कोरोना आर्थिक संकटात सोने देणार सर्वसामान्यांना आधार

सोन्याचे दागिने

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, निधी राय
    • Role, व्यापार प्रतिनिधी, मुंबई.

गरज पडली की पैसे उभे करायला सोन्याचा आधार घेणं हे भारतात फार पूर्वीपासून होत आलंय.

पण बहुतेकजणांची या सोन्यात भावनिक गुंतवणूक असते आणि सोनं विकायची त्यांची तयारी नसते.

कठीण काळात या सोन्याचा 'तारण' म्हणून वापर करण्याची अनेकांची तयारी असते आणि कर्ज देणारेही सोनं तारण ठेवून घ्यायला राजी असतात.

सध्याच्या काळात बँकांनी सावध पवित्रा घेतला असला तरी मणप्पुरम फायनान्स लिमिटेड आणि मुथूट फायनान्ससारख्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) या संधीचा वापर अधिक कर्जं देऊन त्याद्वारे व्याज मिळवण्यासाठी करत आहेत.

कोव्हिड 19 मुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातल्या अनेक लहान व्यापारी, शेतकरी आणि उद्योजकांचं नुकसान झालंय. या परिस्थितीत अनेकांनी खर्च भागवण्यासाठी 'गोल्ड लोन्स'चा आधार घेतलाय.

पुण्यातल्या दिशा दिनेश परब यांचाही लहानसा उद्योग आहे. त्यांचीही अशीच काहीशी कहाणी आहे.

"मी गेली 10 वर्षं डबे देते. दररोज मी 80 रुपयांना एक असे 40 ते 50 डबे पुरवत असे. आता मी डब्याची किंमत कमी करून 60 रुपयांवर आणलीय आणि रोजची फक्त 10 ते 15 डब्यांची ऑर्डर आहे. माझ्या एरवीच्या उत्पन्नाच्या तुलनेत ही मिळकत अगदीच कमी आहे."

"मी बांधकाम मजुरांनाही जेवण द्यायचे. आता ते सगळे निघून गेले आहेत. माझ्या डब्यांना आता मागणी नाही."

दिशांचे दोन मुलगे शिकतायत तर पती बांधकाम उद्योगात आहेत.

कोरोना
लाईन

पण लॉकडाऊनमुळे सध्या त्यांच्या पतीकडे काम नाही. त्यांच्या मालकीचा एक लहानसा गाळाही आहे. दरमहा पंधरा हजारांवर ते हा गाळा भाड्याने द्यायचे.पण आता कोव्हिड 19 च्या लॉकडाऊनमुळे गाळा घ्यायला कोणी येत नसल्याने, ते उत्पन्नही थांबलंय.

उत्पन्नाचे सगळे स्रोत आटल्याने दिशांनी स्थानिक सहकारी बँकेकडून 'गोल्ड लोन' घ्यायचं ठरवलं. सोन्याच्या चार बांगड्या, एक नथ आणि एक दागिना तारण ठेवून त्यांनी अडीच लाखांचं कर्ज घेतलं.

"मध्यम वर्गाला सगळ्यात जास्त फटका बसलाय. सरकार गरीबांना मदत करतं. श्रीमंतांकडे आधीपासूनच पैसे आहेत. आम्ही मदत मिळावी म्हणून भीकही मागू शकत नाही. आमच्याकडे कोणताच पर्याय नाही," दिशा सांगतात.

"सोनं ठेऊन कर्ज घेणं हा आमच्याकडचा सगळ्यात जलद आणि स्वस्त पर्याय होता."

मान्सून सुरू झाल्याने शेतीची कामं सुरू करण्यासाठी काही शेतकऱ्यांनीही अशी कर्ज घेतली आहेत.

हौसीलाल मालवीय यांची अमरावती जिल्ह्यात शेती आहे. शेतीत पेरणी करण्यासाठी त्यांनी 4 लाखांचं गोल्ड लोन घेतलंय. हंगामानुसार ते सोयाबीन, हरभरा आणि कापसाचं पीक घेतात. त्यांचं चौघांचं कुटुंब आहे.

व्हायरसमुळे लॉकडाऊन लागला आणि मार्केट बंद झालं. तेव्हापासून काहीही विकणं शक्य नाही आणि माल साठवणंही कठीण जात असल्याचं ते सांगतात.

हौसीलाल मालवीय
फोटो कॅप्शन, हौसीलाल मालवीय

"अगदी रोजच्या साध्या गोष्टी करायलाही पैशाची गरज होती आणि गोल्ड लोनचा पर्याय चांगला होता."

"मी बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी खूप प्रश्न विचारले आणि कर्ज देण्याची त्यांची इच्छा नव्हता. पण स्थानिक सहकारी बँकेने मात्र मदत करायची तयारी दाखवली," मालवीय सांगतात.

बँकांकडून कर्ज घेणं झालं कठीण

अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि पसरलेली कोव्हिडची साथ यामुळे पैसे कर्जाने देताना बँका सावधगिरी बाळगत आहेत.

गेल्या आर्थिक वर्षांत बँकांनी कर्ज देण्याचा दर 6.14% होता. हा दर 2020 -21मध्ये घसरून फक्त 1 टक्क्यावर येईल असं क्रिसिल या रेटिंग एजन्सीने म्हटलं आहे.

तर गोल्ड लोन्सची मागणी वाढण्याचा अंदाज असल्याचं ही कर्ज देणाऱ्या बिगर बँकिंग वित्तीय संस्थांनी म्हटलं आहे.

सोन्याचे दागिने

फोटो स्रोत, Getty Images

मणप्पुरम फायनान्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि सीईओ व्ही. पी. नंदकुमार सांगतात, "या वर्षात गोल्ड लोन्स 10 ते 15%नी वाढतील अशी आमची अपेक्षा आहे."

"सोन्याच्या किंमती आता पुढचा काही काळ वाढलेल्याच राहणार असल्याचं लोकांच्या एकदा लक्षात आलं की सोनं विकून पैसे मिळवण्याऐवजी गोल्ड लोन घेण्याचा विचार करणाऱ्यांचं प्रमाण वाढेल."

IIFL फायनान्स कंपनीनेही मे 2020मध्ये 700 कोटींची गोल्ड लोन्स वितरीत केली आहेत. यापैकी 15% कर्ज ही यापूर्वीच गोल्ड लोन घेतलेल्या ग्राहकांनी घेतलेली वाढीव कर्जं होती.

तर फेडरल बँक आणि इंडियन बँकेकडच्या गोल्ड लोनसाठीच्या मागणीत 10 पटींनी वाढ झालेली आहे. लहान शहरांमध्ये ही मागणी जास्त आहे.

सोन्याच्या वाढलेल्या दरांचा फायदा

सोन्याचे दर वाढल्याने कर्ज घेणाऱ्या त्याचा फायदा होतोय. त्यांना मोठी कर्जं घेता येत आहेत.

असोसिएशन ऑफ गोल्ड लोन कंपनीजच्या आकडेवारीनुसार कर्जाच्या तुलनेत सोन्याच्या मूल्यामध्ये मार्चपासून 11.3% ची वाढ झालेली आहे.

24 मार्चला एक ग्रॅम सोन्याचं मूल्य होतं रु.2875, तर 10 जूनला 1 ग्रॅम सोन्याचं मूल्य होतं रु 3197.

थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला सध्याच्या सोन्याच्या दराच्या 75% पर्यंतच कर्ज मिळू शकतं. सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 50,000 च्या आसपास आहे.

सोने

फोटो स्रोत, Marid tama

सोन्याचा भाव वाढला की आधीच गोल्ड लोन घेतलेले ग्राहक त्यांची सध्याची कर्ज 'टॉप अप' करतात. कारण त्यांना सध्याच्या तारणावरच जास्त पैसे मिळू शकतात.

"सोन्याच्या वाढलेल्या किंमतींमुळे कर्ज घेणारे आणि देणारे असे दोघेही खुश आहेत. तारणाच्या किंमतीच्या तुलनेत कर्ज घेणाऱ्यांना 20% अधिक पैसे मिळत आहेत. कर्ज देणाऱ्यांनाही गोल्ड लोनचा हा पर्याय आवडतो कारण यात नुकसान कमी असतं." वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलचे भारतातले कार्यकारी संचालक सोमसुंदरन यांनी बीबीसीला सांगितलं.

अर्थव्यवस्था आणि सुवर्ण कर्जं

कोरोनाच्या जागतिक साथीचा परिणाम जगभरातल्या सगळ्याच अर्थव्यवस्थांवर झालेला आहे. यामुळे भारताच्या जीडीपीमध्येही मोठी घट होण्याचा अंदाज आहे. अशावेळी फक्त सोन्याची बाजारपेठच तेजीत आहे.

दागिने

फोटो स्रोत, Getty Images

कर्जाच्या परतफेडी होत नसल्याने नुकसान वाढल्याने वैयक्तिक, व्यापारी वा गृह कर्ज देताना बँकांनी सावधानता बाळगायला सुरुवात केली आहे. बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) गोल्ड लोन्स देत असल्याने त्यांची परिस्थिती थोडी बरी आहे आणि त्यांच्यासमोर बँकांसारखी आव्हानं नाहीत.

सोन्याच्या वाढलेल्या किंमतींचा फायदा कर्ज देणाऱ्यांनाही होत आहे. शिवाय तारण म्हणून सोन्याचा पर्याय सुरक्षित आहे कारण एखाद्या व्यक्तीला कर्जाची परतफेड करता न आल्यास तो तोटा भरून काढण्यासाठीचं पुरेसं तारण कर्ज देणाऱ्यांकडे असतं.

पण सोन्याशी भावनिक संबंध असल्याने, लोकांना आपलं सोनं परत हवं असतं. म्हणूनच ही कर्ज घेणाऱ्या व्यक्ती सहसा या कर्जांच्या परतफेडीत चुकत नाहीत. सोन्यावर कर्ज द्यायला कंपन्याही राजी असतात कारण तारण ठेवण्यात आलेल्या सोन्याचं मूल्य हे कर्ज म्हणून देण्यात आलेल्या रकमेपेक्षा जास्त असतं.

म्हणूनच सध्याच्या काळात ही 'गोल्ड लोन्स' कर्ज घेणाऱ्यांसाठी आणि देणाऱ्यांसाठीही आशेचा एक किरण ठरत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)