सोनभद्रला 'सोनभद्र' हे नाव खरंच सोन्याच्या साठ्यांमुळे मिळालं आहे का?

सोनभद्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ब्रजेश मिश्र
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतात सोन्याचा भारीच मोह आहे. जगात सोन्याची सर्वाधिक विक्री होणाऱ्या देशांमध्ये भारताचा नंबर लागतो. तेव्हा भारतात सोनं सापडल्याच्या बातमीनं सोनेप्रेमींचे कान टवकारले नाही तरच नवल.

अमेरिका, आफ्रिका आणि रशियात मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणी आहेत. भारतातही फार पूर्वीपासून सोन्याचे साठे सापडले आहेत.

सोनभद्र जिल्ह्यात सोन्याची खाण सापडल्याचा दावा जिल्हा खणिकर्म अधिकाऱ्यांनी केला होता. नंतर (Geological survey of India) GSI ने हा दावा फेटाळला आहे. या ठिकाणी 3000 टन सोनं उत्खननात सापडू शकतं असं अधिकारी म्हणाले होते नंतर GSI ने स्पष्टीकरण देऊन सांगितलं की 3000 टन नाही तर 160 किलो सोनं या ठिकाणी मिळू शकतं.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोनभद्र चर्चेत आहे. सोनभद्रचा इतिहास रंजक आहे. या जिल्ह्यात सोन्याबाबतच्या अनेक आख्यायिका आहेत. या जिल्ह्यात कोण-कोणती खनिज संसाधनं आहेत याचा बीबीसी हिंदीने घेतलेला आढावा.

खाण

फोटो स्रोत, ENRICO FABIAN FOR THE WASHINGTON POST/GETTY IMAGES

'सोनभद्र' जिल्ह्यात 'सोनपहाडी' आहे आणि इथल्या एका नदीचं नाव आहे 'सोननदी'. तेव्हा सोनभद्र जिल्ह्याचं नाव तिथे असलेल्या सोन्यावरून पडलं आहे का?, असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. तर याचं उत्तर आहे तिथल्या सामान्य लोकांना तरी असंच वाटतं. कारण या जिल्ह्यात सोनं असल्याच्या, काहींना ते सापडल्याच्या अनेक आख्यायिका आहेत.

इथे बरियार शाह नावाचा एक राजा होऊन गेला. इथले लोक सांगतात की या राज्याच्या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला सोनपहाडी आणि शिवपहाडी नावाचे दोन डोंगर होते आणि किल्ल्यापासून या दोन्ही डोंगरांपर्यंत राजाने अमाप सोनं ठेवलं होतं. तर सोन्यासाठी याच जिल्ह्यातल्या सोनकोरवा नावाच्या एका भागात गावकऱ्यांनी खोदकामही केल्याचंही सांगितलं जातं. त्यांना थोड्याफार प्रमाणात सोनं सापडलं होतं, असंही सांगतात.

News image

मात्र, सोनभद्रच्या या भूमीत खरंच सोनं आहे का, ते आतापर्यंत कधी सापडलं आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या जिल्ह्याविषयी थोडी माहिती करून घ्यायला हवी.

सोनभद्रची ओळख

उत्तर प्रदेशच्या पार दक्षिणेला असलेला सोनभद्र हा अनेक अर्थाने खास जिल्हा आहे. हा भारतातला एकमेव असा जिल्हा आहे ज्याच्या सीमा चार राज्यांना लागून आहेत.

ही राज्यं आहेत मध्यप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड आणि बिहार. आज औद्योगिक नगरी अशी सोनभद्रची ओळख आहे. ही ओळख त्याला मिळाली आहे इथल्या भूमीत असलेल्या खनिज साठ्यांमुळे.

सोनभद्र

फोटो स्रोत, SONBHADRA.NIC.IN

इथल्या जमिनीत बॉक्साईट, चुनखडी, कोळसा, सोनं अशी बरीज खनिजसंपदा आहे. कोळशामुळे इथे मोठमोठे पॉवर प्लांट उभारण्यात आले. त्यामुळे सोनभद्रला ऊर्जेची राजधानीसुद्धा म्हटलं जातं.

तर अशी सगळी खनिजसंपदेची पार्श्वभूमी असणाऱ्या सोनभद्रचं नाव कशावरून ठेवण्यात आलं आणि त्याचा सोन्याशी काही संबंध आहे का, हा प्रश्न आम्ही बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन इतिहास विभागाचे सहप्राध्यापक डॉ. प्रभाकर उपाध्याय यांना विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे नाव सोननदीवरून पडलं. मात्र, त्यामागे सोननदी हे एकमेव कारण नाही. ते पुढे सांगतात की सोननदीमध्ये पूर्वी सोनं मिळायचं. अर्थात ते अत्यंत सूक्ष्म स्वरुपात असायचं.

केवळ सोननदीच नाही तर मध्यप्रदेश आणि ओडिशातल्याही काही नद्यांच्या वाळूत सोन्याचे अंश सापडायचे.

लोह खनिजाचा पट्टा

बीबीसीशी बोलताना प्रा. उपाध्याय म्हणाले, "या नद्यांच्या काठावर गोल्ड वॉशिंग (सोनं काढण्याचं) व्हायचं. इथले खडक नदीत पडून त्यांचा चुरा होतो. याच कारणामुळे या नद्यांच्या काठावर गोल्ड वॉशिंग सुरू झालं. या नद्यांमध्ये सापडणाऱ्या सोन्यावरून कळतं की इथल्या डोंगरांमध्ये सोनं असावं. सोनभद्रमधले आदिवासी आताआतापर्यंत नदीकाठी सोनं काढायचे."

मात्र, इलाहाबाद विद्यापीठातील प्राचीन इतिहास विभागाचे माजी प्राध्यापक जे. एन. पॉल यांचं मत वेगळं आहे. ते म्हणतात की सोनभद्रचं नाव सोननदीवरूनच पडलं आणि त्याचा सोन्याशी काहीही संबंध नाही. या नदीत कधीच सोन्याचे अंश सापडल्याचे पुरावे नाहीत.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "इथे गोल्ड वॉशिंग व्हायचं, असं म्हणतात. मात्र, या सगळ्या आख्यायिका आहेत. तशी खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही."

सोनभद्र

फोटो स्रोत, PRO. PRABHAKAR UPADHYAY

गंगा नदीचा आग्रा, ग्वाल्हेरपासून पुढे बिहार आणि बंगालपर्यंताच सर्व पठारी भाग आयर्न बेल्ट म्हणजे लोह पट्टा म्हणून ओळखला जातो.

प्रा. उपाध्याय सांगतात की या जमिनीत लोह खनिजाचं प्रमाण खूप आहे. गंगेच्या परिसरात दुसरं शहरीकरण या लोहामुळेच झालं.

ते म्हणतात, "सोनभद्रमध्ये सोनकोरवा नावाचं एक ठिकाण आहे. इथे सोनं मिळवण्यासाठी लोकांनी बराच भाग खोदून काढला. असं खोदकाम झाल्याचे अवशेष अजूनही मिळत आहेत. मात्र, त्यांनी फार खोदलं नाही. जवळपास 20 फुटांपर्यंत लोकांनी खोदलं आणि जेवढं सोनं मिळालं ते ठेवून घेतलं. मात्र, या भागात खोलवर मोठ्या प्रमाणात सोनं असल्याचे संकेत फार पूर्वीपासून मिळत आहेत."

प्रा. उपाध्याय यांनी पुढे सांगितलं की सोनकोरवा जवळ पुरातत्त्व विभागाच्या लोकांनी खोदकाम केलं होतं. फार खोलवर खोदण्यात आलं. मात्र, तिथे जे सोनं मिळालं त्याची गुणवत्ता फार चांगली नव्हती. म्हणजे सोनं मिळवण्यासाठी खोदकामाला जेवढा खर्च आला त्यापेक्षा हाती आलेल्या सोन्याचं मूल्य खूपच कमी होतं. त्यामुळे ती योजना तिथेच बारगळली.

सोनभद्र

फोटो स्रोत, SONBHADRA.NIC.IN

उपाध्याय सांगतात, "मी पीएचडीसाठी तिथे गेलो होतो. तिथे काही खडक सापडले ज्यात सोन्याचे अंश होते. आम्ही तिथून काही वस्तू सोबत आणल्या होत्या. त्या आता पेपरवेट म्हणून वापरतो."

प्रा. प्रभाकर उपाध्याय यांनी 2005 साली 'Mining and Minerals in Ancient India' नावाने पुस्तकही लिहिलं आहे. या पुस्तकातही त्यांनी खनिजांसोबत सोनं असल्याचाही उल्लेख केला आहे.

सोनभद्रमध्ये युरेनियमचेही साठे?

इलाहाबाद विद्यापीठातील प्राचीन इतिहास विभागाचे माजी प्राध्यापन जे. एन. पाल सांगतात की पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात इथे प्राचीन सभ्यता आणि लोकवस्तीचे पुरावे सापडले आहेत. त्यावरून इथे प्रागैतिहासिक काळातील लोकांचा सांस्कृति विकास कसा झाला, हे स्पष्ट होतं. इथे गोल्ड वॉशिंग व्हायचं, असंही म्हणतात. मात्र, त्या केवळ आख्यायिका आहेत.

सोनभद्र

फोटो स्रोत, Getty Images

प्रा. पाल सांगतात, "सम्राट अशोकचे शिलालेख इथे सापडले आहेत. त्यामुळे सम्राट अशोकच्या शासनकाळात इथे लोक रहायचे, हे स्पष्ट होतं. मौर्य काळ आणि गुप्त काळातल्याही काही वस्तू सापडल्या आहेत. मात्र, सोनं सापडल्याचं पहिल्यांदाच ऐकतोय."

मात्र, सोनभद्रच्या जमिनीत सोन्याव्यतिरिक्त युरेनियम असण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणतात.

सोनभद्रची संस्कृती

सोनभद्र मागास जिल्हा मानला जातो. मुळात हा आदिवासी भाग होता. आज इथे बराच विकास झालेला दिसत असला तरी इथली मूळ संस्कृती आदिवासीच आहे. आज इथे सिमेंट, वाळू, औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसारखे मोठ-मोठे औद्योगिक प्रकल्प आलेले आहेत.

सोनभद्र जिल्ह्याच्या सरकारी वेबसाईटनुसार जिल्ह्याच्या दक्षिणेला छत्तीसगढ आणि पश्चिमेला मध्यप्रदेश आहे.

जिल्हा मुख्यालय रॉबर्ट्सगंज शहर आहे.

सोनभद्र जिल्हा विंध्य पर्वतरांगात आढळणाऱ्या गुंफांमधल्या भित्तीचित्रांसाठीही ओळखला जातो.

सोनभद्र

फोटो स्रोत, SONBHADRA.NIC.IN

लखानिया गुंफा कैमूरच्या डोंगरांमध्ये आहेत. या गुंफा रॉक पेंटिंग्जसाठी प्रसिद्ध आहेत. ही चित्रं तब्बल 4000 वर्षं जुनी आहेत.

इथला खोडवा डोंगर किंवा त्या डोंगरावर असलेली घोरमंगर ही गुंफादेखील प्राचीन भित्तीचित्रांसाठी प्रसिद्ध आहे.

या भागात रिंहद आणि बरकंधरा अशी दोन धरणंही आहेत. इथे रॉक ऑफ लोरी म्हणजेच लोरीचा खडक प्रसिद्ध आहे. हा एक अतिविशाल खडक आहे.

अशाप्रकारे सोन्याच्या आख्यायिका आणि प्रत्यक्षात सोन्याचे साठे असलेल्या सोनभद्रमध्ये आता सोन्याच्या नव्या खाणीसाठी खोदकाम सुरू होणार आहे.

तेव्हा 'सोनभद्र' जिल्हा आपल्या नावाला जागणार की 'चकाकते ते सर्व सोने नसते' असं म्हणायची वेळ येणार, हे प्रत्यक्ष खोदकाम झाल्यानंतरच कळेल.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)