सीलँडः समुद्रात दोन खांबांवर उभ्या असलेल्या या देशावर जाण्यासाठी लोक का धडपडतात?

फोटो स्रोत, ROBERT HARDING/ALAMY
- Author, माईक मॅकएचरन
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
ही सगळी भन्नाट गोष्ट सुरू झाली एका इमेलमुळे. हा ईमेल आणि त्यापुढे घडत गेलेल्या घटना मी कधीच विसरू शकणार नाही. मे (2020) महिन्यात मला सीलँडचे राजकुमार मायकल यांचा आपण बोलू शकतो का असा संदेश मिळाला.
या एका संदेशामुळे इतिहासाच्या आणि भूगोलाच्या एका वेगळ्याच विश्वात ओढला गेलो. स्वयंभू राजे, जमिनीवर अधिकार सांगणारे दावे, ऐतिहासिक विसंगती, दुसऱ्या महायुद्धातला ब्रिटन, पायरेट रेडिओ स्टेशन, कॉल पकडणे अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळेस मला करता आल्या.
या इमेलमुळे तर मी एकदम रोमांचित झालो होतो. मला याआधी कधीही कोणत्याही राजकुमाराने इमेल पाठवलेला नव्हता आणि भविष्यातही असं होण्याची शक्यता नव्हती.
सीलॅँड हे चिमुकलं संस्थान इंग्लंडच्या सफॉक किनाऱ्याजवळ आहे. हा जगातला सर्वात लहान देश आहे असं म्हटलं जातं.
खरंतर हा दुसऱ्या महायुद्धात अँटीएअरक्राफ्ट प्लॅटफॉर्म होता. 1942मध्ये तो तयार करण्यात आला होता आणि त्यावेळेस त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं एचएम फोर्ट रफ्स.
समुद्रात तोफांनी सज्ज असलेला किल्ला
हा किल्ला ब्रिटनच्या सीमेबाहेर होता. शस्त्रांनी सज्जही होता. युद्धकाळात इथं रॉयल नेव्हीचे 300 सैनिक तैनात होते. 1956मध्ये इथून नौदल पूर्णपणे हटवलं आणि हा किल्ला बेवारशासारखा एकाकी झाला.
1966 पर्यंत हा किल्ला निर्जनच होता. मग एकेदिवशी ब्रिटिश फौजेतला एक निवृत्त मेजर इथं आला आणि त्यानं नव्या देशाची स्थापना केली.
हा किल्ला किनाऱ्यापासून 12 किमी दूर आहे आणि नावेतून पाहाता येतो. दिसायला आजिबात खास वाटत नाही. दोन खांबांवर एखाद्या कंटेनरसारख्या इमारतीचं बांधकाम आहे.
नावेतून तिथं गेलं की क्रेनने वर ओढावं लागतं. मगच वर जाता येतं. पण समुद्राचा भणाणता वारा आणि रौद्र लाटा मनात भीती निर्माण करतात.
याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. त्याच्याशी अनेक कथा निगडित आहेत. हेलिकॉप्टरने घातलेला छापा, गँगस्टर्स, युरोपीय व्यापाऱ्यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न अशा अनेक घडामोडी इथं घडल्यात.
ब्रिटिश सरकारनं जी कागदपत्रं जाहीर केली आहेत त्यामध्ये या किल्ल्याला 'इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावरचा क्युबा' म्हटलं आहे.

फोटो स्रोत, MARTYN GODDARD/ALAMY
याची एकेक माहिती ऐकायला सुरुवात केली की हॉलिवूडच्या एखाद्या पटकथालेखकानं पटकथा लिहिल्यासारखं वाटतं. एका कुटुंबानं या आऊटपोस्टला चिमुकल्या राष्ट्र बनवून टाकलं. हे पटतच नाही.
तरीसुद्धा या एकाकी जागेमध्ये एका नव्या स्वप्न पाहिलं गेलं. कोणत्याही सरकारचा आपल्यावर अंमल नसून आपण स्वतंत्र आहोत असं घोषित करण्यात आलं. ब्रिटनच्या नाकावर टिच्चून इथे स्वतंत्र सरकार आहे.
सीलँडच्या राजकुमार मायकल यांच्याशी फोनवर बोलणं झालं तेव्हा त्यांच्याकडे सुरस कथांचा खजिना असल्याचं मला जाणवलं.
यातल्या काही गोष्टी त्यांनी 'होल्डिंग द फोर्ट' पुस्तकात छापल्या आहेत. परंतु सीलँडसंबंधी ज्या कथा जगाला माहिती नाहीत त्या कथा ते मला सांगायला तयार झाले होते.
पूर्व किनाऱ्यावरचं क्युबा
आम्ही एसेक्स किनाऱ्यावरच्या त्यांच्या मुख्य घरात भेटलो. राजकुमार म्हणाले, "मी 14 वर्षांचा होतो. तेव्हा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यावर मी बाबांना मदत करायला पहिल्यांदा तिथं गेलो होतो. तेव्हा मी सहा आठवडे तिथं राहिल्याचं मला आठवतं."
"मग या त्या बेटावरच्या वाऱ्या पुढे 50 वर्षे चालतील असं वाटलं नव्हतं. ते एक वेगळंच आयुष्य असायचं. इंग्लंडच्या भूमीवरून नाव आली तर काही खाणं-पिणं मिळेल यासाठी कधीकधी आम्हाला कित्येक महिने वाट पाहावी लागे. मी सतत क्षितिजाला डोळे लावून बसे पण समुद्राच्या पलिकडे काहीच दिसत नसे."
सीलॅंडची स्थिती थोडी वेगळी आहे. कोणत्याही देशांना त्याला मान्यता दिलेली नाही. पण राजकुमार म्हणतात, मी कोणाकडे मान्यता मागितलेलीच नाही.
युद्धाच्या काळात ब्रिटनने हा प्लॅटफॉर्म आपल्या सामुद्रसीमेबाहेर अवैधरित्या बांधला होता. पण तेव्हा युद्धाच्या धामधुमीत त्याकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नव्हता.
खरंतर तेव्हाच हे नष्ट करण्याची संधी ब्रिटिशांकडे होती पण त्यांनी तिकडं ढुंकूनही पाहिलं नाही. अनेक दशकं सीलँड तिथंच उभा आहे.
सीलँडचं क्षेत्रफळ फक्त 0.004 चौ. किमी आहे. हा आकार पाहिला की लहान देशांची आपली संकल्पनाच बदलून जाते. पण मग लोक इतक्या लहान देशांची स्थापना का करतात हा प्रश्न उरतोच.
मायक्रोनेशनः द लोनली प्लॅनेट गाईड टू होम-मेड नेशन्स या पुस्तकाचे सहलेखक जॉर्ड डनफोर्ड म्हणतात, की याला वर्तमान सरकारविरुद्धचा असंतोष आणि आपल्या पद्धतीनं काम करण्याची असणारी इच्छा कारणीभूत असते.
डनफोर्ड म्हणतात, सीलँड हे एक विशेष प्रकरण आहे. कारण दीर्घकाळापासून ते सुरू आहे आणि कायद्याच्या कचाट्यातून नेहमी सुटलेलं प्रकरण आहे.
अमेरिकेत अशा कुटुंबाला एक असंतुष्ट कुटंब म्हणून पाहिलं गेलं असतं. पण 1960 च्या दशकात ब्रिटन अधिक उदार होत. तेव्हा हे प्रकरण सोडवण्यात काही फायदा नाही असं अधिकाऱ्यांना वाटलं असेल. एकदोनदा प्रयत्न करुन त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला पण त्यातून सीलँड सुटलं.
मान्यता मिळण्यासाठी नियम
लहान देशांना मान्यता देण्याचे नियम 1933 साली मॉंटेव्हीडिओ संमेलनात तयार करण्यात आले होते. त्यात अशा राज्यांचे अधिकार आणि कर्तव्यं निश्चित केली होती.

फोटो स्रोत, MIROSLAV VALASEK/ALAMY
अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्टसह आंतरराष्ट्रीय नेत्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. याच संमेलनात राज्यासाठी चार मापदंड ठरवण्यात आले होते.
लहान देशांना या मापदंडाच्या आधारावरच मान्यता मिळते असं डनफोर्ड सांगतात. राज्य (देश) म्हणवलं जाण्यासाठी लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, सरकार आणि इतर देशांशी संबंध यांचा विचार केला जातो.
चौथा आणि शेवटचा मापदंड लहान देशांना जास्त जेरीस आणतो कारण ते सतत आपल्याला मान्यता द्या यासाठी इथर देशांकडे भूणभूण लावत असतात. सीलँड मात्र असं करत नाही. ते स्वतःला सार्वभौम समजतात आणि त्यावर आपलाच हक्क असल्याचं समजतात.
प्रत्येक देशाच्या उत्पत्तीची, जन्माची एक कहाणी असते. सीलँडची कहाणी 1965 पासून सुरू होते. मायकल यांचे वडील पॅडी रॉय बेट्स ब्रिटिश सैन्यात मेजरपदावरुन निवृत्त झालेले होते. त्यानंतर त्यांनी मासेमारी सुरू केली होती. त्यांनी रेडियो इसेक्सची स्थापना केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
एचएम फोर्ट रफ्स जवळ एक नॉक जॉन नावाचा किल्ला होता. त्याचा वापरही बंद करण्यात आला होता. त्या किल्ल्यात पॅडी यांनी एक पायरेट रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं.
त्यावेळेस अवैध रेडियो स्टेशन्सची लोकप्रियता इतकी वाढली की ब्रिटिश सरकारला 1967 साली सागरी प्रसारण अपराध कायदा तयार करावा लागला. अशा प्रकारची स्टेशन्स बंद पाडणे हा एकमेव उद्देश होता.
त्यामुळे संधी पाहून बेट्स यांनी आपलं स्टेशन रफ्सवर नेलं. ही जागा ब्रिटिश सागरी सीमेपासून दूर आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात होती.
रेडिओ स्टेशन
नॉक जॉनप्रमाणे हा सुद्धा निर्जन सागरी किल्ला होता आणि त्याची अवस्था वाईट होती. 1966च्या ख्रिसमसच्या आधी त्यांनी हे ठाणं ताब्यात घेतलं. नऊ महिन्यांनी 2 सप्टेंबर 1967मध्ये त्यांनी सीलँडची घोषणा केली. त्याच दिवशी त्यांची पत्नी जोन हिचा वाढदिवस होता. काही दिवसांनी सगळं कुटुंब तिथं राहायला लागलं.

फोटो स्रोत, KIM GILMOUR/ALAMY
1970 च्या दशकात इथं 50 लोक राहात असत. त्यामध्ये सर्व डागडुजी करणारे, स्वच्छता करणाऱ्यांचे कुटुंबीय आणि मित्र सहभागी होते. ब्रिटनच्या सराकरविरोधातील आंदोलनाचं ते प्रतिक बनलं होतं.
सीलँडच्या काही समस्याही होत्या. मायकल म्हणतात, काहीच उपयोगाला यायचं नाही. आमची सुरुवात मेणबत्त्यांपासून झाली होती. मग हरिकेन लुप आणि जनरेटर आले.
सीलँडनं आपलं राष्ट्रीयत्व तयार केलं. शासकीय चिन्हं तयार केली. घटना लिहिली. त्यांचा स्वतःचा झेंडा आहे. फुटबॉलची टीम आणि राष्ट्रगीतही आहे.
सीलँडच्या चलनावर युवराज्ञी जोन यांचं चित्र आहे. आतापर्यंत त्यांनी 500 पासपोर्ट दिलेत. स्वातंत्र्यावर प्रेम हे त्यांचं बोधवाक्य आहे.
मायकल त्यांची तीन मुलं (जेम्स, लियाम आणि शार्लोट) आणि दुसरी पत्नी (मेई शी, या चीनच्या पिपल्स रिबरेशन आर्मीमधल्या निवृत्त मेजर आहेत) सीलँडचा राजवंश चालू ठेवत आहेत.
ब्रिटनशी भांडण
मायकल सांगतात, माझे वडील स्वतःचा देश तयार करावा अशा मताचे नव्हते. पण ब्रिटन सरकार आपलं रेडिओ स्टेशन बंद करण्याच्या प्रयत्नात आहे हे पाहून ते त्रासले होते. आम्ही ब्रिटिश सरकारशी लढलो आणि जिंकलो. सीलँड आतापर्यंत स्वतंत्र अबाधित ठेवू शकलं आहे.
या देशाचा स्वतःचा झेंडा आहे
सीलँडसंदर्भात सर्वात वादग्रस्त घटना 1978मधली आहे. त्यावर ताबा मिळवण्यासाठी जर्मनी आणि हॉलंडचे लोक आले होते. मात्र बंदुक रोखून बेट्स परिवाराने त्या सर्वांना ताब्यात घेतलं.

फोटो स्रोत, NATANAELGINTING/GETTY IMAGES
त्यांना सोडवण्यासाठी लंडनमधून जर्मनीचे राजदूत व शिष्टमंडळ हेलिकॉप्टरने आलं. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला मान्यता दिली.
स्वातंत्र्य सहज मिळत नाही. सीलँडच्या डागडुजीचा खर्च आहे. पहारेकरी तेथेच राहातात. हा खर्च भरुन काढण्यासाठी सीलँडवासी ऑनलाइन स्टोअरवर टीशर्ट, पोस्टाची तिकिटे, राजकीय पदव्या विकतात. लॉर्ड, लेडी. बॅरोन, बॅरोनेस या पदव्या 29.99 पौंडात विकत घेता येतात.
इथं सीमा शुल्क आणि इमिग्रेशनचे सामान्य कायदे लागू नाहीत. राजकुमारांचं अधिकृत आमंत्रण मिळाल्याशिवाय सीलँडवर जाता येत नाही. ते स्वतः तिथं वर्षातून फक्त दोन ते तीन वेळा जातात. बाकी कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही तिथं राहात नाही.

फोटो स्रोत, C LEECH/GETTY IMAGES
डनफोर्ड म्हणतात, "सीलँडची स्थिती नेहमीच बेताची राहिली. परंतु सध्याच्या राजकुमारांनी त्याला चांगल्या पद्धतीनं सांभाळलं आहे. लहान देशांची हीच गोष्ट मला आवडते. ते अस्सल राष्ट्रवादाचं जे रुप दाखवतात ते एकदम शानदार असते."
नागरिकत्वाची नागणी
सीलँडला नागरिकत्व मिळवण्यासाठी दररोज 100 इमेल्स येतात. दिल्लीपासून टोकियोपर्यंतचे लोक सीलँडशी प्रामाणिक राहाण्याची शपथ घ्यायला तयार आहेत.
मायकल म्हणतात, आमची एकूणच गोष्ट लोकांना असा विचार करायला भरीस घालते. जिथं लोकांना काय करा हे सांगितलं जातं अशा समाजात आम्हाला राहात नाही. सर्वजणांना सरकारपासून सूटका हवी आहे. जगाला आमच्यासारख्या प्रेरकशक्तींची गरज आहे. जगात अशा जागा फारच कमी आहेत.
सीलँड अजूनही त्याच जागेवर आहे आणि समुद्र गेली अनेक दशके याचं शांतपणे निरीक्षण करत आहे. ब्रिटनपासून जवळ असूनही जागा ब्रिटनपासून लांब आहे. हे किती वेगळं आणि अशक्यप्राय वाटतं ना?...
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








