पूजा गौड: 'रडलीस तर डोंगरावरून खाली फेकू,' 9 वर्षं पूजाचा छळ, अखेर 'ती' आईजवळ परतली

फोटो स्रोत, BBC AND MUMBAI POLICE
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"9 वर्षांनंतर मला आईला पाहता आलं, तिच्या कुशीत झोपता आलं. मी सुटले. मला खूप छान वाटतंय. पण आता पप्पा नाहीये. मी त्यांना शोधत होते पण ते कुठेच दिसले नाहीत. मला पप्पांना भेटायचं आहे," असं म्हणत 16 वर्षांची पूजा गौड ढसाढसा रडू लागली.
जानेवारी 2013 मध्ये मुंबईत अंधेरी येथे राहणाऱ्या पूजा गौड या मुलीचं अपहरण झालं होतं. त्यावेळी पूजा सात वर्षांची होती. ती पहिलीत शिकत होती.
सकाळी 8 वाजता शाळेत जात असताना 'आईस्क्रीम खायला देतो,' असं सांगून पूजाला पळवून नेलं.
22 जानेवारी 2013 रोजी शाळेबाहेरून बेपत्ता झालेली पूजा थेट 9 वर्षांनी 4 ऑगस्ट 2022 रोजी सापडली.
एवढे वर्षं पूजा कुठे होती? ती कोणत्या परिस्थितीत होती? तिला कोण घेऊन गेलं होतं? मग आता कशी परतली? लेक आणि आईची भेट कोणी घडवून आणली? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. मन हेलावून टाकणारा, प्रसंगी थक्क करणारा हा हृदयस्पर्शी घटनक्रम आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
'अखेर पूजाने हिंमत केली आणि...'
सात महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात पूजा गौड अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होती. त्यांनी तिला पश्चिम मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत एका इमारतीत लहान मुलांना सांभाळण्याच्या कामाला जुंपलं होतं. त्याच घरात 35 वर्षीय प्रमिला देवेंद्र या सुद्धा काम करत होत्या.
प्रमिला आणि पूजा एकत्र काम करत असल्याने हळुहळू दोघींमध्ये एक घट्ट नातं तयार झालं. कामावर येताना पूजाचा चेहरा कायम उदास असायचा. अनेकदा डोळ्यात अश्रू असायचे, हे प्रमिला पाहत होत्या.
प्रमिला देवेंद्र सांगतात, "मला वाटायचं घरातली परिस्थिती चांगली नसेल. आई-वडील आणि मुलीचं काहीतरी पटत नसेल. मी तिला कायम विचारायचे की तू सारखी रडत का असतेस, तुला काय होतंय? ती मला सांगायची की तिला त्रास देतात. पण मला वाटलं घरातलं वातावरण चांगलं नसेल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
परंतु सात महिन्यांनंतर म्हणजेच 2 ऑगस्टला पूजाने अखेर हिंमत केली आणि प्रमिला यांना सगळं सांगितलं. "मी प्रमिला दीदीला सांगितलं की मी ज्यांच्यासोबत आता राहत आहे ते माझे खरे आई-वडील नाहीत. त्यांनी मला पळवून आणलं होतं. तेव्हा मी लहान होते. शाळेत जात होते. मी यू ट्यूबवर माझं नाव सर्च करून पाहिलं तर माझे न्यूजमधले व्हीडिओ दिसले. मला शोधण्यासाठी जे पोस्टर बनवलं होतं ते दाखवलं. त्या पोस्टरवर काही मोबाईल नंबर होते."
हे पाहून प्रमिला यांना धक्का तर बसलाच पण सतत उदास असणाऱ्या पूजाची कहाणी सत्य असल्याचं खात्री प्रमिला यांना पटली.
त्या म्हणाल्या, "यूट्यूबमधून पूजाने मला व्हीडिओ दाखवला. हे माझे आई वडील आहेत असा फोटोही तिने मला दाखवला. तिचा लहानपणीचा फोटो दाखवला. शाळेचा गणवेश घातलेली, केसांची वेणी असलेली फोटोतली ही मुलगी मीच आहे असं पूजा म्हणाली. हा व्हीडिओ मी आमच्या परिसरातील एका मुलीला पाठवला. तिने गुगलवर सर्च केलं आणि मला नंबर पाठवले. त्यावर तीन-चार मोबाईल नंबर होते. त्यापैकी एका नंबरवर फोन लागला. हा नंबर रफीक यांचा होता."
प्रमिला यांचं धाडसी पाऊल
पूजा गौड अंधेरी येथील एका झोपडपट्टीत राहते. पूजाच्या घराजवळ त्यांचे शेजारी रफीक राहतात.
"मी आणि पूजाच्या वडिलांनी पूजाला खूप शोधलं होतं. आम्ही मुंबई पालथी घातली होती. महाराष्ट्रजवळच्या राज्यांमध्ये शोधलं. पूजाचे वडील तर गोवा, पंजाब, राजस्थान अगदी जम्मू-कश्मीरपर्यंत गेले होते. पण पूजा सापडली नव्हती. मला 3 ऑगस्ट 2022 रोजी रात्री साधारण 8 वाजता प्रमिला यांचा फोन आला. पूजा नावाच्या हरवलेल्या मुलीला तिच्या आईशी बोलायचं आहे असं त्या म्हणाल्या. तेव्हा मी एकदम अस्वस्थ झालो. कारण गेल्या काही वर्षांत पूजा आमच्याकडे आहे असा दावा करणारे अनेक जण आले. पण प्रत्यक्षात पूजा ऐवजी दुसऱ्या मुली भेटायच्या. त्यामुळे मी लगेच पूजाच्या कुटुंबीयांना सांगितलं नाही आणि प्रमिला यांना दुसऱ्या दिवशी व्हीडिओ कॉल करा असं सांगितलं."

फोटो स्रोत, Pramila Devendra
4 ऑगस्टला 2022 रोजी सकाळी प्रमिला आणि पूजा कामावर पोहोचल्या. 'तुझ्या आईला व्हीडिओ कॉल करायचा,' आहे असं प्रमिला यांनी पूजाला सांगितलं.
सकाळी साधारण 10 वाजता प्रमिला यांनी रफीक यांना व्हीडिओ कॉल केला. "कॉल येताच मी धावत धावत पूजाच्या आईकडे गेलो. त्यांना सांगितलं की पूजा नावाच्या मुलीचा फोन आहे." रफीक म्हणाले.
पूजाची आई पूनम गौड सांगतात, "मला कळत नव्हतं की काय करावं...मी कावरी-बावरी झाले. हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. पूजा नावाची मुलगी दावा करत होती की ती माझी मुलगी आहे."
रफीक यांनी हा व्हीडिओ कॉल दुसऱ्या मोबाईलवरून रेकॉर्ड केला आहे. आम्ही हा व्हीडिओ कॉल पाहिला. यात सात वर्षांची असताना हरवलेली पूजा एवढ्या वर्षांनी आपल्या आईला पाहत होती. ती आता लहान राहिली नव्हती. आपल्या आईशी बोलताना तिला रडू कोसळलं. पूजाची आई पूनम गौड यांनाही नऊ वर्षांनंतर आपल्या मुलीला पाहून अश्रू अनावर झाले.
पूजाचा फोन आल्याची बातमी गल्लीत वाऱ्याच्या वेगाने पसरली. लहान लहान झोपड्यांमध्ये राहणारी माणसं घराबाहेर येऊन उभी राहिली होती. पूजाच्या आईला सांभाळण्यासाठी शेजारच्या महिलांनी गर्दी केली होती. काही जण पूजाला पाहण्याचा प्रयत्न करत होते. जे पूजाला पाहत होते ते मागून ओरडत होते की, ' ही पूजाच आहे, तिच्यासारखीच दिसते.'

मग पूनम गौड यांनी पूजाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. 'मेरा नाम क्या है?' पूजा रडतच म्हणाली, 'पूनम.'
तिच्या आईने विचारलं, 'पापा का नाम क्या है?' ती म्हणाली, 'संतोष.'
व्हीडिओ कॉल संपल्यानंतर त्यांनी प्रमिला यांना पत्ता विचारला आणि एके ठिकाणी भेटायचं ठरवलं. प्रमिला या पूजासोबतच थांबल्या. त्यांनी आपल्या जवळच्या काही जणांना बोलवलं. तिकडे पूजाच्या आईसोबत दोन भाऊ, तिचे काका, आत्या, शेजारी रफीक आणि इतर असे सर्वजण पूजाला भेटण्यासाठी गेले.
आई-वडिलांपासून दूर नेल्यानंतर 3 हजार 285 दिवसांनी पूजा आपल्या आई-वडिलांना भेटणार होती. पूनम गौड यांच्या मनात धाकधूक होती. दोघी एकमेकींना पाहिल्या पाहिल्या ढसाढसा रडू लागल्या.

पूनम गौड यांनी पूजाची जन्मखूण तपासली. त्या म्हणाल्या, "ही जन्मखूण फक्त मलाच माहिती होती. मी कोणालाही सांगितली नव्हती. मी ती पाहिली आणि माझ्या मनातल्या इतर शंकाही दूर झाल्या."
रफीक यांच्या मोबाईलवर पूजाचा व्हीडिओ कॉल आला तेव्हा पूजाशी भेटण्याची किती आशा होती? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, "मला आशा होती. पण तिचे वडील गेल्यावर आशा मावळली. कारण शोधणारा, धावपळ करणारा माणूस राहिला नाही. पण उपरवाल्याची मेहरबानी. बहुतेक ते वर गेले आणि लढले की आमची मुलगी मिळू दे. माझी बायको एकटी आहे. या दीदीचे उपकार आहेत."
"ही माझी मुलगी नाही हीरा आहे हीरा. जसा हरवलेला हीरा सापडल्यावर आनंद होतो तसाच आनंद मला झालाय. तिच्या चेहऱ्यात मला तिचे वडील दिसतात. ती त्यांच्यासारखीच दिसते. तिच्या आठवणीत त्यांना अन्नाचे दोन घासही जात नव्हते. शेवटी तिला न भेटताच कायमचे निघून गेले," पूजाची आई आमच्याशी बोलताना भावूक होऊन म्हणाली.
दरम्यान, रफीक यांनी डी.एन.नगर पोलीस स्टेशनला कळवलं. 2013 मध्ये पूजा बेपत्ता झाल्याची तक्रार डी.एन.नगर पोलीस स्टेशनला दिली होती. त्यामुळे पोलिसांनाही हे प्रकरण जवळून माहिती होतं.
पूजा भेटल्यानंतर प्रमिला आणि इतर कुटुंबीय पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली.
पूजा गौड सांगते, "मी पोलिसांना सर्वकाही सांगितलं. मला ज्या घरात ठेवलं होतं त्या घराकडे मी पोलिसांना घेऊन गेले. ज्यांनी मला पळवलं होतं त्यांची ओळख पटली आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं."
अखेर 'त्या' रात्री पूजा आपल्या आईच्या कुशीत झोपली. पण पूजा आणि तिच्या कुटुंबीयांसाठी आजही सर्वकाही सामान्य झालंय असं नाही.
पूजा सांगते, "मला ती बाई खूप मारहाण करायची. त्यामुळे मला नीट बसताही येत नाही. रात्री नीट झोपता येत नाही. कंबर खूप दुखते. तसंच नाकावर मारायचे त्यामुळे नाकालाही जखम आहे."
शारीरिक जखमांबरोबरच पूजाच्या मनावर खोलवर झालेल्या जखमा बऱ्या व्हायला अजून काही जाणार.

फोटो स्रोत, Rafiq
पोलीस आणि कुटुंबीयांनी मिळून पूजाला 9 वर्षं शोधलं. त्यांना यश आलं नाही. पण प्रमिला यांच्या एका धाडसी निर्णयामुळे पूजाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
प्रमिला देवेंद्र याविषयी बोलताना भावूक होतात. त्या सांगतात, "ती तिच्या आईजवळ आहे याहून मोठं सुख काय असू शकतं. आम्ही सात महिने एखाद्या आई आणि मुलीप्रमाणे राहिलो. मी फक्त तिची मदत केलीय. आता ती कामावर येत नाही याचं मला दु:ख आहे. मी तिला मिस करते. पण मला वाटतं प्रत्येक आईने त्यांच्याजवळ आलेल्या मुला-मुलींची अशीच मदत करावी. आपण त्यांची आई नसलो तरी आपण एक आई आहोतच."
9 वर्षांत काय घडलं?
पूजाचं पाच जणांचं कुटुंब आहे. पूजाला एक थोरला आणि एक धाकटा असे दोन भाऊ आहेत.
त्या दिवशी (22 जानेवारी 2013) पूजा आपल्या मोठ्या भावासोबत शाळेत जात होती. भावाच्या पाठोपाठ पूजाही शाळेच्या गेटमधून आत जाणार तेवढ्यात पूजाला कोणीतरी आईस्क्रीम देतो असं सांगितलं आणि पूजाला घेऊन गेले.
पूजा गौड सांगते,"मी त्यांना सांगितलं मला घरी जायचं आहे. मला सोडा. ते मला हाजी मलंगला घेऊन गेले. मी खूप रडत होते. मला मम्मी पप्पांकडे जाऊ द्या अशी विनंती करत होते. तर मला मला म्हणाले, आता रडलीस तर डोंगरावरून खाली फेकू. मी घाबरले आणि शांत झाले. तिथे 2-3 दिवस थांबल्याचं मला आठवतं."

"मग मला गोव्याला घेऊन गेले. ते दोघं होते एक पुरुष आणि एक महिला. त्यांची कोणी नातेवाईक तिथे होती. त्यांच्याकडे मला ठेवलं. मी खूप रडत होते. त्या बाईने मला तिथेही धमकावलं की,आता रडलीस तर जीभेला चटका देणार. मला आईची खूप आठवण येत होती. तिथे काही दिवस राहिल्यावर मला गोव्याला घेऊन आले. मग माझं नाव पूजावरून अॅनी (Annie) ठेवलं. यावेळी त्यांच्या त्या आंटीने तिथे ह्यांना राहण्यास मनाई केली. मग मला हे रायचूरला (कर्नाटकमधला एक जिल्हा) घेऊन गेले. तिथे एका हॉस्टेलमध्ये मला ठेवलं. मी तिथे दुसरीपर्यंत शिकले."
"2015 मध्ये त्यांना मुलगी झाली आणि त्यांची माझ्याशी वागणूक पूर्णपणे बदलली. त्यांनी मला हॉस्टेलमधून काढलं आणि पुन्हा मुंबईत आणलं. तेव्हा मी 9 वर्षांची होते. त्यांनी मारहाण सुरू केली. शिवीगाळ करायचे. पट्ट्याने, लाटण्याने, लाथा-बुक्क्यांनी मारायचे. केस पकडून डोकं आपटायचे. एकदा तर लाटण्याने एवढं मारलं की माझी पाठ रक्तबंबाळ झाली होती. मात्र तरीही साधं दवाखान्यातही घेऊन गेले नाहीत. त्या बाईने जखमांवर चुना लावला,"
"घरातलं सगळं काम करून घ्यायचे. त्यांना जेवण गरम लागायचं. हात भाजायचे तरीही पोळ्या भाजाव्या लागायच्या. 2020 मध्ये मला बाहेर काम करायला सांगायचे. आधी 24 तासवालं काम दिलं. तिथे घरातलं सगळं म्हणजे कपडे धुणं, स्वयंपाक, सगळं करावं लागायचं. हे काम मी सोडलं. मग 12 तासाचं घरकाम करायला पाठवलं. तेही मी दोन वेळा सोडलं. माझा सगळा पगार ते ठेवायचे. मला काहीच देत नव्हते,"
एवढ्या वर्षांत सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला?
आपल्यासोबत सतत कोणीतरी असायचं आणि आपल्याला सुरुवातीला चार भिंतीबाहेर कुठे जाऊ दिलं जायचं नाही असं पूजा सांगते.
"मुंबईत आल्यावरही मला एकटीला कुठे जाऊ दिलं नाही. मी घराबाहेर पडले नाही. मला रस्तेही माहिती नाहीत. ती कामावर घेऊन जायची आणि आणयची. माझं घर इथेच जवळपास आहे हे मला कळलं नाही. तो माणूस एकदा दारू प्यायला तेव्हा त्याने मला सांगितलं की आम्ही तुला पळवून आणलं होतं. आम्ही तुला किडनॅप केलं आहे. तुझं खरं नाव पूजा गौड आहे."

फोटो स्रोत, Rafiq
"हे मला सांगितलं तेव्हा मी मुंबईत होते. माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि मोबाईलला हात लावायची परवानगी नव्हती. पण एकदा रात्री सर्वजण झोपल्यावर मी हळूच फोन घेतला आणि माझं नाव टाईप करून पाहिलं. माझा लहानपणीचा फोटो समोर आला. मला अनेक बातम्या दिसल्या. मग मी ठरवलं की योग्य वेळ आल्यावर आपण कोणाची तरी मदत घेऊन इथून निघायचं,"
'आम्हाला मदतीची गरज'
आता पूजा घरी परतल्याने चार हत्तींचं बळ आलंय अशी प्रतिक्रिया पूजाची आई पूनम यांनी दिली. पण त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे.
पूजाच्या वडिलांची चण्याची गाडी होती. अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ ते चणे विकायचे. यातून होणाऱ्या कमाईतूनच त्यांचं घर कसंबसं चालत होतं. परंतु त्यांच्या निधनानंतर पूनम गौड या एकट्या पडल्या.
पूनम गौड सांगतात, "त्यांची तब्येत बरी नव्हती तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की मी गेल्यावर तू गाडी चालव. त्यातून आपलं घर चालेल. ते गेल्यानंतर मी खूप खचले. काम सुरू केलं पण खूप थकवा यायचा. शरीरात ताकद नसायची पण आता पूजाला पाहून कितीही थकले तरी मी समाधानी आहे."
त्या पुढे सांगतात, "आता सगळी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. कोर्टकचेरीसाठीही पैसा खर्च होतोय. सारखं पोलीस स्टेशनलाही जावं लागतं. पूजासोबत रहावं लागतं. त्यामुळे कामावरही त्याचा परिणाम झालाय. आम्ही आज काम केलं नाही तर उद्या अन्न शिजवू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. पूजाला मदत मिळावी एवढीच इच्छा आहे. तिने खूप सहन केलं आहे."

फोटो स्रोत, DIPALI JAGTAP
डी.एन. नगर पोलिसांनी या प्रकरणात हॅरी आणि सोनी डिसुजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपहरण करणे, धमकावणे, मारहाण करणे, मजुरी करण्यास भाग पाडणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती डी.एन.नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी दिली.
पोलिसांनी हॅरी डिसुजाला अटक केली आहे. परंतु 'पूजाला सतत मारहाण करणाऱ्या आणि धमकवणाऱ्या सोनी डिसुजालाही अटक करा,' अशी कुटुंबीयांची मागणी आहे.
पूनम गौड म्हणाल्या, "त्या बाईने माझ्या मुलीला खूप छळलं आहे. ती अजूनही मोकाट आहे. मग मला समाधान कसं मिळेल. पोलिसांनी तिलाही अटक करायला हवी."
पूजाचं नवीन आयुष्य
अंधेरी येथील गिलबर्ट हिलवरील एका झोपडपट्टीत पूजाचं छोटंसं घर आहे. 10 बाय 10 पेक्षाही छोट्या घरात पूजा आई आणि आपल्या दोन भावंडांसोबत राहते.
पूजाच्या वडिलांचं चार महिन्यांपूर्वीच निधन झालं. त्यांना कँसर होता. पूजा घरी परतल्यापासून त्यांची सारखी आठवण काढतेय. पूजाने त्यांना शेवटचं पाहिलं तेव्हा ती अवघ्या सात वर्षांची होती. 'आत्ता घरात आपल्या जवळ पप्पा हवे होते,' असं पूजा म्हणाली.
पूजा म्हणाली, "मला वाटलं मी त्यांना भेटू शकेन. आई आणि भावांना भेटल्यानंतर मी सगळीकडे त्यांना शोधत होते. मला याचं खूप वाईट वाटतंय की ते आता नाहीयेत."

फोटो स्रोत, DIPALI JAGTAP
पूजा बराच मोठा काळ आपल्या घरात, आपल्या परिसरात नव्हती. त्यामुळे तिच्यासाठीही अनेक गोष्टी नव्या आहेत.
आम्ही 8 ऑगस्टला (2022) दुपारच्या वेळेत पूजाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलो होतो. त्यावेळी पूजा, तिची आई आणि तिचे काका पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघाले होते.
ते काही वेळात परत येणार असल्याने आम्ही त्यांच्या घराजवळ थांबलो. गजबजलेली वस्ती, राहण्यासाठी एकावर एक उभारलेली घरं, अंगणात खेळणारी लहान मुलं आणि घरात जागा कमी असल्याने मोकळ्या जागेवर बसणारे लोक असं काहीसं वातावरण तिथे होतं.
घरांमध्ये महिलांची स्वयंपाकाची लगबग सुरू होती तर घरांना लागून उभ्या केलेल्या शिड्यांवर बसून शालेय मुली गप्पा मारत होत्या.
या वेळात पूजाला भेटण्यासाठी अनेकजण येऊन गेले. पूजा कुठे गेली, ती परत आली, आम्ही तिला भेटण्यासाठी आलोय, असं त्या महिला सांगत होत्या.
पूजा लहान होती तेव्हा ज्या अंगणवाडीत शिकली, त्यावेळच्या अंगणवाडी सेविकाही तिला भेटण्यासाठी आल्या. पूजा लहान होती तेव्हा कशी होती हे त्या कौतुकानं सांगत होत्या.
साधारण संध्याकाळी सहा वाजता पूनम गौड पोलीस स्टेशनमधून धावत-पळत आल्या. पूजा परत आल्यापासून त्यांनी चण्याची गाडी लावली नव्हती. त्यामुळे आता आज गाडी लावली नाही तर उद्या खायला मिळणार नाही अशी परिस्थिती. त्यामुळे चण्याचं टोपलं त्यांनी उचललं आणि त्या निघाल्या.

फोटो स्रोत, DIPALI JAGTAP
पूजाचा दिवस सकाळी साधारण 9 पासून सुरू होतो. 'अपहरणकर्त्यांनी खूप मारहाण केल्याने झोपण्यासाठी त्रास होतो, ती रात्री उठून रडते.' असं पूनम गौड यांनी बोलताना सांगितलं.
पूजा दिवसभर बऱ्यापैकी आईसोबतच असते. आईलाही पूजासाठी खूप काही करण्याची उत्सुकता आहे. तिच्यासाठी स्वयंपाक, तिला हाताने जेवण भरवणे, तिच्यासाठी नवीन कपडे, तिचे केस विंचरून देणे अशा गोष्टी करत पूजा आणि तिची आई एकमेकींसोबत शक्य तितका वेळ घालवत आहेत.
पूजाही कधी कधी आईला घरकामात मदत करते. भावंडांसोबतही ती वेळ घालवते. आई बाहेर गेल्यास तिचा धाकटा भाऊ आणि तिच्या घराखालीच राहणारी आत्या तिच्यासोबत असते.
कोणत्याही कारणास्तव बाहेर जायचं असल्यास तिचे नातेवाईक तिच्यासोबत असतात. तिला सहकार्य करत असतात.
पूजा बऱ्याच वर्षांनी परतल्याने काहीसा अवघडलेपणा तिलाही जाणवतो. पण तिला आपल्या आईला आता मदत करायची आहे.
पूजा म्हणाली, "मला काम करायचं आहे. आईला आर्थिकदृष्ट्या सहकार्य करायचं आहे. पण घरातले आणि पोलीस मला बाहेर काम करण्यास मनाई करतात. मला शिक्षण घ्यायचं आहे."
दुसऱ्या बाजूला याप्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. पूजाच्या अपहरणाची केस अंधेरी येथील डी.एन.नगर पोलीस स्टेशनमध्ये आहे.
पूजाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. पूजाने आपल्या जबाबात जी माहिती दिली आहे त्यातील तपशील तपासण्याचं काम सध्या सुरू आहे. यासाठी अनेकदा पूजाला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं. तसंच न्यायालयात केसची तयारी करण्यासाठीही पोलिसांना आणि वकिलांना तिची मदत भासते. यातही तिचा बराचसा वेळ जातो.
पूजा आणि तिच्या कुटुंबियांची गेली 9 वर्षं कधीही परत येणार नाहीत, कदाचित ती रिकामी जागा कधीही भरून निघणार नाही. पण तरीही मोठ्या आशेने पूजा आणि तिच्या आईने आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केलीय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








