून उड्या मारून पाणी आणलं जाई.
या पाण्यावरून मजासवाडी आणि आरे कॉलनीतल्या नागरिकांमध्ये वाद झाला. यात 11 जणांचा मृत्यू झाला होता, अशी नोंद मृणाल गोरे सांगतात.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
त्यानंतर मृणाल गोरेंनी हा मुद्दा मुंबई महापालिकेत उपस्थित केला. त्यावेळी महापालिकेत उपसमित्यांची निवडणूक होती. मृणाल गोरेंनी महापौरांच्या टेबलापाशी जाऊन म्हटलं, "पाण्यासाठी शहरात माणंस मरतायेत आणि आपण कुठल्यातरी उपसमितीची निवडणूक लढवायची, हे मला काही पटत नाही."
एवढं केवळ म्हटलं नाही, तर मतदानासाठीचे बॅलेट पेपर मृणाल गोरेंनी फाडून टाकले. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली.
पण पुढे 17 एप्रिल 1964 पासून त्यापूर्वीच्या झोपडपट्ट्या पाणी देण्यासाठी अधिकृत मानल्या जातील असं सांगितलं. या गोष्टीला मृणाल गोरेंची मुंबई महापालिकेतील ती लढाई कारणीभूत होती.
या सगळ्या आंदोलनांमुळे मृणाल गोरेंना 'पाणीवाली बाई' हे बिरुद चिकटलं, ते त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत.
विरोधासाठी इंदिरा गांधी गोरेगावात
मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर मृणाल गोरे विधानसभेत दाखल झाल्या. 1972 च्या निवडणुकीत त्या गोरेगावातून विजयी झाल्या.
या निवडणुकीतल्या प्रसंगांबाबत कॉम्रेड सुबोध मोरे काही आठवणी सांगतात.
काँग्रेसकडून न्यायमूर्ती माधवराव परांजपे असे मातब्बर उमेदवार मृणाल गोरेंविरोधात देण्यात आले होते. त्यात बांग्लादेशच्या निर्मितीनंतर इंदिरा गांधी प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. त्यामुळे मृणाल गोरेंच्या पराभवाची खात्री काँग्रेसजन बाळगत होते.

फोटो स्रोत, Getty Images
कॉ. सुबोध मोरे सांगतात, "तेव्हा स्वत: इंदिरा गांधी या गोरेगावात आल्या होत्या. त्यांनी मृणाल गोरेंच्या विरोधात प्रचारसभा घेतल्या."
त्यावेळी मृणाल गोरेंच्या समर्थनार्थ एका पोस्टरचा मजकूर सुबोध मोरे सांगतात. ते म्हणतात, "इंदिरा गांधी आल्यानंतर गोरेगावात सर्वत्र पोस्टर लावण्यात आले की, इंदिरा गांधी गोरेगाव में, मृणाल गोरे की जीत."
सुबोध मोरे सांगतात, "त्यावेळी पोस्टरचा मोठा परिणाम होते असे आणि तो 1972 च्या निवडणुकीत दिसला. मृणाल गोरे या इंदिरा गांधींच्या प्रसिद्धीच्या लाटेवर मात करून, न्यायमूर्ती माधवराव परांजपेंविरोधात विजयी झाल्या."
रोहिणी गवाणकर त्यांच्या पुस्तकात लिहितात, "1972च्या 50व्या विधानसभेचे अध्यक्ष होते बॅ. शेषराव वानखेडे. महत्त्वाच्या प्रश्र्नांवरची माहिती मृणाल स्वत: प्रत्यक्ष तिथे भेट देऊन गोळा करते व मगच सभागृहात मांडते, याबद्दल त्यांना तिचे फार कौतुक होते."
साधना मासिकात लिहिलेल्या लेखात मृणाल गोरेंच्या विधानसभेतील पहिल्या कार्यकाळाच्या कामगिरीची आकडेवारी देण्यात आलीय.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
त्यानुसार, "विधानसभेच्या 1972 ते जून 1975 पर्यंतच्या कालावधीत मृणाल गोरेंची गैरहजेरी फक्त 9 दिवसांची होती. कामकाजाचे दिवस एकूण 207 दिवस. त्यांपैकी 196 दिवस मृणाल गोरे सभागृहात हजर होत्या. महिला आमदारांनी 50व्या विधानसभेत मांडलेल्या ठरावांपैकी पाच ठराव मृणाल गोरेंच्या नावे दिसतात.
960 प्रश्र्नांत एकट्या मृणाल गोरेंनी 425 प्रश्न, अर्ध्या तासांच्या चौदा चर्चांपैकी सहा चर्चा तिच्या प्रश्नांवर झाल्या. मांडलेल्या 49 लक्षवेधी सूचनांपैकी 36 सूचना मृणाल गोरेंच्या नावावर आढळतात. स्थगन प्रस्ताव आणि लक्षवेधी सूचना देणारी 1952 ते 1975 या काळातली त्या एकमेव महिला आमदार होत्या."
आणीबाणीच्या काळातील दोन वर्षं तिला मिळाली असती, तर आणखी किती तरी काम तिच्या हातून झाले असते, असं रोहिणी गवाणकर म्हणतात.
महागाईच्या प्रश्नावर त्यांनी याच काळात आवाज उठवला.
महागाईविरोधीतल 'लाटणी मोर्चा'
वाढलेल्या महागाईविरोधात मृणाल गोरेंनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारला धारेवर धरलं. लोकांचाही त्यांना या मुद्द्यावर मोठा पाठिंबा मिळाला. महागाई प्रतिकार संयुक्त महिला समितीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. यावेळी त्यांनी काढलेलं 'लाटणी मोर्चा' केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशभर चर्चेचा विषय झाला.
पत्रकार निखिल वागळेंना दिलेल्या मुलाखतीत मृणाल गोरेंनी हे बोलूनही दाखवलं की, "महिलांना आंदोलनांमध्ये अधिकाधिक सक्रिय करण्यासाठी अशा प्रतीकांचा वापर केला."
महागाईविरोधातील आंदोलनामुळे सराकरला सळो की पळो करून सोडलं. मात्र, मृणाल गोरेंच्या कन्या अंजली वर्तक सांगतात, "महागाई विरोधात लाटणे मोर्चा, घंटा नाद, ठिय्या आंदोलन असे नवे नवे पण अतिशय प्रभावी कार्यक्रम आईने यशस्वी करून दाखवले. विधानसभेत जरी सर्व मंत्रीही तिला घाबरत असत तरी वैयक्तिक जीवनात साऱ्यांनी तिचे कौतुकच केले. माझ्या लग्नालाही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासह सर्व मंत्री येऊन गेले."
मुंबईत महिलांसाठी लोकल ट्रेनमध्ये डबे वाढवून मिळवण्याची पहिली मागणी आणि त्यासाठीचं आंदोलन सुद्धा मृणाल गोरेंनीच केलं.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
उपनगरात रेल्वेचा प्रवास म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न. कामधंदा किंवा नोकरीच्या निमित्तानं, किंवा कार्यक्रमाच्या निमित्तानं असो, रेल्वेशिवाय गत्यंतर नव्हतं. वस्ती वाढत गेली आणि रेल्वेची सुविधा अपुरी पडत गेली.
हेच लक्षात घेऊन मृणाल गोरेंनी सत्याग्रह सुरू केला. त्यावेळचा एक किस्साही त्या दूरदर्शन सह्याद्रीच्या मुलाखतीत सांगतात.
"1972-73 मध्ये महिलांसाठी लोकलचा डबा वाढवून मिळण्यासाठी चर्चगेट स्टेशनला निदर्शनं करण्याचं आम्ही ठरवलं. निदर्शनं सुरू केली. आम्ही रस्ता क्रॉस करून मुख्य कचेरीत गेलो. गेटवर पोलीस होते. काय घडतंय हे कळायच्या आत जाऊन जनरल मॅनेजरच्या कचेरीपर्यंत गेलो. ते बाहेर आले आणि आम्ही सगळ्या गराडा घातला. तीन तास चर्चा चालली. त्यावेळी महिलांसाठी अधिकचा एक डबा देण्याचं जाहीर केलं. त्यानंतरच आम्ही बाहेर पडलो, " असं त्या सांगतात.
पुढे महिलांसाठी विशेष लोकल ट्रेनच सुरू झाली. त्याचं मूळ या मागणीत आहे, असं जाणकार सांगतात.
'पानीवाली बाई दिल्ली में, दिल्लीवाली बाई पानी में'
मृणाल गोरेंची आमदारकीची पहिला कार्यकाळ संपतो न संपतो, तोच देशात आणीबाणी लागू झाली. इतर समाजवादी नेत्यांप्रमाणे आणीबाणीविरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये मृणाल गोरेही आघाडीवर होत्या. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले.
आणीबाणीविरोधात आवाज उठवल्यानं अटकेची टांगती तलवार डोक्यावर होती. त्यावेळी मृणाल गोरे भूमीगत झाल्या. जॉर्ज फर्नांडीस यांच्या सांगण्यावरून त्या गुजरातमध्येही गेल्या. तिथं काँग्रेसचं सरकार जाऊन जनता मोर्चाचे बाबूभाई पटेल यांचं सरकार आलं होतं. त्यामुळे तुलनेनं पोलिसांचा ससेमिरा कमी होणार होता.
26 जून 1975 ला आणीबाणी जाहीर झाल्यापासून पुढची सहा महिने कुठे ना कुठे त्या भूमीगत होऊन राहिल्या. पण अखेर सहा महिन्यांनी म्हणजे 21 डिसेंबर 1975 रोजी मृणाल गोरे यांना अटक झाली आणि नंतर आर्थर रोड, अकोल, धुळे, येरवडा या चार तुरुंगात त्यांचा सव्वा वर्षांचा कालावधी गेला.

फोटो स्रोत, मृणाल गोरे, बाबा आढाव
अकोल्याच्या तुरुंगात मृणाल गोरेंचा अक्षरश: छळवाद मांडण्यात आला होता. महारोगी आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्यांच्या शेजारी त्यांना ठेवले. मृणाल गोरेंनी याबाबत विस्तृत लिहिलं आहे. 'बहुविध' या संकेतस्थळावर हे उपलब्धही आहे.
कॉम्रेड सुबोध मोरे सांगतात, "आणीबाणी उठल्यानंतर ज्यावेळी मृणाल गोरे तुरुंगातून बाहेर आल्या, त्यावेळी त्या लोकल ट्रेननं गोरेगाव स्थानकात उतरणार होत्या. त्यावेळी गोरेगाव रेल्वेस्थानकात जमलेली गर्दी भूतो न भविष्यति होती. आपली 'पाणीवाली बाई' आल्याचं काय आनंद लोकांच्या चेहऱ्यावर होता."
आणीबाणीनंतर 1978 साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि उत्तर मुंबई मतदारसंघातून मृणाल गोरेंना उमेदवारी देण्यात आली.
त्यावेळी 'पानीवाली बाई दिल्ली में, दिल्लीवाली बाई पानी में' ही घोषणा प्रचंड गाजल्याची आठवण कॉ. सुबोध मोरे सांगतात.
लोकसभेत निवडून गेल्यानंतर या वृत्ताच्या सुरुवातीला नमूद केलेल्या प्रसंगाप्रमाणे, मृणाल गोरे यांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी देऊ केलेलं मंत्रिपदही नाकारलं होतं. मात्र, लोकसभेत वेगवेगळ्या मुद्द्यावर आवाज उठवून सभागृह दणाणून सोडत.
खरंतर पुढे जनता पक्षाचं सरकार गेल्यानंतर आलेल्या चौधरी चरण सिंह यांनीही मृणाल गोरेंना केंद्रात मंत्रिपद देऊ केलं होतं, तसंच व्ही. पी. सिंग यांनी राष्ट्रीय महिला आयोगाचं अध्यक्षपद देऊ केलं होतं, ही सर्व पदं मृणाल गोरेंनी नाकारल्याची आठवण रोहिणी गवाणकर सांगतात. जे तत्त्वात बसत नाही, ते मृणालने कधीच केले नाही, असंही गवाणकर नमूद करतात.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
जनता पक्षाचं सरकार पडल्यानंतर, आणि नंतर पक्षच फुटल्यानंतर मृणाल गोरेंनी समाजवादी मंच स्थापन केला. समाजवादी मंचामार्फत त्या 1980 च्या लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिल्या. मात्र, जिंकू शकल्या नाहीत.
जनता पक्षाकडून रवींद्र वर्मा नावाचे उमेदवार होते. ते मूळचे केरळचे होते. तिथून ते खासदारही होते. 1977 च्या मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते. मात्र, 1980 साली जनता पक्षानं त्यांना मृणाल गोरेंविरोधात उभं केलं होतं. त्यांनी मृणाल गोरेंचा पराभव केला.
'मृणालच्या पराभवानंतर मी आणि कमल देसाई तिला भेटायला गेलो. असा भयानक पराभव होईल असं वाटलं नव्हतं. मृणालचं काम लक्षात घेतलं गेलं नाही व जे राजकारण खेळलं गेलं, ते तिथं भेटायला आलेल्या गोपाळ राणेंकडून समजलं,' असं पाणीवाली बाई या चरित्रात्मक पुस्तकात रोहिणी गवाणकर लिहितात.
'बाकी नेहमी गजबजलेला टोपीवाला बंगला शांत होता. लोकही कसे उगवत्या सूर्याला नमस्कार करतात व कामापुरते मामा असतात ही सिद्ध असलेली गोष्ट पुन्हा सिद्ध झाली' असंही गवाणकरांनी म्हटलंय.
पुन्हा विधानसभेत आणि विरोधी पक्षनेत्या
1985 साली गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून जिंकून मृणाल गोरे पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्या. याच कार्यकाळादरम्यान डिसेंबर 1988 ते ऑक्टोबर 1989 दरम्यान त्या विरोधी पक्षनेत्याही होत्या.
पाण्याचा प्रश्न जितक्या हिरहिरीने त्यांनी लावून धरला, तेवढ्याच क्षमतेनं दुसरा मुद्दा लावून धरला तो नागरी निवाऱ्याचा.
झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करताना सरकारकडून 180 फूट जागा मिळत असे. मात्र, एवढ्या जागेत कुटुंब राहणं अशक्य होतं. लोकांना सर्व सोयींयुक्त घर मिळावा, यासाठी मृणाल गोरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे भूखंडाची मागणी केली.
आता दिंडोशीमध्ये नागरी निवारा उभा आहे, त्यामागे मृणाल गोरेंची धडपड कारणीभूत आहे.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
या नागरी निवाऱ्याचा किस्सा शरद पवारांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रात सांगितला आहे.
"नागरी निवाऱ्याची मागणी मान्य होत नाही, हे पाहून मृणाल गोरेंनी आंदोलन सुरू केलं. त्यामुळे वसंतदादा अस्वस्थ होते. एकदा आम्ही एकत्र बसलो असताना वसंतदादांनी माझ्याशी मृणालताईंच्या मागणीचा विषय काढला.
वसंतदादा म्हणाले की, मृणालची मागणी रास्त आहे. पण अडचण ही आहे की, त्यांना देण्यासाठी राज्य सरकारकडे जमीन नाही. या भागात नसली वाडिया यांच्याकडे जमीन आहे. पण ती मागायची कशी?
आम्ही नसली वाडिया यांच्याकडे हा विषय काढला. त्यांनी नागरी निवारा परिषदेसाठी एक रुपया दरानं पंचवीस एकर जमीन देऊन टाकली."
शरद पवार आणि मृणाल गोरे हे दोघे वेगवेगळ्या राजकीय पक्षात होते. विविध विषयांवर मृणाल गोरेंनी त्यांना घेरलेही होते. मात्र, मनभेदापर्यंत हे विषय ताणले गेले नाहीत. असं पवारांनीच पुढे नमूद करून ठेवले आहे.
'ती गर्दी हीच हीच आईची खरी कमाई'
वयाच्या 60 व्या वर्षी मृणाल गोरेंना ब्रेस्ट कॅन्सरनं घेरलं होतं. याबाबत बोलताना मृणाल गोरेंच्या कन्या अंजली वर्तक सांगतात, मी पार हादरले होते. पण प्रभुभाई संघवी यांच्यामुळे डॉ. कामत यांच्यासारखे निष्णात डॉक्टरांकडून ऑपरेशन झालं. मात्र त्यातून बरी झाल्यानतंरही आई झपाटल्यासारखी काम करतच राहिली.

फोटो स्रोत, Keshav Gore Smarak Trust
"खाण्यापिण्याच्या वेळा न पाळल्यानं मधुमेहाला सामोरं जावं लागलं. मध्यंतरीच्या काळात अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला. मात्र, ती खचली नव्हती हे खरं."
शेवटच्या दिवसात मृणाल गोरे गोरेगाव सोडून वसईला मुलीकडे म्हणजेच अंजली वर्तक यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. अंजली वर्तक सांगतात, "थोडे दिवस राहिल्यानंतर तिला गोरेगावची आठवण येई. गोरेगाव तिचा आत्मा होता."
17 जुलै 2012 ला थोडं तापाचं निमित्त झालं आणि तिला हॉस्पिटला नेल्याचं अंजली वर्तक सांगतात. मात्र, तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली.
अंजली वर्तक सांगतात, "आईचं पार्थिव केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या आवारात ठेवलं होतं. अंत्यदर्शनासाठी आलेले लोकांची गर्दी अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही. ती जमलेली गर्दी आणि त्या गर्दीतल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भावना हीच आईच्या आयुष्याची खरी कमाई होती."
या लेखासाठीचे संदर्भ :
- पाणीवाली बाई (मृणाल गोरेंचं चरित्र) - रोहिणी गवाणकर
- तुरुंगातले दिवस (लेख) - मृणाल गोरे
- माझी आई (लेख) - अंजली वर्तक, तसंच अंजली वर्तक यांच्याशी बातचीत
- दुसऱ्या स्वातंत्र्ययुद्धातील 'साधना'चा लढा (लेख) - सदानंद वर्दे
- ग्रीक शोकांतिकेचा नायक? (लेख) - पन्नालाल सुराणा
- कॉम्रेड सुबोध मोरे, पत्रकार युवराज मोहिते, जयंत धर्माधिकारी यांच्याशी बातचीत
- लोक माझे सांगाती (आत्मचरित्र) - शरद पवार
- आकाशवाणी मुंबईवर रोहिणी गवाणकरांनी घेतलेली मुलाखत
- दूरदर्शन सह्याद्रीवरील मुलाखत
- ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी घेतलेली मुलाखत
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








