RRR : राम चरण-NTRच्या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी का ट्रेंड होतीये?

फोटो स्रोत, Social Media
बाहुबली फेम दिग्दर्शक राजामौली यांचा बहुचर्चित RRR हा चित्रपट 25 मार्चला प्रदर्शित होत आहे. ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे.
एकीकडे RRRच्या प्रदर्शनाची उत्सुकता असतानाच, दुसरीकडे बुधवारी (23 मार्च) सोशल मीडियावर RRRवर बंदी घालण्याची मागणी सुरू झाली आहे.
कर्नाटकमध्ये RRRवर बंदी घालण्यात यावी यासाठी #BoycottRRRinKarnataka हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागलाय. कर्नाटकमध्ये या चित्रपटाविरोधात एवढा रोष निर्माण होण्याचं कारण काय आहे?
RRR 25 मार्चला जगभरात प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा तेलुगू, तमीळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये रिलीज होतोय. मात्र, कन्नडमधील RRRला कर्नाटकात मिळालेल्या स्क्रीन्सची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांना कन्नड भाषेतील सिनेमाची तिकिटंच मिळत नाहीयेत. त्यांना तेलुगू व्हर्जनचेच शो अधिक प्रमाणात दिसत आहेत आणि त्यामुळेच कन्नड प्रेक्षकांचा रोष सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
दिग्दर्शक राजामौली यांना टॅग करून काही प्रेक्षकांनी हा चित्रपट कन्नडमध्येही प्रदर्शित करू या आश्वासनाची त्यांना आठवण करून दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter
"आश्वासन पाळलं गेलं नाहीये. कन्नडमध्ये एकही शो नाहीये. आमचा सिनेमाला विरोध नाहीये. केव्हीएन प्रॉडक्शननं ज्या पद्धतीने वितरण केलंय त्याला आमचा विरोध आहे," असं एका युझरनं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
"RRR वर कर्नाटकात बंदी घाला. हा चित्रपट कन्नडमध्ये बहुतांश ठिकाणी नाहीये. तिकिटांचे दरही दुप्पट-तिप्पट आहेत. प्रेक्षकांची लूट केली जातीये," असं श्रीधर एच नावाच्या युझरनं म्हटलं आहे.
काही प्रेक्षकांनी तिकिट बुकिंग वेबसाइटचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत. त्यात केवळ तेलुगू आणि हिंदी भाषेतल्याच सिनेमाची तिकिटं उपलब्ध होत असल्याचं म्हटलंय.

फोटो स्रोत, Social Media
"आमच्या कुटुंबात एकूण 12 लोक आहेत. आम्ही तेलुगू किंवा तमीळमध्ये टीव्हीवरही सिनेमा पाहात नाही. जर सिनेमा लोकप्रिय असेल आणि कन्नडमध्ये असेल, तर मात्र आम्ही नक्की पाहतो. तुम्ही दिल्लीत हिंदी RRR रिलीज करताय, मग कर्नाटकाचं काय?"

फोटो स्रोत, Twitter
काही तेलुगू प्रेक्षकांनी या वादात उडी घेत केजीएफ आणि आरआरची तुलनाही केली आहे.
एका युजरनं म्हटलं आहे की, केजीएफ2 सुद्धा तेलुगू भाषक राज्यांत रिलीज होत आहे. याची आठवण ठेवा आणि हा सगळा वाद निर्माण करा. कर्नाटकमधल्या डिस्ट्रीब्युटरला विचारा की, कन्नड व्हर्जनला स्क्रीन्स का नाहीयेत. रामचरण, एनटीआर आणि राजामौलींना दोष देऊ नका.

फोटो स्रोत, Twitter
अर्थात, दुसऱ्या एका युजरनं मात्र केजीएफ 2ची तुलना RRR सोबत करू नका. जसं तुम्हाला तुमच्या भाषेत सिनेमा पाहायला आवडतं, तसंच आम्हालाही आमच्या कन्नड भाषेत डब केलेले चित्रपट पाहायला आवडतात. जर तुम्ही तुमच्या राज्यामध्ये केजीएफ2 कन्नड भाषेत पाहिला असेल तरच बोला.

फोटो स्रोत, Twitter
काही युजर्सनी असंही म्हटलं आहे की, आम्हाला कन्नडमध्ये RRR पाहायचा आहे. त्यामुळे Boycott RRRपेक्षाही We want RRR हे महत्त्वाचं आहे.
RRRच्या टीमने या प्रकरणाची दखल घेत आलेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी एक विशेष घोषणा केली आहे. कर्नाटकात 'RRR' चे वितरक असलेल्या केव्हीएन प्रॉडक्शन यांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या कन्नड व्हर्जन जास्तीत जास्त स्क्रीनवर पोहोचवण्यासाठी त्यांची संपूर्ण टीम मेहनत घेत आहे.
"उद्यापर्यंत कन्नड व्हर्जन जास्तीत जास्त स्क्रीनवर लावण्यासाठी आम्ही आमच्या नियंत्रणात असलेले सर्व प्रयत्न करू. आम्हाला आशा आहे की कन्नड व्हर्जन पाहून तुम्ही आम्हाला पाठिंबा द्याल आणि राज्यभरात आणखी स्क्रीन लावण्यासाठी आम्हाला मदत कराल. तुमचे प्रेम आणि समजून घेतल्याबद्दल धन्यवाद."
दिग्दर्शक राजामौली यांचा RRR या सिनेमा एका ऐतिहासिक घटनेभोवती गुंफलेली काल्पनिक कथा आहे. यामध्ये ज्युनिअर एनटीआर कोमराम भीम यांच्या भूमिकेत आहेत, तर रामचरण हे अल्लुरी सीतारमण राजू या स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत आहेत.
या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या कामगिरीची तुलना प्रभासच्या 'बाहुबली'शी केली जाईल. भव्य अॅक्शन-ड्रामा असलेल्या या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे चित्रपट निर्माते RRRबद्दलही आशादायी आहेत.
एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाची झालेली जाहिरात पाहता RRR बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे. पण RRR ओपनिंग डे ला बाहुबलीच्या बॉक्स ऑफिस रेकॉर्डला मागे टाकणार का? हा प्रश्न आहेच.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








