सामना : 'मारुती कांबळेचं काय झालं?' हे विचारण्याचं धाडस दाखवणारा 50 वर्षांपूर्वीचा 'कल्ट सिनेमा'

सामना

फोटो स्रोत, Saamana Movie Poster / Giriraj Pictures

    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"चांगले उच्च जातीचे दिसता, म्हणूनच उग्र... जातीचा ज्वलंत अभिमान... छान, छान..."

अंगावर धावून येत उग्रपणे भुंकणाऱ्या कुत्र्यांना उद्देशून श्रीराम लागू बोलत असलेला सामना चित्रपटातली हा संवाद.

विजय तेंडुलकर यांच्या लेखणीतून उतरलेला हा संवाद 50 वर्षांपूर्वीचा असला, तरी ते आजच्या काळात असते तर त्यांनी असंच काहीतरी लिहिलं असतं, हे त्यांच्या लिखाणावरून अगदी स्पष्ट आहे.

अशाच एक ना अनेक संवाद हे सामना चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.

एक सहकार सम्राट, त्याला विरोध करणारा गावात परतलेला सैनिक आणि त्याच्या हत्येचं गूढ उकलण्यासाठी धागा ठरलेला चित्रपटातला साधा सरळ पण तत्वनिष्ट मास्तर असं अगदी साधं कथानक.

पण तरीही कथा, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनयाच्या जोरावर असलेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरला.

या चित्रपटामध्ये असलेला सामाजिक बाज, एका व्यक्तीबाबत चित्रपटभर पसरलेलं गूढ आणि ते गूढ सोडवण्यासाठी एक भल्याच व्यक्तीची सतत चाळवणारी जिज्ञासा असा वेगळंच रसायन या चित्रपटात होतं. त्यामुळं त्याची छापही पडल्याशिवाय राहत नाही.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने या लेखाच्या माध्यमातून आपण आजच्या काळातही यातले संवाद किंवा विचार किती समर्पक आहेत यावर चर्चेसह त्याबाबतच्या आठवणींनाही उजाळा देणार आहोत.

सामना चित्रपटाचं बीज

सामना हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा विषय किंवा एकूणच बाज हा फार चर्चा किंवा विचाराअंती ठरला असेल असं वाटल्याशिवाय राहत नाही. पण या चित्रपटाबाबतची प्रक्रिया जाणून घेतल्यानंतर कशाप्रकारे सगळंकाही घडत गेलं हे लक्षात येतं.

रामदास फुटाणे चित्रकला शिक्षक होते. या नोकरीतून त्यांना अंदाजे जेमतेम 350 रुपये महिन्याला मिळायचे. पण ते ज्या मुलांना शिकवायचे ती सगळी मोठ्या घरची, व्यापाऱ्यांची मुलं होती. त्यातली काही तेव्हाच लाखो रुपयांचे व्यवसाय सांभाळायचे. तर फुटाणे हे तेव्हा या नोकरीशिवाय महिन्यातले काही दिवस चित्रपटांच्या प्रोडक्शनचंही काम करायचे. सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव या चित्रपटांसाठी काम केल्याचं ते सांगतात.

आपले विद्यार्थी आजच एवढे मोठे आहेत तर आपण किती दिवस अशी नोकरी करत राहणार? आपणही काहीतरी मोठं करायचं या विचारातून चित्रपट बनवायचा असं रामदास फुटाणे यांनी ठरवलं. पण सामाजिक आशयाचे चित्रपट बनवायचे हे मात्र त्यांचं ठरलेलं होतं. हेच सामना चित्रपटाचं बीज होतं.

सामना चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डावीकडून डॉ.मोहन आगाशे, दिलीप ठाकूर, रामदास फुटाणे आणि विलास रकटे.

फोटो स्रोत, facebook/gaurav.futane

फोटो कॅप्शन, सामना चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डावीकडून डॉ.मोहन आगाशे, दिलीप ठाकूर, रामदास फुटाणे आणि विलास रकटे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चित्रपट करायचं ठरवलं तेव्हाच रामदास फुटाणे यांनी लेखक विजय तेंडुलकर यांचं लिखाण असेल हे ठरवलेलं होतं. तेंडुलकरांच्या 'अशी पाखरे येती', 'सखाराम बाईंडर' आणि 'घाशिराम कोतवाल'सारख्या कलाकृतींच्या लिखाणाचा फुटाणे यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळं त्यांनी तेंडुलकरांना भेटून विचार बोलून दाखवला.

पण विजय तेंडुलकरांनी चित्रपटाच्या भानगडीत पडायचं नाही म्हणून सुरुवातीलाच प्रस्ताव फेटाळला. फुटाणेंनी मात्र त्यांचा पिच्छा सोडला नाही आणि अखेर तेंडुलकरांनी त्यांना होकार दिला.

रामदास फुटाणेंना सामाजिक विषयावरचा चित्रपट काढायचा होता. तसंच ते आर्थिक गरजा भागवण्यासाठी कर्ज काढून हा चित्रपट बनवत आहेत याबाबत तेंडुलकरांना जाणीव होती. त्यामुळं किमान चित्रपटाचे पैसे वसूल व्हायला हवेत यासाठी त्यावेळची मोठी नावं आणि चांगले अभिनेते म्हणजे श्रीराम लागू आणि निळू फुले या दोघांना घेऊन चित्रपट बनवायचा असा सल्ला तेंडुलकरांनी दिला होता.

त्यानुसार चित्रपटाचे कलाकार ठरले. त्यानंतर दिग्दर्शनासाठीही तेंडुलकरांनी रामदास फुटाणे यांना एक नाव सुचवलं होतं. पण रामदास फुटाणे यांना मात्र जब्बार पटेल यांनी दिग्दर्शन करावं असं वाटत होतं.

जब्बार पटेल यांनी आधी तेंडुलकरांचं 'घाशिराम कोतवाल' नाटक केलं होतं. त्यामुळं तेंडुलकरांचं लिखाण त्यांना माहिती होतं. तसंच ग्रामीण भागाशी त्यांचा परिचय होता. त्यामुळं दिग्दर्शनासाठी तेच योग्य असं फुटाणेंचं म्हणणं होतं.

आधी कलाकार मग कथा

रामदास फुटाणे यांच्या मते या चित्रपटासाठी त्यांच्या मनातली संकल्पना ही 'सत्तेवर असलेली प्रवृत्ती आणि सत्तेपासून फेकली गेलेली प्रवृत्ती' दाखवणारी अशा प्रकारची होती.

खरं तर आधी चित्रपट लिखाणाला नकार देणारे विजय तेंडुलकर या कथेसाठी मात्र अनेक दिवस अहमदनगरमधली गावं, साखर कारखाने फिरले. त्याठिकाणच्या लोकांची बोलण्याची पद्धत इतर बाबींचं निरीक्षण केलं. त्यानंतर त्यांनी कथा लिहायचं ठरवलं.

या चित्रपटात दोन मुख्य पात्र असणार होती एक सत्ताधारी आणि दुसरा त्याला आव्हान देणारा किंवा सत्तेला सुरुंग लावणारा. तर सत्ताधारी म्हणून आमदार किंवा खासदाराचं पात्र असावं असं फुटाणेंना वाटत होतं. पण तेंडुलकरांनी निवडला साखर कारखान्याचा चेअरमन.

ग्राफिक्स

त्या काळाचा विचार करता आमदार-खासदार कोण होणार हेच मुळाच साखर कारखान्यांचे हे चेअरमन ठरवणार एवढा त्यांचा प्रभाव असायचा. त्यामुळं अशा प्रकारचं लोकांच्या आणखी जवळचं पात्र निवडायचं ठरलं. तर दुसरा होता एक गांधीवादी विचारसरणीचा पण दारुच्या आहारी गेलेला स्वातंत्र्यसैनिक.

अशा प्रकारे आधी श्रीराम लागू आणि निळू फुले हे अभिनेते ठरले. त्यानंतर त्यांच्यासाठीची पात्रं ठरली आणि त्यानंतर त्यांच्यावर आधारित या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली. नेहमीच्या ठरलेल्या किंवा पारंपरिक प्रक्रियेच्या अगदी उलट ही प्रक्रिया होती.

अभिनयाची कमाल अन् जुगलबंदी

विजय तेंडुलकरांनी सामना हा चित्रपट जेवढ्या समर्थपणे लिहिला आहे, तेवढ्याच समर्थपणे खऱ्या अर्थानं निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू या दोघांच्या अभिनयानं तो खांद्यावर उचलून घेतल्याचं अगदी स्पष्टपणे जाणवतं.

निळू फुले यांनी साकारलेला हिंदुराव धोंडे पाटील हा सहकार सम्राट पहिल्या फ्रेम पासून जेवढ्या समर्थपणे प्रेक्षकांसमोर उभा राहतो तेवढ्याच ताकदीने डॉ. श्रीराम लागू यांनी शांतपणे विवेकानं पण टोचेल असं परखड बोलणाऱ्या मास्तर म्हणून उभा राहतो.

एखाद्या सहकार सम्राटाची त्याच्या साम्राज्यात किंवा परिसरात जी जरब असते ती हिंदुरावच्या प्रत्येक सीनमध्ये निळू फुलेंच्या डोळ्यांतून काहीही न बोलताही जाणवते. अगदी वारंवार ती जाणवत राहते.

पण त्याचबरोबर मनातलं हिंदुरावाच्या मनात सुरू असलेलं द्वंद्वही अगदी स्पष्टपणे दिसतं. मास्तरबाबत मनात असलेली शंका, त्याच्या वर्तणुकीतून येणारा राग आणि त्याच्याबद्दलही नकळत दिसणारी एक प्रकारची आत्मीयता अशा अनेक भावना निळू फुलेंनी अगदी स्पष्टपणे मांडल्या आहेत.

सामना

फोटो स्रोत, Saamana Movie Poster / Giriraj Pictures/UGC

दुसरीकडे त्याच सगळ्या दृश्यांमध्ये डॉ. लागूंनी साकारलेला मास्तरही भाव खावून जातो. दारुपायी पाय धरायलाही तयार असणारा पण त्याचवेळी जे बोलायचं ते हसत, टोमणे देत बोलणारं हे पात्र त्यांनी अगदी सक्षमपणे उभं केलं.

प्रचंड हुशारी पण तरीही दारुसाठीची लाचारी आणि त्याचवेळी कुजबूज सुरू असलेल्या मारुती कांबळे बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता हे सगळे रंग त्यांच्या अभिनयातून अगदी चित्रपटभर उधळलेले पाहायला मिळतात. त्यामुळंच त्यांच्या अभिनयाची एक अनोखी जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळते.

मारुती कांबळे यांची भूमिका करणारे डॉ. मोहन आगाशे आणि स्मिता पाटील ही मोठी नावंही या चित्रपटात होती. त्यांनीही अपेक्षित असं योगदान चित्रपटासाठी दिलं आहे.

अभिनयाबरोबरच चित्रपटातले डायलॉग या जुगलबंदीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.

मारुती कांबळेचं काय झालं?

"मारुती कांबळेचं काय झालं?" हा प्रश्नरुपी संवाद या चित्रपटात सूत्रधाराचं काम करतो. कारण त्याचभोवती फिरणारं सगळं कथानक आहे.

मास्तरच्या कानावर पहिल्यांदा पडलेला हा प्रश्न आणि त्यानंतर त्याचं उत्तर मिळावं यासाठी त्यांची चाललेली धडपड या भोवतीच सगळं घडतं. पण हा प्रश्न आणि त्याचं उत्तर मिळत नसल्यानं अस्वस्थ झालेला मास्तर हा त्या काळातील समाजाव्यवस्थेवर केलेलं भाष्य होतं.

तेव्हा तो विचारलेला प्रश्न आजही अनेक बाबतीत तंतोतंत लागू होतो, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अनेकदा कुठं थेट तर कुठं अप्रत्यक्षपणे अन्यायायाच्या विरोधात प्रश्न विचारताना वापरला जात असल्याचं पाहायला मिळतं.

अगदी वृत्तपत्रांमध्ये सरकारच्या अनास्था किंवा एखाद्या विषयावर मार्मिक भाष्य करायचं असेल तर याचा वापर केला जातो. काही अग्रलेखांचं शिर्षक म्हणूनही याचा वापर झालेला आजवर पाहायला मिळालाच आहे.

त्यामुळं प्रस्थापित व्यवस्थेविरोधात जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित करायचा असेल, तेव्हा भूमिका कशाप्रकारे मांडायची आणि त्यात सातत्य कसं असावं याचा आदर्शपाठ घालून देणारा हा संवाद आणि त्याचा वापर आहे.

याशिवायही अनेक संवाद चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरले आहेत.

संवाद हाच चित्रपटाचा आत्मा

'सामना'मध्ये संपूर्ण चित्रपटभर मधली काही गाणी सोडली तर प्रामुख्यानं दोनच पात्र सातत्यानं दिसत राहतात. मास्तर आणि हिंदुराव. पण त्यांच्यात अनेक अर्थांचे पदर असलेला जो संवाद सुरू असतो, तो मात्र पाहणाऱ्याला अस्वस्थ करून सोडल्याशिवाय राहत नाही.

विजय तेंडुलकरांनी या चित्रपटातल्या एकेका संवादातून ज्या पद्धतीनं समाजावर आणि समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे, ते पाहता त्या प्रत्येक संवादावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते. कारण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची समीक्षा करता येईल. अगदी आजच्या काळातही चपखल बसतील असे हे संवाद आहेत. अशाच काही मोजक्या उदाहरणांमधून आपण ते जाणून घेऊयात.

ग्राफिक्स

चित्रपटाच्या सुरुवातीला हिंदुरावची कुत्री मास्तरवर भुंकत असतात, तेव्हा त्यांना उद्देशून मास्तर म्हणतो, "चांगले उच्च जातीचे दिसता, म्हणूनच उग्र... जातीचा ज्वलंत अभिमान... छान, छान..." विजय तेंडुलकरांनी त्या काळात केलेलं हे लिखाण अनेक व्यवस्थांवर एकाचवेळी भाष्य करतं.

50 वर्षांपूर्वी हे लिहिलं गेलं ते चित्रपटात आलं आणि त्यावर चर्चाही झाली असणार. आजच्या काळात असं काही असतं तर काय? याचा विचार न केलेलाच बरा.

हिंदुराव मास्तरला त्यांनी केलेला 'विकास' दाखवायला नेत असतात तेव्हा, "पायी चालून समजतं, ते गाडीनं दहा जन्मात समजणार नाही," असं म्हणतात. यावरून साम्राज्य निर्माण करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, याची त्यांना असलेली जाणीव आणि हुशारीचं दर्शन होतं.

त्याचवेळी, "इथल्या कुठल्या झाडाला किती पानं आहे? हे आम्ही झोपेतही सांगू", असं म्हणत हिंदुराव एक प्रकारे मास्तरला इशारा देत असल्याचंही जाणवल्याशिवाय राहत नाही.

ग्राफिक्स

मास्तरही त्या माळरानावर उभारलेले सहकाराचे इमले पाहताना हिंदुरावला प्रश्न करतो की, "या जमिनीवरचे शेतकरी कुठं गेले भुर्रकन उडून गेले".

विकासासाठी जमिनी गमावून देशोधडीला लागणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न या एका ओळीतून अगदी सहजपणे तेंडुलकरांनी मास्तरच्या तोंडून मांडले आहेत. शेतकरी आणि भूसंपादन याबाबत आजची परिस्थिती काय हेही वेगळं सांगण्याची गरज नाही.

"निवडुंगाच्या फडात शहाण्या माणसानं पाय घालू नये", या हिंदुरावच्या इशाऱ्यावर "जन्मभर निवडुंगच तुडवला आम्ही, शहाण्या माणसांत आमची गणना कधी नव्हतीच मालक, आम्ही गाढव... जन्मजात आणि भले थोरले...", असं उत्तर मास्तर देतात. म्हणजे एकीकडे स्वतःला कमी लेखणारे शब्द वापरले तरी, आम्ही हवं ते करतच राहणार हेही वेगळ्या मार्गाने सांगून टाकतात.

"कोणत्याही साम्राज्यावर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो केव्हातरी मावळणार हे निश्चित असतं," असं सांगत मास्तरच एकप्रकारे हिंदुरावला त्यांच्या सत्तेलाही हादरे बसू शकतात हे सांगायला मागे पुढं पाहत नाहीत.

जातीय राजकारणावरील भाष्य?

चित्रपटात मारुती कांबळेला कसा संपवला, हे हिंदुराव मास्तरला सांगत असताना एका घटनेबद्दल ते सांगतात. त्या दृश्यातून आणि संवादातून तेंडुलकरांनी दोन जातींमधला किंवा समाजातील दोन वर्गांमधला संघर्ष परखडपणे मांडला आहे.

मारुती कांबळेचा विरोध मोडून काढण्यासाठी त्याला अडकवण्यासाठी एका गर्भवती विधवेबरोबरच्या त्याच्या संबंधाचा बनाव करून तिच्या हत्येचा आरोप मारुती कांबळेवर लावला जातो. ही विधवा साळुंक्याची असते.

त्यानंतर मारुती कांबळे गावातून पळून गेला हे सांगताना हिंदुराव म्हणतात की," मारुती कांबळे बेपत्ता झाला, नाही तर गावानी त्याला उभा जाळला असता, कारण... विधवा साळुंक्याची होती ना," असं बोलताना हिंदुरावच्या चेहऱ्यावरचं हास्य या वाक्यामागचं राजकारण समजावण्यासाठी पुरेसं ठरतं.

मारुती कांबळे आणि साळुंक्याची विधवा यांच्यामध्ये असलेल्या जातीचा किंवा सामाजिक उच्च नीचतेची तफावत कशाप्रकारे संघर्षासाठी कारणीभूत ठरणारी होती, हे यावरून अगदी सहज स्पष्ट होतं.

अशा एक ना अनेक सामाजिक मुद्द्यांकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न सामनानं केला आहे.

सम्राटांच्या पायाशी लोळण घालणारी सत्ता

दिग्दर्शक म्हणून जब्बार पटेल यांचाही हा पहिलाच चित्रपट होता. ब्लॅक अँड व्हाइट असलेल्या या चित्रपटाची मांडणी अत्यंत वेगळ्या पद्धतीनं केलेली पाहायला मिळते.

चित्रपट पाहायला संथ वाटत असला तरी त्याकाळी ज्या पद्धतीनं राजकीय विषय यात हाताळण्यात आला होता, त्याचं वेळोवेळी कौतुक झाल्याशिवाय राहत नाही. त्यात जब्बार पटेल यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण चित्र उभं केलं त्याचा मोठा वाटा होता.

चित्रपटाचे अनेक सीन हे अत्यंत प्रतिकात्मक पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करणारे असल्याचं पाहताना जाणवतं.

सामना

फोटो स्रोत, UGC

उदाहरण घ्यायच झालं तर, खासदार हिंदुरावला त्यांच्या बंगल्यावर बैठक आयोजित करायला सांगतो. त्यानुसार हिंदुराव बैठक आयोजित करतो. बैठकीत मैफल रंगते. खासदार आणि इतर नेते नाचगाणं आणि इंग्रजी दारूची मजा लुटतात. हिंदुराव स्वतः पीत नाही पण सगळ्यांना अगदी आग्रहाने पाजत असतो.

चित्रपटात याठिकाणी एक गाणं आहे आणि गाण्याचा शेवट होतो तो सीन बरंच काही दर्शवणारा आहे.

शेवटी एका खुर्चीवर अत्यंत अभिमानानं किंवा अहंकारानं बसलेला हिंदुराव आणि त्यांच्यापासून लांब जाणाऱ्या कॅमेऱ्यात खाली लोळत असलेले लोकप्रतिनिधी अशी अत्यंत सूचक फ्रेम शूट करण्यात आली आहे.

सत्ताधाऱ्यांना लोळवणारा असा हा सहकार सम्राट दाखवलेला आहे. आजही लोकप्रतिनिधींवर काही मोजक्या लोकांचं लांगुलचालन करत असल्याचा आरोप होतच आहे.

चित्रपटातील गाणी

या चित्रपटातलं संगीतही अत्यंत खिळवून ठेवणारं होतं. या चित्रपटातली गाणी ही प्रचंड लोकप्रिय झाली. भास्कर चंदावरकर यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

चित्रपटातलं कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे गाणं तर आजही अनेक ठिकाणी वाजवलं जातं. मराठीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांमध्ये या गाण्याचा समावेश असणार यात शंका नाही. आरती प्रभू यांनी लिहिलेलं हे गाणं रवींद्र साठे यांनी गायलं आहे.

तर सख्या रे घायाळ मी हरिणी हे गाणंही तेवढंच प्रसिद्ध आहे. वेगळा बाज असलेली ही लावणी 50 वर्षांनंतर आजही तेवढीच लोकप्रिय आहे. लता मंगेशकरांनी गायलेल्या या गाण्याचे शब्द जगदीश खेबुडकरांचे आहेत.

त्याशिवाय उषा मंगेशकर यांच्या आवाजातील आणखी दोन लावणी आहेत. त्यातही सख्या चला बागामधी रंग खेळू चला हीदेखिल प्रचंड लोकप्रिय झालेली लावणी आहे.

तर या टोपीखाली दडलंय काय हे गाणं जब्बार पटेलांनी लिहिलं असून श्रीराम लागूंसह, रवींद्र साठे आणि उषा मंगेशकरांनी ते गायलं आहे.

चित्रपटात दिसणारा 'सामना'

नावाप्रमाणे चित्रपटातही अनेकप्रकारे सामना असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात आधी जाणवतो तो दोन उत्तम अशा कलाकारांमधल्या अभियनाचा सामना.

निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांनी एकमेकांच्या अगदी तोडीस तोड अभिनय करत चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. दोघांपैकी कोणीही एकमेकांच्या तुलनेत अगदी तसूभरही कमी नसल्याचं दिसतं.

एकीकडे जसा या दोन अभिनेत्यांचा सामना सुरू असतो, तसाच एक सामना लेखक आणि दिग्दर्शक यांच्यातल्या जुगलबंदीचाही दिसतो.

ज्या पद्धतीनं तेंडुलकरांनी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत, त्याच तोडीचं आणि वेगळ्या धाटणीचं दिग्दर्शन करत जब्बार पटेलांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं.

चित्रपटाचा शेवटही वेगळ्या पद्धतीचा

चित्रपटामध्ये सत्तेच्या प्रवृत्तीचं चित्रं मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याचा प्रत्यय चित्रपटाच्या शेवटानंही येतो, असं रामदास फुटाणे यांनी बीबीसी मराठीच्या मुलाखतीत सांगितलं.

चित्रपटाच्या शेवटी जेव्हा मारुती कांबळेमुळं आपण अडचणीत येत आहोत असं वाटतं, तेव्हा हिंदुराव गाव सोडून मुंबईत निघून जातो. उपोषणाला बसलेल्या मास्तरला ते समजतं.

पण हिंदुराव अडचणीत आल्यामुळं दुसऱ्या एका आमदाराला फार आनंद झालेला असतो. मास्तरच्या नेमकं ते लक्षात येतं.

दुसरा आमदार कारखाना ताब्यात घेईल पण, त्याचीही सत्तेची भूक तशीच असणार, हे मास्तरला माहिती असतं. त्यामुळं मास्तर मुंबईला जाऊन हिंदुरावला परत घेऊन येतात. तुमचं राज्य कोसळतंय, हे मास्तर हिंदुरावला सांगतात.

हा विकास हिंदुरावने केला आहे, त्यामुळं त्याला किमान साम्राज्याची जाणीव आहे. ते सांभाळण्याची त्याची इच्छा आहे. "काही चूक असेल तर त्याला सामोरं जा पण परत चला, असं सांगत मास्तर हिंदुरावला घेऊन येतात."

सुरुवातीला फ्लॉप नंतर बनला 'कल्ट'

सामना चित्रपटाच्या प्रदर्शनाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही महिन्यांपूर्वी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात रामदास फुटाणे यांनी चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से सांगितले होते.

सुरुवातीला या चित्रपटाला तेंडुलकरांनी 'सावलीला भिऊ नको' असं नाव सुचवलं होतं. पण फुटाणे यांना ते नाव आवडलं नाही. हे नाव नाटकासारखं वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आणि नंतर त्याला 'सामना' हे नाव भारतीय चित्रपट सृष्टीत अजरामर झालं.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात हा चित्रपट चालला नव्हता. ग्रामीण भागात तर लोक फक्त गाणी सुरू झाली की उठायचे आणि निळू फुले आणि श्रीराम लागू यांचे डायलॉग सुरू झाले की लोक झोपायचे, असंही फुटाणे म्हणाले.

हिंदुरावच्या भावाच्या म्हणजे सर्जेरावच्या भूमिकेत असलेल्या विलास रकटेंना फुटाणेंनी एका हॉटेलमध्ये जेवताना पाहिलं होतं. तेव्हा ते सर्जेरावाच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचं त्यांना वाटलं. त्यांनी विचारलं आणि रकटेंनीही होकार दिला आणि त्यांची निवड झाली. रकटेंनी या चित्रपटासाठी प्रोडक्शनचंही काम केलं होतं.

चित्रपट फ्लॉप झाला असला तरी, बर्लिन चित्रपटासाठी भारताकडून सामनाची निवड झाली होती. पण चित्रपट कर्ज काढून केला तर महोत्सवासाठी बर्लिनला जायलाही त्यांच्याकडं पैसे नव्हते. त्यावेळी सुशील कुमार शिंदे सांस्कृतिक मंत्री होते. त्यांच्याकडे मदतीसाठी फुटाणे गेले होते.

तेव्हा शिंदे यांनी अर्ज लिहून घेतला पण अशी मंजुरीला सहा महिने लागतील असं म्हणत ते स्वतः अर्ज घेऊन मधुकरराव चौधरी आणि शंकरराव चव्हाण यांच्यासह सचिवांकडं जात ते स्वतः सह्या घेऊन मंजुरी मिळवली होती. ओळख नसतानाही सुशीलकुमार शिंदे यांनी एवढी मदत केल्याचं रामदास फुटाणे म्हणाले.

सामना

फोटो स्रोत, UGC

शशी कपूर यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याला दाद दिली होती. अनेक राजकीय चित्रपट पाहिले पण खऱ्या अर्थानं हा राजकीय चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, अशी आठवण निळू फुलेंनी एका मुलाखतीत सांगितली आहे.

सुरुवातीला हा चित्रपट सहकार क्षेत्राच्या विरोधात आहे, असं म्हणत सगळीकडून विरोध होत होता. आताच्या छत्रपती संभाजीनगर (तत्कालिन औरंगाबाद) या चित्रपटाच्या विरोधात एक मोर्चा निघाला होता.

त्याला विरोध म्हणून दलित पँथरने हा चित्रपट दाखवावा म्हणून दुसरा मोर्चा काढला. तेव्हा पहिल्यांदा तिन्ही शो हाऊसफुल झाले होते, अशीही आठवण त्यांनी सांगितली.

चित्रपट चालेल किंवा नाही अशी शंका रामदास फुटाणे यांनाही होती. निर्माते म्हणून जोखीम त्यांनी पत्करली होती.

अनेकांकडून कर्ज काढली होती. त्यामुळं तोटा झालाच तर काय करायचं हेही त्यांनी ठरवून ठेवलं होतं. चित्रकला शिक्षक असल्याचे चित्र काढता येतात त्यामुळं चित्रपटाचे पोस्टर रंगवण्याचं काम करायची तयारी ठेवली होती, असं ते सांगतात.

विकास करायचा पण आपल्याला हवा तसा, आपल्या अटीवर हा चित्रपटातील हिंदुरावचा होरा. म्हणजेच सहकाराच्या आडून तो लादू पाहत असलेली हुकूमशाही आणि हा डाव हाणून पाडण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीनं भिडणारा तत्वनिष्ठ मास्तर.

असाच सामना आजच्या काळातही आजुबाजुला पाहायला मिळतोच आहे, फक्त हिंदुराव आणि मास्तरचे चेहरे बदलले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.