'कचऱ्यामुळं आम्ही भिकेला लागलो'; डम्पिंग ग्राऊंडमुळं कसं बिघडतंय मुंबईकरांचं आरोग्य?

- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
"कांजूरमार्गमधील कचरा डम्पिंगमुळे आम्ही भिकेला लागलो. रोजगार आणि आरोग्यावर खूप परिणाम झालाय. कचऱ्याचा घाण वास येतो आणि केमिकलमुळं मासेमारीवरही परिणाम झालाय. अनेक वर्ष याकडं कोणीही लक्ष देत नाही."
कांजूरमार्ग एकविरा नगरमध्ये राहणारे 64 वर्षांचे काशिनाथ पाटील डम्पिंग ग्राऊंड दाखवत बोलत होते.
मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमुळं आसपासच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणि दैनंदिन जीवन गंभीरपणे बाधित झाल्याचं स्थानिक नागरिक सांगतात.
दुर्गंधी, धूर, केमिकलयुक्त पाणी आणि वाढते आजार यामुळं कांजूरमार्गसह भांडुप, विक्रोळी, पवई आणि मुलुंड परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. या भागात खाडीत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे रोजगार बुडाल्याचं स्थानिक कोळी लोक सांगतात.
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड संरक्षित जंगलात येतं. यामुळं मुंबई हायकोर्टानं ते हटवण्याचे आदेश आधीच दिले होते. मात्र यावर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं स्थगिती मिळवली. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.
तर दुसरीकडे विक्रोळीच्या रहिवाशांनी त्यांना होणाऱ्या त्रासाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावरही नियमित सुनावणी सुरू आहे.
कचऱ्यामुळं उद्भवणाऱ्या समस्यांबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यासंदर्भातील पालिकेच्या उपाययोजनांचा अभ्यास करून ही समिती अहवाल देणार आहे.
दुर्गंधीने सर्वसामान्य त्रस्त
सर्वसामान्य लोकांना भेडसवणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही कांजूरमार्ग आणि विक्रोळी परिसरात पोहोचलो.
दिवसभर वारं कमी असल्यानं दुर्गंधी थोडी कमी असते. पण सकाळी आणि संध्याकाळी अधिक तीव्रतेने येणाऱ्या दुर्गंधीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्याचं स्थानिक सांगतात.

कांजूर गाव परिसरात राहणाऱ्या पन्नास वर्षांच्या कावेरी बालकृष्ण पाटील याबाबत बोलताना म्हणाल्या की, "आम्ही पन्नास वर्षांपासून इथं राहतो. पण काही वर्षांपासून इथं राहणं त्रासदायक झालं आहे. माझ्या मुलाला दुर्गंधीमुळं खूप त्रास होतो. तो सारख्या उलट्या करतो. नियमित उपचार सुरू आहेत. आम्हाला इथं राहावंसं वाटत नाही. पण काय करणार? नाईलाज आहे."
एकविरा नगरमध्ये राहणाऱ्या सुमन म्हसकर यांनीही, या वासामुळं आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगितलं.
"आम्ही, आमची मुलं आजारी पडतो. दर दोन दिवसांनी डॉक्टरकडे जावं लागतं. दिवसभर असणाऱ्या वासामुळं मळमळ, उलट्या होतात, त्वचेच्या आजारांचा त्रास होतो," असं त्या म्हणाल्या.
'रोजगार नाही, कसं जगायचं?'
कचऱ्याच्या या समस्येमुळं दैनंदिन आयुष्याबरोबरच पारंपरिक मच्छीमारी व्यवसायावरही मोठा परिणाम झाल्याचं एकविरा नगरमधील काशिनाथ पाटील सांगतात.
"आम्ही पूर्वी कांजूर, भांडुप आणि नवी मुंबईजवळ खाडीलगत मच्छीमारी करायचो. मात्र, कचरा डम्पिंगचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. केमिकलमुळे मच्छी राहत नाही. आमच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतोय. मच्छीच नसल्यामुळं आता आम्हाला रोजगारही नाही. आम्ही कसं जगायचं?"

कांजूरमार्गसारखीच स्थिती विक्रोळी-कन्नमवार नगर भागातही पाहायला मिळाली. अनेकांनी इथं लाखो रुपये खर्च करुन घरं घेतली. पण, डम्पिंगच्या वासामुळं खासगी आणि म्हाडाच्या उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना दिवसभर दारं-खिडक्या बंद ठेवावी लागतात.
या परिसरातील शुभांगी सावंत यांच्या मते, "दुर्गंधीमुळं मला वर्षभरापासून श्वसनाच्या आजारावर उपचार सुरू आहेत. आधीच असलेला हृदयरोग, बीपी आणि डायबेटिसचा त्रास यामुळं वाढलाय.
औषधं घेतली तरी उलट्या होतात. दारं-खिडक्या बंद ठेवल्या तरी वास येतो. खिडक्यांवर किडेही येतात. अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. इथं मोकळा श्वासच घेता येत नाही."
'आमचा विरोध कायम असेल'
विक्रोळीतील स्थानिक आणि विक्रोळीकर विकास मंचाचे अध्यक्ष संजय येवले यांनी म्हटलं की, "या ठिकाणचं डम्पिंग ग्राऊंड पूर्णपणे अनधिकृत आहे. आम्ही या प्रकरणी न्यायालयात गेलो आहोत. डम्पिंग ग्राऊंड वस्तीच्या आसपास असून लोकांना मोठा त्रास होतोय.
आम्ही सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. न्यायालयाच्या आदेशाचंही इथं पालन होत नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण डम्पिंग ग्राऊंड इथून जाईपर्यंत आमचा विरोध कायम असेल."
'आरोग्य धोक्यात, रुग्णसंख्या वाढते'
डम्पिंग ग्राऊंडमुळं विक्रोळी कन्नमवार नगर भागात रुग्णसंख्या वाढत आहे. विक्रोळी कांजूर पवई डॉक्टर असोसिएशननं पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहून कळवलं आहे.
या परिसरात आरोग्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढल्या असल्याचं, स्थानिक फिजिशियन डॉ. राजेश वैद्य सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "मळमळ, उलटी, स्किन इन्फेक्शन, श्वसनाचे आजार वाढले आहेत. आधीपासून आजार असलेल्या रुग्णांची प्रकृती अधिक बिघडते आहे. डासांमुळे होणारे आजारही वाढले आहेत."
"इथे सल्फर ऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. कधी कधी लागणाऱ्या आगीतून निघणारे वायू आणि संध्याकाळच्या वेळचा धूर अत्यंत त्रासदायक असतो.
आम्ही सर्व डॉक्टरांनी यापूर्वीही प्रशासनाकडे याविरोधात आवाज उठवला आहे. डम्पिंगच्या त्रासामुळे संपूर्ण परिसरातील सर्वसामान्य त्रस्त आहेत," असंही ते म्हणाले.
मुंबईतील सुमारे 85 टक्के कचरा इथे टाकला जातो?
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड सध्या मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावणारं प्रमुख केंद्र आहे. पालिकेच्या अहवालानुसार हे डम्पिंग ग्राऊंड सुमारे 118.41 हेक्टर क्षेत्रात पसरलेलं आहे.
मुंबईत दररोज सुमारे 7000 टन कचरा तयार होतो. त्यापैकी अंदाजे 5900 टन घनकचरा दररोज कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातो. म्हणजेच मुंबईतील सुमारे 85 टक्के कचरा इथे टाकला जातो.
हे डम्पिंग ग्राउंड विक्रोळी, कांजूरमार्ग, नाहूर, पवई, भांडुप परिसर आणि नवी मुंबईच्या खाडीलगतच्या भागाच्या मध्यभागी आहे.

13 वर्षांपासून पर्यावरण संघटना आणि नागरिकांचा लढा
कांजूरमार्ग वगळता कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महापालिकेकडे इतर कोणतंही ठिकाण नाही. गोराई येथील कचरा डेपो बंद केला असून मुलूंडमधील डेपोही बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तर देवनारमधील जागा धारावी प्रकल्पासाठी मागितली आहे. त्यामुळे सध्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी केवळ कांजूरमार्ग हाच पर्याय उपलब्ध आहे.
कांजूरमधील डम्पिंग परिसर मूळचा मिठागरं आणि कांदळवन क्षेत्र होता, असं पर्यावरण अभ्यासक सांगतात. 2008 पासून हे डम्पिंग ग्राऊंड सुरू आहे. याचा करार 2036 पर्यंत असणार आहे. हे डम्पिंग ग्राऊंड चालवण्यासाठी आतापर्यंत पालिकेने सुमारे 4000 कोटी रुपये खर्च केले आहेत.
डम्पिंग ग्राउंड मानवी वस्तीच्या जवळ असून ठाणे खाडी, खारफुटी आणि फ्लेमिंगो अधिवासालगत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वादग्रस्त ठरत आहे.

2013 मध्ये पर्यावरण संघटना वनशक्ती आणि विक्रोळीकर विकास मंच यांनी स्वतंत्रपणे कांजूर डम्पिंग ग्राऊंडविरोधात न्यायालयात दाद मागितली.
डम्पिंग ग्राऊंडची जमीन संरक्षित जंगलाच्या श्रेणीत येते. त्यामुळं पर्यावरण नियमांचं उल्लंघन होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे, असा दावा करत या संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत.
हायकोर्टाची स्थगिती, पण...
जवळपास 12 वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. वनशक्तीने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात मे 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कांजूर डम्पिंग ग्राऊंडची जमीन 'संरक्षित वनजमीन' असल्याचं नमूद केलं.
राज्य सरकारचा हे ठिकाण कचरा टाकण्यासाठी वापराचा निर्णय बेकायदा असल्याचं सांगत न्यायालयाने 119.91 हेक्टर जमिनीचा संरक्षित वनजमीन म्हणून दर्जा कायम ठेवत तीन महिन्यांत जमीन पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.
न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने 11 वर्षांनी ही याचिका निकाली काढली होती. या आदेशामुळे मुंबई महापालिकेपुढे संपूर्ण शहराच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न निर्माण झाला. या निर्णयाविरोधात महापालिका आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश भूषण आर. गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने 1 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात महापालिकेला कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इतर याचिकांवर सुनावणी सुरू
कांजूर डम्पिंग ग्राऊंडसंदर्भातील इतर याचिकांवर मुंबई हायकोर्टात अजूनही नियमित सुनावणी सुरू आहे. विक्रोळीकर विकास मंचाच्या याचिकेत लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.
22 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या सुनावणीत स्वच्छ हवेत श्वास घेणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं. तसेच दुर्गंधी आणि प्रदूषणावर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
न्या. जी. एस. कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने ही परिस्थिती आपत्कालीन असल्याचं नमूद केलं.
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने 21 डिसेंबर रोजी डम्पिंग ग्राऊंडची पाहणी केली असून दुर्गंधीची समस्या असल्याचं आढळल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे.
पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात 2026 रोजी होणार आहे.
या डम्पिंग ग्राऊंडमुळं नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागाशी आणि संबंधित कंत्राटदारांशी संपर्क साधला.
मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











