सोनं: तुमच्या प्रत्येकाच्या घरात सोन्याची खाण आहे?

सोनं

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, टीम स्मेडली
    • Role, बीबीसी फ्युचर

'माझ्याकडे काय आहे? गुंजभर सोनं माझ्याकडे नाही', असा विचार करणाऱ्यांनो थोडं थांबा. सोनं आणि इतर मौल्यवान धातू तुमच्या घरातच आहेत.

हो, आता बदलत्या काळामध्ये खाणी खोदून सोनं किंवा इतर मौल्यवान धातू मिळवण्याऐवजी एक नवा उपाय केला जाण्याची शक्यता आहे. तो म्हणजे रिसायकलिंग.

तुमच्या आजूबाजूला घरातच असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे रिसायकल करुन ते मिळवले जातील. कारण हजारो टनांचे दगड बाजूला करुन, भलीमोठी लांबलचक आणि वेळखाऊ, खर्चिक प्रक्रिया करुन धातू मिळवण्यापेक्षा रिसायकलिंगमधून धातू मिळवणं कमी वेळेत, कमी खर्चात होणार आहे.

वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक फोरमचे (WEEF) प्रोजेक्ट मॅनेजर जेम्स हॉर्न याबद्दल अधिक माहिती सांगतात.

त्यांच्या मते आता ग्राहकांना आपल्याकडच्या वस्तूंचं रिसायकलिंग योग्य पद्धतीनं आणि कमी खर्चात कसं करायचं हे समजलं आहे. त्यामुळे 'अर्बन मायनिंग' म्हणजेच शहरांमध्येच रिसायकलिंग करुन धातू मिळवणं हा एक सोपा मार्ग होऊ शकेल.

याचं तुम्हाला पटू शकेल असं एक उदाहरण पाहू. टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलम्पिकमधील 5000 सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकं तयार करण्यासाठी 60 लाख फोन आणि 7.2 कोटी टन इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याचं रिसायकलिंग केलं गेलं. त्यातून मिळालेल्या धातूमधून ही पदकं तयार करण्यात आली होती.

अशा मौल्यवान धातूंचे जगभरात काहीच ठिकाणी आहेत. ते खोदून काढून, त्यावर मोठी ऊर्जा खर्च करुन वापरण्यापेक्षा अर्बन मायनिंग हा शाश्वत भविष्यासाठी उपयोगी ठरेल.

तुमच्या प्रत्येकाच्या घरात सोन्याची खाण आहे?

फोटो स्रोत, Getty Images

जमिनीखाली असलेले मौल्यवान धातूंचे दुर्मिळ साठे मर्यादित आहे. गेली अनेक दशके आपण भरपूर प्रमाणात खनन केल्यामुळे हे साठे झपाट्याने संपत चालले आहेत.

युरोपियन लोकांप्रमाणे धातूचा वापर सर्व जगातल्या लोकांनी करायचा विचार केला तर आपल्याला आतासारख्या आणखी 2.8 पृथ्वींची गरज लागेल. तर अमेरिकेतल्या लोकांसारखी जीवनशैली सर्वांनी स्वीकारली तर 5 पृथ्वींमध्ये असेल इतकी साधनसंपत्ती लागेल.

या धातूंच्या खाणकामामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं. संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल रिसोर्स पाहणीनुसार एकूण कार्बन उत्सर्जनापैकी 40 टक्के आणि एकूण जैवविविधता नष्ट होण्यातलं 10 टक्के प्रमाण फक्त या खाणकामामुळे होतं.

गेल्या 50 वर्षांमध्ये हे खाणकाम तिपटीने वाढलं आहे. अनेक धातू सापडणं कठीण झालंय, तर कित्येक धातू महाग झाले. पर्यावरणाची हानी त्याहून जास्त आहे.

तुमच्या प्रत्येकाच्या घरात सोन्याची खाण आहे?

फोटो स्रोत, Getty Images

हॉर्न म्हणतात, "अर्बन माईनमध्ये फक्त इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचा समावेश होतो असं नाही, तर त्यात गोदाम, दुकाने, उद्योग, घरात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचा समावेश होतो.

जी उपकरणं दीर्घकाळ वापरलेली नाहीत किंवा वापरण्यास योग्य राहिलेली नाहीत अशा सर्व उपकरणांचा वापर करता येतो."

त्यामुळे पारंपरिक खाणकाम बंद होण्याइतपत धातू जमिनीवरच उपलब्ध आहेत का? याचा विचार करायला हवा.

त्यासाठी 'इ-वेस्ट'कडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला पडलेले जुने फोन, लॅपटॉप्स, स्वयंपाकघरातल्या वस्तू, टीव्ही आणि इतर उपकरणांमध्ये सोनं, चांदी, तांबं, पॅलेडियमसारखे मौल्यवान धातू वापरलेले असतात. त्यांचा वापर नवी इलेक्ट्रॉनिक उपकरणं तयार करण्यासाठी करता येतो.

जगभरात दरवर्षी 5 कोटी टन इतक्या वजनाचा इ-कचरा तयार होतो. त्यातून 6000 आयफेल टॉवर तयार केले जाऊ शकतात आणि या कचऱ्यात प्रत्येकवर्षी 3 ते 4 टक्क्यांची वाढ होत आहे.

आशियामध्ये सर्वात जास्त इ-कचरा तयार होतो. आशियात 1.82 कोटी टन इ-कचरा तयार होतो. अमेरिकेत 1.13 कोटी टन, अफ्रिकेत 22 लाख टन, ऑस्ट्रेलिया खंडात 7 लाख टन इ-कचरा तयार होतो.

युरोप खंडात 1.23 कोटी टन इ-कचरा तयार होतो. त्यामध्ये 3 लाख 30 हजार टन तांबं आणि 31 टन सोनं सापडू शकतं. सध्याच्या उपकरणांपेक्षा पूर्वीच्या उपकरणांमध्ये जास्त प्रमाणात धातू असत. ते सगळे रिसायकल केले तर युरोपातील दरवर्षी जे 1.43 कोटी टन वजनाचे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि बॅटरी घेतात त्यासाठी लागणारे धातू निर्माण करू शकू.

युरोपला दरवर्षी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी 29 लाख टन प्लॅस्टिक, 2 लाख 70 हजार टन तांबं, 3500 टन कोबाल्ट आणि 26 टन सोनं लागतं. त्यामुळे आता सारखं खाणकाम करण्याऐवजी रिसायकलिंगची गरज किती आहे हे यातून लक्षात येतं.

तुमच्या प्रत्येकाच्या घरात सोन्याची खाण आहे?

फोटो स्रोत, Getty Images

बेल्जियममधील युमिकोर ही एक खाणकाम कंपनी होती. त्यांनी तर आपल्या कंपनीचं रुपांतर आता जगातल्या सर्वात मोठ्या रिसायकलिंग कंपनीत केलं आहे. त्यांचा मूळ भर बॅटरी आणि इलेक्ट्रीक गाड्यांवर आहे. त्यातून ते तांबं, कोबाल्ट, निकेल आणि लिथियम मिळवतात.

या कंपनीचे प्रवक्त्या मार्जोलिन शिअर्स म्हणतात, "धातूचे गुणधर्म न गमावता आपण ते अगणितवेळा रिसायकल करू शकतो. रिसायकलिंग नंतर ते पुन्हा वापरले जाऊ शकतात किंवा विकता येतात."

युमिकोर दरवर्षी किती रिसायकल करते याची आकडेवारी ते नेहमी जाहीर करत नाहीत. पण त्यांची 7000 हजार टन बॅटरी रिसायकल करण्याची क्षमता असल्याचं ते सांगतात. म्हणजे 25 कोटी मोबाईल फोन बॅटरी आणि 20 लाख इ-बाईक बॅटरी किंवा 35 हजार इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरीचा त्यात समावेश होतो.

सध्या सर्वात जास्त मागणी कोबाल्टला आहे. इलेक्ट्रिक कार आणि स्मार्टफोनमधील लिथियम आयन बॅटरीतील तो महत्त्वाचा घटक आहे.

2016 ते 2018 या कालावधीमध्ये कोबाल्टच्या किमती 300 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यातले 60 टक्के कोबाल्ट कांगोमधून येतं. तिथल्या खाणकामात बालकामगारांना वापरलं जातं आणि पर्यावरणाचं नुकसानही होतं. कोबाल्टच्या शाश्वत पुरवठ्यासाठी रिसायकलिंग करणं गरजेचं आहे असं शिअर्स सांगतात.

तुमच्या प्रत्येकाच्या घरात सोन्याची खाण आहे?

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या 20 वर्षांत युरोपियन युनियनमधील देशांनी जितकी पोर्टेबल उपकरणं वापरली ती रिसायकल केली तर 1 कोटी नवी इलेक्ट्रिक वाहनं तयार करता येतील असंही त्या सांगतात.

युमिकोर कंपनीच्या दाव्यानुसार 1 टन मोबाईल बॅटरीमधून 135 ते 240 किलो कोबाल्ट काढलं जातं. अर्थात हे प्रमाण मोबाईलनुसार बदलतं. तसेच याचमधून 70 किलो तांबं आणि 15 किलो लिथियमही काढलं जातं असं कंपनी सांगते.

तसेच प्रत्येक 1 टन मोबाईल हँडसेटमधून 1 किलो चांदी आणि 235 ग्रॅम सोनंही मिळतं. याची तुलना पारंपरिक खाणकामाशी केली की रिसायकलिंग फारच स्वस्त पडत असल्याचं दिसतं.

1 टन खनिजावर प्रक्रिया केली की 100 ग्रॅम सोनं मिळतं आणि तसेच एक टन खनिजावर प्रक्रिया केली की 2 ते 5 किलो सोनं मिळतं. म्हणजे पारंपरिक खाणकामात किती मेहनत, किती खर्च आणि प्रदूषण होत असेल याचा अंदाज लावता येतो. त्यामानाने हे रिसायकलिंग सोपं आणि कमी खर्चात होतं.

तुमच्या प्रत्येकाच्या घरात सोन्याची खाण आहे?

फोटो स्रोत, Getty Images

सिंटेफ या नॉर्वेतील संशोधन संस्थेने अर्बन मायनिंगमध्ये 17 टक्के ऊर्जा कमी लागत असल्याचं सांगितलं. चीनमध्ये फेकून दिलेल्या टीव्ही सेट्समधून मोठ्या प्रमाणात सोनं आणि तांबं मिळवता येऊ शकेल असंही संशोदऩतानू स्पष्ट झालं आहे.

हा टप्पा गाठण्यापासून आपण अजून फार दूर आहोत असं ते सांगतात.

इंग्लंडमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार निम्म्यापेक्षा जास्त लोकांकडे एक तरी न वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक उत्पादन होतं. तसेच 45 टक्के लोकांकडे 5 पर्यंत उपकरणे पडून होती. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या अहवालानुसार 4 कोटी उपकरणं तरी अशी पडून राहिली असती.

WEEF च्या अंदाजानुसार साधारणतः प्रत्येक युरोपीय व्यक्तीकडे 248 किलो वजनाची वापरलेली आणि वापरण्यास योग्य नसणारी उपकरणं घरात असतात. त्यात 17 किलो बॅटरीचाही समावेश आहे.

युमिकोरच्या मते ही उपकरणं गोळा करण्याने रिसायकलिंग चांगल्या पद्धतीनं सोपं होईल.

आपल्या घरांमध्ये ड्रॉवर्समध्ये पडून असलेली मोबाईलसारखी उपकरणं बाहेर काढून लोकांना ती रिसायकलिंगला पाठवण्यास उद्युक्त करण्याची गरज कंपनीला वाटते. त्यामुळे आपल्या घरांमध्ये काही अशी उपकरणं पडली असली तर आताच विचार करा. न वापरलेल्या वस्तूच तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देऊ शकतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)