नवी मुंबई विमानतळावरून आजपासून वाहतूक सुरू, मुंबईतल्या सध्याच्या विमानतळाचं काय होईल?

मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारं एअर इंडियाचं विमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारं एअर इंडियाचं विमान

मुंबईला लवकरच एक नवा कोरा विमानतळ मिळणार आहे. नवी मुंबईतल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं.

आज 25 डिसेंबरपासून या विमानतळावरुन वाहतूक सुरू झाली आहे.

सुरुवातीला इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा या देशातल्या आघाडीच्या विमान कंपन्या लवकरच नवी मुंबईतून उड्डाणं सुरू करणार आहेत.

दोन धावपट्ट्या (रनवे) असलेल्या या विमानतळाचा पहिला टर्मिनल पूर्ण झाला आहे आणि 2036 पर्यंत नवी मुंबईत चार टर्मिनल उभे राहणार आहेत. त्यामुळे मुंबई परिसरातील हवाई वाहतुकीचा मोठा भार हा विमानतळ उचलणार आहे.

पण नवी मुंबईतला हा विमानतळ सुरू झाल्यावर मुंबईतल्या सध्याच्या विमानतळाचं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (CSMIA) काय होईल?

नवी मुंबईतल्या विमानतळावरुन आजपासून वाहतुक सुरू

फोटो स्रोत, Air india Express

मुंबई विमानतळाचं काय होईल?

नवी मुंबईत नवा विमानतळ सुरू होत असला, तरी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद होणार नाही. मात्र या विमानतळावरील हवाई वाहतुकीवर परिणाम नक्कीच होऊ शकतो.

मुंबईच्या विमानतळावर दोन रनवे असले तरी ते एकमेकांना छेदून आहेत. म्हणजे एका वेळी इथे एकच रनवे वापरता येतो, त्यामुळे हा एक 'सिंगल रनवे एअरपोर्ट' आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारं एअर इंडियाचं विमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारं एअर इंडियाचं विमान

अलीकडे हवाई वाहतुकीत झालेली वाढ पाहता मुंबई विमानतळ जगातल्या सर्वात व्यग्र सिंगल रनवे विमानतळांपैकी एक बनला आहे.

हा विमानतळ दिवसाला साधारण 950 विमानांची वाहतूक हाताळतो. म्हणजे दिवसाला साधारण 950 विमानं या विमानतळावरून टेक ऑफ (उड्डाण) किंवा लँडिंग (उतरणे) करतात.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 मधलं एक दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 मधलं एक दृश्य

11 नोव्हेंबर 2023 रोजी तर 24 तासांत 1032 विमानांनी इथे टेक ऑफ किंवा लँडिंग केलं होतं.

म्हणजे तासाला इथे तब्बल 44-46 विमानं ये-जा करतात. कधी कधी तर हा आकडा 50 च्या वर जातो.

म्हणजे साधारण दर सव्वा ते दीड मिनिटाला मुंबईत एक विमान उड्डाण किंवा लँडिंग करतं.

थोडक्यात, जसं मुंबईच्या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होतो, तसंच काहीसं चित्र मुंबईच्या हवाई हद्दीतही असतं.

मुंबईतल्या रनवेवर जाण्यासाठी रांगेत उभी राहिलेली विमानं. जुलै 2023 मध्ये पावसाळ्यातलं दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईतल्या रनवेवर जाण्यासाठी रांगेत उभी राहिलेली विमानं. जुलै 2023 मध्ये पावसाळ्यातलं दृश्य

ही कोंडी एवढी आहे की देशात एकीकडे प्रवासी विमान वाहतुकीची मागणी वाढली असतानाही मुंबईतल्या विमानतळावरची वाहतूक गेल्या सहा-सात वर्षांत फारशी वाढलेली नाही.

कारण वाढीव वाहतुकीचा भार पेलण्याची मुंबई विमानतळाची क्षमताच उरलेली नाही.

त्यामुळेच ही कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबईचा विमानतळ बांधण्यात आला. हा नवा विमानतळ मुंबईची वाढती हवाई वाहतूक सामावून घेऊ शकेल अशी आशा आहे.

येत्या काळात विमान कंपन्या अधिकाधिक वाहतूक नवी मुंबईतून करू शकतात किंवा कार्गो वाहतूक नवी मुंबईत हलवून मुंबईतल्या हवाई वाहतुकीचा भार थोडा हलका केला जाईल. पण दोन्ही विमातळ सुरू राहतील, असंच चित्र सध्या आहे.

नवी मुंबईत विमानतळ पूर्ण होण्यास अवकाश

मुंबईतील विमानतळ व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार सध्या मुंबई विमानतळावरून वर्षाला 5.5 कोटी प्रवासी वाहतूक होते आणि वाढीव 2 कोटी प्रवाशांना सामावून घेण्याची मागणी आहे, जी CSMIA पूर्ण करू शकत नाही.

पण नवी मुंबईचा विमानतळ ही वाढीव मागणी सामावून घेऊ शकतो. तसंच भविष्यात नवी मुंबईचा विमानतळ मुंबई शहर परिसरातला मुख्य विमानतळ बनेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

29 डिसेंबर 2024 रोजी नवी मुंबईत पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग झालं, तेव्हाचा फोटो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 29 डिसेंबर 2024 रोजी नवी मुंबईत पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग झालं, तेव्हाचा फोटो.

नवी मुंबईतील विमानतळावर दोन रनवे असणार आहेत. तसंच सध्या एकच टर्मिनल सुरू होत असला तरी दशकभरात चारही टर्मिनल सुरू होतील, अशी योजना आहे.

सर्व टर्मिनल्सचं काम पूर्ण झालं की हा विमानतळ वर्षाला 9 कोटी प्रवासी हाताळू शकेल.

मात्र टर्मिनल्सचं काम पूर्ण होईपर्यंत तसंच नवी मुंबई विमानतळापर्यंत येजा करण्याच्या सुविधा आणखी सुरळीत होईपर्यंत मुंबई विमानतळच शहरातील हवाई वाहतुकीचं मुख्य केंद्र राहील असं तज्ज्ञांना वाटतं.

मुंबईतल्या टर्मिनल-1 चं काय होणार?

नवी मुंबईतील विमानतळ सुरू झाला की येत्या काही महिन्यांत मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या पुनर्बांधणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

टर्मिनल ही विमानतळावरची अशी जागा असते, जिथे उड्डाणाआधीच्या प्रक्रिया पूर्ण केल्या जातात, प्रवासी तिथे वाट पाहू शकतात आणि तिथल्या गेट्समधून विमानात चढता येतं.

थोडक्यात, रनवे भरपूर असले, तरी एकाच टर्मिनलवरून प्रवासी जाणार असतील, तर त्यात बराच वेळ लागतो. त्यामुळे बहुतांश मोठ्या एअरपोर्टवर अनेक टर्मिनल असतात.

मुंबईतल्या टर्मिनल-2 वरून सर्व आंतरराष्ट्रीय वाहतूक होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईतल्या टर्मिनल-2 वरून सर्व आंतरराष्ट्रीय वाहतूक होते.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या टर्मिनल 1 (T2), टर्मिनल 2 (T2) आणि कार्गो टर्मिनल असे तीन टर्मिनल आहेत.

यातील T1 आणि T2 प्रवासी वाहतूक हाताळतात. सध्या T1 ची क्षमता बरीच कमी आहे आणि इथून केवळ देशांतर्गत वाहतूक होते.

मात्र इमारतीच्या सुरक्षिततेच्या कारणांमुळे या टर्मिनलचा काही सध्या भाग बंद आहे आणि येत्या काही वर्षांत या टर्मिनलची पुनर्बांधणी केली जाणार आहे, अशी माहिती मुंबई विमानतळाची व्यवस्था पाहणाऱ्या अदानी ग्रुपनं दिली होती.

जुहू ते नवी मुंबई

भारतात प्रवासी विमान वाहतुकीची सुरूवात मुंबईतूनच झाली होती. जुहू इथला एअरोड्रोम हा भारतातला पहिला प्रवासी विमानतळ आहे. सध्या हा विमानतळ हेलिकॉप्टर्सच्या वाहुतकीसाठी वापरला जातो.

1932 साली जेआरडी टाटांनी जुहू विमानतळावर भारतातलं पहिलं व्यावसायिक लँडिंग केलं होतं.

त्यानंतर 1930 च्या दशकात दुसऱ्या महायुद्धादरम्यान सांताक्रुझ इथे हवाई दलासाठी रनवे बांधण्यात आला होता, ज्याचा पुढे सहार गावात विस्तार करण्यात आला आणि त्यातूनच मुंबईच्या सध्याच्या विमानतळाचा विकास झाला.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर

भारताच्या आर्थिक राजधानीतली आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक गेली आठ दशकं या एकाच विमानतळावरील, एकाच रनवेवरून होत आली आहे.

तुलनेनं दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन रनवे आहेत. तसंच दिल्लीसाठी गाझियाबाद येथील हिंडन विमानतळही कार्यरत आहे आणि तिसरा विमानतळ नोएडामध्ये लवकरच सुरू होतो आहे.

एरवी जगातील जवळपास सर्व मोठ्या शहरांमध्ये दोन किंवा कधीकधी तीन विमानतळ असतात. न्यूयॉर्क, लंडन, पॅरिसला तर तीन विमानतळ आहेत. आता नवी मुंबईचा विमानतळ सुरू झाला, की या यादीत मुंबईचाही समावेश होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)