मुक्ता : 'जात व्यवहारातून जाते, मनातून जात नाही', म्हणत प्रेमकथेपलीकडे जाणारा सिनेमा आजही महत्त्वाचा का?

फोटो स्रोत, NFDC
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"हा प्रश्न फक्त दलित स्त्रीचा आहे. तिची कुठली चळवळ नाही. तिच्यासाठी कुठलं स्त्रीवादी मासिक नाही. पोलिसांच्या शांतता कमिटीत तिचा कुठला प्रेशर ग्रुप नाही. स्वतःची अशी धिंड काढून घेऊन गप्प बसण्याशिवाय ती काय करणार?"
"उद्या कणसे पाटलांच्या कारखान्यात 30 टक्के आरक्षणातून एखादा दलित डायरेक्टर येऊ शकेल. पण घरात चालेल का दलित जावई?"
"पुरोगामित्वासाठी आम्ही दलित जावई करणार नाही. कणसे-पाटील एकवेळ राजकारण खुंटीला टांगतील, पण घराणं नाही."
"हे असं राजकीय सोय म्हणून आम्हाला वापरायचं. आमची चळवळीची वाट लावायची. पांढरे कपडे घालून वाघाची शेळी करायची."
हे संवाद आहेत 'मुक्ता' सिनेमातले. डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 1995 साली प्रसिद्ध झाला होता.
डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले, रिमा, मधू कांबीकर, सोनाली कुलकर्णी, अविनाश नारकर, चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. शरद भुताडिया असे दिग्गज कलाकार या सिनेमात आहेत.

काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या धडक-2 सिनेमामध्ये एक तथाकथित उच्चवर्णीय मुलगी आणि दलित मुलाची प्रेमकथा दाखविण्यात आली होती.
दिग्दर्शिका शाजिया इक्बाल यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, प्रेमकथेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रकारचे पूर्वग्रह आणि भेदभावांबद्दल अतिशय प्रभावी पद्धतीने चर्चा करता येऊ शकते.
हिंदी असो की मराठी बहुंताश सिनेमांमध्ये जात वास्तव हे प्रेम कथेच्या माध्यमातूनच मांडलं गेलेलं दिसतं. मुक्तामध्येही हळूवारपणे उमलणारी एक प्रेमकथा आहे, पण सिनेमाचा विषय केवळ तेवढाच नाहीय.
हा सिनेमा आपल्या जगण्याचं वास्तव असलेल्या जातीच्या मुद्द्याचे वेगवेगळे पदर उलगडून दाखवतो. जातीचं राजकारण, राजकारणातली जात, आपल्या मनात खोलवर दडलेले जातीबद्दलचे पूर्वग्रह, सामाजिक आणि खाजगी आयुष्यातला आपला दुटप्पीपणा असे अनेक पदर हा सिनेमा उलगडतोच.
पण त्यापलिकडेही जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच हा सिनेमा मराठीमधला एक महत्त्वाचा सिनेमा आहे.
धडक, आर्टिकल 15, मसानसारख्या हिंदी सिनेमांमधून होणाऱ्या जात वास्तवाची चर्चा करतो. तमिळ सिनेमा जातीयवादाची मांडणी कसा करत आहे, यावर बोलतो. मराठीतही गेल्या काही काळात फँड्री, सैराट, कोर्टसारखे सिनेमे या प्रश्नाची मांडणी करत आहेत.
पण तीस वर्षांपूर्वी मराठीत जात वास्तवाची राजकीय-सामाजिक अंगाने मांडणी करणारा मुक्तासारखा सिनेमा बनला होता, हे कदाचित चटकन लक्षात येत नाही. त्यामुळेच आजही तितकाच कालसुंसगत असलेल्या या सिनेमाबद्दल बोलायलाच हवं.
आपल्यालाच आरसा दाखवणारी 'मुक्ता'ची गोष्ट
डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शिक केलेला मुक्ता हा सिनेमा जन्माने भारतीय, पण अमेरिकेत वाढलेल्या मुलीची गोष्ट. अमेरिकेतून ग्रॅज्युएशन पूर्ण करून आलेली मुक्ता पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी भारतात येते.
मुक्ताचं घराणं राजकारणी. आबासाहेब कणसे-पाटील तिचे आजोबा. राजकारणातलं बडं प्रस्थ. तिचे काकाही राजकारणात.
मोठ्ठं कुटुंब. मात्र, कवी मनाच्या वडिलांना राजकारणात रस नाही. आपला राजकीय वारसा नाकारून ते अमेरिकेत स्थायिक झालेले आणि तिथल्याच मोकळ्या वातावरणात वाढलेली ही मुलगी.
इथे परत आल्यावर ती कॉलेजमधल्या डाव्या विचारांच्या, चळवळीत सक्रिय असलेल्या ग्रुपमध्ये जाते. या ग्रुपमधल्याच मिलिंद सोबत मैत्री होते, एक हळूवार नातं दोघांमध्ये उमलायला लागतं.
पण मिलिंद दलित असतो आणि त्यातूनच कथेतला पुढचा संघर्ष सुरू होतो.
मुक्ताच्या घरी अर्थातच हे नातं मान्य नाही, त्यावरून घरात ज्या चर्चा होतात, जे मतभेद समोर येतात, त्यावरून समाज म्हणून आपलीच मानसिकता समोर येते.
इथे डॉ. जब्बार पटेल आपल्याला एक आरसा दाखवतात आणि लक्षात येतं की, आपण स्वतः कितीही नाकारत असलो, तरी जात आपल्या मनात किती खोलवर दडून बसली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मुक्ताच्या कथेबद्दल बोलताना एका मुलाखतीत डॉ. जब्बार पटेल यांनी म्हटलं होतं की, "मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रपटावर काम करत असताना माझ्या मनात विचार आला की, आता दलित चळवळीची परिस्थिती काय आहे, जातीवादाकडे आपण कसं पाहतो, आंबेडकरांचा विचार कुठपर्यंत रुजला आहे.
तिथेच मला मुक्ताची कथा सुचली. एक मुलगी जी पूर्णपणे माणूसपणाचा विचार करते ती या सगळ्याला कसं सामोरं जाईल हा प्रश्न मी प्रेक्षकांसमोर ठेवला."
मुक्ता सिनेमाचे संवाद हे लेखक-नाटककार संजय पवार यांनी लिहिले आहेत. मुक्ताची गोष्ट ही प्रेमकथा असली तरी वेगळी का आहे, याबद्दल त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "प्रेम ही स्वाभाविक भावना आहे. त्या त्या वयात ते आकर्षण असणं स्वाभाविक आहे.
पण त्याला जी सामाजिक चळवळीची किंवा त्या प्रकारच्या विद्यार्थी चळवळीची जी जोड दिली होती, त्याचबरोबर मग महाराष्ट्राचं राजकारण, त्यातला असणारा जात आणि सत्तेचा संघर्ष असा तो सगळ्या बाजून बोलतो."
सिनेमा समाज म्हणून असलेल्या आपल्या सगळ्याच पूर्वग्रहांना, विचारपद्धतींना थेट धक्का देणारा आहे.
जातीवादाकडून वंशवादाकडे जात विस्तारणारा परिणाम
मुक्ता हा सिनेमा एका वेगळ्या वळणावर जातो, जेव्हा कथेत एन्ट्री होते मुक्ताच्या अमेरिकन मित्राची.
घरात मुक्ता आणि मिलिंद यांच्या नात्याबद्दल नाराजी असते. कणसे-पाटलांच्या घरातली मुलगी एका दलित मुलासोबत फिरते, त्यांची मैत्री आहे, चळवळीत सहभागी होते यावरून घरातले आपला त्रागा व्यक्त करत असतात. त्याचवेळी मुक्ता त्यांना सांगते की, अमेरिकेहून माझा मित्र येत आहे.
त्यानंतर तिची काकू म्हणते की, पाहा हा अमेरिकन मित्र आला की ती विसरून जाईल हे सगळं.
घरच्यांना अमेरिकन मित्रासोबत तिनं असणं तितकं गैर वाटत नाही. तिथे त्याचं परदेशी असणं, धर्म आड येत नाही.
पण इथे तिच्या घरच्यांना आणि प्रेक्षक म्हणून आपल्यालाही धक्का बसतो, कारण तिचा अमेरिकन मित्र असतो कृष्णवर्णीय.
प्रेक्षक म्हणून आपलाही किती पूर्वग्रह असू शकतो, हे मला तेव्हा जाणवलं. कारण अमेरिकन म्हटल्यावर मीही हाच विचार केला होता की तो गोराच असणार.
हेच गृहीत धरून असलेल्या मुक्ताच्या घरच्यांचा हा कृष्णवर्णीय मित्र पाहून अजूनच रागराग होतो. तिच्या काकूची धुसफूस होते. तिच्या आमदार काकांचे सल्लागार असलेले परांजपे उपहासाने म्हणतात की, आता हे प्रकरण आंतरराष्ट्रीय होत चाललं आहे.

याचबद्दल डॉ. जब्बार पटेल यांनी म्हटलं की, तिचा अमेरिकन मित्र आल्यावर सिनेमा अधिक व्यापक होतो. त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून मी या भेदभावाचे अजून कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न केला.
शेवटी आपण सगळे माणूस आहोत. आता असं काही नसतं, आपण समान आहोत वगैरे म्हणत असलो तरी आपल्या मनात हे भेदभाव किती खोलवर रुतलेले असतात हे दाखवणं हा माझा मुद्दा होता.
मुक्ताचे संवाद लेखक संजय पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, पण मुक्तामधला पेच मला आजच्या दृष्टिने अधिक महत्त्वाचा वाटतो.
कारण त्यात दलित-सवर्ण या प्रश्नाच्या बरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरचा रेसिझमचा मुद्दाही जोडलेला आहे. तिचा अमेरिकन मित्र येणार असं म्हटल्यावर सगळ्यांनाच वाटतं की तो गोराच असेल.
या सगळ्या प्रसंगांमधून जाती-धर्माचं पॉवर पॉलिटिक्स कळतं. कारण कणसे-पाटलांना आपल्या लेकीसाठी दलित प्रियकर नको आहे, अमेरिकन-ख्रिश्चन चालतो. पण तो काळा असेल तर?
सिनेमातल्या एका प्रसंगात मुक्ताही आपल्या आई-वडिलांना विचारते की, गौरी ताईने केलेला ब्राह्मण जावई चालतो, पंजाबी सून चालते, मग मिलिंद का नाही?
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्नाबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सहसा आपण आपल्याशी समकक्ष किंवा तथाकथित उच्चवर्णीय जोडीदाराला प्राधान्य देतो. आपल्याकडच्या मॅट्रिमोनिअलच्या जाहिरातीही काय सांगतात? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इंटरकास्ट लग्नात असं म्हणणारे कोणत्या जातींचा विचार करतात? हेच मुक्ता थेटपणे मांडतो.
बाईची जात कोणती?
मुक्ताच्या कथेला अजून एक पदर आहे तो म्हणजे स्त्रीवादाचा. बाईची कोणती जात नसते, तिच्याकडे नेहमीच पुरूषाच्या नजरेतून पाहिलं जातं, हेही मुक्ता फार संवेदनशीलपणे मांडतो.
शोषितांच्या हक्कांसाठी आग्रही असलेला, चळवळी करणारा मिलिंद एका दलित स्त्रीवर अत्याचार होतो, तिची धिंड काढली जाते तेव्हा संतापतो. अत्याचार ग्रस्त स्त्रीला जात नसते, हा स्त्रियांचा प्रश्न आहे असं सांगणाऱ्या मैत्रिणीला सुनावतो की, हा प्रश्न फक्त दलित स्त्रीचा आहे. तिची कुठली चळवळ नाही. तिच्यासाठी कुठलं स्त्रीवादी मासिक नाही. पोलिसांच्या शांतता कमिटीत तिचा कुठला प्रेशर ग्रुप नाही.
मुक्ताचा अमेरिकन मित्र आल्यावर त्याची आणि तिची मैत्री पाहून मिलिंद अस्वस्थ होतो. तुमच्यात शारीरिक संबंध होते का असं त्याला विचारतो. त्यावेळी मुक्ता त्याला म्हणते की, मी तुला वेगळं समजत होते. तूही एक पुरूषच निघालास. एका स्त्री-पुरूषात एवढंच नातं असतं का रे?
एरव्ही समानतेबद्दल बोलणारा मिलिंद एका अर्थाने आपल्या 'हक्काच्या' स्त्रीला जेव्हा दुसऱ्या पुरूषासोबत पाहतो. तेव्हा तोही एक पारंपरिक पुरूषी चष्मा चढवतो. आणि जात-धर्म कोणताही असो, बाईकडे पाहण्याच्या पुरुषी मानसिकतेवर बोलतो.

फोटो स्रोत, NFDC
मुक्ताच्या काकाचे अनैतिक संबंध घरात सगळ्यांना माहीत असतात. पण सगळेच गप्प असतात. मुक्ताबद्दल बोलणाऱ्या आपल्या या दीराला सुनावताना तिची आई म्हणते की, ज्या बाईसोबत तुमचे संबंध आहेत ती कोणत्या जातीची आहे...तुमच्याच भाषेत खालच्या जातीची आहे. पण शरीराच्या गरजेला कशाला हवी जात...तिथे बाईची जात पुरेशी.
स्त्री-पुरूष संबंधांबद्दल आपल्या सोयीस्करपणावरही इथे भाष्य आहे. गरजेपुरते संबंध, केवळ उपभोगताना स्त्रीच्या जातीचा विचार होत नाही. तिथे स्त्री ही दुय्यम आणि शोषितच. शिवाय घरच्या पुरूषाने असे संबंध ठेवले तरी हरकत नाही, ते राजरोसपणे मिरवलेही जातात. पण घरच्या स्त्रीसाठी सगळ्या चौकटी. तिने त्या चौकटीबाहेर जाऊन केलेलं प्रेम किंवा जोडलेलं कोणतंही नातं अमान्य.
'हे' संवाद सेन्सॉर कसे झाले नाहीत?
'मुक्ता' या सिनेमाची ताकद ही त्याच्या संवादांमध्ये आहे. हे संवाद अतिशय थेट, टोकदार आणि समाज म्हणून आपल्या वर्मावर बोट ठेवणारे आहेत.
या लेखातही सिनेमातल्या संवादांचे उल्लेख आले आहेत. यामध्ये जातीवाचक संवाद आहेत. जातींचे थेट उल्लेख आहेत.
छोट्या-छोट्या गोष्टींवरून भावना, अस्मिता दुखावण्याच्या काळात तर हे संवादांचं महत्त्व अधिकच अधोरेखित होतं आणि प्रश्नही पडतो की, सेन्सॉरच्या कात्रीतून हे संवाद सुटले कसे, हे संवाद लिहिताना दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि संवाद लेखक संजय पवार यांच्यामधली क्रिएटिव्ह प्रोसेस नेमकी कशी होती.

फोटो स्रोत, NFDC
जातीवाचक संवादांवर सेन्सॉरची कात्री का चालली नाही, याबद्दलही त्यांनी सांगितलं.
या सगळ्याच्या आठवणी संजय पवार यांनी सांगितल्या.
"मुक्ताचे संवाद आधी अरुण साधू लिहिणार होते. विजय तेंडुलकरांनाही विचारलं होतं, सतीश आळेकरांशीही बोलणं झालं होतं. असं करत करत संवाद लेखनाचं काम माझ्याकडे आलं. मी मी डॉक्टरांसोबत त्यांच्या काही डॉक्युमेंट्रीजसाठी वगैरे काम करायला पण लागलो होतो.
त्यांनी माझं 'कोण म्हणतं टक्का दिला' हे नाटक पाहिलं होतं. त्यातही जातीचा, आरक्षणाचा मुद्दा होता. टक्क्यामध्ये जसे हार्ड हिटिंग संवाद आहेत, तसेच त्यांना मुक्तामध्येही हवे होते. त्यामुळे त्यांनी माझ्यासारख्या नवख्या तरूणाला संधी दिली."

"संवादांमध्ये जातीचे उल्लेख असल्यामुळे आक्षेप घेतले जातील याची कल्पना होतीच. त्यामुळे आम्ही सिनेमाच्या सुरूवातीलाच एक डिस्क्लेमर देण्याचा निर्णय घेतला."
या सिनेमात जे सामाजिक वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्या अनुषंगाने कोणत्याही जातधर्म समुदायाचे उल्लेख आले असतील तर ते सामाजिक विश्लेषणाच्या अनुषंगाने आले आहेत. यात कोणत्याही सामाजिक घटकांचा अवमान करण्याचा उल्लेख नाही.
अशी सूचना सिनेमाच्या सुरूवातीलाच आपल्याला दिसते.
"आम्ही डिस्क्लेमर तर दिला होताच, पण त्यावेळी समाजही सहिष्णू होता. ऐकून घेण्याची क्षमता होती," असंही संजय पवार यांनी म्हटलं.
'डॉक्टरांनी विचारणं हा सुखद धक्का'
मुक्तामध्ये अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी आणि अविनाश नारकर आहेत. आता आपल्या अभिनयाने स्वतःचं स्थान निर्माण केलेले हे दोन्ही चेहरे तेव्हा नवखे होते.
सोनाली कुलकर्णींचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता, तर अविनाश नारकर यांचा दुसरा.
मुक्ता ही स्वतंत्र विचारांची, स्वतःची ठाम मतं असलेली मनस्वी मुलगी.
सोनाली कुलकर्णींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आम्ही या भूमिकेसाठी खूप चर्चा केल्या. अमेरिकेत वाढलेली भारतीय मुलगी मी साकारत होते. ती कशी वागेल, तिचे उच्चार यावर खूप मेहनत घेतली. मी डॉक्टरांना खूप प्रश्न विचारले होते. त्यांच्याकडून मुक्ताची व्यक्तिरेखा समजून घेण्याचा प्रयत्न केला.
ही मध्यवर्ती भूमिका सोनाली कुलकर्णी यांना कशी मिळाली, याची आठवण त्यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितली.
"डॉ. जब्बार पटेलांसोबत मी वर्कशॉप केले होते. डॉक्टरांनी माझी एकांकिका पाहिली होती. त्यानंतर त्यांनी मला या भूमिकेबद्दल विचारलं. त्याचीही एक गंमत आहे. आम्ही एका निषेध मोर्चात होतो. तिथे चालताना त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. त्यावेळी डॉक्टर आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगताहेत, आपल्यासोबत बोलत आहेत यामुळेच खूश झाले होते. त्याचवेळी त्यांनी विचारलं की, करशील का तू मुक्ताचं काम? डॉक्टरांनी माझी निवड करणं हा माझ्यासाठी सुखद आणि अनपेक्षित धक्का होता."
'मुक्ता'च्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, "मुक्ताची व्यक्तिरेखाही खूप सुंदर पद्धतीने लिहिली होती. ती अमेरिकेतून आली असली तरी निरागस आहे. तिला इथल्या राजकारण-समाजकारणाबद्दलचा फार अंदाज नाहीये. त्यामुळेच जेव्हा तिचा मित्र जेव्हा म्हणतो की, 'कणसे-पाटलांच्या घरात चालेल का दलित जावई, का गं मुक्ते' असं विचारतो तेव्हा ती पटकन म्हणते- हो. तू करशील माझ्याशी लग्न?"
'मुक्ता'मधले इतरही प्रसंग असेच आहेत. मुक्ताचा अमेरिकन मित्र येणार असतो, त्या प्रसंगातही डॉक्टर आपल्याला विचार करायला लावतात, एक धक्का देतात. कारण अमेरिकन मित्र म्हटल्यावर आपल्याला वाटत असतं की, कोणीतरी गोरा, सोनेरी केसांचा मुलगा येईल. पण प्रत्यक्षात तिचा कृष्णवर्णीय मित्र येतो. आपण हा विचार केलेलाच नसतो."

फोटो स्रोत, Getty Images
मुक्ता हा सिनेमा मराठीतला एक महत्त्वाचा सिनेमा आहेच, पण तो कलाकार म्हणून आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे, हे सांगताना सोनाली कुलकर्णींनी म्हटलं की, मुक्ता हा माझा दुसरा आणि मराठीतला पहिला सिनेमा.
हा सिनेमा माझ्या जडणघडणीतला अतिशय महत्त्वाचा सिनेमा आहे. मी पॉलिटिक्समध्ये बीए करत होते. पण जे आम्हाला वर्गात शिकवत नव्हते, ते मला मुक्ताच्या निमित्ताने शिकायला मिळालं. मला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. डॉक्टरांसोबत मी मुक्ता केला. आंबेडकर हा सिनेमा केला. त्या अर्थाने डॉक्टरांनी मला घडवलं आहे.
करिअरच्या सुरूवातीलाच गिरीश कर्नाडांसोबतचा चेलुवी, मुक्ता त्यानंतर सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्यासोबतचा दोघी यांसारखे चित्रपट केल्यामुळे आपल्याला योग्य ती दिशा मिळाली. या भूमिकांमुळे एक जबाबदारीची जाणीव आली, ज्यामुळे मी चित्रविचित्र भूमिका निवडणं शक्यच नव्हतं, असंही सोनाली कुलकर्णींनी म्हटलं.
डॉ. लागूंसोबतच्या 'त्या' सीनच्यावेळी सगळेच झाले हळवे
मुक्ता सिनेमाच्या वेळेची एक भावूक करणारी आठवणही सोनाली कुलकर्णींनी सांगितली.
"सिनेमात मी डॉक्टर लागूंच्या नातीची भूमिका करत होते. आमचं शूटिंग सुरू झालं. तेव्हा डॉ. जब्बार पटेल डॉक्टरांना म्हणाले की, हिला एखाद्या टोपण नावाने हाक मारा.
डॉक्टरांसोबत माझी ओळख ही तन्वीरची (डॉ. श्रीराम लागू यांचा मुलगा) मैत्रीण म्हणून होती. तो आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये होता. त्याला ते 'पिलू' अशी हाक मारायचो. ही तन्वीरची मैत्रीण म्हणून त्यांनी मलाही 'पिलू' अशी हाक मारली."

फोटो स्रोत, Getty Images
त्या पुढे म्हणाल्या, " आमचं डबिंग सुरू झालं. मी अमेरिकेहून घरी आले आहे. डॉक्टर बागकाम करत असतात. मी आजोबा अशी हाक मारते. ते वळून पाहतात आणि पिलू अशी हाक मारतात...हा प्रसंग होता. पण त्यावेळी डॉक्टरांना हाक मारताच येत नव्हती. कारण तन्वीर तेव्हा या जगात नव्हता. त्याप्रसंगी आम्ही सगळेच हेलावून गेलो होतो, इतक्या सज्जन माणसासोबत असं का व्हावं हा प्रश्न पडला होता."
"जात व्यवहारातून जाते, मनातून जात नाही"
असा एक संवाद 'मुक्ता'मध्ये आहे. दुर्देवाने याची प्रचिती आजही आपल्याला रोजच्या जगण्यात येते. त्यामुळेच तीस वर्षांनंतरही हा सिनेमा तितकाच कालसुसंगत वाटतो. आता हे समाज म्हणून आपलं अपयश समजायचं का?
संजय पवार म्हणतात, "सामाजिक समस्या या अनेक दशकं, शतकं रिलेव्हन्ट राहतात. त्यामुळे मराठीच्या अगदी सुरुवातीच्या काळातले शेजारी, कुंकूसारखे सिनेमे किंवा हिंदीमधले सुजातासारखे सिनेमे असतील, ते आजही कालसुसंगत वाटतात. त्यामुळे दुर्देवाने सामाजिक समस्यांवरचे सिनेमे हे कायमच रिलेव्हन्ट राहतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











