कोरोना लॉकडाऊन : 'शिक्षण बंद आहे, पैसे नाहीत, त्यामुळे 12-13 व्या वर्षीच मुलीच्या लग्नाचा विचार'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात बालविवाहांचं प्रमाण अचानक वाढलंय. खासकरून, ग्रामीण भागात 13 ते 17 वयोगटातील लहान मुलांची जबरदस्ती, धमकावून किंवा परिस्थितीमुळे लग्न लावून दिली जात आहेत.
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात अचानक वाढलेल्या बालविवाहांचं कारण काय? हे शोधण्याचा प्रयत्न करत असताना करमाळा तालुक्यातील एका गावात बालविवाह होणार असल्याची माहिती बाल कल्याण समितीला मिळाली. आम्ही तातडीने सोलापुरहून करमाळ्याच्या दिशेने निघालो...
तारीख- 30 ऑगस्ट 2020
वार- रविवार
ठिकाण- करमाळा, सोलापूर
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आम्ही करमाळा पोलीस स्टेशनला पोहोचलो. लग्न कोणत्या गावात आहे? कधी होणार आहे? मिळालेली माहिती खरी आहे? गावात काय होईल? असे अनेक प्रश्न पडले होते. त्यांची उत्तरं गावात जाऊनच मिळणार होती. काही वेळाने तालुक्याचे बाल संरक्षण अधिकारी मारूती ताटे त्याठिकाणी आले.

फोटो स्रोत, Mayank Bhagwat
प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. लग्न कधीही होण्याची शक्यता होती. प्रत्येकाची घाई सुरू होती. सुरक्षेसाठी पोलिसांची टीम तयार होती. सर्व तयारी झाली. पोलीस गावाच्या दिशेने निघाले. बाल संरक्षण अधिकाऱ्यांसोबत आम्हीदेखील पोलिसांच्या गाडीमागे निघालो. गाडी भरधाव वेगाने अंतर कापत होती. गाव पोलिसांना माहीत होतं आणि मुलीचे डिटेल्स बाल संरक्षण अधिकाऱ्यांकडे होते.
बाल संरक्षण अधिकारी मारूती ताटे म्हणाले, "बालविवाहाची माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाते. काहीवेळा माहिती बाहेर फुटते. पोलीस, सरकारी अधिकाऱ्यांपासून मुलीला लपवलं जातं. कुटुंबीय खोटी माहिती देतात. लग्न नाही म्हणतात. अल्पवयीन मुलींचे बालविवाह घरच्या घरी, कमीत-कमी पाहुण्यांमध्ये लावण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची सखोल चौकशी करावी लागते. "
अर्धा तास उलटून गेला होता…गाव कुठे आहे? गावात काय सुरू असेल? मुलगी गावात असेल ना? लग्न झालं तर नसेल? असे प्रश्न होते. पोलिसांची गाडी गावात दाखल झाली…गावात लग्नाची तयार दिसून येत नव्हती. पण, वरून जी परिस्थिती दिसते किंवा दाखवली जाते त्यापेक्षा वेगळी असते असं पोलीस कर्मचारी म्हणाले.
शेतातून वाट काढत टीम मुलीच्या घरी पोहोचली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेवढ्यात एक लहान मुलगी तिथे आली. मुलीचं वय अवघं 12-13 असावं. बाल संरक्षण अधिकाऱ्यांची खात्री पटली. टीम योग्य मुलीच्या घरी पोहोचली होती.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

पोलिसांनी मुलीच्या आईकडे चौकशी सुरू केली. पहिल्यांदा मुलीच्या आईने पोलिसांनी लग्न नाही अशी माहिती दिली. पण त्यानंतर मुलीचं लग्न उरकून टाकण्याचा विचार असल्याचं मान्य केलं. "मुलगी शिकत नाही. घरी पैसा नाही. परिस्थिती नाही. मुलगी गावात फिरण्यापेक्षा लग्न बरं, म्हणून लग्नाचा विचार केला," अशी माहिती मुलीच्या आईने दिली.
अल्पवयीन मुलींशी त्यांना विश्वासात घेऊन बोलावं लागतं. त्यामुळे बाल संरक्षण अधिकारी आणि पोलिसांनी त्या लहान मुलीशी बोलणं सुरू केलं. चौकशी दरम्यान मुलीने दिलेली माहिती धक्कादायक होती.
"आमची शिकण्याची ऐपत नाही. मला बघायला आले होते. साखरपुडा करण्याचं नक्की झालं. लग्न ठरलं होतं. मला विचारलं नाही. आज लग्न होणार होतं. पण आता मोडलंय.पोराकडचे म्हणतात आमच्याकडे खूप जमीन आहे. तुम्ही फक्त मुलगी द्या."
मुलीच्या शब्दांनी पोलीस आणि बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. एक गोष्ट स्पष्ट होती. बाल संरक्षण अधिकाऱ्यांना मिळालेली माहिती खरी होती. मुलीचं लग्न त्याच दिवशी लग्न नक्की झालं होतं.
मुलीचे वडील म्हणाले, "यंदा ऑनलाईनमुळे शिक्षण नव्हतं. त्यामुळे म्हटलं उरकून टाकावं. लग्न आज जमवलं होतं आम्ही. झाला होता विषय. पण कॅन्सल झालं. लग्न जमवत होतो तो पर्यंत बालविवाह वगैरे माहीत नव्हतं. हा विषय आमच्या डोक्यात नव्हत्या अटी-शर्ती माहित नव्हत्या."

फोटो स्रोत, Mayank Bhagwat
मुलीला गावात न ठेवता बाल कल्याण समितीसमोर नेण्याचा निर्णय घेवून अधिकारी मुलीला घेवून पोलीस स्टेशनकडे निघाले. मुलगी सुखरूप होती. पण, राज्यातील प्रत्येक अल्पवयीन मुलगी सुरक्षित आहे? या बालविवाहांची कारणं का? लॉकडाऊन दरम्यान बालविवाह अचानक का वाढले?
याबाबत बीबीसीशी बोलताना महिला बालकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मनिषा बिरारीस म्हणतात, "लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, काम नसल्याने मजुरी नाही. दैनंदिन खर्चासाठी पैशाची विवंचना. त्यात शाळा बंद असल्याने मुली घरी होत्या. लॉकडाऊनमुळे कमी खर्चात होणारं लग्न. समोरून खर्च करून मुलगी घेवून जातो असं सांगण्यात येतं. या कारणांमुळे लॉकडाऊनच्या काळात राज्यात बालविवाह होण्याचं प्रमाण वाढलं."
रोखण्यात आलेल्या बालविवाहांची जिल्हानिहाय आकडेवारी:
- पुणे - 0
- हिंगोली - 7
- रायगड - 0
- नागपूर - 3
- चंद्रपूर - 0
- धुळे - 12
- मुंबई सिटी - 0
- अमरावती - 2
- बुलडाणा - 9
- सातारा - 0
- नंदूरबार - 0
- गडचिरोली - 1
- सिंधुदुर्ग - 0
- ठाणे - 2
- अकोला - 1
- सोलापूर - 31
- गोंदिया - 0
- औरंगाबाद - 22
- उस्मानाबाद - 14
- भंडारा - 1
- अहमदनगर - 8
- कोल्हापूर - 4
- नाशिक - 3
- यवतमाळ - 14
- रत्नागिरी - 0
- जालना - 13
- नांदेड - 2
- परभणी - 4
- वर्धा - 7
- सांगली - 5
(स्रोत- महिला बालविकास विभाग)
मनिषा बिरारीस पुढे म्हणाल्या, "राज्याची सर्व यंत्रणा मार्चपासून कोव्हिड-19 शी लढत आहे. त्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष असेल असं लोकांना वाटलं. त्यामुळे ही बालविवाहांच प्रमाण लॉकडाऊनमध्ये वाढलं. किती बालविवाह झाले हे सांगता येणार नाही. पण, सरकारी यंत्रणेला मोठ्या संख्येने बालविवाह रोकण्यात यश आलं."

फोटो स्रोत, Mayank Bhagwat
ज्या मुलींचे बालविवाह रोखण्यात यश आलं. त्यांनी कोणत्या परिस्थितीत लग्न करण्यात होकार दिला? मनाविरुद्ध लग्न करण्यासाठी धमकी दिली होती? हे जाणून घेण्यासाठी आम्ही बालगृहात जाऊन मुलींशी चर्चा केली.
बालगृहात आम्ही 16 वर्षाच्या मुलीशी चर्चा केली. ती म्हणाली, "घरची परिस्थिती खूप वाईट आहे. वडील मजूरी करतात, आई घरकाम. लग्नासाठी काही देण्याची परिस्थिती नाही. मुलाकडचे म्हणाले फक्त मुलगी द्या. 2-4 पाहुणे येणार होते. लग्नासाठी खर्च नव्हता. त्यामुळे लग्नासाठी स्थळ आल्यानंतर मी तयार झाले."
पण, 16 वर्षांच्या मुलीचं लग्न करण्यासाठी वडील का तयार झाले? मुलीचे वडील म्हणाले, "इतरवेळी लग्न केलं असतं तर दीड-दोन लाख रूपये खर्च आला असता. लॉकडाऊनमध्ये पाहुणे जास्त नव्हते. खर्च पण कमी येणार होता. त्यामुळे लग्न करण्याचं ठरवलं होतं."
एकीकडे लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, तर दुसरीकडे मुलींची सुरक्षितता हा देखील मोठा प्रश्न आहे. हे 17 वर्षाच्या मुलीशी बोलताना लक्षात आलं. ती म्हणाली, "पुण्यात असताना एक मुलगा लग्नासाठी त्रास देत होता. नकार दिला, तर त्याने घरी मोडतोड केली. वडील, आई आणि मला मारण्याची धमकी दिली. पुणे सोडून सोलापूरला आलो. पण, परिस्थिती बदलली नाही. मग नाईलाजाने लग्नानंतर त्रास होणार नाही याचा विचार करून लग्नास होकार दिला."

फोटो स्रोत, Mayank Bhagwat
21 व्या शकतातही मुलींना काय सोसावं लागतंय. छेडछाडीला कंटाळून या मुलीला आपल्या स्वप्नांचा बळी देत लग्नाच्या बेडीत स्वत:ला बांधून घेणं जास्त सुरक्षित वाटलं. मुलीचं दुख: तिच्या मनाला होणाऱ्या वेदना, बापाचं काळीज हेलावून टाकणाऱ्या होत्या. मुलीसाठी सर्वस्व देण्यास तयार असलेला बापही मग हळवा होताना पहायला मिळाला.
2015-16 मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, देशातील 70 जिल्ह्यात बालविवाह होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यात महाराष्ट्रातील 17 जिल्हे आहेत. या रिपोर्टनुसार, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे.
याबाबत बोलताना राज्याच्या महिला बालकल्याण विभागाचे आयुक्त, ऋषीकेश यशोद म्हणाले, "मागील वर्षाच्या बालविवाहांच्या तुलनेत यंदा संख्या दुप्पट झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात 214 पेक्षा जास्त बालविवाह थांबवण्यात आले. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आव्हान म्हणजे, लोकांची मानसिकता. अनेक प्रकरणं सामाजिक दबावामुळे आपल्यासमोर येत नाहीत. तक्रार आल्याशिवाय प्रो-अॅक्टिव्हली आपल्याला कारवाई करता येत नाही."
"राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे. यातील 80 टक्के मराठवाड्यातील आहेत. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिकसारख्या औद्योगिक जिल्ह्यांमधूनही सरासरीपेक्षा जास्त प्रकरणं समोर येत आहेत. आर्थिक मागासलेपण आणि स्थलांतरीत मजुरांची संख्या जास्त असल्याने या वर्गात ही समस्या जास्त आढळून येते," असं ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Mayank Bhagwat
ज्या दिवशी करमाळ्यात 13 वर्षाच्या मुलीचं लग्न थांबवण्यात आलं. त्याचदिवशी सोलापूरात 2 अल्पवयीन मुलींचं लग्न रोखण्यात यश आलं. याबाबत बोलताना सोलापूरच्या बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अनुजा कुलकर्णी म्हणाल्या, "बालविवाहाची माहिती कोणत्याही वेळी येऊ शकते. अगदी रात्री-अपरात्री सुद्धा. त्यामुळे एकीकडे आमची टीम बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्नांशी शर्थ करत असताना दुसरीकडे लग्नाची तयारी सुरू असते. त्यामुळे आम्हाला 24 तास सतर्क रहावं लागतं."
बालगृहात आम्हाला भेटलेल्या तिसऱ्या मुलीची परिस्थिती वेगळी होती. या मुलीचं आई-मावशीने जबरदस्ती लग्ना लावून दिलं होतं. "लग्न केलंस तर घरी रहा, नाहीतर घर सोड अशी धमकी घरच्यांनी दिली. भीतीपोटी लग्न केलं. पण, पुढे शिकायचं होतं. पायावर उभं रहायचं होतं. त्यामुळे मुलाचं घर सोडलं. घरी गेले, तर पुन्हा नवऱ्याकडे जा असं म्हणत मारहाण केली. मग, मुंबईला जायचं ठरवलं. पण, सोलापूरला पोलिसांनी चाईल्डलाइच्या सुपूर्द केलं. आता पुढे शिकायचं आहे, पोलीस व्हायचं आहे," असं बालगृहात रहात असलेली 16 वर्षांची मुलगी म्हणाली.
बालविवाह रोखणं सहज शक्य आहे? समाज, गावकरी, स्थानिक पुढारी यांचा दबाव येतो? याबद्दल बोलताना बाल संरक्षण अधिकारी विजय मुत्तार म्हणाले, "लोक गाडीसमोर आडवं पडतात. अंगावर येतात. स्थानिक पुढारी, नेते, आमदार यांना फोन करून बोलावतात. राजकीय दवाब टाकतात. बालविवाह रोखताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. पण, अखेर त्या बाळाला, कोवळ्या जीवाला लग्नाच्या बेडीत जाण्यापासून वाचवल्यानंतर मनाला समाधान मिळतं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








