शेतकऱ्यांचं भवितव्य बदलणारी 'जादूई' निळी फुलं; कशी करतात शेती आणि किती उत्पन्न मिळतं?

फोटो स्रोत, Impex
- Author, प्रीती गुप्ता
- Role, तंत्रज्ञान प्रतिनिधी
"काही वर्षांपूर्वीपर्यंत, गोकर्णचा (बटरफ्लाय पी फ्लॉवर) वेल हा माझ्या गावातील एक सामान्य, इतर वेलींसारखाच चढत जाणारा एक वेल होता," असं निलम ब्रह्मा म्हणतात. त्या आसाममधील अंथाईग्वलाओ या गावात राहतात.
भारतात अनेक ठिकाणी अपराजिता म्हणून ओळखला जाणारा हा वेल एकप्रकारची लता किंवा वनस्पती आहे. त्याला आकर्षक निळ्या रंगाची फुलं येतात.
साधारण 2 वर्षांपूर्वी ब्रह्मा यांना समजलं की ही फुलं विकून स्थानिक महिला पैसे कमावत आहेत. या फुलांचा वापर करून चहा किंवा निळा रंग तयार केला जाऊ शकतो.
मग त्यांनीही या महिलांबरोबर या कामात सहभागी व्हायचं ठरवलं.
"या कामातून जे झालं, त्यामुळे मीदेखील आश्चर्यचकित झाले. पहिल्यांदा मी वाळवलेली फुलं विकून जवळपास 4500 रुपये (50 डॉलर) कमावले. त्यावेळेस मला धक्काच बसला. त्यातून मला विश्वास वाटला की मी माझं चांगलं भविष्य घडवू शकते," असं त्या म्हणतात.
या प्रयोगातून सुरुवात झाली एका छोट्या व्यवसायाची.
त्या म्हणाल्या, "मी छोट्या कर्जासाठी अर्ज केला. सौर ड्रायरमध्ये गुंतवणूक केली. या यंत्रामुळे मला फुलं लवकर वाळवता आली, त्यांचा रंग टिकवून ठेवता आला आणि ग्राहकांना ज्या गुणवत्तेचा माल हवा होता, त्याची पूर्तता करता आली."
जगभरातून गोकर्णाच्या फुलांना वाढती मागणी
थायलंड आणि इंडोनेशिया हे देश गोकर्णाच्या फुलांच्या उत्पादनात आघाडीवर आहेत, तसंच या देशांमध्ये या फुलांचा सर्वाधिक वापरदेखील होतो.
मात्र आता जगभरातून या फुलाला मागणी वाढते आहे. यामुळे भारतातील व्यावसायिक याकडे आकर्षित होत आहेत.
"नैसर्गिक रंगद्रव्यांची जगभरातील मागणी प्रचंड वाढते आहे," असं वर्षिका रेड्डी म्हणतात. त्या टीएचएस इम्पेक्स या कंपनीच्या संस्थापक आहेत. टीएचएस इम्पेक्स नैसर्गिक रंगद्रव्य (डाय) आणि ॲडिटिव्हची निर्यात करते. ॲडिटिव्ह म्हणजे सहाय्यक घटक जो उत्पादन किंवा पदार्थात थोड्या प्रमाणात, विशिष्ट उद्देशात मिसळला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
नैसर्गिक घटकांना ग्राहकांकडून असलेल्या मागणीत वाढ होते आहे. तसंच अमेरिका आणि युरोपमध्ये खाद्यपदार्थांमध्ये टाकण्यात येणाऱ्या कृत्रिम रंगद्रव्यांवर (सिन्थेटिक फूड डाय) कठोर बंधनं किंवा नियंत्रणं आली आहेत. या कारणांमुळे नैसर्गिक घटक किंवा रंगद्रव्यांची मागणी वाढत चालली आहे.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रसासनानं म्हणजे यूएसएफडीएनं 2021 मध्ये गोकर्णाच्या फुलाला खाद्यपदार्थांमधील घटक (फूड ॲडिटिव्ह) म्हणून वापरण्यास परवानगी दिली.
मात्र, 2022 मध्ये युरोपियन फूड सेफ्टी ऑथोरिटीनं (ईएफएसए) या फुलाच्या वापराबाबत सुरक्षिततेसंबंधी चिंता व्यक्त केली.
युरोपियन युनियन आणि युके या दोघांनी गोकर्णाच्या फुलाचं वर्गीकरण 'नवीन' खाद्यपदार्थ म्हणून केलं आहे. याचा अर्थ त्याच्या व्यापक स्वरुपातील वापरासाठी अद्याप मंजूरी मिळणं बाकी आहे.
भारतात या फुलांच्या व्यवसायाबाबत असलेली आव्हानं
मात्र असं असूनही, भारतीय व्यावसायिक या फुलांच्या व्यवसायात मोठी संधी दिसते आहे आणि त्यांना यासंदर्भात भारताची बाजारपेठ विकसित करायची आहे.
रेड्डी म्हणतात, "या पिकाकडं अजूनही व्यावसायिक वस्तूऐवजी, अंगणातील शोभेची वस्तू किंवा वैद्यकीय वनस्पती म्हणून पाहिलं जातं. याबाबत अजूनही बाजारात संघटित किंवा शिस्तबद्ध, स्पष्ट आकलन नाही. सरकारकडून याचं वर्गीकरण करण्यात आलेलं नाही."
"तसंच किंमत ठरवणारी कोणतीही प्रमाणित यंत्रणा नाही. यामुळे याच्या उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल शेतकऱ्यांना अनिश्चितता वाटते."
गोकर्णाच्या फुलांच्या उत्पादनाची मानकं उंचावण्यासाठी त्या शेतकऱ्यांबरोबर काम करत आहेत.
आम्ही उत्तर प्रदेशातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या एका कटिबद्ध गटाबरोबर काम करत आहोत. यात मोठ्या संख्येनं महिला शेतकरी आहेत.
"आम्ही त्यांच्याशी औपचारिक करार केले आहेत...आम्ही त्यांना या फुलांची सर्वोत्तम शेती करण्यासाठीच्या पद्धती, सिंचन व्यवस्थापन आणि पिकानुरुप विशिष्ट तंत्र यावरील मार्गदर्शनासह सर्वसमावेशक कृषीशास्त्रासाठी सहाय्य उपलब्ध करून देतो," असं त्या म्हणाल्या.
मोठ्या व्यावसायिक संधी
भारतातील इतरांनीही या फुलांबाबतची व्यावसायिक संधी ओळखली आहे.
"जेव्हा तुम्ही हे फूल गरम पाण्यात टाकता, तेव्हा ते निळं होतं. तुम्ही जेव्हा त्यात लिंबू पिळता, तेव्हा ते जांभळ्या रंगाचं होतं. ही एक जादूच असते," असं नितेश सिंह म्हणाले. ते दिल्लीच्या अगदी जवळच राहतात.
रेड्डी यांच्याप्रमाणे नितेश सिंह यांनाही वाटलं की या फुलाच्या व्यवसायाला भारतात खूप जास्त संधी आहे.
"हे फूल हजारो वर्षांपासून इथं आहे. मात्र ते एक स्वच्छ, आरोग्यदायी अन्न असू शकतं, हे कोणालाच माहित नव्हतं," असं सिंह म्हणतात.

फोटो स्रोत, Phungjwa Brahma
त्यामुळेच, सिंह यांनी 2018 मध्ये 'ब्ल्यू टी'ची स्थापना केली. भारतातील गोकर्णाच्या फुलांचा वापर करून एक भारतीय ब्रँड विकसित करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र सुरुवातीला गोष्टी अपेक्षेप्रमाणे झाल्या नाहीत.
ते पुढे म्हणाले, "सुरुवातीला आम्हाला फुलं आयात करावी लागली. कारण आम्हाला भारतात चांगल्या गुणवत्तेची फुलं मिळाली नाहीत. इथल्या फुलांना कमी पाकळ्या होत्या. उन्हात वाळवल्यानंतर काहीच शिल्लक राहत नव्हतं."
"आम्हाला अशा फुलांची आवश्यकता होती, ज्यात अधिक रंगद्रव्य असेल, अधिक पाकळ्या असतील, आणि वाळवल्यानंतर ज्यांचा रंग टिकून राहील."
सुधारित तंत्रातून दर्जेदार आणि अधिक उत्पादन घेण्याचे प्रयत्न
गेल्या 7 वर्षांपासून, उत्पादन वाढवण्यासाठी आणि फुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, सिंह शेतकऱ्यांबरोबर काम करत आहेत.
त्यांनी फक्त 5 शेतकऱ्यांसह सुरुवात केली होती. आता ते देशभरातील 600 शेतकऱ्यांबरोबर काम करतात.
ते म्हणाले, "प्रशिक्षण आणि गुणवत्तेचं नियंत्रण ही सर्वात मोठी आव्हानं आहेत."
फुलं तोडणं, हा या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे. हे काम प्रामुख्यानं महिला करतात.
"महिलांचे हात नाजूक असतात. वनस्पतीला इजा न करता नाजूक फुलं कशी तोडायची हे त्यांना नैसर्गिकरित्याच माहित असतं. त्यामुळे तोडण्यायोग्य फुलं कशी ओळखायची याचं प्रशिक्षण महिलांना दिलं जातं," असं सिंह म्हणाले.
फुलं तोडल्यानंतर, ती वाळवावी लागतात. हे कामदेखील अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं.
"या फुलांना वाळवण्यासाठी तापमान नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. एक चूक आणि त्याचं मूल्य नष्ट होतं," असं ते पुढे म्हणाले.
'ब्ल्यू टी' कंपनीमध्ये फुलं पोहोचण्यापूर्वी शेतकरी काही प्रमाणात फुलं वाळवतात. तिथे फुलांची आर्द्रता तपासली जाते आणि मग पुढील वाळवण्याची प्रक्रिया केली जाते.
"फुलं वाळवायला आम्ही दीर्घ काळ खूप सौम्य तापमानाचा वापर करतो. जर उष्णता खूप जास्त असेल, तर फुलं जळून जातात आणि त्यांचा औषधी गुणधर्म आणि रंग नष्ट होतो," असं सिंह म्हणाले.
या फुलांच्या फायद्यांविषयी अधिक संशोधनाची आवश्यकता
गोकर्णाच्या फुलाच्या आकर्षक रंगाबरोबरच, त्याचे आरोग्यासाठी फायदे आहेत, याचेही काही पुरावे आहेत. मात्र यासंदर्भात आणखी संशोधनाची आवश्यकता आहे.
व्ही सुप्रिया, चेन्नईतील श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.
त्या म्हणतात, "आम्ही जेव्हा यासंदर्भातील साहित्याचा अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा आमच्या लक्षात आलं की गोकर्णाच्या फुलामध्ये प्रचंड व्यवहारपयोगी आणि औषधी गुणधर्म असूनदेखील त्यावर फार कमी संशोधन केंद्रित आहे. उपलब्ध असलेल्या संशोधनामध्ये उंदीर आणि घुशींचा वापर करण्यात आला होता."

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी मधुमेहाच्या पूर्वस्थितीतील (प्री-डायबेटिक) लोकांवर एक छोटा अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांना आढळून आलं की जे लोक गोकर्णाच्या फुलांपासून तयार करण्यात आलेला चहा प्याले, त्यांच्या रक्तातील साखर, तो न प्यायलेल्यांपेक्षा अधिक नियंत्रणात होती.
"गोकर्णाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं गेलं. मात्र आता त्याच्यासंदर्भातील पुरावे समोर येत असल्यामुळे - विशेषकरून मानवावरील चाचण्यांमधून - गोकर्णाच्या आरोग्यासाठीच्या फायद्यांमुळे ती अधिक लोकप्रिय होऊ शकतात," असं सुप्रिया म्हणतात.
पुष्पल बिस्वास यांच्यासह अनेकांच्या आयुष्यात घडला मोठा बदल
पुष्पल बिस्वास यांचं पश्चिम बंगालमध्ये छोटंसं शेत आहे. ब्ल्यू टी कंपनीमुळे त्यांचा गोकर्णाच्या शेतीशी संबंध आला.
"मी पूर्वी भात आणि भाजीपाल्याची लागवड करायचो. मात्र अनेकदा, माझं पीक विकलं जात नसे आणि मला नुकसान सोसावं लागत असे," असं ते म्हणतात.
मात्र गेल्या 7 वर्षांपासून या नव्या पिकामुळे सर्वकाही बदललं आहे.
"या पिकाची लागवड करणं खूप सोपं आहे," असं ते गोकर्णाबद्दल म्हणतात.
"वैज्ञानिक पद्धतींमुळे माझं उत्पादन 50 किलोवरून 80 किलोवर गेलं. त्यातून मला जे पैसे मिळाले, त्यातून मी आणखी शेतजमीन भाड्यानं घेतली. त्यामुळे माझी शेतजमीन वाढली. मग माझं शेतीतील उत्पादन वाढलं. हळूहळू माझं उत्पन्नदेखील वाढलं," असं पुष्पल बिस्वास म्हणाले.
भारतातील काही समुदायांच्या बाबतीत, या फुलानं खरोखरंच मोठा बदल घडवला आहे.
"गेल्या काही वर्षांमध्ये, जवळपासच्या गावांमधील अनेक लोक आमच्यासोबत याची लागवड करू लागले आहेत," असं बिस्वास म्हणाले.
"आता ही फक्त शेती राहिलेली नाही. ते एक नेटवर्क, एक समुदाय आणि एक व्यावसायिक कुटुंबं बनलं आहे," असं ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











