गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं निर्मूलन करणारा पहिला देश ठरेल ऑस्ट्रेलिया

सर्व्हिकल कॅन्सर

फोटो स्रोत, CANCER COUNCIL AUSTRALIA

महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी जगभर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्या अनुषंगाने एक आशेचा किरण म्हणून ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या प्रयत्नांकडे पाहता येईल.

या कॅन्सरच्या समूळ उच्चाटनासाठी ऑस्ट्रेलियात लसीकरण आणि चाचण्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. तेथील संशोधकांच्या मते ही मोहीम यशस्वी झाली तर सर्व्हिकल कॅन्सरचं परिणामकारक निर्मूलन करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरेल. पुढच्या 20 वर्षांत हे लक्ष्य गाठण्याचं उद्दिष्ट आहे.

ऑस्ट्रेलियात 2022पर्यंत हा कॅन्सर 'दुर्मीळ कॅन्सर'च्या श्रेणीत गणला जाईल, असा अंदाज आहे. दर एक लाख व्यक्तींमध्ये सहापेक्षा कमी एवढं प्रमाण असणाऱ्या कॅन्सरला 'दुर्मीळ कॅन्सर' मानलं जातं.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रतिबंधात्मक मोहिमेचं हे यश असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात.

ऑस्ट्रेलियात 2007मध्ये Human Papilloma Virus म्हणजेच HPV विरोधी लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला फक्त मुलींनाच ही लस दिली जायची. काही काळानंतर मुलांचाही त्यात समावेश करण्यात आला.

1991मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय चाचणी मोहीमेचा तो एक भाग बनला.

कॅन्सर काउन्सिल न्यू साउथ वेल्स या स्वयंसेवी संस्थेने गेल्या आठवड्यात The Lancet Public Health Journalमध्ये या नव्या मोहिमेविषयी माहिती दिली.

निर्मूलनासाठीचे प्रयत्न

जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या अहवालानुसार गर्भाशयमुखाचा कॅन्सर हा HPVच्या 'हाय रिस्क' प्रकारच्या विषाणूमुळे होतो. लैंगिक संबंधांतून त्याचं संक्रमण होतं. महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा चौथा क्रमांक लागतो. शिवाय या कॅन्सरमुळे रुग्ण दगावण्याची शक्यताही खूप जास्त आहे. ऑस्ट्रेलियात सध्या एक लाख महिलांमध्ये सात जणींना हा कॅन्सर आहे.

एका अभ्यासानुसार ऑस्ट्रेलियात 2035पर्यंत हा दर एक लाख महिलांमध्ये चार एवढा कमी होईल, असा अंदाज आहे. संशोधकांच्या मते अशावेळी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं संपूर्ण निर्मूलन झालं आहे, असं म्हणता येईल.

मात्र गर्भायश मुखाच्या कॅन्सरचं पूर्णपणे निर्मूलन झालं आहे, असं मानण्यासाठी त्याचं प्रमाण किती असावं, हे जागतिक आरोग्य संघटनेनं अजून ठरवलेलं नाही.

Human Papilloma Virus (HPV)मुळे कॅन्सर होऊ शकतो.

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन, Human Papilloma Virus (HPV)मुळे कॅन्सर होऊ शकतो.

कॅन्सर काउंन्सिल न्यू साउथ वेल्सच्या संशोधक डॉ. मेगन स्मिथ सांगतात, "निर्मूलनासाठीचं प्रमाण कितीही असलं, तरी ऑस्ट्रेलियात या कॅन्सरचं असलेलं कमी प्रमाण आणि आमची प्रतिबंधात्मक मोहीम बघता गर्भाशय मुखाच्या कॅन्सरच्या संपूर्ण निर्मूलनालाचं उद्दिष्ट गाठणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरण्याची शक्यता आहे."

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची प्राथमिक चाचणी करण्यासाठी पॅप सीमर तपासणी (PAP smear examination) करतात. पॅप सीमर म्हणजे गर्भाशयाच्या मुखातून काही पेशी (Cells) काढून त्याची मायक्रोस्कोपखाली तपासणी केली जाते. त्या पेशींची वाढ सामान्यपणे होत नसेल तर ती कॅन्सरची सुरुवात असू शकते.

अशा असामान्यपणे (abnormal) वाढणाऱ्या पेशी दिसल्यास त्याची अधिक खोल तपासणी करून कॅन्सर आहे की नाही, त्याचा टप्पा कोणता याची माहिती मिळवली जाते.

मात्र ऑस्ट्रेलियात गेल्यावर्षीपासून या पॅप सीमर तपासणीहूनही अधिक प्रभावी अशी HPV सर्वाइकल स्क्रिनिंग टेस्ट केली जाते. यात गर्भाशयमुख कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणाऱ्या हाय रिस्क HPV या विषाणूची बाधा झाली आहे की नाही, हे अधिक स्पष्ट आणि प्रभावीपणे कळतं.

कॅन्सर, वैद्यकशास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

संशोधकांच्या मते दर पाच वर्षांत एकदा कराव्या लागणाऱ्या या नव्या चाचणीमुळे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं प्रमाणे 20 टक्क्यांनी कमी होऊ शकतं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगात गर्भाशय मुखाचा कॅन्सर असलेल्या दहापैकी नऊ महिलांचा मृत्यू हा कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये होतो.

Human Papilloma Virus (HPV) म्हणजे काय?

- एकाच प्रकारच्या विषाणूंना HPV म्हटलं जातं. जवळपास शंभर प्रकारचे HPV आहेत.

- अनेक महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी HPV संसर्ग झालेला असतो. मात्र त्यातल्या बहुतांश महिलांवर या संसर्गाचा कुठलाच दुष्परिणाम होत नाही.

- बहुतांशी महिलांमध्ये या HPV संसर्गाची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत आणि हा संसर्ग आपोआप बरा होता. मात्र काही स्त्रियांमध्ये वारंवार हा संसर्ग होत असल्यास गर्भाशय मुखासंबंधीचे आजार होऊ शकतात.

कॅन्सर, वैद्यकशास्त्र

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

- काही विशिष्ट प्रकारच्या HPV संक्रमणामुळे कॅन्सर होऊ शकतो. म्हणून त्यांना हाय रिस्क म्हणजे अतिशय धोकादायक प्रकारचे HPV म्हणतात.

- इतर कमी धोकादायक असलेल्या HPV विषाणू संसर्गामुळे जननेंद्रियांवर गाठ किंवा चामखिळीसारखे प्रकार दिसू शकतात.

- जवळपास सर्वच गर्भाशयमुखाचे कॅन्सर (99.7%) हे हाय रिस्क HPV संसर्गामुळे होतात.

- HPV लस 80 टक्के गर्भाशयमुख कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या चार प्रकारच्या HPV विषाणूंना प्रतिबंध करते.

(स्रोत : NHS Choices)

हे वाचलत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)