महाराष्ट्रातील 'या' भागात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण, काय काळजी घ्यावी?

गर्भाशयाच्या मुखाशी असलेल्या पेशींमध्ये अचानक होणारी वाढ Cervical Cancer साठी कारणीभूत ठरते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गर्भाशयाच्या मुखाशी असलेल्या पेशींमध्ये अचानक होणारी वाढ Cervical Cancer साठी कारणीभूत ठरते.
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सर्व्हायकल कॅन्सरला (Cervical Cancer) मराठीत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणतात. जगभरातील महिलांमध्ये सर्वसाधारणपणे हा कॅन्सर चौथ्या क्रमांकावर आढळतो.

महाराष्ट्रातील नागपूरसह विदर्भ परिसरातील महिलांमध्ये हा कॅन्सर तिसऱ्या क्रमांकावर आढळून येत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी अशा रुग्णांचा अभ्यास केला. यामधून काही निष्कर्ष समोर आले आहेत.

तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या अभ्यासानुसार, सर्वाधिक रुग्ण हे ओरल कॅन्सर 43 टक्के, त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सरचे 28 टक्के, तर सर्व्हायकल कॅन्सरचे 14 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

हे निष्कर्ष नेमके काय आहेत? हे बघण्यासाठी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे काय हे समजून घेऊया.

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे काय?

गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे Cervix किंवा ग्रीव.

हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूला योनीमार्गात उघडतो. याच ठिकाणी महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो.

गर्भाशयाच्या मुखाशी असलेल्या पेशींमध्ये अचानक होणारी वाढ या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरते.

गर्भाशयाच्या मुखाशी होणारा हा कॅन्सर हळूहळू पसरतो. प्रजनन मार्गात हम्युन पेपिलोमा व्हायरसचा (Human Papiloma Virus) संसर्ग होतो.

लैंगिक संबंधातून हा व्हायरस पसरतो ज्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर होतो. याची लक्षणं त्वरीत लक्षात येऊन आपण रुग्णालयात जाऊन चाचण्यांद्वारे निदान केलं तर यावर यशस्वी उपचार केले जाऊ शकतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

14 टक्के महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर

तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे सल्लागार आणि कर्करोगतज्ज्ञ डॉ. बी. के. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयात नागपूरसह विदर्भातील जिल्हे आणि मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून रुग्ण येतात.

जास्तीत जास्त रुग्ण कॅन्सरचं निदान झाल्यानंतर उपचार घ्यायला येतात, तर काही रुग्ण लक्षणं असलेली येतात.

कॅन्सरचं निदान झालं अशा रुग्णांची नोंद रुग्णालयातल्या कॅन्सर रजिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये केली जाते. अशा गेल्या तीन वर्षांतल्या 8327 कर्करोगाच्या रुग्णांचा अभ्यास या रुग्णालयातील तज्ज्ञांनी केला.

यात महिला आणि पुरुष सगळ्यांचा समावेश आहे. यापैकी 1206 महिलांना सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असल्याचं आढळून आलं.

नागपूर आणि विदर्भ परिसरातील महिलांमध्ये हा कॅन्सर तिसऱ्या क्रमांकावर आढळून येत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नागपूर आणि विदर्भ परिसरातील महिलांमध्ये हा कॅन्सर तिसऱ्या क्रमांकावर आढळून येत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 14 टक्के आहे. यात 51-60 वर्षांच्या महिलांमध्ये सर्वाधिक म्हणजे 34 टक्के रुग्णांचा समावेश आहे. यानंतर 31 टक्के महिला 41-50 वयोगटातील, तर 61 ते 70 वयोगटातील महिला रुग्णांचा 20 टक्के समावेश आहे.

विदर्भात कॅन्सर तिसऱ्या क्रमांकावर का?

एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत लैंगिक संबंध ठेवल्यानं हा कॅन्सर होत असल्याचं प्रमुख कारण आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या एका अभ्यासात 80 टक्के लोकांना लैंगिक संबंधातून एचपीव्ही व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

जगभरात हा चौथ्या क्रमांकावर आढळणारा कॅन्सर आहे. पण तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलच्या अभ्यासात हा कॅन्सर तिसऱ्या क्रमांकावर आढळला आहे.

असं का झालं? यामागे काय कारण असू शकतं? याबद्दल आम्ही डॉ. बी. के शर्मा यांच्यासोबत संपर्क साधला.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "आपल्याकडे या कॅन्सरबद्दल जनजागृती नाही हे सगळ्यात मोठं कारण आहे. अद्यापही महिलांना हा कॅन्सर काय असतो हे माहिती नाही. तसेच लस घेऊन या कॅन्सरपासून बचाव करता येतो हे सुद्धा माहिती नाही.

"त्यामुळे नागपूरसह विदर्भ, मध्य प्रदेशातून आमच्याकडे आलेल्या रुग्णांमध्ये या कॅन्सरचं प्रमाण इतकं आढळून आलं असावं. योग्य जनजागृती झाली तर लस देऊन हे प्रमाण कमी करता येऊ शकतं.”

गर्भाशयाच्या मुखाशी असलेल्या पेशींमध्ये अचानक होणारी वाढ Cervical Cancer साठी कारणीभूत ठरते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गर्भाशयाच्या मुखाशी असलेल्या पेशींमध्ये अचानक होणारी वाढ Cervical Cancer साठी कारणीभूत ठरते.

याशिवाय या भागातल्या महिलांमध्ये हा कॅन्सर होण्याची अन्य कारणंही ते सांगतात.

अनेक महिलांना तंबाखू आणि धुम्रपानाची सवय, योनी मार्गाची अस्वच्छता, मासिक पाळीच्या काळात स्वतःची नीट काळजी न घेणे, गर्भनिरोधक गोळ्यांचं दीर्घकाळ सेवन करणं, जास्तीची गर्भधारणा, कमी वयात लैंगिकदृष्ट्या सक्रीय होणे, पोषक असा आहार न घेणे ही सर्व्हायकल कॅन्सर होण्याची कारणं आहेत.

या कर्करोगाची लक्षणं काय आहेत?

गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये मृत्यूही होऊ शकतो. पण, हा कॅन्सर होण्याआधी त्याची काही लक्षणं दिसतात.

महिलांना रजोनिवृत्तीनंतर किंवा मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होणं, मासिक पाळी वारंवार येणं, लैंगिक संबंध ठेवल्यानंतर रक्तस्त्राव होणं, योनीमार्गातून सतत पांढरा द्रव पदार्थ बाहेर पडणं, त्याची दुर्गंधी पसरणं, योनीमार्गात संसर्ग होणं अशी या कॅन्सरची लक्षणं आहेत.

लक्षणं ओळखून लगेच डॉक्टरांना दाखवणं, तसेच मासिक पाळीदरम्यान अतिरक्तस्त्राव होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करावी असं तुकडोजी कॅन्सर हॉस्पीटलच्या रेडीओलॉजी विभागाचे प्रमुख करतार सिंह सांगतात.

हा कॅन्सर होऊ नये, यासाठी महिलांनी काय काळजी घ्यावी?

डॉ. शर्मा सांगतात, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी महिलांनी नियमित व्यायाम करायला पाहिजे. पोषक आहार घ्यायला हवा.

सफरचंद, शतावरी, काळी बीन्स, ब्रोकोली, लसूण, कोबी, सलाद, सोयाबीन, पालक, कांदा याचं सेवन करायला हवं. ते गुणकारी असतं. तसेच एचपीव्ही लसीकरणाद्वारेही हा कर्करोग रोखता येऊ शकतो. पण, महिलांना याबद्दल अधिक माहितीच नाही. लसीसाठी जनजागृती होणं गरजेचं आहे.

HPV लस कॅन्सरपासून कसा बचाव करू शकते?

HPV लस ही 9 प्रकारच्या एचपीव्ही विषाणूंपासून संरक्षण करते. यामध्ये गर्भाशयाच्या, मानेच्या, डोक्याच्या आणि जननेंद्रियांच्या कॅन्सरसाठी कारणीभूत असणाऱ्या व्हायरसच्या प्रकारांपासून ही लस संरक्षण देते.

रिसर्चमधून हे देखील स्पष्ट झालंय की तुम्ही HPV लस घेतकी की त्यानंतर किमान 10 वर्ष तुम्हाला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळतं.

एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे.

लैंगिकदृष्ट्या सक्रीय होण्याआधी, पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना ही लस दिली तर प्रभावी ठरू शकते. कारण, HPV संक्रमण हे लैंगिक संबंधादरम्यान होतं आणि ही लस हा संसर्ग टाळू शकते. एकदा व्हायरसचा संसर्ग झाला तर ही लस काम करत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार या लशीचे एक किंवा दोन डोस दिले जाऊ शकतात. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांना दोन किंवा तीन डोस देण्याच्या सूचनाही जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)