शेवाळ आणि चहापासून तयार होणार 'डिस्पोजेबल' कापड; प्रदूषणमुक्त फॅशन खरंच शक्य आहे?

फोटो स्रोत, Getty Images
आपल्याला दररोज नवनवीन कपडे पुरवणारा फॅशन उद्योग आज जागतिक स्तरावर एक अवाढव्य बाजारपेठ बनला आहे.
आकडेवारीनुसार, या उद्योगात दरवर्षी तब्बल 1.7 ट्रिलियन डॉलर (सुमारे 140 लाख कोटी रुपये) इतकी प्रचंड उलाढाल होते.
मात्र या झगमगाटामागे प्रदूषणाचे काळे वास्तव दडलेले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार, फॅशन उद्योग हा जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर होणाऱ्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनापैकी 8% वाटा एकट्या फॅशन उद्योगाचा आहे.
या प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे 'फास्ट फॅशन'. आजकाल स्वस्त दरात मिळणारे आणि काही वेळा वापरून फेकून दिले जाणारे कपडे घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
यामुळे कपड्यांचे उत्पादन प्रचंड वेगाने वाढत असून, त्याचा थेट परिणाम पर्यावरणाच्या ऱ्हासावर होत आहे.
कपड्याच्या जीवनचक्रातील प्रत्येक टप्प्याचा पर्यावरणावर परिणाम होतो. कापसाच्या पिकावर फवारली जाणारी कीटकनाशकं, पॉलिस्टर तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल, कापड रंगवण्याची प्रक्रिया यासह कारखान्यांसाठी लागणारी वीज असो किंवा लँडफिल्समध्ये (कचरा डेपो) टनांमध्ये फेकल्या जाणाऱ्या कपड्यांच्या कचऱ्यातून होणारे उत्सर्जन असो.
तज्ज्ञ इशारा देतात की, फॅशन उत्पादनाचे आणि उपभोगाचे सध्याचे स्वरूप हे दीर्घकाळ टिकण्यासारखे (शाश्वत) नाही."
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, येथील मटेरियल साइंटिस्ट प्रोफेसर मार्क मियोडोनिक यांनी 'बीबीसी रेडिओ 4' च्या 'इनसाइड सायन्स' कार्यक्रमात बोलताना एका कटू सत्याकडे लक्ष वेधले.
ते म्हणतात की, "जेव्हा तुम्ही 5 पौंड (सुमारे 600 रुपये) किमतीचा टी-शर्ट खरेदी करता, तेव्हा ती त्याची केवळ छापील किंमत असते. पण पृथ्वीला त्यासाठी मोजावी लागणारी वास्तविक किंमत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते."
ते पुढं असंही सांगतात की, "आपल्या अवाजवी खरेदीमुळं वातावरण आणि महासागरांमध्ये जे विनाशकारी बदल घडत आहेत, त्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहोत किंवा आपण ते मान्य करायलाच तयार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
"जर एखाद्या कपड्याची खरी किंमत आकारली गेली, उदा. 500 रुपयांचा टी-शर्ट 4,000 रुपयांना मिळाला, कारण तो बनवताना पृथ्वीला कोणतीही हानी पोहोचवली गेली नाही तर साहजिकच तुमची खरेदी कमी होईल," असे प्रोफेसर मार्क स्पष्ट करतात.
सध्या कपड्यांच्या 'सेकंड-हँड' विक्रीमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यासोबतच, फॅशन उद्योगाचा पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी डिझाइनर्स आता नवनवीन शाश्वत सामग्री आणि प्रगत उत्पादन प्रक्रियांचा शोध घेत आहेत.
सध्या या नवीन सामग्रीचे उत्पादन केवळ छोट्या प्रमाणावर होत असले तरी, भविष्यात हे घटक फॅशन जगताचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
असे बदल घडवून आणू शकणाऱ्या तीन नाविन्यपूर्ण घटक किंवा साहित्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
1. थ्रीडी-प्रिंटेड साहित्य (3D-printed materials)
आपल्याला घरीच शरीराच्या अचूक मापाचे कपडे 'थ्री-डी प्रिंट' करता आले तर? हे ऐकायला एखाद्या स्वप्नासारखं किंवा अशक्य वाटत असलं, तरी भविष्यात हे प्रत्यक्षात घडू शकतं.
प्रोफेसर मियोडोनिक सध्या अशा एका प्रगत तंत्रज्ञानावर काम करत आहेत. कोणत्याही व्यक्तीचे शरीर स्कॅन करून त्याचा डिजिटल आराखडा त्याद्वारे तयार करता येतो. त्यानंतर, या तंत्रज्ञानाद्वारे सिंथेटिक किंवा बायोप्लास्टिक-आधारित साहित्य वापरून लहान साखळीच्या दुव्यांप्रमाणे एक-एक थर तयार करून कपडा 'प्रिंट' केला जातो.
या क्रांतिकारी प्रयोगाबद्दल बोलताना ते म्हणतात, "आपण ज्याला 'कापड' म्हणतो आणि ज्याला 'फॅशन' समजतो, त्या पारंपरिक संकल्पनांच्या सीमा ओलांडणारं असं हे तंत्रज्ञान आहे."
नायकी (Nike), न्यू बॅलन्स (New Balance), आदिदास (Adidas) आणि बॅलेन्सीयागा (Balenciaga) यांसारख्या नामवंत ब्रँड्सनी आधीच ३डी-प्रिंटिंगचे यशस्वी प्रयोग केले आहेत.
फॅशन क्षेत्रात 3डी-प्रिंटिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, याद्वारे ग्राहकांच्या पसंतीनुसार 'कस्टम-मेड' वस्तू तयार करता येतात. त्यामुळं कापडाचा अपव्यय किंवा गरजेपेक्षा जास्त उत्पादन होण्याचा धोका राहत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रक्रियेत वापरले जाणारे 'बायोप्लास्टिक्स' हे मका किंवा ऊसाच्या अर्कापासून बनवले जातात. विशेष म्हणजे, या कपड्यांचा वापर संपल्यानंतर त्यांचे औद्योगिक पद्धतीने खतात रूपांतर करणे शक्य आहे.
या तंत्रज्ञानाचे इतरही अनेक क्रांतिकारी फायदे आहेत.
प्रोफेसर मियोडोनिक सध्या या 3डी-प्रिंटेड सामग्रीमध्ये सेन्सर्स आणि मोशन डिव्हाइसेस बसवण्यावर काम करत आहेत. याचा उपयोग हालचालींवर मर्यादा असलेल्या किंवा दिव्यांग व्यक्तींना त्यांचे अवयव अधिक सुलभतेने हलवण्यासाठी होऊ शकेल.
या कल्पनेचे स्वरूप स्पष्ट करताना ते सांगतात, "समजा, तुम्हाला खुर्चीवरून सहज उठणे शक्य होत नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी असे कापड (फॅब्रिक) तयार करू शकतो जो त्या क्षणी तुमच्या स्नायूंना आधार देण्यासाठी घट्ट होईल. एकदा तुम्ही उभे राहिलात की ते पुन्हा सैल होईल, म्हणजे तुम्हाला सहजपणे चालता येईल."
ते पुढे म्हणतात, "आम्ही सध्या पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या आणि पाठीच्या गंभीर समस्या असलेल्या लोकांशी संवाद साधत आहोत. त्यांच्यासाठई हे तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं गेम-चेंजर ठरू शकतं."
2. कोम्बुचा लेदर (Kombucha Leather)
कोम्बुचा हे चहा आणि साखर आंबवून बनवलेले एक पेय असून ते पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या बॅक्टेरियासाठी ओळखले जाते. मात्र, आता डिझाइनर्स या पेयाच्या उप-उत्पादनाचा वापर करून कपडे बनवण्याचे प्रयोग करत आहेत.
हे पेय साधारण तीन आठवडे उकळवून ठेवल्यास, त्या द्रव्याच्या वरच्या थरावर बॅक्टेरियाचा एक पातळ पापुद्रा किंवा पडदा तयार होतो.
युकेमधील मँचेस्टर युनिव्हर्सिटीतील टेक्सटाईल टेक्नॉलॉजी तज्ज्ञ डॉ. जेन वुड सांगतात की, "तुम्ही तो पडदा काढून घेऊ शकता. तो फक्त पाण्याने स्वच्छ धुवून वाळवला की तुम्हाला चामड्यासारखी दिसणारा आणि भासणारा एक घटक मिळतो."

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. वुड यांच्या मते, कोम्बुचा लेदर हे गाई-गुरांच्या पालनापेक्षा अधिक पर्यावरणपूरक तर आहेच पण ते 'घर्षणरोधक' देखील आहे. विशेष म्हणजे, मोटारसायकलला वापरल्या जाणाऱ्या लेदरपेक्षाही हे अधिक मजबूत आणि टिकाऊ असू शकलं.
डॉ. वूड असंही सांगतात की, "हे साहित्य पूर्णपणे विघटनशील आहे. तुम्ही ते खताच्या कुंडीत टाकलं तर अवघ्या दोन आठवड्यांत त्याचं पूर्णपणे मातीत रूपांतर होईल."
कोम्बुचा लेदरमध्ये नैसर्गिकरित्या जलरोधक गुणधर्म नसतात, त्यामुळं पावसाळ्यात वापरण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय नाही. मात्र, नैसर्गिक तेल किंवा 'मधमाशांचे मेण' लावून हे लेदर वॉटरप्रूफ बनवता येऊ शकतं.
तसेच, संशोधक आता कापड उद्योगासाठी बुरशी किंवा जीवाणू यांसारख्या सूक्ष्मजीवांचा वापर करून नैसर्गिक रंग कसे तयार करता येतील, यावरही काम करत आहेत. कापड रंगवण्याची ही पद्धत सध्याच्या रासायनिक प्रक्रियेपेक्षा अधिक पर्यावरणपूरक ठरू शकते.
3. समुद्रातील शेवाळ
अनेक जागतिक ब्रँड्सनी आता सेंद्रिय पदार्थांपासून बनवलेल्या आणखी एका नवीन कापडाचा प्रयोग सुरू केला आहे, आणि तो पदार्थ म्हणजे समुद्रातील शेवाळ.
समुद्रातील हे शेवाळ आधी वाळवले जाते, त्यानंतर ते दळून त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेतून वनस्पतीमधील तंतू वेगळे केले जातात आणि त्याचा वापर करून कापड विणले जाते.
नुकतेच स्टेला मॅकार्टनी आणि एच अँड एम (H&M) यांसारख्या प्रसिद्ध फॅशन ब्रँड्सनी 'केल्सन' पासून बनवलेले कपडे बाजारात आणले आहेत. 'केल्सन' हे समुद्रातील 'केल्प' नावाच्या शेवाळामध्ये आढळणाऱ्या बायोपॉलीमरपासून तयार केलेले एक विशेष तंतू आहेत.
दुसरीकडे, अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधक आणि डिझायनर शार्लोट मॅककर्डी यांनी शैवाळापासून (Algae) मिळवलेल्या बायोपॉलीमरचा वापर करून एक 'पारदर्शक रेनकोट' तयार केला आहे.
याच साहित्याचा वापर करून डिझायनर फिलिप लिम यांच्या सहकार्याने एक चमकणारा ड्रेस आणि त्यावरील 'सिक्विन्स' (टिकल्या) तयार करण्यात आल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
समुद्रातील शेवाळाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पूर्णपणे विघटनशील आहे. पॉलिस्टरसारख्या प्लास्टिक आधारित कापडांच्या विरुद्ध, शेवाळापासून बनवलेले कापड पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही.
पॉलिस्टरमधून 'मायक्रोप्लास्टिक्स' बाहेर पडतात आणि ते समुद्र आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. मात्र शेवाळाच्या बाबतीत हा धोका नाही.
समुद्रातील शेवाळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पाण्याखाली वाढताना ते कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. याच्या उत्पादनासाठी कोणत्याही कीटकनाशकांची गरज भासत नाही.
तसेच, या वनस्पतीपासून कापड तयार करण्याची प्रक्रिया पारंपरिक कृत्रिम धाग्यांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रदूषण करणारी आहे.
डॉ. वूड म्हणतात, "सध्याचे बरेच तंत्रज्ञान हे आपण पर्यावरणाप्रती अधिक जबाबदार कसे होऊ शकू, यावर लक्ष केंद्रित करत आहे; जेणेकरून कचरा निर्माण होणार नाही आणि आपण अशा वस्तू तयार करू शकू ज्यांचा वापर झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावणे सहज सोपे असेल."
प्रोफेसर मियोडोनिक यांनी 'फास्ट फॅशन'मधील विसंगतीवर बोट ठेवताना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.
ते म्हणतात की, "जर तुम्ही 'फास्ट फॅशन' कशापासून बनली आहे याचा विचार केला, तर त्यात प्रामुख्याने 'पॉलिस्टर'चा वापर होतो.
मग प्रश्न असा पडतो की, जे कपडे तुम्हाला केवळ काही वेळाच परिधान करायचे आहेत, ते बनवण्यासाठी तुम्ही अशा साहित्याचा (पॉलिस्टरचा) वापर का करता, जे कधीही नष्ट होत नाही आणि जे अनंतकाळ पृथ्वीवर टिकून राहते?
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











