सुदानमध्ये काय घडतंय, कशावरून निर्माण झाला वाद?

फोटो स्रोत, Reuters
- Author, बेव्हरली ओचिएंग
- Role, बीबीसी मॉनिटरिंग, नैरोबी
सुदानची राजधानी खार्तूममध्ये शनिवारी लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये झालेल्या गोळीबार आणि स्फोटानंतर परिस्थिती कठीण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुदानच्या लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये (रॅपिड सपोर्ट फोर्सेस) मध्ये हा तणाव सुरू आहे.
वादाची पार्श्वभूमी काय?
ऑक्टोबर 2021 मध्ये सुदान मध्ये बंड होऊन सत्तापालट झाली. त्यानंतर देश सैन्याच्या जनरल्स कौन्सिलद्वारे चालवला जातोय. सुदान मधील वादामागे दोन लष्करातील प्रमुख आहेत.
जनरल अब्देल फताह अल-बुरहान सशस्त्र दलांचे प्रमुख आहेत आणि जनरल्स कौन्सिलचे अध्यक्ष देखील आहेत.
तर जनरल मोहम्मद हमदान डगालो हे रॅपिड सपोर्ट फोर्सेस सर्वेसर्वा असून कौन्सिलचे उपाध्यक्षही आहेत.
सुदानमध्ये वर्षानुवर्षे वादात असलेल्या पॅरामिलिटरी रॅपिड सपोर्ट फोर्सचे लष्करात विलीनीकरण करण्याची योजना आहे. आणि नागरी शासनाकडे प्रस्तावित वाटचाल यावर या दोघांचेही मतभेद आहेत.
हा वाद खरं तर प्रस्तावित नागरी सरकारमध्ये 100,000 च्या युनिफाइड आर्मीचं नेतृत्व कोण करेल यावरून सुरू आहे.
पण शनिवारी काय झालं?
तर लष्कर आणि निमलष्करी दलात तणाव वाढल्याने आरएसएफने देशभरात लष्करी तळाजवळ सैन्य तैनात केले.
चर्चेने परिस्थिती निवळेल अशी आशा होती पण तसं काही झालं नाही.
शनिवारी सकाळी गोळीबार सुरू झाला. पण सुरुवात नेमकी कोणी केली याविषयी स्पष्टता नाही. त्यामुळे बिघडलेली परिस्थिती आणखीनच गंभीर झाली.
तणाव कमी व्हावा म्हणून दोन्ही बाजूंनी गोळीबार बंद करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
रॅपिड सपोर्ट फोर्सची स्थापना
2013 साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशीर यांच्या आदेशानंतर रॅपिड सपोर्ट फोर्सची स्थापना झाली. दारफुरमध्ये सक्रिय असणाऱ्या आफ्रिकन पॅरामिलिट्रीविरोधात लढण्यासाठी ही फोर्स स्थापन करण्यात आली.
पुढे जनरल डगालो यांनी येमेन आणि लिबियामधील संघर्षांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आणि सुदानच्या काही सोन्याच्या खाणींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या शक्तिशाली सेनेचा वापर केला.
जून 2019 मध्ये 120 हून अधिक आंदोलकांची हत्या करून मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याचाही आरोप या सेनेवर आहे.
लष्कराव्यतिरिक्त आणखीन एक शक्तिशाली सेना असल्याने देशात अस्थिरता निर्माण होत असल्याचं चित्र आहे.
लोकांच्या विरोधानंतर तीन दशकांपासून सत्तेवर असलेले सुदानचे माजी राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशीर यांना पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा तणाव वाढला.
जवळपास तीन दशकांची राजवट संपुष्टात आणण्यासाठी सुदानमध्ये निदर्शने सुरू होती. शिवाय ओमर अल-बशीर यांनी पायउतार व्हावं म्हणून सैन्यानेही उठाव केला.
ओमर अल-बशीर पायउतार झाल्यानंतरही नागरिकांनी लोकशाही शासनासाठी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं.
त्यानंतर एक संयुक्त लष्करी-नागरी सरकार स्थापन करण्यात आलं, पण ऑक्टोबर 2021 मध्ये दुसऱ्यांदा सत्तापालट झाली.
आणि तेव्हापासून जनरल बुरहान आणि जनरल डगालो यांच्यातील वाद टोकाला गेला.
लोकशाहीमार्गाने सरकार सत्तेवर यावं यासाठी गेल्या डिसेंबरमध्ये फ्रेमवर्क करारावर सहमती झाली होती. पण अंतिम वाटाघाटीच्या चर्चा अयशस्वी ठरल्या.
आता पुढे काय होणार?
ही लढाई अशीच सुरू राहिल्यास देशाचे तुकडे होऊ शकतात आणि राजकीय अशांतता वाढू शकते.
पाश्चात्य मुत्सद्दी आणि प्रादेशिक नेत्यांनी दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्यासाठी आणि नागरी शासन पुनर्संचयित करण्यासाठी वाटाघाटी करण्यात पुढाकार घेतला होता. पण यावेळी तसं घडेलच असं नाही.
दरम्यान, सुदानच्या नागरिकांना मात्र अनिश्चिततेच्या छायेत जगावं लागेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








