सोन्याच्या खाणी असलेल्या सुदानसाठी हे सोनंच शाप बनलंय, कारण...

फोटो स्रोत, Getty Images
गवताळ प्रदेशासाठी प्रसिद्ध सुदान हा पूर्व आफ्रिकेतील एक देश. सुदानमध्ये परिस्थिती चिघळली आहे. हिंसा बोकाळली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 300 लोकांचा मृत्यू झाला आहे.
सुदानचं लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात झालेल्या संघर्षात इतक्या लोकांनी जीव गमावला आहे. एप्रिल 2019 नंतर ओमार अल बशीर यांची राजवट संपुष्टात आल्यानंतर राजकीय सत्तासंघर्ष, दडपण आणि परिस्थिती चिघळली आहे.
सुदानचं लष्कर आणि निमलष्करी यांच्यात संवाद आणि समन्वय नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. लष्कराचं नेतृत्व काऊंसिल जनरल करतात.
सध्याचे सुदानचे राष्ट्राध्क्ष जनरल अब्देल फत्ताह अल बुरहान हेही लष्करप्रमुख आहेत. दुसरे जनरल म्हणजे मोहम्मद हमादान दगालो. ते हेमेटी या नावाने प्रसिद्ध आहेत. हेमेटी हे पॅरामिलिटरी रॅपिड सपोर्ट फोर्सचे प्रमुख आहेत.
सुदानमधल्या गृहयुद्धाच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे आफ्रिका खंडातील सोन्याच्या असंख्य खाणींपैकी बऱ्याचशा सुदानमध्ये आहेत.
2022 मध्ये सुदानच्या सरकारने 41.8 टन सोन्याची निर्यात केली. याची किंमत जवळपास 20,511 कोटी रुपये एवढी आहे. सरकारच्या सांख्यिकी विभागानेच ही माहिती दिली आहे.
सोन्याच्या खाणी निमलष्करी दलाच्या हातात

फोटो स्रोत, Getty Images
सुदानमधल्या बहुतांश सोन्याच्या खाणी निमलष्करी दलाच्या हातात आहे. देशात आणि शेजारी देशांमध्ये सोनं विकण्यात, विपणनात निमलष्करी दलाचा मोठा वाटा आहे.
"आर्थिक संकटाला सामोरं जाणाऱ्या सुदानसाठी सोन्याच्या खाणी हा उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे", असं सुदानसंदर्भातील जाणकार शुविट वोल्डमायकेल यांनी सांगितलं.
आरएसएफच्या उत्पन्नाचा तो एक मोठा स्रोत आहे. लष्कराला यासंदर्भात अनेक आक्षेप आहेत असं त्यांनी सांगितलं.
दुसरीकडे प्रचंड खाणकामामुळे खाणीलगतच्या क्षेत्राचं नुकसान होत आहे. पारा आणि शिसं या रासायनिक धातूंमुळे प्रचंड प्रदूषण होत आहे.
सोनं वरदान नव्हे ठरलं शाप

फोटो स्रोत, Getty Images
सुदानला ब्रिटिशांकडून 1956 साली स्वातंत्र्य मिळालं. सुदानच्या सीमा निश्चित करण्यावरून वाद निर्माण झाला.
त्यावेळी खनिज तेलाचं उत्पादन हा सुदानचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. 1980च्या दशकात दक्षिणेकडच्या भागात स्वातंत्र्यासाठी एक चळवळ सुरू झाली. या चळवळीचं लोण अन्य भागात पसरलं. यातूनच रिपब्लिक ऑफ साऊथ सुदान नावाच्या देशाची 2011 मध्ये निर्मिती झाली.
साऊथ सुदानच्या निर्मितीनंतर सुदानने दोन तृतीयांश खनिज तेल उत्पादनातून येणारं उत्पन्न गमावलं. जसं खनिज तेलातून मिळणारा पैसा घटू लागला तसं सुदानमधल्या विविध जातीजमातीत, लष्कर तसंच निमलष्करी दलांदरम्यान संघर्ष होऊ लागले.
2012 मध्ये जेबेल अमीर या उत्तरेकडच्या भागात सोन्याचे साठे सापडले. या साठ्यांच्या माध्यमातून आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात असा कयास होता.
ही देवाने दिलेली देणगी आहे असं सुदानच्या नागरिकांना वाटलं. साऊथ सुदानच्या निर्मितीनंतर सुदानच्या अनेकांची रोजीरोटीच गेली असं टफ्ट्स विद्यापीठातील सुदानसंदर्भातील जाणकार अलेक्स डी वाल यांनी सांगितलं.
ज्या सोन्याच्या खाणी एकेकाळी सुदानसाठी वरदान होत्या त्या आता शाप ठरल्या होत्या. सोन्यांच्या खाणीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध संस्था, लष्कर तसंच निमलष्करी दल यांच्यात वाद पेटला.
सोन्याच्या खाणींचा शोध लागल्यानंतर हजारो तरुणांनी या भागाकडे स्थलांतर केलं.
काहीजण श्रीमंत झाले. तर काही जण भुसभुशीत जमिनीच्या खाणींमध्ये गाडले जाऊन मृत्यूमुखी पडले. काही शिसं आणि पाऱ्याच्या प्रदूषणामुळे गेले असं त्यांनी सांगितलं.
2021 मध्ये सोन्याच्या खाणीत अपघात झाला आणि 31 लोकांचा मृत्यू झाला. यंदा 31 तारखेला अशाच एका खाण अपघातात 14 लोकांचा मृत्यू झाला.
प्रदूषण

फोटो स्रोत, Getty Images
2020 मध्ये सुदान विद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सोन्याच्या खाणींजवळच्या पाण्याचे नमुने घेतले. त्या नमुन्यांमध्ये 2004 पीपीएम पारा आणि 14.23 पीपीएम शिसं सापडलं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार पारा 1 पीपीएम आणि शिसं 10 पीपीएमपेक्षा जास्त असता कामा नये.
हा प्रश्न एकदम गंभीर आरोग्य संकट झालं कारण पाण्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर धोकादायक रसायनं मिळाली असं पर्यावरण कायद्याचे प्राध्यापक अल झैली हमौदा सालेह यांनी सांगितलं. खार्तूम इथल्या बहरी विद्यापीठात ते कार्यरत आहेत.
सुदानमध्ये 40,000 जास्त सोन्याच्या खाणी आहेत. 60 सोनं शुद्धीकरण कारखाने आहेत. 15 कंपन्या साऊथ कोरडोफॅन इथे आहेत. पण इथे कोणीही पर्यावरणविषयक नियम पाळत नाहीत असं त्यांनी सांगितलं.
त्याचवेळी वांशिक संघर्षही घडत आहेत. मुसा हैली या आदिवासी प्रमुखांच्या नेतृत्वात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 800 लोकांचा मृत्यू झाला आहे. अल बशीर यांचे निष्ठावंत असल्याचं सांगितलं जातं.
संघर्षानंतर हैली यांनी काही भागांचा ताबा मिळवला. त्यांनी आणखी सोन्याच्या खाणी शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ते हे सोनं खार्टूनमधल्या संस्था आणि सरकारला विकत असत. 2017 मध्ये हैली यांच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला. सुदानच्या सरकारने त्याला आंतरराष्ट्रीय संस्थांकडे सोपवलं. हैली याला पाठिंबा असणाऱ्या हेमेटी यांनी सोन्याच्या खाणींवर ताबा मिळवला.
देशाच्या एकूण निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 40 टक्के सोन्यातून मिळत असे. सोन्यानेच हेमोटी यांना देशातला प्रमुख नेता बनवलं. चॅड आणि लिबिया यांच्याशी असलेल्या सीमेवरही त्यांनी नियंत्रण मिळवलं असं डेव्हाल यांनी सांगितलं.
लोकशाही कधी परतणार?

फोटो स्रोत, Getty Images
2019 मधे लष्कराने सत्ता हस्तगत केल्यानंतर ओमर अल बशीर यांचं सरकार पडलं. त्यानंतर हा देश दोन लोकांच्या हातात गेला. हेमेटी आणि अल बुरहान
डी वाल सांगतात, “आपण इतर गोष्टी बाजूला ठेवू. पण आरएसएफकडे 70 हजार हत्यारबंद सैनिक आणि 10 हजार पिक अप ट्रक आहेत. आरएसएफ सुदानमधला स्वयंभू हत्यारबंद समूह बनला आहे. इतक्या सैनिकांमुळे हा समूह राजधानी खार्तूमवर नियंत्रण ठेवू शकतो, हा दावा करू लागला आहे.”
2021 साली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू करण्याबद्दल सहमति झाली. यावेळी सुदानमध्ये नागरी सरकार असावं, हे ठरवलं गेलं.
वोल्डमायकल यांनी म्हटलं, “गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेव्हा या गोष्टीवर सहमती झाली आणि सोन्यातून मिळालेलं उत्पादन निवडून आलेल्या सरकारकडे हस्तांतरित करण्यात येईल. मात्र हेमेटी यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी अल बुरहान यांच्या जवळच्या लोकांनी आरएसएफच्या हालचालींना नियंत्रित करण्याचा सल्ला लष्कराला दिला.”
उत्तर सुदानमधील खाणीतल्या सोन्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी इतरही अनेक लोक सक्रीय आहेत.
एकूणच सुदानमध्ये भडकलेल्या हिंसाचाराच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे इथल्या सोन्याच्या साठ्यांवर नियंत्रण मिळवणं हे पण आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








