बालविवाह : 'माझं बळजबरीने रात्री लग्न लावलं, मला मारतील म्हणून मी काहीच बोलले नाही'

बालविवाह

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता धुळप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुलींच्या लग्नासाठीची किमान वयोमर्यादा 18 वरून वाढवून 21 करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह अनेक नेत्यांनी याला विरोध केला होता.

एकीकडे या मुद्दयावरून राजकारण सुरू झालं आहे, तर दुसरीकडे आजही अशा अनेक मुली आहेत ज्या बालविवाहाची झळ सोसत आहेत.

राज्यात बाल विवाहाला बंदी असूनही गेल्या 3 वर्षात 15 हजाराहून अधिक बालविवाह झाल्याची सरकारने 21 मार्च 2023 रोजी कबुली दिली. गेल्या 3 वर्षात सरकारला केवळ 10 टक्के बालविवाह रोखण्यात यश आल्य़ाचं विधानपरिषदेत लेखी प्रश्नाला सरकारनं उत्तर दिलं आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्डनुसार राज्यांत सन 2019, 2020 आणि 2021 मध्ये 152 गुन्ह्यापैकी 137 गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे.

विशेष म्हणजे शासनाच्या त्रिसदस्यीय समितीनेे सादर केलेल्याअहवालात 18 वर्षाखालील मुली माता झाल्याची संख्या 15 हजार 253 असल्याचे आढळून आले आहे.

कोव्हिड काळात लॉकडाऊन असताना अनेक मुलींचे बालविवाह झाले होते. लॉकडाऊनमध्ये बालविवाह झालेल्या मुलींच्या दोन प्रातिनिधिक कहाण्या बीबीसीने मांडल्या होत्या. त्या पुन्हा प्रसिद्ध करत आहोत...

Presentational grey line

11 वर्षांच्या प्रियांकाचा विवाह या वर्षी मे महिन्यात झाला. तिच्या चारही बहिणींची लग्न लहान वयातच झाली होती, प्रियांका आम्हाला सांगत होती. आपलंही लग्न असंच लवकर होईल या भीतीने ती गेली दोन वर्षं बहिणीकडे जाऊन राहिली होती.

"माझी बहिण माझ्यावर खूप माया करते. मी तिला म्हटलं होतं मला लग्न करायचं नाही. तिच्यासंगच राहायचंय. तिथे तिच्या लहान लेकराला मी सांभाळायचे आणि शेळ्या-मेंढ्यांना चरायला घेऊन रानात जायचे. पूरा दिवस त्यात निघून जायचा. शेळ्या ऐकायच्या माझं. पण मेंढ्या नाही. त्या लई आगाऊ असत्यात..."

प्रियांका तिच्या निरागस भावविश्वाबद्दल सांगत होती. जेमतेम दुसरीपर्यंत शाळेत गेलेली प्रियांका नंतर शाळेत गेलीच नाही.

ऊसतोडमजूरीवर या स्थलांतरित कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. बीडच्या दुष्काळी भागातला रखरखता उन्हाळा सुरू होता. प्रियांका रानात जाण्याआधीच वडील आणि नातेवाईक जीप घेऊन आले आणि तिला मामाच्या गावाला घेऊन गेले.

'मलाही बहिणीसारखंच मारलं असतं...'

"मला काहीच माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे. मामाच्या घरी त्या दिवशी दुपारी मी झोपून उठले. डाळ-भाताचं जेवण तयार केलेलं होतं. माझी लहान बहिण सोडली तर इतर चार मोठ्या बहिणी नव्हत्या. खूप कमी लोक होते. संध्याकाळी आई आणि मामीने मला लाल रंगाची साडी नेसवली.

हातात, गळ्यात आणि पायात दागिने घातले. रात्र होती त्यामुळे नंतर काहीच कळलं नाही. हे सगळं कशासाठी हा प्रश्नही मी विचारला नाही, जर विचारला असता तर पप्पांनी माझ्या बहिणीसारखंच मलाही धरुन मारलं असतं, हे मला ठाऊक होतं. बळेबळेच माझं लग्न लावलं."

लग्न कसं लागलं? हा प्रश्न विचारल्यावर प्रियांकाच्या चेहऱ्यावरचा संभ्रम, ताण, भीती स्पष्टपणे दिसत होती. आम्ही तिला दोन-तीनदा हा प्रश्न विचारला. पण तिने त्याबद्दल बोलायचं टाळलं. पण एका गोष्टीचा तिने आवर्जून उल्लेख केला. वडिलांनी नवऱ्यामुलाकडून पैसे घेतले तसंच लग्नाचा खर्चही त्यानेच केला. किती पैसे घेतले याची तिला कल्पना नव्हती. पण तिने जोर देत सांगितलं- "अर्धे घेतले आणि अर्धे द्यायचे राहिले आहेत."

मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

हा बालविवाह झाल्यानंतर प्रियांका सासरी गेली खरी पण नंतर तिला परक्या घरात ठेवण्यात आलं. तिथूनच 26 जुलैला संशयास्पद वाटल्याने जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीने पोलिसांच्या मदतीने तिची सुटका (rescue) केली गेली.

नवरदेवाचं वय 28 वर्षं असल्याचं समोर आलंय. प्रियांकाची बालविवाह करून तस्करी होत होती का याविषयी बीड ग्रामीण पोलीस अधिक तपास करतायत. लॉकडाऊनमध्ये बालविवाहाच्या अशा केसेसची संख्या वाढली असल्याचं अनेक जिल्ह्यांच्या बाल कल्याण समितींचं म्हणणं आहे.

आपल्यासोबत अन्याय झालाय याची प्रियांकाला जाणीवही नाही. ती सांगते- "माझ्या बहिणीचं लग्न जसं झालं तसं माझं होणारच होतं. बहिणींची लग्न झाली तेव्हा त्या शहाण्या झालेल्या होत्या."

शहाण्या म्हणजे मासिक पाळी आलेल्या. प्रियांकाला अजून मासिक पाळी सुरू झालेली नाही.

'मनातलं काहूर शब्दात कसं सांगायचं?'

पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत प्रियांका एका संस्थेत राहतेय. तिला घरी जायचंय. पण आपल्याला कुठे सुरक्षित वाटेल याविषयी तिला नीट सांगता येत नाही. आपल्याला नेमकं काय वाटलं, कसं वाटतंय, काय हवंय हे व्यक्त करण्याची भावनिक भाषा प्रियांकाकडे नाही.

तिच्या मनातलं काहूर जाणून घेण्यासाठी आम्ही तिच्याच बोली भाषेत बोलणाऱ्या दुभाषी महिलेची मदत घेतली. 'हे मला नको होतं, लग्न नको होतं' यापलिकडे तिला काही सांगता आलं नाही.

बालविवाह

फोटो स्रोत, Getty Images

तिच्यासारखंच जेमतेम चौथी शिकलेल्या दिशाचंही लॉकडाऊनमध्येच लग्न झालं. ती देखील प्रियांकासोबत संस्थेत आम्हाला भेटली. तिचं वय 15 वर्षं आहे. आपलं या वयात घरातले लग्न लावून देणारच होते याची खात्री तिला होती. त्यामुळे विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता, ती म्हणाली.

लॉकडाऊनमध्ये बालविवाह झालेल्या मुलींच्या या दोन प्रातिनिधिक कहाण्या आहेत.

कोव्हिड काळात बालविवाह किती झाले?

कोव्हिड संकटाच्या काळात बालविवाहांची संख्या वाढेल ही शक्यता गृहित धरुन महाराष्ट्र सरकारने कसोशीने प्रयत्न सुरू केले. त्याचाच परिणाम म्हणून राज्यभरात 790 बालविवाह रोखण्यात आले, त्याचं कौतुक होतंय. पण याच काळात अनेक ठिकाणी बालविवाह झाल्याचं वास्तव डोळ्यात अंजन घालणारं आहे.

बालविवाह रोखण्यात अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, बाल संरक्षण अधिकारी, जिल्ह्यातील बाल कल्याण समित्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

बीडच्या बाल कल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे सांगतात- "लॉकडाऊनमध्ये महिन्याला जवळजवळ 25 ते 30 केसेस आढळून आल्या. म्हणजे आपल्यापर्यंत आल्या. पण असे बालविवाह आम्ही थांबवायला गेलो तर लोक आमच्या अंगावर येणार, आमचाच बालविवाह दिसला का? कमीत कमी 10 ते 12 मुलींची नावं सांगायचे."

"त्यांचं समुपदेशन करताना आम्ही सांगायचो की, आमच्याकडे त्यांची तक्रार आली, इतरांची आली नाही. त्यांची तक्रार आली तर आम्ही त्यांच्यावरही कारवाई करू. असं दिसतंय की प्रत्येक गावात कमीत कमी पाच तरी बालविवाह झाले असतील."

अशा नोंद न घेतलेल्या बालविवाहांची माहिती गोळा करण्यासाठी सरकारने गावोगावी सर्वे करावा अशी मागणी तत्वशील करतात. बालविवाहांची संख्या हाती आल्यावर या मुलींच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, विकासासाठी, सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना करता येतील असंही ते म्हणतात.

बालविवाहाचा पॅटर्न बदलला?

महाराष्ट्रात आतापर्यंत बालविवाह झालेल्या मुली 15 ते 18 वयोगटातील दिसत होत्या, पण कोव्हिडच्या काळाचा सामना करण्यासाठी गरीब कुटुंबांनी 'आर्थिक भार नको' म्हणून बालविवाहाचा हा पॅटर्न बदलून टाकलेला दिसतोय. आता 11-12 वर्षांच्या मुलींची लग्नही लावली जातायत, असं युनिसेफच्या बाल सुरक्षा सल्लागार अल्पा वोरा म्हणतात.

तसंच बालविवाहातून सुटका केलेल्या मुलींचं पुनर्वसन करणं हे सामाजिकदृष्ट्या खूप संवेदनशील असल्याचंही नमूद करत त्या आणखी एका पैलूकडे लक्ष वेधून घेतात. "बालविवाहाच्या कचाट्यात सापडलेल्या मुलींची सुटका (रेस्क्यू) करणं पुरेसं नाही. कोव्हिड काळातल्या बालविवाहाची कारणं शोधली पाहिजेत, या कुटुंबांच्या उपजिविकेचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्याकडे लक्ष द्यायला हवं, त्याशिवाय या मुलींना न्याय मिळणार नाही."

'बालविवाहांतर्गत शरीरसंबंध म्हणजे हिंसाच'

बालविवाहामुळे मुलींच्या शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात. अल्पवयात, नकळत्या वयात येणारे शरीरसंबंध, गरोदरपण लादले गेलेले असतात. त्यातही अठरा वर्षांच्या आतील शरीर संबंध हा कायद्याच्या भाषेत बलात्कार असल्याने बालविवाहाच्या या हिंसक पैलूकडे 'अक्षरा सेंटर'च्या सह-संस्थापक नंदिता शाहा लक्ष वेधतात.

'अक्षरा सेंटर' ही संस्था 1995पासून महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी काम करते. तसंच किशोरवयीन मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कौशल्य विकसित करायला मदत करते. महाराष्ट्राच्या बालविवाहाविरोधातील अभियानाच्या उपक्रमात ही संस्था सहभागी आहे.

मानसिक ताण

फोटो स्रोत, Getty Images

"आता होणारे बालविवाह पूर्वी सारखे नाहीत. तेव्हा मुलीचं लग्न लागायचं, नंतर तिला पाळी आल्यावर सासरी पाठवलं जायचं. पण आता वयाने खूप मोठ्या असणाऱ्या मुलांसोबत बालविवाह लावले जात असल्याचं दिसून येतंय. पहिली चिंतेची बाब ही आहे की- लग्न झाल्यानंतर या मुली अचानक 'प्रौढ' होतात. दुसरं, घरातल्या कामांची जबाबदारी त्यांच्याकडे येते. तिसरं इतक्या लहान वयात येणारे लैंगिक संबंध हे 'विवाहांतर्गत बलात्कार' आहेत. या लैंगिक हिंसेकडे काना डोळा केला जातो. परिणामी कमी वयात येणारं मातृत्व आणि हरवलेलं बालपण तिच्या वाट्याला येतं."

"घरात कौटुंबिक हिंसाचाराला स्थान नाही त्याच प्रकारे बालविवाहाच्या नावाखालचा हिंसाचार नकोच असं वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे, तरच मुली निर्भयपणे वावरु शकतील." असंही त्या म्हणतात.

कमी वयातले लैंगिक संबंध

बालविवाह झाल्याने मुलींच्या शरिरावर आणि बालमनावर काय परिणाम होतात याविषयी ग्रामीण आणि आदिवासी भागात काम करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या रेवडकर सांगतात- "किशोरवयीन मुलं आणि मुली शारीरिक वाढ, संप्रेरक स्त्राव, जनानंगांची वाढ व परिपक्वता, मानसिक बदल या सर्वातून जात असतात. तसंच शिक्षणाच्या माध्यमातून आपला भवताल, समाज समजून घेत, स्वतःची ओळख निर्माण करायला उत्सुक असतात. याच वयात निर्णय घेण्याचीही क्षमता विकसित पावत असते. अशा वाढीच्या काळात लग्न लावून दिल्याने मुलीच्या भावविश्वावर आघात तर होतोच, पण तिच्या शरीरावरही दुष्परिणाम होतो."

अत्याचार

फोटो स्रोत, Getty Images

गरीब कुटुंबांमध्ये त्यातही मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातील कुटुंबांमध्ये सर्वंकष आहारावर मर्यादा येतात. त्याचा परिणाम किशोरवयीन मुलांच्या विकासावर होत असतो.

"भारतात अनेक किशोरवयीन मुलींमध्ये अपुऱ्या आहारामुळे कुपोषण आणि रक्तक्षय दिसून येतो.

शिवाय कुटुंबनियोजनाबद्दल जागरुकता नसल्याने अवघ्या काही महिन्यांत मुलगी गरोदर राहाते. तिचं अपरिपक्व शरीर गरोदरपणासाठी तयार नसतं आणि कमी वयात गर्भधारणा झाल्याने मुलींना रक्तक्षय, रक्तदाब, अडलेली प्रसूती व सिझेरिअन शस्त्रक्रियेला तोंड द्यावं लागतं.

तसंच या मुलींची प्रसूती नऊ महिन्यांच्या आधीच होऊन कमी दिवसांचं, कमी वजनाचं बाळ जन्माला येतं. या संपूर्ण प्रक्रियेत मुलीच्या शरीराची हानीही होते आणि मानसिक ताण-तणावांना तोंड देऊन, मुलींना अकाली प्रौढत्व येतं."

"अशा कमी वयाच्या गरोदर मुली माझ्याकडे तपासणीसाठी येतात, तेव्हा तिचं शरीर लहान मुलीचं आणि चेहऱ्यावर उदास, दुःखी भाव पाहून काळजाचा ठोका चुकतो. लहान वय असल्याने त्या घाबरलेल्या अशतात. त्यात शस्त्रक्रिया करावी लागली तर लहान वयात शरीरावर व मनावरही व्रण उमटतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सरच्या अनेक कारणांपैकी बालविवाहामुळे कमी वयात सुरू होणारी लैंगिक क्रिया (sexual activity) हे एक कारण आहे. भारतात याचं प्रमाण जास्त आहे."

कौटुंबिक हिंसाचार, नवऱ्याकडून बळजबरीचा संभोग या विरुद्ध बालविवाह झालेली मुलगी आवाज तरी उठवू शकेल का? असा प्रश्न डॉ. ऐश्वर्या विचारतात.

'मनातलं बोलण्याचं हक्काचं ठिकाण'

कोव्हिड काळात अनेक कुटुंबांच्या मिळकतीवर, व्यवसायावर परिणाम झाला. मोलमजूरी आणि गरीब कुटुंबांमध्ये कमावते हात कमी झाल्याने घरातली वयात आलेली वा लवकरच वयात येणारी मुलगी 'ओझं' असा विचार घरातली वडीलधारी मंडळी करू लागली. बालविवाहाच्या अनेक कारणांपैकी अर्थव्यवस्था हे देखील कारण महत्त्वाचं मानलं जातं. आणि या काळात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याने अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला.

"आता लॉकडाऊनमुळे लग्नासाठी फार लोक बोलवण्यावर आपोआप बंधन आलं आणि गुपचूप विवाह उरकण्याकडे लोकांचा कल होता. काही बालविवाह मुलींच्या पालकांशी बोलून थांबवले." असं जालन्यामधील अंगणवाडी सेविका वनमाला पवार सांगत होत्या.

बालविवाह

फोटो स्रोत, Getty Images

"पूर्वी काय व्हायचं की असा बालविवाह कुठे होत असेल तर मुलींच्या मैत्रिणींकडून आमच्यापर्यंत किंवा शिक्षकांपर्यंत त्याची कुणकुण लागायची. मग आम्ही त्यांच्या पालकांशी बोलून तो विवाह थांबवण्याचा प्रयत्न करायचो. त्यानंतर 18 वर्षांपर्यंत थांबण्यासाठी ते तयार व्हायचे."

लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने मुलींचा इतरांशी संपर्क होणं अवघड होऊन गेलं. केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत 11 ते 18 वर्षं वयाच्या किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात.

"त्यानिमित्ताने लोहाच्या गोळ्या घेण्यासाठी, आरोग्य तपासणीसाठी, आरोग्य शिक्षणासाठी मुली केंद्रात यायच्या. घराबाहेर वावरायच्या. त्यावेळी मैत्रिणींशी त्यांचं बोलणं व्हायचं. मुलींची व्यक्त होण्याची, मनातलं सांगण्याची सार्वजनिक पण सुरक्षित जागा लॉकडाऊनच्या काळात नाहीशी झाली. त्यामुळे वयात आलेल्या मुलींच्या वाट्याला एकलकोंडेपण आलं."

"या मुली जेव्हा कधी एकत्र यायच्या तेव्हा स्वतःच्या लग्नाबद्दल कधी बोलत नसत. तर पुढे काय शिकायचंय, कुठला क्लास लावायचा, शिवणकाम कसं करायचं, नर्सिंगचा कोर्स कसा करता येईल याबद्दल कुतूहलाने बोलायच्या. एकमेकींना माहिती द्यायच्या. त्यामुळे आपोआप त्यांना आत्मविश्वास वाटायचा," वनमाला सांगतात.

भावनिक सजगतेमध्ये शाळेची, शालेय शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते, ती स्पेसही गेल्याने घरातल्या बंदिस्त वातावरणात मुलींचा कोंडमारा झाल्याची उदाहरणंही पुढे आलीयेत.

बालविवाहाच्या भीतीने घरातून पळाली

लहानपणीच आई गेली, घरात वडील आणि म्हातारी आजी होती, म्हणून लहान रेणुकाला सांभाळणं कठीण जात होतं. त्यामुळे शासकीय बालगृहात राहून रेणुका शिकू लागली.

रेणुकासाठी दहावीचं वर्षं खूप महत्त्वाचं होतं, पण लॉकडाऊन लागलं आणि त्याच महिन्यात म्हणजे मार्च 2020मध्ये बालगृहाने रेणुकाला घरी पाठवलं गेलं. तिचं रोजचं आयुष्य अचानक बदललं.

शिक्षणामुळे आपल्या आयुष्याचं भलं होतंय याची खात्री रेणुकाला होती. पण अचानक घरी आल्यानंतर तिचं लग्न लावायचा घाट वडिलांनी घातला. दडपण आलेली पंधरा वर्षांची रेणुका पहाटे घराबाहेर पडली आणि 17 किलोमीटर चालत पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांनी तिला पुन्हा शासकीय बालगृहात पोहचवलं. साताऱ्यातील ही घटना बाल हक्क आयोगासमोरही मांडण्यात आली.

रेणूका आपला बालविवाह होऊ नये ज्या आत्मविश्वासाने ठाम राहिली, त्याच आत्मविश्वाने तिला आपलं शिक्षण पूर्ण करुन स्वतःच्या पायावर उभं राहायचंय.

मुलींसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यात शिक्षणाची महत्वाची भूमिका असते. स्थलांतरित कुटुंबांमधली मुलींची शाळागळती थांबवण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात युनिसेफ, जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्था एकत्रिपणे अभियान चालवतात. त्याचा परिणाम लॉकडाऊनमध्ये दिसून आला.

अंगणवाडी सेविका वंदना घोरपडे सांगतात- "ऊसतोड मजूर कुटुंबांसमोर स्थलांतर करताना आपल्या मुली कशा सुरक्षित राहतील याची चिंता असायची. यावर तोडगा म्हणून मुलींची हॉस्टेल्स होती. त्यामुळे बालविवाह लावण्याचं आई-वडिलांवरचं दडपण कमी झालं. लॉकडाऊनमध्ये केवळ तीन महिने आई-वडील ऊसतोडीसाठी गेले. तेव्हा हॉस्टेल्स बंद होती, तरीही त्यांनी मुलींना आपल्या नातेवाईकांकडे सुरक्षित ठिकाणी त्यांची व्यवस्था केली. बालविवाह रोखण्यात पालकांची ही भूमिका खूप महत्त्वाची होती. त्याचा सकारात्मक परिणाम साहजिकच मुलींच्या मानसिकतेवर झालाय."

आज भोकरदनमधल्या अनेक मुली आपल्याला काय नको, काय हवं. काय खुपतंय, काय दुखतंय हे या मुली सांगू शकतात. हे सांगता येणं ही सुदृढ मानसिक आरोग्याची पहिली पायरी आहे असं मानलं जातं.

बालविवाहाचं संकट किती गंभीर?

कोव्हिड संकटामुळे जगभरात 1 कोटी मुलींचे बालविवाह होतील असा इशारा युनिसेफसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त केलाय. बालविवाह म्हणजे मानवी हक्कांचं उल्लंघन मानलं जातं. भारतात बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 असूनही अशी लग्न होतात, हे वास्तव आहे.

2019मध्ये युनिसेफने दिलेल्या आकडेवारीनुसार सरकार, प्रशासकीय यंत्रणा, संस्थाच्या मदतीने बालविवाहांमध्ये लक्षणीय घट दिसून आली. 25 वर्षांमध्ये दक्षिण आशियाई देशांमध्ये बालविवाहाचं प्रमाण 59 टक्क्यांवरुन 30 टक्क्यांवर घसरलं. 2030 पर्यंत बालविवाह निर्मुलनाचं मोठं उद्दिष्ठ जगासमोर होतं. पण कोव्हिड संकटामुळे अशा अनेक प्रयत्नांची पिछेहाट झाली आहे. लॉकडाऊनमुळे बालविवाह प्रतिबंधक कार्यक्रमांमध्ये अडथळे आले. काही ठिकाणी हे कार्यक्रम पूर्णपणे थांबले. शिवाय बालविवाह झालेल्या मुली कायमच्या शिक्षणापासून वंचित राहतील ही भीती तज्ज्ञ व्यक्त करतायत.

मुलींसाठी निर्भय, मोकळं, सुरक्षित वातावरण तयार करणं हे आता सरकार आणि समाजासमोरचं मोठं आव्हान असणार आहे.

(बालविवाह झालेल्या वा रोखलेल्या मुलींची नावं गोपनीय ठेवण्याच्या उद्देशाने बदललेली आहेत.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)