‘माझी शेजारीण दोन वर्षं बेपत्ता होती आणि अडीच वर्षं तिचा मृतदेह घरात पडून होता’

फोटो स्रोत, BBC/PHIL COOMES
- Author, हॅरी फर्ले
- Role, बीबीसी रेडियो 4 प्रतिनिधी
सूचना : यातलं चित्रण वाचकांना अस्वस्थ करू शकतं.
दक्षिण लंडनमध्ये राहणारे काही रहिवासी सध्या पीबॉडी या गृहनिर्माण संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहेत.
त्याचं कारण म्हणजे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेचा मृतदेह तिच्याच घरात आढळला होता. मृत्यू झाल्यानंतर अडीच वर्ष हा मृतदेह घरातच पडून होता.
विशेष म्हणजे, शेजाऱ्यांनी अनेकदा शंका उपस्थित करत याकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला होता. पण तरीही त्याकडं दुर्लक्ष झालं. शिवाय कुणी एवढा काळ इतरांच्या संपर्काशिवाय कसं राहू शकतं, हाही प्रश्न होताच.
आँड्री 2018 पासून लॉर्ड्स कोर्ट या पेकहॅममधील अत्याधुनिक तीन मजली ब्लॉकच्या एका फ्लॅटमध्ये राहत आहेत. त्यांना तो दिवस अजूनही स्पष्टपणे आठवतो. पोलिसांनी त्यांच्या फ्लॅटच्या समोरच असलेल्या फ्लॅटचा दरवाजा तोडला होता.
"दार उघताच मला समजलं होतं की, काही तरी अत्यंत वाईट घडलेलं आहे. कारण पोलिसांच्या चेहऱ्यावरच ते स्पष्ट दिसत होतं," असं आँड्री म्हणतात.
एका छोट्याशा वन बेडरूम फ्लॅटमध्ये पोलिसांना 58 वर्षीय शीला सेलिऑन यांच्या मृतदेहाचे अवशेष आढळले होते. जवळजवळ त्यांचा फक्त सांगाडाच उरला होता. त्यावर पांढरा टॉप आणि निळा पायजमा परिधान केलेला होता. पोलिसांना त्या मृत्यूमध्ये काहीही संशयास्पद आढळलं नाही.
फ्रीजमध्ये एक जुनी मिठाई पडलेली होती. त्यावरून तो मृतदेह तिथं किती काळ तिथं पडून असेल याचा अंदाज येत होता. कारण ती मिठाई अडीच वर्षांपूर्वीच कालबाह्य झालेली होती.
शीला यांच्या शेजाऱ्यांना बऱ्याच दिवसांपासून काहीतरी चुकीचं घडलंय, हे वाटणं अगदीच साहजिक होतं.
ऑगस्ट 2019 मध्ये शीला यांच्या खालच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या चँटल यांनी त्यांच्या घराचे बल्ब बदलले. त्यांनी जुने बल्ब काढले त्यावेळी छतामधून खूप सारे किडे आणि अळ्यांचा जणू सडाच खाली पडला. त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये त्यांची ही समस्या आणखी वाढतच गेली.
"मला माझ्या बेडरूममध्ये अळ्या आढळू लागल्या, लिव्हिंग रूम आणि बाथरूममध्येही आढळू लागल्या. एवढंच काय पण माझ्या सर्व फर्निचरवही सगळीकडं तेच दिसू लागलं," असं त्या सांगतात. "समजा तुम्ही सोफ्यावर बसले आणि काही वेळानं उठले तर तुम्हाला तुमच्या खालीही अळी चिरडलेली दिसत होती. एखाद्या हॉरर चित्रपटातील घरात राहण्यासारखं ते होतं," असं त्या म्हणाल्या.
चँटेल त्यांचं खरं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर आमच्याशी बोलल्या. त्या म्हणाल्या की, त्यांनी पीबॉडीला याबाबत माहिती दिली होती, पण त्यांनी याचा निपटारा करण्याचं काम आमचं नाही, असं उत्तर दिलं.
"एखादी व्यक्ती एवढ्या दीर्घ काळासाठी तिच्या फ्लॅटमध्ये असते आणि कोणालाही ती आढळत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. विशेष म्हणजे कोणीही, त्यांच्याशी संपर्क साधायलाही कुणी जात नाही, हे अधिकच वाईट आहे," असं त्या म्हणाल्या.
त्यानंतरच्या काही आठवड्यांमध्ये किंवा महिन्यांमध्ये याविषयी चिंता व्यक्त करणाऱ्यांमध्ये त्या एकट्याच शेजारी नव्हत्या.

फोटो स्रोत, BBC/HARRY LOW
आँड्री यांना आठवतं की, त्या कामानिमित्त काही दिवसांच्या प्रवासावरून परतल्या, तेव्हा लिफ्टनं तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर त्यांना एखादा "मृतदेह कुजल्यासारखा" दुर्गंध येऊ लागला होता.
"त्यामुळं मला आजारी पडल्यासारखं वाटू लागलं. मला काहीतरी जाणीव होत होती. ती अत्यंत भयावह भावना होती," असं त्या म्हणाल्या.
त्याच मजल्यावर राहणाऱ्या इतर शेजाऱ्यांनी सांगितलं की, ते दारांच्या खाली फट बुजवण्यासाठी टॉवेल किंवा इतर कपडे टाकून दुर्गंधी घरात येऊ नये म्हणून प्रयत्न करत होते.
"आम्हाला तर फ्लॅटमध्ये झोपही येत नाही. जेवणही करू शकत नाही, कारण तो दुर्गंध खूप म्हणजे खूपच घाणेरडा होता," असं डोनट्स ओकेके यांनी सांगितलं. ते पत्नी एव्हलिन आणि त्यांच्या तीन मुलांसह दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहत होते.
शीला त्यावेळी त्याठिकाणी राहत नव्हत्या हे अगदीच स्पष्ट होतं. त्यांची घराबाहेरची पत्रपेटी भरून त्यातली पत्रं खाली पडू लागली होती. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी डोअरमॅट दाराला उभी करून ठेवली होती. ते परत कधीच तिकडं गेले नाहीत.
एव्हलिन म्हणाल्या की, त्यांनी पीबॉडीला अनेकदा फोन केले. त्यांनी आम्हाला, पहिल्यांदा फोन केला तेव्हाची म्हणजे 10 ऑक्टोबर 2019 ची नोंदही दाखवली. शीला यांचा मृत्यू झाला असावा असं वाटल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी हा संपर्क केला होता.
त्याच मजल्यावर राहणाऱ्या आणखी एक शेजारी, इयेशा यांनीही पीबॉडीला अनेकदा संपर्क केला होता. "मी कायम त्यांना फोन करून मृतदेह सडल्याचा दुर्गंध येत असल्याचं सांगत होते. पण कोणीही आलं नाही," असं त्या म्हणाल्या.
शंका आल्यानंतर सावध करण्यासाठी म्हणून शेजाऱ्यांनी शक्य ते सर्व काही केलं असं आँड्री म्हणाल्या. त्यावर त्या जेव्हाही कॉल करायच्या, तेव्हा पीबॉडीच्या ग्राहक सेवा केंद्राकडून याचा तपास केला जाईल अशी आश्वासनं वारंवार मिळत होती, असंही त्यांनी सांगितलं.
"मला एकाच गोष्टीचं दुःख आहे, ते म्हणजे मी पीबॉडीवर विश्वास ठेवला. पोलिसांना आधीच माहिती दिली नाही, याची खंतही वाटते. कारण पीबॉडीकडून लवकरच काहीतरी पावलं उचलली जातील, असा विश्वास मी ठेवला होता."

पीबॉडीनं बीबीसीशी बोलताना म्हटलं की, शीला यांच्याबरोबर जे काही घडलं ते अत्यंत हादरवून टाकणारं होतं. तसंच नेमकं कुठं चूक झाली, याबाबत अत्यंत प्रामाणिक आणि पारदर्शक असल्याचंही ते म्हणाले.
फेब्रुवारी 2022 पर्यंत शीला यांचा शोध का लागला नाही?
शीला यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडून भाड्याची रक्कम मिळणं बंद झाली होती. त्यामुळं पीबॉडीनं त्यांना पत्रं, ई मेल आणि अनेक व्हॉइसमेल पाठवले. पण त्यानंतरच्या वर्षांमध्ये कोणीही त्यांना शोधण्यासाठी घरी भेट दिली नाही.
2014 मध्ये त्या फ्लॅट भाड्याने घेऊन इथं राहायला आल्या, तेव्हापासून प्रत्येकवेळी त्या अगदी वेळेवर भाडं देत होत्या. तरीही भाडं थकल्यानंतर फार कोणी दखल घेतली नाही.
त्याउलट, शीला यांच्याशी संपर्क साधण्याऐवजी पीबॉडीनं त्यांचं भाडं भरण्यासाठी युनिव्हर्सल क्रेडीट संस्थेकडं अर्ज केला. ज्या भाडेकरूंना भाडे देण्यासाठी किंवा खर्च भागवण्यासाठी अडचणी येत असतात, त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजनेच्या माध्यमातून त्यांनी ते मिळवण्यासाठी अर्ज केला होता.
पीबॉडीचा अर्ज स्वीकारला गेला. त्यामुळं मार्चपर्यंत म्हणजे शीला यांच्या मृत्यूच्या सात महिन्यांच्या नंतरपर्यंत त्यांचं भाडं या योजनेच्या माध्यमातून थेट पीबॉडीकडे जमा होत होतं.
त्यानंतर एप्रिल 2020 मध्ये त्यांचं गॅस सेफ्टी चेक व्हायचं होतं. मालकाला वर्षातून एकदा ते करणं बंधनकारक असतं. पण त्यावेळी पीबॉडीच्या कंत्राटदारांना फ्लॅटच्या आत जाता आलं नाही, त्यानंतरही पीबॉडीकडून कोणीही परत भेटच दिली नाही. त्याउलट त्यांनी पत्रं लिहिली आणि नंतर त्यांचा गॅस पुरवठा बंद केला.
शीला यांच्या मृत्यूच्यानंतर एका वर्षानं अखेर पीबॉडीनं शेजाऱ्यांच्या तक्रारींना प्रतिसाद देत त्याठिकाणी भेट दिली. त्यांनी पोलिसांनाही तपासण्यास सांगितलं. पण अधिकाऱ्यांनी दार वाजवलं तेव्हा आतून कोणीही प्रत्युत्तर दिलं नाही. अखेर दार तोडण्यासाठी म्हणून पुरेसं योग्य कारण नसल्याचा निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला होता.
एका पोलिस ऑपरेटरनं केलेल्या चुकीचा हा गंभीर परिणाम होता. शीला या दिसल्या असून त्या जीवंत आणि सुखरुप असल्याचा मॅसेज पीबॉडीला पाठवण्यात आला होता.
त्यानंतर शीला यांचा मृतदेह मिळण्यास आणखी 16 महिने लागले. पोलिसांनी याबाबत माफीही मागितली. तसंच ऑपरेटर यासाठी जबाबदार असता आणि निवृत्त झाला नसता, तर त्याची चौकशी करण्यात आली असती, असंही पोलिस म्हणाले.

फोटो स्रोत, BBC/EMMA LYNCH
त्या क्षणापर्यंत म्हणजे, शीला यांच्या निधनानंतर सुमारे वर्षभराचा काळ निघून गेला होता. या दरम्यान शीला यांचे थकलेले भाडे, रखडलेलं गॅस सेफ्टी चेक, त्यांनी पत्रांना, ई मेलला उत्तरं न देणं या कशानंही पीबॉडीतील कोणालाही काळजी वाटली नाही. कोणीही त्यांच्या फ्लॅटला प्रत्यक्ष भेट देऊन, त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
शीला यांचा मृतदेह मिळाल्यानंतर पीबॉडीच्या वतीनंही एक अहवाल तयार करण्यात आला होता. शीला यांच्याबाबत खूप आधीच माहिती मिळण्याच्या अनेक संधी त्यांनी हातून गमावल्याचा उल्लेख त्यात होता.
शेजाऱ्यांकडून वारंवार मिळालेली माहिती, तसंच रखडलेलं गॅस सेफ्टी चेक अशा घटनांकडं "सिलो वर्किंग"मुळं( कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव) दुर्लक्ष झाल्याचंही या अहवालात म्हटलं होतं.
"या संस्थेनं संकेतांकडं लक्ष दिलं नाही, शेजाऱ्यांचं म्हणणं ऐकलं नाही किंवा वेगवेगळे असलेले बिंदू एकत्र जोडण्याचा प्रयत्नही केला नाही," असंही या अहवालात म्हटलं होतं. यावरून पीबॉडीमधील नोकरशाही किंवा एकाच ध्येयाच्या दिशेनं काम करण्याची वृत्ती आणि त्यामुळं ग्राहकाला केंद्रस्थानी न ठेवणं, हे समोर येतं असाही उल्लेख अहवालात होता.
हाऊसिंग चॅरिटी शेल्टरच्या मते गृहनिर्माण संस्थांचं विलिनीकरण करून मोठ्या संस्था तयार करण्याचा ट्रेंड आहे. संस्थेचे धोरणात्मक प्रमुख चार्ली ट्र्यू यांच्या मते, यामुळं ‘नफ्यापेक्षा भाडेकरू अधिक महत्त्वाचे’ असल्याच्या मूळ उद्देशाकडं दुर्लक्ष होण्याचा धोका आहे.
शीला यांच्या शेजाऱ्यांनी 2017 मधील अशाच एका बदलाकडं लक्ष वेधलं. त्यावेळी लॉर्ड्स कोर्ट, फॅमिली मोझेक अशा छोट्या संस्थांचं कित्येक पटीनं मोठ्या असणाऱ्या पीबॉडीमध्ये विलिनीकरण झालं होतं.
या ब्लॉकमध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध असलेला समुदाय होता, असं आँड्री सांगतात. पण "आता लॉर्ड्स कोर्टमध्ये गेल्यानंतर अत्यंत उदास आणि दुःख दाटल्यासारखा अनुभव येतो," असं त्या म्हणाल्या.
त्यांनी सांगितलं की, फॅमिली मोझेकनं एका बिल्डींग मॅनेजरची नियुक्ती केली होती. त्याचे सर्वांशी चांगले संबंध होते आणि तो येथील रहिवाशांना भेटण्यासाठी अधून मधून येत असायचा. "लोकांची काळजी कशी घ्यावी, हे कदाचित पीबॉडीला माहितीच नसावं," असं त्या म्हणाल्या.
यासाठी कदाचित पीबॉडीकडे त्यावेळी असलेल्या मोठ्या आकाराचे पॅच (ठरावीक भाग) कारणीभूत असावेत. येथील गृहनिर्माण संस्थांनी भौगोलिक भागाच्या आधारे पॅचचे विभाजन केलेलं असतं. प्रत्येक पॅचसाठीचा एक नेबरहूड मॅनेजर किंवा हाऊसिंग ऑफिसर असतो. त्याचं काम रहिवाशांच्या समस्या जाणून घेणं, त्या सोडवणं आणि त्यांना मदत करणं हे असतं.

फोटो स्रोत, BBC/PHIL COOMES
पण साधारणपणे एका पॅचमध्ये अंदाजे 250 ते 500 घरं असतात. पण पीबॉडीच्या पॅचचा आकार त्यावेळी 800 ते 1000 घरं एवढा होता. याचा अर्थ म्हणजे नेबरहूड मॅनेजरला जास्त भागात काम करावं लागत होतं. परिणामी त्याला भेटींसाठी अत्यंत कमी वेळ मिळत होता.
शीला यांचा मृतदेह सापडल्यानंतर पीबॉडीनं त्यांच्या पॅचचा आकार कमी करून अंदाजे 500 घरांवर आणल्याचं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
निधीसंबंधीच्या पायाभूत अडचणींमुळं गृहनिर्माण संस्थांवर असलेला दबाव सातत्यानं वाढत असल्याचं, शेल्टरचे चार्ली ट्र्यू म्हणाले.
सरकारनं 2010 पासून केलेल्या कपातीमुळं त्यांना उत्पन्नाचा पर्याय शोधावा लागल्याचं ते म्हणाले. त्यासाठी त्यांना खासगी घरांची निर्मिती आणि विक्री करून सामाजिक निवासस्थानं तयार करण्यासाठी निधी उभारावा लागतो, असंही त्यांनी सांगितलं.
"याचा परिणाम म्हणजे या संस्थांनी भाडेकरूंपेक्षा त्यांच्यावर असलेल्या दबावामुळं आर्थिक कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रीत केलं. त्यामुळं भाडेकरूंसाठीचा अनुभव दिवसेंदिवस वाईट होत गेला," असंही ते म्हणाले.
गृहनिर्माण, समुदाय आणि स्थानिक सरकारचे प्रवक्ते म्हणाले की, "शीला यांच्याबाबतच्या दुर्दैवी घटनेमुळं, मालकांकडून भाडेकरूंकडं होणारं दुर्लक्ष आणि त्याचे गंभीर परिणाम याकडंही लक्ष वेधलं आहे."
सरकारनं 2010 पासून सामाजिक पातळीवर भाड्यानं देण्यासाठी 1,62,000 हून अधिक घरं प्रदान केली असल्याचंही त्यांनी म्हटलं.
"आम्ही आणखी मोठ्या संख्येनं अशा प्रकारची घरं उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी सरकार 11.5 अब्ज युरोची गुंतवणूक करणार आहे. त्यामाध्यमातून भाडे तत्वावर देण्यासाठी किंवा विक्रीसाठी देशभरात हजारो घरं उपलब्ध करून दिली जातील," असंही त्यांनी सांगितलं.
गृहनिर्माण संस्था विलिनीकरणाद्वारे नफ्यावर अधिक लक्ष केंद्रीत करत असल्याची बाब चिंताजनक आहे. त्यामुळं भाडेकरूच एक प्रकारची अडचण किंवा समस्या असल्यासारखी वागणूक त्यांना दिली जाण्याची शक्यता असते. यावर लवकर मार्ग शोधायला हवा, असंही चार्ली म्हणाले.
"यासाठी मूलभूत संस्कृतीमध्येच बदल होणं गरजेचं आहे. तसं झाल्यास गृहनिर्माण संस्था पुन्हा एकदा भाडेकरूंचे आरोग्य आणि सेवांवर लक्ष केंद्रीत करतील. ते त्यांच्या भाडेकरूंचं म्हणणं ऐकू लागतील, तसंच भाडेकरू आनंदी जीवन जगत आहेत हे सुनिश्चित करणं हे त्यांचं कर्तव्य समजतील."
शीला यांच्याबाबत आधी माहिती का मिळाली नाही, याच्याशी संबंधित असलेला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे, त्या किती एकाकी जगत होत्या.

फोटो स्रोत, BBC/HARRY LOW
त्यांच्या अंत्ययात्रेच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण रिकाम्या स्मशानभूमीत फक्त एक जण उभा असल्याचं दिसत होतं. तो त्यांचा सावत्र भाऊ होता. अनेक वर्षांपासून शीला यांच्याशी बोलणंही झालं नव्हतं असं त्यानं सांगितलं. त्याशिवाय दुसरा व्यक्ती होता तो म्हणजे, पीबॉडीतील प्रतिनिधी, तो काही वेळानं तिथं आला होता.
कुटुंबातील दुसरं कोणीही नव्हतं. एकही मित्रदेखील नव्हता.
शीला यांना एका एजन्सीच्या माध्यमातून नोकरी मिळालेली होती. त्यावरून त्यांचं कामाचं निश्चित ठिकाण किंवा सहकारी कर्मचारी असण्याची शक्यता कमी होती.
त्यांच्याबाबत मिळवलेल्या ऑनलाईन माहितीचा विचार करता, सोशल मीडियावरही त्या फारशा सक्रिय नव्हत्या. 2012 मधील एका फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी शाळेतील मैत्रिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचं आढळलं होतं. "मला तुझा पत्ता लक्षात नाही आणि मी चुकून तो लिहूनही ठेवला नव्हता," अशी पोस्ट त्यांनी केली होती. पण त्यावर कोणीही उत्तर दिलेलं नव्हतं.
अधिकृत आकडेवारीनुसार सुमारे 7% ब्रिटीश प्रौढांना अनेकदा किंवा कायमच एकटं असल्याची भावना निर्माण होत असते. तर 25% हे किमान काही काळासाठी तरी एकटे पडलेले असतात.
काही संशोधनावरून समोर आलंय की, एकटेपणामुळं लवकर मृत्यू होण्याची शक्यता वाढत असते. शीला यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे माहिती नाही. मात्र, त्यांच्या रिपोर्ट्समध्ये आरोग्यासंबंधी काही समस्या असल्याचं समोर आलं होतं.
त्यांच्या शेजाऱ्यांच्या मते, शीला या ‘लाजाळू’ आणि स्वतःमध्येच रमणाऱ्या पण तरीही मनमिळावू होत्या. त्या पायऱ्यांवर भेटल्या की, हॅलो वगैरे बोलायच्या. पण त्यां एकमेकिंना ओळखत नव्हत्या.
"यामुळं मला माझे शेजारी आणि मी राहत असलेला समाज, याकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडलं. आपण इतर लोकांबाबतही माहिती ठेवायला हवी," असं आँड्री म्हणाल्या.
त्याठिकाणी नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत, अशी कबुली पीबॉडीनं दिली.
"त्याउलट आम्ही सतत पत्र पाठवत राहिलो आणि फोन करत राहिलो. पण हे पुरेसं नाही, हे आमच्या लक्षातच आलं नाही," असं त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं.
या सर्वामुळं तक्रारींची दखल घेण्याची पद्धतच पूर्णपणे बदलल्याचं पीबॉडीनं सांगितलं. भाडे वसुली आणि गॅस सेफ्टी चेक याबाबतही शीला यांच्या प्रकरणानंतर बदल केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
"भाडेकरू आणि त्यांचं उत्तम जीवन याला केंद्रस्थानी ठेवत आम्ही आता नव्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली आहे," असं पीबॉडीनं निवेदनात म्हटलं.

फोटो स्रोत, BBC/HARRY LOW
"हा संस्कृतीमधील बदलाचाच एक भाग आहे आणि त्याला वेळ लागतो. तसंच आमच्या सेवा हव्या तेवढ्या उत्तम नसल्याचं आम्हाला माहिती आहे. मात्र, आम्ही आमची मूल्ये जपण्याचा, चुकांतून धडा घेण्याचा आणि रहिवाशांच्या सेवेसाठी सातत्यानं सुधारणा करण्याचा निर्धार केला आहे."
लॉर्ड्स कोर्टमधील रहिवाशांबरोबर असलेलं नातं अत्यंत वाईट होतं आणि त्यासाठी माफी मागितली असल्याचंही, पीबॉडीकडून सांगण्यात आलं.
पण, पीबॉडीनं सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी, जे काही घडलं त्याचा धक्का अजूनही लॉर्ड्स कोर्टमधील शेजाऱ्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळं शेजारी त्यांच्या एकूण अनुभवानंतर झालेल्या नुकसान भरपाईसाठी कायदेशीर कारवाई करण्याबाबत वकिलांशी चर्चा करत असल्याची माहिती बीबीसीला मिळालीये.
याठिकाणी राहताना अडीच वर्ष मृतदेहापासून काही मीटर अंतरावर राहिल्याच्या भयावह आठवणी, तसंच पीबॉडीला सांगण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या आठवणी वारंवार दाटू लागतात, असं आँड्री सांगतात.
"त्या दारामागं नेमकं काय घडत असेल, याचं मला कायम आश्चर्य वाटत असायचं," असंही त्या म्हणाल्या.
शीला यांचा मृतदेह सापडल्यानंतर लगेचच ऑंड्रींनी पीबॉडीला दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जागा देण्याची विनंती केली होती. पण वर्षभरानंतरही त्यांना पर्यायी जागा मिळालेली नाही.
"या घटनेनंतर आम्ही रात्री कशा जागून काढल्या, आणि या संपूर्ण घटनेचा आमच्यावर काय परिणाम झाला, हे त्यांना माहिती नाही," असं आँड्री म्हणाल्या.
"अजूनही मी जेव्हा बाहेर पडले आणि शीला यांच्या फ्लॅटकडे पाहते, तेव्हा त्याचा माझ्यावर काहीतरी परिणाम होतो. तिथं काय घडलं होतं, हेच मला वारंवार आठवत राहतं."
एव्हलिन आणि त्यांच्या कुटुंबानंही दुसरीकडं जाण्याचा प्रयत्न केला होता. शीला यांचा मृतदेह मिळाला तेव्हापासून, एव्हलिन यांचा 12 वर्षांचा मुलगा व्यवस्थित झोपू शकलेला नाही. तसंच त्याच्या शाळेतील कामगिरीवरही परिणाम झालाय. मृतदेह असलेल्या घराच्या जवळच आपण अडीच वर्ष राहत होतो, हे समजल्याचा हा परिणाम होता, असं त्या म्हणाल्या.
"आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येतंय. त्यांना आमची काळजी नाही. त्यांना फक्त पैशाची काळजी आहे, बाकी कशाचीही नाही," असंही त्या म्हणाल्या.
लंडनमध्ये सामाजिक स्तरावर विचार करता अशा घरांची कमतरचा आहे. पण तरीही आँड्री आणि एव्हलिन यांच्यासाठी चांगला पर्याय शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचं पीबॉडीकडून सांगण्यात आलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








