कोरोना व्हायरस टाळायचा असेल तर 'हे' करा आणि सुरक्षित राहा

मास्क

फोटो स्रोत, ANI

कोरोना व्हायरस टाळण्यासाठी आणि व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी फेसमास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलाय. मास्क न वापरणाऱ्या लोकांना अनेक ठिकाणी दंड भरावा लागत असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील.

मास्कमुळे कोरोनाच्या प्रसारावर मास्कच्या वापरामुळे काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचं आढळलंय. म्हणूनच मास्क लावाल, तर वाचाल', अशी जाहिरातही आता सरकारकडून केली जातेय.

पण सोबतच व्हॉल्व असलेले मास्क वापरू नये, असंही केंद्र शासनाने म्हटलंय.

व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कच्या वापराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहीलं आहे. व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कमुळे, मास्क वापरणारी व्यक्ती जरी सुरक्षित होत असली तरी या मास्कच्या व्हॉल्व्हमधून विषाणू बाहेर पसरू शकतात आणि हा मास्क कोव्हिड-19 व्हायरसला बाहेर जाण्यापासून थांबवत नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्यसेवा संचालक डॉ. राजीव गर्ग यांनी या पत्रात म्हटलंय.

व्हॉल्व्ह असलेल्या मास्कचा वापर कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत हानिकारक असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं.

सावर्जनिक ठिकाणी वावरताना, कामाच्या जागी आणि प्रवास करताना मास्कचा वापर करावा अशा सूचना भारत सरकारच्या अनलॉकच्या नियमावलीमध्ये देण्यात आलेली आहे.

भारतासह जगभरातल्या अनेक देशांनी मास्क घालण्याविषयी नियमावली तयार केली आहे.

प्रत्येक जण मास्क का घालून फिरतोय?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार फक्त दोन प्रकारच्या लोकांनी मास्क वापरायला हवेत,

· जे आजारी आहेत आणि ज्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत आहेत.

मास्क

फोटो स्रोत, ANI

· जे कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत किंवा काळजी घेत आहेत.

मेडिकल मास्क हे फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवावेत, सामान्यांनी तीन पदर (Layers) असणारे कापडी मास्क वापरावेत असंही WHOनं म्हटलं आहे.

हे कापडी मास्क कसे असावेत, त्याची स्वच्छता कशी राखावी आणि ते घरच्या घरी कसे तयार करता येऊ शकतात याची माहिती WHOने त्यांच्या वेबसाईटवर दिली आहे.

याशिवाय काय सांगण्यात आलं आहे?

संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खोकलणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तीपासून किमान 1 मीटर अंतरावर उभं राहण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे.

जे आजारी आहेत आणि ज्यांना संसर्गाची लक्षणं आहेत, त्यांनी चेहऱ्यावर मास्क बांधावेत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

कोरोना
लाईन

एवढंच नाही तर संघटनेने यावरही भर दिला आहे की मास्क बांधण्याचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही वारंवार स्वच्छ हात धुवून मास्क वापराल आणि वापरानंतर त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जाईल.

युके आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी सोशल डिस्टंसिंगचा अर्थ किमान 2 मीटर अंतर असल्याचं म्हटलेलं आहे.

तोंडातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबातून म्हणजेच ड्रॉपलेट्समधून विषाणूची लागण होते, या आधारावर हे अंतर ठरवण्यात आलेलं आहे. बहुतांश ड्रॉपलेट हवेत विरून जातात किंवा संबंधित व्यक्तीच्या आसपास खाली जमिनीवर पडतात, असं आतापर्यंत मानलं जात होतं.

नवीन संशोधन काय म्हणतं?

अमेरिकेतील, केम्ब्रिजमधल्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलीजी (MIT) इथे हे नवीन संशोधन करण्यात आलं आहे. या संस्थेतल्या संशोधकांनी हाय-स्पीड कॅमेरा आणि इतर सेंसर्स वापरून खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर नेमकं काय घडतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर तोंडातून छोटी मात्र वेगवान अशी हवा बाहेर पडते. याला संशोधकांनी क्लाऊड ऑफ गॅस म्हटलं आहे. या क्लाऊड ऑफ गॅसमध्ये वेगवेगळ्या आकाराचे पाण्याचे थेंब असू शकतात. यातले अतिसूक्ष्म थेंब दूरवर वाहून नेले जाऊ शकतात, असं या संशोधनात आढळून आलं आहे.

प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात हा प्रयोग करण्यात आला. यात असं आढळलं आहे की अशापद्धतीने पाण्याचे अतिसूक्ष्म थेंब खोकलल्यानतंर 6 मीटर तर शिंकल्यानंतर 8 मीटर अंतरापर्यंत जाऊ शकतात.

याचे परिणाम काय होतील?

संशोधनाचं नेतृत्त्व करणाऱ्या एमआयटीच्या प्राध्यापिका लिडिया बोरोईबा यांनी सध्या ज्याला आपण 'सुरक्षित अंतर’ मानतो, त्याबाबत काळजी व्यक्त केली आहे.

त्या म्हणतात, “आपण खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर किंवा उच्छवासानंतर हवा (क्लाऊड ऑफ गॅस) बाहेर सोडत असतो. ही हवा अतिशय वेगाने बाहेर फेकली जाते. ती दूरपर्यंत जाऊ शकते. यात सर्वच आकाराचे थेंब असतात आणि ते देखील संपूर्ण खोलीत वाहून नेले जातात.”

त्या पुढे सांगतात, “त्यामुळे 1 किंवा 2 मीटरच्या अंतरात हे ड्रॉप खाली पडतात, असं आम्ही केलेल्या प्रयोगात दिसत नाही.”

याचा मास्क वापरासंबंधीच्या सूचनेवर परिणाम होईल का?

प्रा. बोरोईबा यांच्या मते जिथे हवा खेळती नाही, अशा खोल्यांमध्ये चेहऱ्यावर मास्क वापरला तर संसर्गाचा धोका कमी होईल.

त्या पुढे सांगतात, “पातळ मास्कमधून हवा गाळली जात नाही आणि म्हणूनच असे मास्क वापरल्याने हवेतील अतिसूक्ष्म कण श्वासाद्वारे आत घेण्यापासून रोखले जाऊ शकत नाही."

cemdk

फोटो स्रोत, AFP

“मात्र, असे मास्क तोंडातून किंवा नाकातून अतिशय वेगाने बाहेर पडणाऱ्या हवेची दिशा बदलू शकतात.”

जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागारांना काय वाटतं?

MIT आणि इतर संस्थांनी केलेल्या संशोधनांचे निष्कर्ष खोकला किंवा शिंकल्यानंतर शरीराबाहेर पडणारे ड्रॉपलेट्स यापूर्वी मानलं जायचं त्यापेक्षा अधिक दूर जात असल्याचं सुचवतात. त्यामुळे या संशोधनांवर विचार व्हायला हवा, असं प्रा. हेमॅन यांचं म्हणणं आहे.

तसं जर असेल तर “मास्क वापरणं हे सुरक्षित अंतर ठेवण्याइतकंच किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्त परिणामकारक ठरू शकेल.”

मात्र, मास्क वापरण्याचीही योग्य पद्धत असल्याचं ते म्हणतात. मास्कने नाक पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे. मास्क ओलसर किंवा दमट (moist) झाल्यास त्यातून संसर्गाचे विषाणू आत जाऊ शकतात. मास्क काढताना त्यावरचे जंतू तुमच्या तळहात किंवा बोटांना लागणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. याशिवाय मास्क पूर्णवेळ घालून ठेवावा लागतो.

ते म्हणतात, “मास्क वापरायचा आणि नंतर सिगारेट ओढण्यासाठी, खाण्या-पिण्यासाठी तो सारखा काढायचा, असं नसतं.”

जागितक आरोग्य संघटनेच्या Strategic and Technical Advisory Group for Infectious Hazards चे तज्ज्ञ पुढच्या काही दिवसात व्हर्च्युअल बैठक बोलावून चर्चा करणार आहेत.

हॉस्पिटलबाहेर मास्क वापरल्याचे मोठ्या प्रमाणावर चांगले परिणाम दिसून आलेले नाहीत, असं इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

ते म्हणतात, “मास्क योग्य पद्धतीने बांधले, वारंवार बदलले, काढताना योग्य पद्धतीने काढले, त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली आणि स्वच्छतेच्या जागतिक निकषांचं पालन करत ते वापरले तरच त्याचा उपयोग होतो."

मास्क

फोटो स्रोत, Getty Images

दीर्घकाळ मास्क वापरणाऱ्यांपैकी अनेकांचं नंतर नंतर मास्क वापरण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष होतं आणि हलगर्जी होते, असंही एका संशोधनात आढळून आलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)