नवं संशोधन : वाढत्या वजनामुळे वाढतोय कॅन्सर!

फोटो स्रोत, Getty Images
यूकेमध्ये एका मोठ्या अभ्यासाअंती प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, अतिस्थूल आणि जास्त वजन असलेल्यांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे, तर धूम्रपानामुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण घटतं आहे.
अभ्यासात विचार केलेल्या कॅन्सरग्रस्तांपैकी एक तृतीयांश जणांचा कॅन्सर टाळता आला असता. वजन जास्त नसतं तर कॅन्सर रोखता आला असता अशांची संख्या जवळपास १ लाख ३५ हजार आहे, अशी माहिती कॅन्सर रिसर्च यूके या संस्थेनं दिली.
वाढत्या वजनामुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण ६.३ टक्के इतके झालं असून २०११मध्ये हेच प्रमाण ५.५ टक्के होते. तर, धूम्रपानामुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण घसरलं असल्याचंही या संस्थेनं केलेल्या संशोधनात आढळून आलं आहे.
अतिस्थूलपणाचा आरोग्याला असलेल्या धोक्यापासून वेळीच सावध होण्याची गरजही या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
चांगलं आरोग्य ठेऊन रोखता येऊ शकणाऱ्या कॅन्सरचं सर्वाधिक प्रमाण स्कॉटलंडमध्ये ४१.५ टक्के, उत्तर आयर्लंड ३८ टक्के, वेल्स ३७.८ टक्के, इंग्लंडमध्ये ३७.३ टक्के इतके आहे, असं या संशोधनात दिसून आलं.
संपूर्ण यूकेमध्ये धूम्रपानामुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण हे पूर्वी सर्वांत जास्त होते. हा कॅन्सर टाळता येणाऱ्या कॅन्सरपैकी एक आहे. सध्या मात्र, या कॅन्सरचं प्रमाण घटलं असून ते १५.१ टक्के झालं आहे. २०११मध्ये हेच प्रमाण १९.४ टक्के होतं. तसंच, पूर्वी वाढत्या वजनामुळे कॅन्सर होणं हे दुसऱ्या क्रमांकावर तर सूर्याच्या अतिनील किरणांमुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण हे तिसऱ्या क्रमांकावर होतं.
एखादी व्यक्ती स्थूल आहे की नाही, हे ठरवण्याची सर्वमान्य पद्धत म्हणजे बॉडी मास इंडेक्स होय. आपल्या उंचीसाठी आपलं वजन योग्य आहे की नाही, हे यावरून ठरवलं जातं.
BMI जर 25पेक्षा जास्त असेल तर तुमचं वजन जास्त आहे आणि जर तुमचा BMI 30पेक्षा जास्त असेल तर तुम्ही स्थूल असता. कार्लाईल इथल्या जेनेट बोक यांना वयाच्या 51व्या वर्षी गर्भशायचा कॅन्सर असल्याचं निदान झाले. मासिक पाळी थांबल्यानंतर 4 वर्षांनंतर त्यांना पुन्हा रक्तस्राव सुरू झाला, त्यानंतर त्यांना कॅन्सर असल्याचं निष्पन्न झालं.

फोटो स्रोत, CANCER RESEARCH UK
त्यांच्यावर गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. तुमचं वजन जास्त असल्यानं तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका वाढला, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यावेळी त्यांचं वय 127 किलो होतं.
जेनेट म्हणतात, "या सगळ्यांना मी जबाबदार आहे, असं मला वाटू लागलं. जर मी माझी लाईफस्टाईल चांगल्या पद्धतीने निवडली असती तर मी या स्थितीत आले नसते."
जेनेटला नातवंडं आहेत. त्यांनी आता बरंच वजन कमी केलं आहे.
कॅन्सर रीसर्च यूकेच्या माहितीनुसार अल्ट्राव्हॉयेलेट किरणांच्या संपर्कामुळे एका वर्षात 13,600 इतक्या लोकांना कॅन्सर झाला. एकूण कॅन्सरमध्ये हे प्रमाण 3.8 टक्के इतकं आहे.
कॅन्सर होण्यात साहाय्यभूत होणारी पण टाळता येण्यासारखी काही कारणं आहेत. त्यामध्ये दारू पिणं आणि अत्यल्प प्रमाणात तंतूमय पदार्थांचं सेवन यांचा समावेश आहे.
पण एकूण विश्लेषणात असं लक्षात आलं आहे की, टाळता येऊ शकणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण 42.7 टक्केवरून कमी होऊन 2011मध्ये 37.7 टक्के इतकं झालं आहे.
कॅन्सर रीसर्च यूकेच्या माहितीनुसार धूम्रपान टाळण्याच्या संदर्भातील धोरण उपयुक्त ठरत आहे, पण स्थूलतेवर अधिक काम करणं आवश्यक होती.

फोटो स्रोत, Getty Images
कॅन्सर रीसर्च यूकेमधील तज्ज्ञ प्रा. लिंडा बॉल्ड म्हणतात, "स्थूलता हे फार मोठं संकट आहे आणि आपण जर काहीच केलं नाही तर परिस्थिती अधिकच बिकट होईल."
"यूके सरकारने धूम्रपान विरोधात जनजागृती करण्यात जे यश मिळवलंय त्यानंतर आता स्थूलतेशी संबंधित कॅन्सरवरही काम केलं पाहिजे," असं त्या म्हणाल्या. रात्री 9 पूर्वी जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी घालणं हा एक महत्त्वाचं आहे, असं त्या म्हणाल्या.
लंडनमधील इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चमधील जीवशास्त्रज्ञ प्रा. मेल ग्रीव्हज म्हणतात, "हा अभ्यास महत्त्वाचा असून अनेक प्रकारचे कॅन्सर टाळता येतात या कल्पनेचा पुरस्कार करणारा हा अभ्यास आहे."
पण त्यांचं असंही म्हणणं आहे की, स्थूलता किंवा कमी प्रमाणात तंतुमय पदार्थ खाण्याने कॅन्सर होऊ शकतो, ही कल्पना अगदी वरवरची वाटते आणि त्यावर अधिक अभ्यास होणं आवश्यक आहे.
ग्रीव्हज म्हणतात, "जर स्थूलता टाळता आली तर कॅन्सरच्या प्रमाणात किती घट होईल हे निश्चित नाही, पण कॅन्सरचा धोका कमी होईल हे नक्की."
ते म्हणतात, "सध्याच्या तरुणांमध्ये स्थूलतेचं प्रमाण लक्षात घेतलं तर धूम्रपानासारखंचे ते एक सामाजिक आव्हान असून ते वैद्यकीय क्षेत्राच्या सीमेपलीकडंचं आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








