Cancer : केमोथेरपी म्हणजे काय? कॅन्सर रुग्णाला त्याचा किती फायदा होतो?

फोटो स्रोत, Getty Images
कॅन्सरच्या पेशींना मारून टाकण्यासाठी तसंच कॅन्सर शरीराच्या अन्य भागात पसरू नये यासाठी उपयोगात येणारी औषधप्रणाली म्हणजे केमोथेरपी.
वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार म्हणून एकच उपचारपद्धती नाही. कारण वेगवेगळ्या कॅन्सर पेशी वेगवेगळ्या औषधांना वेगवेगळा प्रतिसाद देतात.
काहीवेळेला आजारावर नियंत्रणाचा सर्वोत्तम उतारा म्हणून आठ वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचं एकत्र मिश्रण केलं जातं. उपचारांची परिणामकारकता वाढावी यासाठी डॉक्टर मंडळी सातत्याने औषधांची नवनवी समीकरणं शोधत असतात.
केमोथेरपी दुष्परिणामांसाठी कुप्रसिद्ध आहे. मात्र अत्याधुनिक केमोथेरपीमध्ये दुष्परिणामांचं प्रमाण कमी झालं आहे.
केमोथेरपीचा वापर कधी केला जातो?
केमोथेरपीची औषधं थेट रक्तात दिली जातात, त्यामुळे संपूर्ण शरीरात त्यांचा वावर असतो. कॅन्सर पेशींवर ही औषधं हल्ला चढवतात.
कॅन्सरच्या पेशी शरीराच्या एकापेक्षा जास्त भागात विखुरल्या आहेत हे लक्षात आल्यानंतरच डॉक्टर केमोथेरपीचा विचार करतात.
कॅन्सरच्या पेशी शरीराच्या एका भागात वाढतात तर काही मुख्य ट्यूमर अर्थात गाठीपासून विलग होऊन शरीराच्या अन्य भागात जाऊ शकतात. यकृत आणि फुप्फुसात जाऊन कॅन्सरच्या पेशी वाढतात.
सर्जन मुख्य ट्यूमर आणि त्याच्या जवळच्या पेशी शस्त्रक्रियेद्वारे कापून काढू शकतात.
कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिओथेरपीचा वापर केला जातो. रेडिएशन शरीरातल्या एका छोट्या भागातल्या कॅन्सर पेशी नष्ट करू शकतं. त्याचा वापर मर्यादित ठेवावा लागतो अन्यथा सुदृढ पेशींनाही हानी पोहोचते.

फोटो स्रोत, Science Photo Library
कॅन्सरची मुख्य गाठ काढल्यानंतर, या रोगाचा अंश राहिलेल्या पेशींना दूर करण्यासाठी केमोथेरपीचा वापर केला जातो.
ल्युकेमियासारख्या कॅन्सरच्या उपचारांमध्ये केमोथेरपीचा उपयोग करावा लागतो. कारण यात कॅन्सरच्या पेशी संपूर्ण शरीरभर पसरलेल्या असतात.
काहीवेळेला ट्यमूरचा म्हणजेच गाठीचा आकार कमी व्हावा यासाठी केमोथेरपीचा प्रयोग केला जातो. जेणे करून सर्जनला शस्त्रक्रिया करणं सोपं जातं.
ज्या रुग्णांचा कॅन्सर बरा होणारा नाही त्यांच्या शरीरातील आजाराची लक्षणं केमोथेरपीमुळे कमी होऊ शकतात.
केमोथेरपीचं स्वरूप काय असतं?
पारंपरिक स्वरूपानुसार केमोथेरपीत वापरलं जाणारं रसायन असून हे कॅन्सर पेशींसाठी अत्यंत विषारी असतं. कॅन्सर पेशींना मारण्याची क्षमता या रसायनात असते.
याला सायटोटॉक्सिक केमिकल म्हटलं जातं. केमोथेरपीचं प्राथमिक स्वरूप मस्टर्ड गॅसपासून तयार करण्यात आलं होतं. पहिल्या महायुद्धादरम्यान याचा वापर रासायनिक अस्त्र म्हणून करण्यात आला होता.
अर्थात कॅन्सरच्या पेशींसाठी जीवघेणं असणारं हे रसायन शरीरातील निरोगी पेशींना धोकादायक ठरू शकतं. निरोगी पेशींचं शरीरात संवर्धन होणं महत्त्वाचं असतं.

फोटो स्रोत, Science Photo Library
जास्तीत जास्त कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करतील आणि कमीत कमी निरोगी पेशी मरतील, अशी केमोथेरपी शोधणं हेच खरं कौशल्य आहे.
कॅन्सरच्या पेशी आणि त्याच्या सभोवतालच्या निरोगी पेशी ओळखू शकेल असं रसायन शोधण्यात डॉक्टरांना दिवसेंदिवस चांगलं यश मिळतं आहे.
पेशी ज्या वेगाने नव्याने निर्माण होतात किंवा त्यांचं विभाजन होतं यावरून निरोगी आणि कर्करोगाच्या पेशींमध्ये मूलभूत फरक असतो.
अन्य पेशींपेक्षा कॅन्सरच्या पेशी वेगाने वाढतात. म्हणूनच ट्यमूर किंवा गाठी तयार होतात. त्या शरीरात तयार होणाऱ्या नैसर्गिक संप्रेरकांना कमी किंवा जास्त प्रतिसाद देऊ लागतात.
कॅन्सर पेशींची वाढ खुंटावी यासाठी केमोथेरपीचे काही प्रकार काम करतात.
बाह्य आक्रमणापासून रोखण्यासाठी शरीरात असलेली प्रतिकारक्षमता यंत्रणा कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करत नाहीत कारण ही यंत्रणा कॅन्सर पेशींना परकं मानत नाही.
बचाव यंत्रणा कॅन्सर पेशींना परकं मानून त्यांच्यावर आक्रमण करेल अशी पद्धतीनेही केमोथेरपीचे काही प्रयोग सुरू आहेत.
केमोथेरपीचे उपचार कसे होतात?
केमोथेरपी इंजेक्शनद्वारे थेट रक्तवाहिन्यांमध्ये देण्यात येते.
औषध शरीरात सहजतेनं आवश्यक तिथे पोहोचावं यासाठी सलाईन ड्रिपद्वारेही केमोथेरपी देण्यात येते. असं केल्याने रक्तवाहिनीला धक्का न लावता उपचार होतात.
एखाद्या रुग्णाला उपचारांसाठी सातत्याने वेगवेगळ्या औषधांची आवश्यकता असेल तर त्याला किंवा तिला दरवेळी नवं इंजेक्शन घ्यायला लागू नये म्हणून रक्तवाहिनीमध्ये ट्यूब बसवण्यात येते. ट्यूब सीरिंजला जोडलेली असते. छातीतल्या रक्तवाहिनीत अशी जोडणी केली जाते त्याला 'हिकमॅन लाइन' असं म्हणतात.

फोटो स्रोत, Science Photo Library
कॅन्सरग्रस्त भागाला केमोथेरपी दिली तर दुष्परिणामांची शक्यता कमी होते.
मूत्राशयाच्या कॅन्सरसाठी, केमोथेरपी थेट त्या पेशींमध्ये दिली गेल्यास परिमाण अधिक होतो. केमोथेरपीच्या सायकल्स किती द्यायच्या म्हणजेच त्याच्या उपचारांची वारंवारता कॅन्सरच्या प्रकारावर अवलंबून आहे. काही रुग्णांना पंधरा दिवसात अनेकदा दिली जाते. काहींना अनेक महिन्यांमध्ये टप्याटप्याने दिली जाते.
केमोथेरपीचे दुष्परिणाम काय?
झपाट्याने वाढणाऱ्या तसेच विघटित होणाऱ्या पेशींवर आक्रमण करण्यासाठी केमोथेरपीचा उपयोग होत असल्याने, त्याजवळच्या निरोगी पेशींनाही बाधा पोहोचते.
उदाहरणार्थ केसांची निर्मिती करणाऱ्या पेशींवर त्यांचा विपरित परिणाम होतो. म्हणूनच केमोथेरपीदरम्यान केसगळतीचा त्रास होतो. मात्र केमोथेरपीचे उपचार बंद झाल्यावर केस पुन्हा येतात.
वेगाने वाढणाऱ्या पेशी पोट आणि आतड्यांमध्ये आढळतात. केमोच्या वेळेस कॅन्सरच्या बरोबरीने या दोन अवयवांमधल्या निरोगी पेशींवरही आक्रमण होतं. यामुळे भूक लागेनाशी होते, अतिसाराचा त्रास होतो.
हे रोखण्यासाठीही औषधं आहेत. औषध घेण्याच्या वेळेस पोट भरलेलं असू नये यासाठी वेळेवर जेवण हा उपाय काही रुग्णांसाठी प्रभावी ठरतो.
रक्तपेशींनाही केमोथेरपीचा फटका बसतो.

फोटो स्रोत, Science Photo Library
ऑक्सिजनचं वहन होण्यासाठी लालपेशी आवश्यक असतात. अन्य रक्तपेशी जंतूसंसर्ग होऊ न देण्यादृष्टीने महत्त्वाच्या असतात.
म्हणूनच केमोथेरपींना सामोरे जाणाऱ्या रुग्णांना इन्फेक्शनचा त्रास होतो. त्याच्याशी मुकाबला करणंही अवघड असतं.
केमोथेरपीचे उपचार घेणाऱ्या रुग्णांची वारंवार रक्तचाचणी केली जाते जेणेकरून शरीरात कोणत्या पेशी किती प्रमाणात आहेत हे समजू शकतं. याला फुल ब्लड काऊंट म्हटलं जातं.
केमोथेरपीचे उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रचंड थकवा जाणवतो. केमोथेरपीमुळे पुरुष तसेच स्त्रीच्या लैंगिक क्षमतेवरही परिणाम होतो. आता पुरुष त्यांचे वीर्य तर महिला स्त्रीबीज गोठवून त्याचं संवर्धन करू शकतात. नंतर टेस्ट ट्यूब बेबीसाठी याचा वापर होऊ शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








